Login

पसंत आहे मुलगी भाग २४

“हा आई बोल....” “अरे संदिप कधीपासून फोन करतीये तुला...” सिदची आई जरा चिडून बोलली.. “अगं आई, एक कॉन्फर?

भाग २४

हा आई बोल....

अरे संदिप कधीपासून फोन करतीये तुला... सिदची आई जरा चिडून बोलली..

अगं आई, एक कॉन्फरन्स मिटिंग होती. थोडा बिझी होतो. बोल आता फ्री झालोय... संदित आईला समजावत बोलला.

अरे कसा आहेस, माझी सून कशी आहे., काही फोन वगैरे करत नाहीस तू, आम्ही आपलं इथं काळजी करत बसलोय...

आई... आई..., आम्ही दोघं पण मजेत आहोत..., पुढच्या आठवड्यात येतोय पुण्यात...,

अरे देवा, बरं होईल... तुम्ही सगळी पोरं अशी बाहेर गेलात, आम्हा दोघांना करमेना इकडं.. त्या सिध्दूला फोन करतीये तर त्याच्या मित्रांचाच एवढा गोंगाट काही ऐकूही येईना... आई तक्रारीच्या सूरात बोलली..

हो... मी पण केलेला मगाशी त्याला... काय स्वारी हनिमूनला गेलेली दिसतीये... तेही मित्रांसोबत... काय खरं नाही आपल्या सिदचं.. संदीप हसत म्हणाला.

काय करतोस मग बाबा, तू अन् रूचा काही मनावर घेत नाही मग सिदला तरी घेऊदे... तीशीत पोहचली पोरं अजून नातवंडं नाहीत.. शेजारी-पाजारी बायका टोमणे मारतात मला सारखं...

आई... झालं का तुझं सुरू..., अगं मला फोर्स करतीयेस ते ठिक आहे... आता सिदला आणि आशूच्या पण मागे लागलीस का... नुकतंच लग्न झालंय.., जरा लाईफ पण एन्जॉय करू दे..., त्यात ती अबोल, शांत आशू..., जरा दोघांना एकमेकांमध्ये नीट मिसळू तर दे...

अरे त्यांचं नवीन लग्न झालंय.,पण तुझं तर नाही ना तसं..., तू कसली वाट पाहतोयस..., ते काही नाही, आता येशील ना पुण्याला तेव्हा काहीतरी गोड बातमीच घेऊन ये बघ.. आई चिडत पण मश्किरी करत म्हणाली...

संदीपला जोरजोरात हसू आलं... आई..., काय तू पण... गोड बातमी काय खाऊ आहे का..., हे असं घेऊन ये बोलतीये.,

आईपण हसू लागली.....,

***

रात्रंभर प्रवास करून सकाळी अकरा वाजता ट्रेन गोव्याला पोहचली. ठरलेल्या डेस्टिनेशनला सगळे उतरले आणि बुक केलेल्या हॉटेलमध्ये रवाना झाले...,

आपण इथे एन्जॉय करायला आलोय हे विसरून सगळे पहिले आपापल्या रूममध्ये गेले...,

सिद-आशू मात्रं वेड्यासारखे एकमेकांकडे पाहत उभे राहिले...,

सिद हसत म्हणाला, अरेच्छा... माझे मित्रं पण ना हे असे आहेत..., वेट मी आलोच....,

सिद बॉईजच्या रूमच्या दिशेने गेला....,

अरे सिध्द्या, जा रे.., चार वाजेपर्यंत झोप घेतोय आम्ही. तुही जा... संध्याकाळी छान सनसेट पाहू...फोटो काढू, समूद्रात नाचू एन्जॉय करू..., आता जेवायचं असेल तर वहिनी आणि तू खाऊन घ्या काहीतरी.., आम्ही तरी काही आता जेवण्याच्या मनस्थितीत नाही..., अभ्या आतूनच अर्धा दरवाजा उघडा ठेवून बोलत होता...,

अरे अभ्या.. वेडायस का तू... मला आत घे की मग.. मी काय खाली हॉलमध्ये झोपू काय... सिद दरवाजा आत ढकलत बोलला...

