Login

पसंत आहे मुलगी भाग 22

सात दिवस त्यांचा हाच दिनक्रम चालू होता. दिवसा त्यांच्यामध्ये काही बोलणं होत नव्हते आणि रात्री

पसंत आहे मुलगी... भाग २२

सात दिवस त्यांचा हाच दिनक्रम चालू होता. दिवसा त्यांच्यामध्ये काही बोलणं होत नव्हते आणि रात्री हॉलमध्ये अभ्यास करत रात्र जात होती...,

सिदला कुठेतरी वाटत होते की आपण परिक्षा पास व्हावी आणि आशूलाही कुठेतरी वाटत होते की सिदने काहीतरी डिग्री मिळवावी.

दोघांच्या प्रयत्नांना चांगलेच यश मिळाले, सिदला सगळेच पेपर चांगले गेले. प्रत्येक पेपरला कॉपी करणारा मुलगा आज मनाने पेपर लिहित होता. सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होते...

पेपर होताच सर्व मित्रांनी सिदजवळ घोळका घातला...

सिध्द्या... चांगला पेपर छापत होतास की, काय यावेळ जोरात अभ्यास केलेला दिसतोय....?” अभ्या म्हणाला.

हो मग..., जरा खांद्यावरचं ओझं हलकं करायचं म्हणतोय, केट्यांवर केट्या..., त्यातच जीव जायचा माझा..., म्हणून घेतलं आता मनावर..., असं म्हणत त्याने बॅग खांद्यावर अडकवली, आणि फोन बाहेर काढून आशूला फोन लावू लागला.

अरे.. पेपरचं मरूदे.., आता तू वेगळीच गोष्टं मनावर घेतली पाहिजेस..., दुसरा एक मित्र सहज सिदला हे बोलून त्याच्या खांद्यावर मारत बोलला.

तसा सिद स्तब्ध झाला...

अरे असा काय बघतोय...?”तो दुसरा मित्र बॅगेत पेपर टाकत म्हणाला..,

नाय रे... त्याने आशूला लावलेला फोन कट केला.. आणि उगाच इकडे तिकडे पाहत उभा राहिला...

चल सिध्द्या..., आपली गँग शोधूया.. अजून आली नायत..., अभ्या सिदची मनस्थिती समजत म्हणाला..

हो... जा तू बघ ह्या पुढच्या वर्गात आहे.., थांबतो मी इथं...

तोपर्यंत दुसरा मुलगा म्हणाला, सिध्द्या..., लग्न बाकी भारी झालं राव तुझं..., अडाणी अडाणी समजत चांगलीच बायको मिळाली की तुला..., आणि आमचं बघ.. अजून एकं मुलगी हा बोलंना...,

का रे...?”, सिद पडक्या तोंडानं बोलला.

अरं काय सांगू.., सगळे शिक्षणावर येतात... आता दोन वर्षे मी बिझनेस करत होतो हे नाही कुणाला दिसत... लोकांना बिझनेस करणारे जावई नको असतात.. नोकरी करणारे हवे असतात.. त्यात मुली म्हणत्यात दिसायलाच असाय, काळाच हाय... अऱं काये..., म्हणून मी ना आता हे शिक्षण देणारे सोडून, पयला जॉब बघणारे...,

असं काही नसतं रे... जे नशीबात असतं ते होतंच... सिद खाली मान घालून बोलला...

तेच ना तू लकी आहेस..., तू तर पाच सहा वर्षे केट्या क्लिअर करतोय.. म्हणजे तुझी शैक्षणिक पातळी फारच.... तो वाकडं तोंड करत त्याला चिडवत म्हणाला... त्यात तू जॉब करतो का रे...?” त्याने मुद्दाम टोमणा मारत विचारले...

हो..., करतोय ना...,

कुठं.. कोणता...?”,

आहे स्टेशनला एक ऑफिस..., ऑफिसबॉय..

तो मित्र मोठमोठ्याने हसला..., तरी तुला त्या डॅनीभाईची बहिण कशी दिली असंल रे... ती म्हणत्यात बारावीला त्यांच्या शाळेत पहिली आलेली... पोस्टर लागलेले सगळीकडे..., अश्विनीच ना...?”, त्याने विचारले..

ह्म... तो इकडे तिकडे पाहत म्हणाला...

लय हुशार मुलगी, त्यात राजकीय पार्श्वभूमी..., अरं लहानपणी आमच्या ट्युशनमध्ये एडमिशन घेतलेलं तिने...एक दिवस क्लासला आली..., आख्खा वर्ग तिच्यामागे फिदा होता..., तिच्या त्या डॅनीभाईला कळालं... तो अर्ध्या क्लासमधून तिला घरी घेऊन गेला... बाकी काही म्हण लयंच सुंदर बायको मिळाली तुला... आम्हाला वाटायचं तो डॅनी त्याच्या बहिणीचं लग्न चांगल्या मुलाशी करंल..., छान इंजिनीयर, डॉक्टर नि काय काय... पण त्यानीं तर.... तो खिल्ली उडवत हसला..

तुला काय प्रॉब्लेम काय रे... ती सुंदर आहे हा की मी अडाणी आहे हा... का तुझं अजून लग्न होत नाहीये हा.....?”

तो हसत म्हणाला, तिच्या बाबांनी तुझ्याशी लग्न लावून दिलं हे बरंच केलं.., एक गोष्ट सांगू का...  राग नाय वाटून घ्यायचा हं... तुला माहित असंल नसंल, म्हणून सांगतो, तो इकडं तिकडं पाहत म्हणाला..

सिद त्याच्याकडे एकटक पाहत म्हणाला, काय... कोणती गोष्ट...?”

सिदचा रागीट चेहरा पाहत तो त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, जाऊ दे काही नाही...,

दिप्या... कोणती गोष्ट...? काय सांगायचंय..?” सिद त्याच्याच खांद्यावर हात ठेवत म्हणाला.

अरे..., अश्विनी..., म्हणजेच आता आमची वहिनी..., अरे मला त्यांचा फॅमिली बॅग्राउंड सगळा माहितीय..., मरता मरता....

तो पुढे बोलणार इतक्यात संकेत, तेजस, अभ्या तिथे आले...,

सिध्द्या चल राव लय भूक लागलीये... चल चल..., संकेत दूरूनच ओरडत आला..

अरे तुम्ही जा..., मला दिप्याशी बोलायचं थोडंस...

अरे नाय नाय.., जा तू., नंतर बोलू..., मला बी जायचंय लवकर.. चल बाय...दिप्या म्हणाला.

सिद अस्वस्थ झाला.. अरे तुझा नंबर दे.., तो पटकन बोलला पण तोपर्यंत तो दिपक निघून गेला होता...

चल चल.. काय महत्त्वाचं बोलतोयस.. नंतर बोल..., आता मला सांगा कॅन्टीनमध्ये नाष्टा करायचा की बाहेर कट्ट्यावर बोला पटकन... संकेत सिदबरोबर सगळ्यांना विचारले.

बाहेर कट्ट्यावर ठिके..., कॅन्टीन नको..., अभ्या म्हणाला..

आणि सगळेजण बाहेर निघाले.., पण सिद मात्र वेगळ्याच विचारात होता...

आशूचं फॅमिली बॅकग्राउंड दिप्याला माहितीय... मलाही माहितीय.. मग त्यात सांगण्या सारखी कोणती गोष्ट..., तो त्याच विचारात मित्रांच्या मागं मागे चालत होता...

बाहेर कट्ट्यावर सगळे मित्रं मैत्रिणी जमले...

सिद.., तुझ्या बायकोचा पण आज पेपर होता ना रे...?”, रियाने त्याच्या हातात चहाचा कप देत म्हटले..

ह्म... त्याने मान डोलावली...

सिध्द्या..., कसल्या टेन्शनमध्ये आहेस..?”, तेज्याने विचारले..

नाय रे कसलं नाय..., सिद चहा पित म्हणाला..,

तेवढ्यात समोरून टिना आणि डॉली आली... सिद त्यांना पाहूनच दूर गेला... तो आधीच वेगळ्या विचारात होता, त्याला घोळक्यात थांबण्याचे मन झाले नाही...

सिदला कोपऱ्यात बसून चहा पिताना पाहून संकेत त्याच्याजवळ आला, सिद.. काय झालंय...सकाळी मस्त मूडमध्ये होता, आत्ता अचानक का असा गप आहेस... वहिनींशी पुन्हा काही...