तेवढ्यात संकेत आला आणि आतून दरवाजा जोरात ढकलत बोलला, निघतो का...., तूझी आणि वहिनींची वेगळी रूम बूक केलीय आम्ही... सरळ जायचं आपल्या खोलीत... चल...., संकेत त्याला दम भरत बोलला....

सिदने डोक्याला हात लावला...,आणि आता घरच्यासारखं इथंही अवघडल्यासारखंच राहायचं...., तो बारीक तोंड करून खाली आला. त्या दोघांच्या बॅगा घेतल्या आणि चालू लागला..

आशू त्याला थांबवत बोलली, काय झालं..., कुठे आहेत सगळेजण...?”,

सिद तिच्यासोबत चालत बोलला, गर्ल्स आणि बॉयज वेगवेगळ्या रूममध्ये आहेत..., आपण कपल्स आहोत ना तर आपल्याला वेगळी रूम बुक केलीय... सो तिकडेच जावं लागेल कारण माझंही सगळं अंग जाम दुखतंय... झोपण्याशिवाय आता गत्यंतर नाही....

सिद असं म्हणत रूम उघडून आत गेला...,

आशू तशीच अस्वस्थ चेहऱ्याने आत आली...

आत येऊन पाहतात तर त्यांची रूम सुंदर गुलाबाच्या फुलांनी सजवलेली होती... बेडवर गुलांबाचा थर टाकला होता, वॉलवर सिद लव्ह आशू असं लिहिलं..., रूमच्या सगळ्या खिडक्या बंद होत्या आणि त्या अंधारात रूमला केलेल्या रंगेबीरंगी लाईटिंगमुळे वेगळाच लूक आला होता...

काही क्षण सिद-आशू तो रूम डोळे भरून पाहू लागले..., त्यांची ती रात्रं त्यांना आठवत होती...., सिदचे गाणे, आशूचे लाजणे..., सिदचा जोक, आशूचे नाजूक हसणे..., आणि.............,

आशूचा ते भाजलेलं शरीर आणि कानशिलात तेल ओतल्यासारखी सिदची ती किंकाळी....,

दोघेही त्या आठवणींतून बाहेर आले., अस्वस्थपणे एकमेकांकडे पाहू लागले...,

सिदने क्षणाचाही विलंब न करता सगळ्या खिडक्या उघडल्या, लाईट चालू केली, वॉलवर चिकटवलेली त्यांची नावं काढली, वर फॅनला भिंतीला चिकटवलेले फुगे काढून टाकले..., बेडवरच्या गुलाबाच्या पाकळ्या खाली झटकल्या आणि आशूकडे पाहून हसत म्हटला., वेडेच आहेत माझे मित्रं..., एवढं डेकोरेशन करायला काय खरोखरंच हनिमूनला थोडीच आलोय आपण...., सिदने हसतच बेडवर अंग टाकले..., दुसरी उशी अंगावर घेऊन तो डोळे मिटून पडला..,

आशूच्या डोळ्यात पाणी साचलं होतं..., पण आता सुटायचंय ना यातून, हे लग्नं नावाला होतं, दादा नि बाबांच्या हौसेसाठी होतं..., सिदला आलेल्या वाईट अनुभवासाठी होतं..., मग आता वाईट वाटून रडून काय फायदा...,

आशूने डोळ्यात आलेलं पाणी बाजूला सारलं आणि तशीच जवळच्या खुर्चीवर बसून राहिली....,

सिद मात्र पडल्या पडल्या झोपी गेला....,

दोन-तीन तास झाले.., आशू पुस्तक वाचत खुर्चीवर बसली होती..., तिला फ्रेश व्हायचे होते, पण सिद आल्याआल्या बेडवर पडल्यामुळे ती त्याला बाहेर जा असं म्हणू शकत नव्हती..., पण आता तो गाढ झोपलाय हे पाहून ती फ्रेश व्हायला गेली...,

थोड्यावेळाने,

सिदच्या तोंडावर पाण्याचे फवारे पडत होते.. त्यात संपूर्ण रूममध्ये एक वेगळाच सुगंध दरवळत होता..., सिदने पुसटसे डोळे उघडून पाहिलं तर आशू तिचे केसं टॉवेलने पुसत आरशासमोर उभी होती...,

सिदचे पुसटसे डोळे पूर्ण उघडले गेले, डोळे मोठे करून, आ वासून तो आशूकडे पाहू लागला.

मोरपंकी रंगाचा ड्रेस, मागे पाठीवर लोंबणारे ते लांबलचक ओले केस.., चेहऱ्यावर कसलाच मेकअप नसतानाही आलेलं ते तेज..., नाजुकशी हनुवटी आणि मनाला वेड लावणारे तिचे पाणीदार बोलके डोळे.....,

आशू आपली आरशात स्वतःला न्याहाळत होती, तिचं सिदकडे लक्षं नव्हतं....

सिद तसाच बेडवर उठून बसला..., तिच्याकडे एकटक पाहत...,

आपण त्या रात्री जी मुलगी पाहिली ती ही नव्हेच, ते कदाचित आपलं स्वप्नं असावं, वाईट स्वप्नं....,

जिची गालावरची खळी पाहून आपण गालात हसलो ती ही मुलगी, जिला पाहून पहिल्यांदा पोटात गोळा आला ती ही मुलगी, जिचा नाजूक आवाज ऐकून मनाच्या तारा छेडल्या गेल्या ती ही मुलगी, जिला पाहून मनात उद्गार आले, पसंत आहे मुलगी..... ती ही मुलगी....,

सिदच्या चेहऱ्यावर सुखद हसू पसरलं...., तो बेडवरून उतरून तिच्या दिशेने येणार एवढ्यात बाहेरून चैतूने दार ठोठावलं,,,,

सिध्द्या...., सिद....., दोन तीन वेळा तिने आवाज दिला...,

तेवढ्यात आशूने मागे पाहिले तर सिद तिच्या मागे उभा होता..., ती कावरी बावरी होत तिथून दार उघडायला गेली...,

आशूला पाहून चैतू काहीक्षण स्तब्ध झाली...., ती आज जरा कालपेक्षा जास्तच छान दिसत होती..., तिने आत सिदकडे पाहिले, तो तर एका वेगळ्याच विश्वात होता..., त्याच्या चेहऱ्यावरून एकंदरित रूममधले वातावरण चैतूने ओळखले...

ओ सॉरी, चुकीच्या वेळी आले का मी....?”, चैतू म्हणाली..

नाही नाही, बोल ना..., आशू हलकेसे स्मित देत म्हणाली...

अगं... आराम करून झाला असेल तर जायचं का आपण बाहेर हे विचारायला आले होते..., बाकीचे कुणीच उठायला तयार नाहीत, म्हटलं तुम्ही दोघं असाल रेडी....,

तेवढ्यात सिद पुढे आला आणि म्हणाला, नाही नाही आम्ही अजून रेडी नाही झालो... तू जा..., हे बघं ना ह्या मॅडम अंघोळ वगैरे करून फ्रेश झाल्यात पण मी तर आत्ता उठलोय झोपेतून..., आम्ही दोघं आवरून येतो... तू जा आता....

सिद एकदम तिला हकलण्याच्या सुरात बोलत होता आणि अधूनमधून आशूकडे पाहत होता...,

चैतूला राग आला..., ती मुद्दाम आशूला म्हणाली, चल मग आशू.. तू येतेस का...?”