काही नाही झालं रे... तो दिप्या काहीतरी सांगत होता मला.., आशूबद्दल बोलत होता.., तुम्ही साल्यांनी बोलू पण दिलं नाही...

सिद.. आता का सारखा सारखा तो विचार करतोयस..., तुझं सगळं क्लिअर झालंय ना..., तुला राहायचंय ना वहिनींसोबत आयुष्यभर, झालाय ना तुझा विचार, मग का तिची अशी लोकांकडून माहिती काढतोय...?”

संकेत यार मी माहिती नाही काढत आहे..., तो स्वतः मला येऊन बोलला... आता तिच्या बाबांबद्दल तर आख्ख्या शहराला माहिती आहे पण तो मात्र आशूबद्दल काहीतरी बोलत होता.., एक गोष्ट सांगू का असं बोलला, आणि अर्धवट बोलून निघून गेला.. नक्की त्याला काय सांगायचं होतं देव जाणे... तुला सांगतो संक्या, धक्क्यांवर धक्के खाऊन पुरता खचलोय यार मी...,

तू वहिनींशी बोललास का..?” संकेतने गंभीर चेहऱ्याने विचारले.

कशाबद्दल...?”

तेच... हे सगळं कसं झालं म्हणून...?”,

नाय यार... तो विचार करूनच मला किळस येते.. तो तोंड वाकडं करून असं बोलला व पुन्हा संकेतकडे पाहिले..

मी नाय सांगू शकत संक्या तुला... सिद चहाचा कप कट्ट्यावर ठेवत बोलला... मला ना पुढं काय होणार आहे हे माहित नाही पण सध्द्या तरी मला तो विचारच करायचा नाहीये, कारण तिचं ते रूप पाहणं माझ्याच्यानी शक्य नाही..., मी जे सहन करतोय ना ते असह्य होतंय आता आणि तो विचार करून मला उलटीसारखं..., सिद असं म्हणाला आणि नकळत त्याच्याच डोळ्यातून पाणी आलं...,

सिद राव रडतोयंस तू... एवढं टेन्शन नको घेऊ रे.. चल जरा दूर जाऊन बोलूयात..., ह्या सगळ्यांनी ऐकलं तर आणखीन इश्यू....

दोघेही जरासे लांब येऊन उभे राहिले...

पण सिध्द्या तू एटलिस्ट त्यांना विचार तरी की हे कशामुळे झाले का झाले.. तू बोलणार नाहीस तर कसं क्लिअर होणार आणि मला सांग असं किती दिवस तू तो विचारच काढणार नाही...?”

मला नाही माहित यार.., पण प्लीज नको... मी तिला मैत्रीण मानतो, मी माझं मन एवढं स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करतो की मला तिच्यात आता कुणीच दिसत नाही, तिच्या चेहऱ्याकडं पाहिलं तर तिचं ते शरीर आठवतं आणि मग उसणं आवसान आणून तिच्याशी बोलायचं धाडस करतो मी..., तिच्या मनाचा विचार करतो मी पण माझं मन मारून...

संकेत शांत उभा होता..,

मला टेन्शन येतंय राव तुझी ही अशी अवस्था पाहून..., संकेत पुढे म्हणाला.

कळत नाय रे सांगू कुणाला.. कोण समजून घेईल मला.., पण आता ना आई-बाबांना त्रास नाय द्यायचाय मला... जे चाललंय ते चालूदे.. कधीतरी येईल त्या देवाला माझी दया... असं म्हणत सिद पुन्हा कट्ट्यावर येऊन बसला...,

काय होता हा मुलगा, काय लाईफ होती याची...,

लग्न झालं की सर्वात महत्त्वाचा असतो तो हनिमून, दोन मनं जुळतात.., शरीरांचं मिलन हा बहाणा नुसता.., पण नवीन नवरा बायकोंसाठी सर्वात सुखाचा क्षण म्हणजे हनिमून. म्हणून हनिमून इज मस्ट.. आफ्टर मॅरेज...,

सिदचंच हे वाक्य आठवून संकेतला त्याचं वाईट वाटतं.., का याच्याय लाईफमध्ये असं... लवकरात लवकर सिदची आणि आशू वहिनींची मैत्री झाली पाहिजे. त्याशिवाय त्यांच्यात प्रेम होणारच नाही., काहीतरी केलं पाहिजे.., सिदला आज त्यांचे शरीर पाहून उलटीसारखं होतंय, किळस वाटतेय कारण त्याला प्रेमाची परिभाषाच नीट उमजलेली नाहीये... त्यासाठी त्यांच्यात मैत्रीच व्हायला पाहिजे... काहीतरी केलं पाहिजे... संकेत विचार करत उभा राहिला...