तेवढ्यात सिद म्हणाला, काय गं आपले बेंगलोर वाले पाहुणे कुठे गेले..., आणि तुझ्या नवऱ्याला सोडून तू आम्हाला काय बोलवतीयेस... सिद हसत हसत आशूच्या खांद्यावर त्याच्या हाताचा कोपरा रेलत म्हणाला.

नेहमीप्रमाणे सिद चैतूचा अपमान करत होता... आधीपासून तिला सिद खूप आवडायचा पण दरवेळेस तो तिच्याशी असंच वागायचा..., तू इतर मुलींपेक्षा वेगळी असंही म्हणायचा पण कधी निवांत मनातलं बोलावं म्हटलं की असा सरळ-सरळ अपमान...,

चैतू खूप दुखावली... ती नाराज चेहऱ्याने बोलली, कार्तिकची अचानक एक मिटिंग ठरली... सो तो तीच अटेंड करतोय....

ओह माय गॉड...., हनिमूनला पण मिटिंगच करतोय तुझा हबी... चैते काय गरज काय होती एवढा करोडपती नवरा शोधायचीं....?”

आशूला हे सगळं ऐकून त्यांच्या दोघांच्या मध्येच उभे राहल्याचं फिल आलं ती लगेच तिथून आत जायला लागली तेवढ्यात, चैतू म्हणाली, हवा तो मिळालाच नाही मग जो मिळाला तो आपलासा करावा लागला...

हे ऐकून आशूने आश्चर्याने मागे पाहिले....

चैतू विषय बदलत बोलली, बाय द वे सिध्द्या तू तुझ्या बायकोला कसल्या बंधनात वगैरे ठेवतो का रे, कालपासून बघते तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसतच नाहीये मला..., आणि काय रे गोव्या सारख्या ठिकाणी हनिमूनला घेऊन आलास तिला तरी हे असले पंजाबी ड्रेस घालायची सक्ती करतोस की काय तिच्यावर....?”

हे ऐकून आशू अजून अस्वस्थ झाली..

नाही तर, मी कसली सक्ती वगैरे नाही करत... सिद एकदम तोंड पाडून बोलला.

मग सांग ना तिला एखादा छान वनपीस किंवा शॉर्ट घालायला..., एवढी सुंदर आहे तुझी बायको आणि हे काय असले गबाळ्यावाणी राहायला लावतोस तिला...?”

चैतू सिदवरच्या बदललेल्या छटांचं चांगलंच निरिक्षण करत होती...

सिदला आलेला गेलेला सगळा उत्साह झटक्यात निघून गेला....,

तो आत जात बोलला, आशू तुला जायचं असेल तर जा हिच्यासोबत.. मी आलोच फ्रेश होऊन....,

हे ऐकून तर चैतू आश्चर्याने दोघांकडे पाहू लागली...

आता सिद फ्रेश होताना इकडे बसण्यापेक्षा बाहेर गेलेलं बरं... आशूने मान हलवली आणि चैतूसोबत निघाली..

चैतू आश्चर्याने पाहत म्हणाली, हे काय.. काही क्षणांपूर्वी मला हकलत होतास आता स्वतःच तिला पाठवतोय...?”

चैताली,, चल ना..., तो येईल फ्रेश होऊन.. असं म्हणत आशूने दार लावून घेतले....

सिद इकडे बेडवर बसून खाली फेकलेल्या फुलांकडे पाहत होता...., त्याचे डोळे पाणावले होते....,

काय झालंय आपल्या आयुष्याचं...ह्या फुलांसारखं कुस्करून गेलंय आपलं आयुष्यं. नाही नाही म्हटलं तरी पुढे जातच नाहीये माझं आयुष्यं.  असं वाटतंय आता जावं आणि समुद्राच्या तळाशी जाऊन बसावं. अंगावर सगळं पाणी झेलावं आणि पाण्यात डुबून मरून जावं.....,

ऐय, पाण्यात डुबून मरणाऱ्या लेकरा..,, कुठे... कुठे जायचा प्लॅन चालू आहे?” रूममध्ये येत संकेत बोलला.

अभ्या आणि तेज्या संकेतच्या मागे आले.

या सर्वांना पाहून सिदने वाकडं तोंड केलं आणि म्हणाला, या तुमचीच कमी होती... या या..., बसा.... सिद उठला आणि त्या सर्वांना त्या बेडवर बसवलं...

तिघं एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले...

सिदने खाली पडलेल्या गुलाबाच्या पाकळ्या मुठीत घेऊन त्या तिघांना मारू लागला..

साल्यांनो, कुणी सांगितलं हे सगळं डेकोरेशन करायला..., माझ्या जखमेवर मीठ चोळताय का तुम्ही...?” तो हाताने पण त्यांना मारू लागला..

ए, सिद..., राव मारतो कशाला..., थांब थांब... तिघंही ओरडू लागले...

मारू नाय तर काय करू..., का यार तुम्ही ह्या हनिमूनचा वगैरे प्लॅन केला. संक्या तुला सांगितलंय ना मी, आम्ही डिवोर्स घेणार आहोत आता...., सिद खूपच वैतागत म्हणाला.

तिघंही एकमेकांकडे पाहू लागले...

तुम्हाला हे सगळं माहितीय तरी तुम्ही का ही सगळी नाटकं लावली आहेत. पाच मिनिटात हा इथला कचरा साफ करायचाय, नाहीतर तुम्हा तिघांना या रूममध्ये कोंडून ठेवेल. मग करत बसा काय हनिमून करायचाय तो... सिद असं रागात म्हणाला आणि फ्रेश व्हायला वॉशरूममध्ये निघून गेला.

तो गेला तसे हे तिघं मोठमोठ्याने हसू लागले....,

आम्हाला कोंडून ठेवतोय... कोंडून तर तुला ठेवलं पाहिजे आम्ही.... चांगली आयडिया दिलीस.... संकेत हसत म्हणाला..

मी तेच म्हणतोय, असा काहीतरी प्लॅन करू ना की आशू वहिनी आणि सिध्द्या चोवीस तास एकमेकांसोबत पाहिजे..., तेज्या म्हणाला.

एका दिवसात दोघांमधला दुरावा दूर होईल... अभ्या हसत म्हणाला...,

नको, पण आता जसा चिडला तसाच चिडेल परत..., तसं काही नको करायला..., आपण तो रात्रीचा प्लॅन केलाय तो पाहू कसा पार पाडतोय, मग पुढंच पुढं बघू... संकेत हळूच म्हणाला..

बरं बरं, ठिके..., आता ही फुलं उचलूया नाहीतर आपल्याला कोंडून ठेवायचा सिध्द्या.... अभ्या हसत म्हणाला....,

संकेत आणि तेज्यापण हसला....,

****

तुमचं अँरेंज मॅरेज झालं हे ऐकूनच खूप अप्रुप वाटतंय मला. सिद नेहमी म्हणायचा अगं की तो लव्ह मॅरेजच करणार, त्याच्या स्वप्नातली सुंदरी भेटायला वेळ लागेल पण तो लव्ह मॅरेजच करणार... त्याने अँरेंज मॅरेज केलं हे ऐकून शॉक बसला.

बीचवर समुद्राच्या लाटा पाहत त्या दोघी उभ्या होत्या.

चैतूचे बोलणे आशू शांतपणे ऐकत होती.

कशी झाली गं तुमची ओळख, म्हणजे तू त्याच्या नात्यातली वगैरे आहेस का..., स्थळ कसं आलं सिदचं तुला....?”

आशू शांतपणे म्हणाली, वधूवर सुचक मंडळात नाव नोंदवलं होतं मी....

चैतू एकदम हसूच लागली... काय सांगतेस काय,, तुझं नाव म्हणजे सिदचं पण असणार..., सिदने वधुवरसूचक मंडळात नाव नोंदवण्याइतपत त्याच्यावर वाईट वेळ आली होती चैतू मोठमोठ्याने हसत होती.