त्या दिवसापासून पुन्हा दोन तीन दिवस सिद शांतच होता, आशूला पाहिले की तिचे ते शरीर आठवून त्याला तिच्याशी बोलायची इच्छा होत नव्हती.., तरी त्याच्या डोक्यात राहून राहून हा विचार येत होता की आशू एवढी भाजली कशाने, असे काय झाले की तिच्यावर एवढी वाईट वेळ आली. पण हे सगळं आशूसोबत बोलण्यासाठी त्याचं मन तयार होत नव्हतं...

आशूला सिदचे वागणे चांगलेच उमजत होते.., रोज मुद्दामहून हॉलमध्ये झोपायचे म्हणून तो आग्रह करत होता..कधी अचानकच तिच्याशी मैत्रीपूर्ण वागत होता तर कधी अचानकच तिच्या नजरेलाही नजर मिळवत नव्हता..,

आशूच्या बोलण्याने वागण्याने तो कधीकधी मोहित होत, तिच्या जवळ जावं आपण तिचा नवरा आहोत तिच्यावर पहिला हक्कं तो आपला आहे, तोच हक्कं तिच्यावर गाजवावा, तिच्यावर प्रेम करावं असं त्याला क्षणीक वाटे आणि त्याच्या डोळ्यासमोर तिचे ते भाजलेले शरीर येई...., आहे ते सगळे फेकून उध्वस्त करून टाकावे असे त्याला वाटे...,

काही दिवस तो ह्याच द्विदा मनस्थितीत होता..आशूची मनस्थिती तरी काही वेगळी असणार का, तिला तर सिदच्या वागण्याचा अंदाजच घेता येत नव्हता.. रोज मिनिटा मिनिटाला त्याचा बदलणाऱ्या स्वभावाचा तिला आता त्रास होऊ लागला होता..,

शेवटी एक नवरा किती दिवस आपल्या लग्नाच्या बायकोसोबत फक्त मैत्रीचे नाते ठेवणार...., सिदला ते जमत नव्हते व आशूला ते सहन होत नव्हते...,

हे एक कारण होते आणि त्यांच्यामध्ये दुरावा येत होता.. महिन्यांमागून महिने पालटत चालले होते व दिवस उजाडता यांच्यामध्ये मैत्री बहरत होती दिवस मावळता त्यांची मैत्रीही कोमेजून जात होती.., रात्र त्या दोघांसाठीही न सरणारी होती.., ही रात्र येऊच नये असे दोघांना वाटायचे, रात्र म्हणजे त्यांच्या आयुष्यात येणारा अंधार.., त्यांना मित्र बनून राहणे पसंत होते पण शरीर सगळा घात करत होते, आशूच्या शरीरावर असलेल्या जखमा आणि सिदच्या शरीरावर नसूनसुध्दा त्याला भासणाऱ्या जखमा...., शरीरामुळे गोष्टी असह्य होत होत्या.

दोघांचे आयुष्य अर्थहिन बनत चालले होते... कारण मैत्रीचंच नातं बहरता बहरत नव्हतं तर प्रेमाची पालवी फुटणं शक्यच नाही...

पण ही बाब हळू हळू त्याच्या बाबांच्या लक्षात आली होती, कधी रूममध्ये झोपायचे म्हटले तर सिद घरी उशिरा यायचा. नाहीतर मुद्दाम हॉलमध्ये झोपायचा. आशूसोबतचे तूटक वागणे, दिवसेंदिवस त्याचा बदलत चालणारा स्वभाव त्याचे बाबा पाहत होते. कधी जर त्या दोघांच्या भविष्याविषयी काही बोलले तर तो बाबांवर खेकसत होता. उद्या काय होणारे, उद्या कुणी पाहिलाय, असे तो म्हणत.

नक्की काय भानगड आहे हे त्यांना जाणून घ्यायचे होते..