यात हसण्यासारखं काय आहे.

नाही..., लग्नं होत नसेल ना तर लोकं वधूवरसुचक मंडळात नाव नोंदवतात..., असं खुद्दं सिदंच बोलायचा..... चैतू हसत म्हणाली.

आशूने डोळे फिरवले, असं काही नसतं., किंवा असेलही.

म्हणजे... चैतू शांत होत म्हणाली.

तेच, सिद्धार्थचं होत नसेल लग्नं म्हणून त्याच्या वडिलांनी नोंदवले असेल त्याचे नाव. आशू म्हणाली.

नाही गं, असं नाही होणार. सिद सारख्या मुलाला कोणती मुलगी भेटणार नाही, शक्यं आहे का हे?”

आशूला समजत नव्हते, चार-पाच वर्षं ग्रॅज्युएशन क्लिअर करू न शकणाऱ्या ह्या सिदला कशा कोणत्या मुली स्विकारू शकतात.

तसा सिद फार हुशार आहे हं... तो वर्गात पहिला येत नाही, पण त्याने मनावर घेतलं असतं तर ते पण त्याच्याकडून शक्यं झालं असतं. तो काहीही करू शकतो. तो इम्पॉसिबल मुलगा आहे. जग इकडचं तिकडं नेऊ शकतो तो...., जाम भारीय तो....,

आशू हे ऐकून शांतच होती.

तुला सांगते, कदाचित सिदने हा किस्सा तुला सांगितला नसेल.  आमच्या क्लासमध्ये ना एक मुलगी होती, थोडी बुटकीच होती ती. त्या मुलीला सिद फार आवडायचा...

हे ऐकून आशूने डोक्यालाच हात लावला. आता हे नवीन प्रकरण, असं मनाशी म्हणत ती ऐकू लागली.

बुटकी होती, बसकी होती पण दिसायला मस्त होती हं..., पण बुटकी म्हटल्यावर हसण्याचा विषयच ना गं

आशू कान देऊन ऐकू लागली...,

तिने एक दिवस सिदला प्रपोज केलं पण सिदने तिला साफ नकार दिला बरं. पण त्याने दिलेल्या नकारामुळे आमच्या क्लासमधले सगळे पोरं तिला चिडवू लागले. आता सिद किती हँडसम आहे हे तुला सांगायला नकोच. त्या दोघांची बरोबरीच करणं शक्यं नव्हतं. अगं आम्ही पण तिला खूपदा हसायचो, पण सिद मात्रं नेहमी तिच्याशी चांगलंच बोलायचा, तिच्यासोबत एक दोन वेळा त्याने डब्बाही खाल्ला., पण मुलं काय गं, तिला चिडवायचे ते चिडवायचेच. हळूहळू तिला सिद आवडतोय हे आख्ख्या कॉलेजमध्ये पसरलं. जो तो तिला सिदच्या नावाने चिडवू लागला. एकदा ती कॉलेजमध्ये येत होती आणि एका मुलाने तिला सिदच्या नावाने चिडवलं...., चैतू सांगता सांगता हसू लागली.

मग, मग काय झालं?” आशूने कुतूहलाने विचारले.

मग काय, सिदला जावं लागलं जेलमध्ये, आणि सिदच्या बाबांनी पोलिसांना पैसे देऊन त्याला सोडवून आणलं

म्हणजे, मला समजलं नाही...

अगं धुतलं ना त्या पोराला त्याने. दात पाडला त्याचा एक. त्याच्या वडिलांनी हाफ मर्डरची केस केली सिदवर. मग काय घरी सिदलापण त्याच्या बाबांनी चांगलाच धुतला आणि चौकीत पोलिसांनी पण....

आशू जरा घाबरलीच. आधीच तिच्या घरात हा असा क्रूरपणा चालायचा. पण सिदही मारामारी करतो हे ऐकून ती जरा शॉकच झाली....,

त्या मुलीचं काय झालं मग पुढे....?” आशूने विचारले.

तिचं लग्नं लावून दिलं तिच्या आई-वडिलांनी. ती हसत पुढे बोलली, सिध्द्या पण गेलेला तिच्या लग्नाला...

हे ऐकून आशूला बरं वाटलं. ती मनातल्या मनात विचार करत होती, सिध्दार्थ खरंच खूप चांगला मुलगा आहे, अशी मुलं जगात असतील तर कोणत्याच मुलीचं आयुष्य बरबाद होणार नाही. बिचाऱ्याचं सगळं चांगलं व्हावं, लवकरच त्याला मी माझ्या टेन्शनमधून मुक्तं करणार आहे. त्याच्या स्वप्नातली स्वप्नसुंदरी लवकरच त्याला भेटावी...

काय गं काय विचार करतेस.... चैतालीने विचारले.

काही नाही आशू स्माईल देत म्हणाली.

तेवढ्यात तिथे सगळे बॉईज आले...,

सगळेजण बीचवर फोटो काढण्यात मग्न झाले आणि चैतूपण त्यांच्यामध्ये सामील झाली...

आशू तिथे असल्याने सिदला काही मनसोक्त मस्ती करता येत नव्हती...

तो उगाच तिच्या शेजारी येऊन थांबला आणि म्हणाला, तुला नाही आवडत का पाण्यात खेळायला...?”

ती म्हणाली, नाही...

अच्छा, ओके.... तो एवढेच बोलला.

तेवढ्यात तिथे चैतू येऊन म्हणाली, आशू, चल न जरा एन्जॉय करूया ना..., हनिमून आहे म्हणून काय दोघांनीच नाही गप्पा मारत बसायचं... फ्रेंड्सपण आहेत इथे... ती सिदकडे पाहत म्हणाली...

आशू म्हणाली, नाही, नको तुम्ही करा सर्वजण एन्जॉय... मी आहे इथं...

तेवढ्यात सिद म्हणाला, आम्ही....

आशूने त्याच्याकडे पाहिले...

सिद हसत म्हणाला, मला पण हे असं पाण्यात वगैरे खेळायला आवडत नाही,....छान मला चौपाटीवर फेर-फटका मारायला आवडतो...

वॉव, मलाही आवडेल ते...आशू आनंदाने म्हणाली.

चल, मग....तो म्हणाला.

असं म्हणत ती दोघं चालू लागली....,

थोडावेळ कुणीच काहीच बोलत नव्हतं.. शेवटी सिदनेच सुरूवात केली, तुला एक विचारू?

ती म्हणाली, ह्म्मम...

तो थांबला..

ती पण थांबली...,

सिद तिच्याकडे पाहत म्हणाला, तुला एवढं डेंजर कसं काय भाजलं आणि ते ही....

तो पुढे काही बोलू शकला नाही....,

तिच्या मनात चर्र झालं..., त्या वेदना जणू काही तिच्या ताज्या झाल्या....,

तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं...,

तो उगाच तिला शांत करत म्हणाला, अगं नसेल सांगायचं तर नको सांगू.., तसंही तो विषय काढून मलाही त्रासच होतो...

दोघांनाही उसना आलेला सगळा मूड गेला...,

ती म्हणाली, मला तुला सांगायचं आहे.., सगळं...

यावर मात्रं सिद कुतूहलाने तिच्याकडे पाहू लागला...,

पण तेवढ्यात संकेत आणि अभ्या तिथे आले...

हॅलो, लव्ह बर्ड्स..., चला अंधार पडत आलाय..., इथे रात्रीचं बीचवर परमिशन नाही... चला लवकर....

आशूला अजून काय सांगायचं हे ऐकणं अर्धवटच राहिलं.., पुन्हा सिद मोठा प्रश्न घेऊन हॉटेलमध्ये आला...,