एकेदिवशी जेवताना त्याच्या बाबांनी विषय काढला,

सिध्दार्थ राव.., तुम्हाला एक गोष्ट लक्षात येतीये का...?”,

सिद जेवत होता.. आणि त्याचे बाबा सोफ्यावर बसून त्याला विचारत होते..

कोणती गोष्ट...?” तो नेहमीच्या निराश चेहऱ्याने बोलला...

तुमचं लग्न होऊन चार महिने झाले बरं...,

तो टक्क बाबांकडे पाहत म्हणाला, मग...?”

मग काय मग..., मी तर विसरूनच गेलो... काय सरिता, आपण ह्या दोघांना हनिमून का काय असतं ते त्याला पाठवलंच नाय..., काय रे...?” बाबा हसत म्हणाले..

हो नां..., दोघांना निवांत वेळच मिळत नाये...,

आणि आपला पठ्ट्या, आशूला कुठे बाहेर फिरायलाही नेत नाहीये..., सिदचे बाबा म्हणाले.

सिद हसत म्हणाला, बाबा.., अहो आता हे काय फिरायचे वय राहिले का.. वर रूम बांधायची ना, पैसे कमवायला नको का.., आणि तूम्हीच म्हणता ना लग्न झालं की पोरगा जबाबदार होतो, आता झालो की मी जबाबदार.. आणखी काय हवंय....?”

आशू फक्त ऐकत होती...

असं कसं.., काय संसार म्हणजे काय फक्तं नवरा आणि बायकोच का.., मूलबाळ...

तेवढ्यात सिद पटकन उठला आणि ताट उचलून किचनमध्ये नेत म्हणाला, आई दादाला का तू असे हट्ट करत नाहीस गं.. मलाच का....?”

त्याच्या चेहऱ्यावरचा राग, तिरस्कार आई-बाबांनी पाहिला...,

अरे.. एवढं चिडायला काय झालं.. काय डोंगर उचलून आणायला सांगितला की काय..., अन, संदिप म्हणतोय अजून एक दोन वर्षं थांबायचं... असंल त्यांचं काहीतरी नियोजन.., तसं तुमचं काये,,, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे...?” बाबा जरा स्पष्टच बोलले...,

बाबा तुम्ही हे बोलताय ह्याच्यावर मला विश्वासच बसत नाहीये.., चार महिने नाही झाले लग्नाला तर काय तुम्ही हे सुरू केलं... तो चिडत सोफ्यावर येऊन बसला..

आशूने सर्वांची ताटं उचलली आणि आत किचनमध्ये नेली...

अरे चिडायला झालं काय पण तूला..? मुलबाळ असणं ही काय वाईट गोष्टं झाली काय.., आम्ही सहज विचारलं... तू एवढा रागवतोय जसं काय तुला जंगलात रहायला पाठवतोय आम्ही..., त्याची आई म्हणाली..

सिध्या.. नक्की प्रॉब्लेम काये मला नीट सांग हा..?” त्याचे बाबा त्याला दम भरत म्हणाले..

काही प्रॉब्लेम नाहीये बाबा.. पण अशी घाई करू नका.. संदिप दादाला आधी घाई करा आणि मग मला.. प्लीजच...,

असं म्हणत तो किचमध्ये आला....

आशू भांडी आवरत होती..

तो तिच्यासमोर येऊन उभा राहिला, तिने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले..

तू का काही बोलत नाहीयेस.. ?”

मी काय बोलू.. आशू हळू आवाजात बोलली...

तुला माहितीये, बाबा जे बोलत आहेत ते कधी शक्य नाहीये...

ह्म... ती एवढंच म्हणाली.

ह्म.. काय आशू.. तू बोल काहीतरी.., नाहीतर यांना वाटेल काहीतरी प्रॉब्लेम आहे.., चार-पाच वर्षं तर नाही असं काहीतरी बोल.., कारण आई-बाबा काही करून आपल्या मागे लागतील...

बोलते..

तू एवढं लाइटली का घेतीय..? मी तुला सिरियसली सांगतोय...,

हो कळतंय ना मला सिध्दार्थ.., मी बोलते म्हटले ना..,

हे बघ आशू.. मी तुला आधीपण सांगितलंय..., माझी बायको म्हणून तुला माझ्याकडून सगळं मिळेल, पण ती एक गोष्ट आहे...

तेवढ्यात ती त्याला थांबवत म्हणाली, मी काही अपेक्षा केलीच नाही तुझ्याकडून..., तू का टेन्शन घेतोय..., मला फक्त ना दोन तीन अपेक्षा आहेत त्या तेवढ्या तू पूर्ण करशील का प्लीज...?”,

तो म्हणाला, कोणत्या...?”

मला एमपीएससी- युपीएससीची एक्झाम द्यायची आहे..., यावर्षी ग्रॅज्युएशन झालं की मला ती देता येईल.., त्यासाठी फक्त मला मदत करशील...,

त्याने होकारार्थी मान हलवली पण ही असली कसली अपेक्षा म्हणून त्याने तिच्याकडे पाहिले..

आणि मला जॉब करायचाय... प्लीज त्यासाठीही तू परवानगी देशील, आय मिन आजपर्यंत मी माझ्या बाबांना आणि दादाला प्रत्येक गोष्टीसाठी परवानगी मागत आले.. मला त्यांनी कोणतीच गोष्टं माझ्या मनासारखी करू दिली नाही.., पण आत्ता मात्र ह्या दोन गोष्टी मला करायच्या आहेत..,

मी तुला कधीच कोणत्या गोष्टीवर दडपण आणलं नाहीये तुला हवं ते तू करू शकतेस... मी नाही निदान तू तरी काहीतरी कर आयुष्यात..

ह्म..., आणि तुला माहिती का, मी ती परिक्षा दिली, त्यात जर पास झाले..., तर तुझी आणि माझी लाईफ खूप सुखकर होऊ शकेल...

ते कसं...?” तो म्हणाला...

मी तेव्हा स्वतंत्र असेल, माझ्याकडे काही अधिकार असतील. मूळात माझे स्वतःचे काही पैसे असतील. तेव्हा तुला तुझ्या बाबांच्या भितीने किंवा मला माझ्या बाबांच्या भितीने एकमेकांसोबत रहायची गरज पडणार नाही... मी तुला सोडू शकेल आणि कारणही सर्वांना पटणारं असेल, की तू माझ्या पोजिशनला मॅच होत नाहीयंस.. आणि तुझ्यासाठीही कारण रेडी असेल, जे तुला माहितच आहे...

ए असं काय नाहीये अगं.. तू प्लीज...,

सिध्दार्थ.. किती दिवस चालवायचं आहे हे नाटक... मला कुढत जगायची सवय आहे अरे पण तुझं काय...?, तू का सहन करतोय..., तुझा हेतू मला समजतोय, पण तू नको असं स्वतःचं आयुष्य बरबाद करूस..., त्याग वगैरे हे सगळं प्रेमात असतं आपल्यात तसं काही नाहीये तर मग का तू हे सगळं सहन करतोय...?”,

प्लीज आशू.. तू वेगळा अर्थ काढतीयेस माझ्या बोलण्याचा.. मी तुला तेव्हाही सांगितलंय, काहीही झालं तर आपलं लग्नं कधी मोडणार नाहीये...

हे बघं अजून एका वर्षाने खूप काही गोष्टी बदललेल्या असतील. आणि मी तुला नकार देणार.. मग तुला काही प्रॉब्लेमच नाहीये, तूही माझ्यातली खोट सांगू शकतोस.., मी तेव्हा माझ्यातला स्वार्थ दाखवले, माझ्यातला अहंकार जागवेल..., आणि तुझ्यासोबत नाही रहायचं असं म्हणून आपण वेगळं होऊ शकतो..., मला हा मुलगा पसंत नाही असं मी बिनधास्तपणे सांगू शकते आणि तुलाही ही मुलगी पसंत नाही हे तू सांगू शकतोस..., जे कारण सर्व जगाला पटणारं आहे..., एक तुझे आई-बाबा सोडले तर..., पण डोन्ट वरी त्यांनाही पटेल..., तुझं नाही तर माझं कारण..., पण पटेल.. आणि ह्या सगळ्या प्रकरणावरून लोकांना मी आणि मीच वाईट वाटेल. तुझ्या इमेजवर याचा काही परिणाम होणार नाही अरे.. ती सहज बोलली.

तो शांतपणे ऐकत होता..

तुला फक्त माझ्यामधली मोठी खोट दाखवून द्यायचीये... मी तुला फसवलंय हे दाखवून द्यायचंय..., तुला सांगते काहीच प्रॉब्लेम न येता आपलं लग्नं मोडेल... पण तोपर्यंत फक्त या दोन गोष्टींसाठी मला स्वतंत्र दे.., एकदा माझ्याकडे पैसे आले, मी कोणतीतरी सरकारी परिक्षा पास झाले ना माझे जगण्याचे मार्ग मोकळे होतील.., आणि तुझे ही..., मला लग्नं करून प्रेम तर हवं होतंच पण त्याहीपेक्षा जास्त म्हणजे स्वातंत्र्य हवं होतं आणि तू ते देतोयंस मला.. ह्यामध्येच मी समाधानी आहे अरे..., खरं.. ती हसत म्हणाली..

पण सिद मात्र विचारात पडला होता... आशू बोलते त्यामध्ये त्याला तथ्य दिसू लागले होते..

अगं आशू, सिद.. काय चाललंय किचनमध्ये... आम्ही वाट पाहतोय तुमची... आई बाहेरून ओरडली..

हो आलो आई.. असं म्हणत आशूने सिदला स्माईल दिले.. चल.., मी बोलते आई-बाबांशी बरोबर... तू नको टेन्शन घेऊस..., असं म्हणत ती बाहेर आली.. तोही तिच्या मागे आला..

बाबा, आम्ही आतातरी नाही करणारे हा कसला विचार... मुळात मी आता स्पर्धा परिक्षा द्यायचा विचार करतीये आणि सध्या तरी जॉबचा... एकटा सिद्धार्थ तरी किती काय करणार..., म्हणून सध्यातरी हा विचार नकोच ... ती हे बोलली आणि सिदने तिच्याकडे आश्चर्याने पाहिले..

अगं काय बोलतीस बाळा तू आशू.., दोन्ही सूना काम करणार..कसं गं.., तुला काही कमी पडतंय का.. सांग

नाही आई.. काहीच कमी नाही.. जे आहे ते भरभरून मिळालंय..., प्रेम, आपुलकी आणि सन्मान.... जे या घराने मला दिलंय ना ते मला कुठेच मिळालं नसतं..., म्हणून तुम्ही प्लीज माझ्या जॉब करण्याचा वेगळा अर्थ काढू नका.. सिद्धार्थला मदत म्हणून आणि मलाही माझ्या करिअरचे पहावे लागणार ना... माझ्या बाबांनी मला जॉबला कधी परवानगी दिली नाही. पण तुम्ही असं करू नका बाबा..., प्लीज... ती बाबांकडे बारीक डोळे करत म्हणाली..

अगं वेडी आहेस का.., मी कसली तुला परवानगी देणार... आपल्या घरात कुणी कसली परवानगी वगैरे मागत नाही हं.. तुला वाटेल ते तू कर.. बिनधास्त.. फक्त स्वतःची काळजी घेऊन..., सिदसाठी तू एवढा विचार करतीयेस हे ऐकूनच बरं वाटलं...

हे ऐकून सिदलाही जरा बरंच वाटलं होतं..., ते दोघे वेगळे होणार आणि त्यातून कुणालाही त्रास होणार नाही हे आशूने त्याला समजावून सांगितलं होतं..., आपण फसलो गेलो याचा थोडा त्रास त्याच्या आई-बाबांना होईल पण लग्न मोडलं म्हणून आशूला तिच्या बाबांच्या घरी जावं लागणार नाही, जर तिला चांगली नोकरी असेल तर....

हा विचार सिदलाही पटला... त्याच्या चेहऱ्यावर हलकासा आनंद पसरला...

तरी... त्याचे बाबा घसा खाकरत म्हणाले.. सिद विचारातून बाहेर आला..

तरी.., तुम्हा दोघांना एक आठवडा बाहेर फिरायला जावं लागेल... त्याला तुम्ही हनिमून समजा नायतर आणखीन काय..., पण मी तुमच्या दोघांची गोव्याची बुंकिंग करतोय.. आणि हं., मी करतोय म्हणून तुम्ही दोघांनी काही बोलायचं नाही, गप जायचं आणि सात दिवस या जगाला विसरून एन्जॉय करायचा...

अहो बाबा पण... सिद असे म्हणाला..

आणि तेवढ्यात सिदचे मित्र घरी आले..

काय बाबा कसलं डिस्कशन चाललंय...?”, संकेत पुढे येत म्हणाला..

हनिमून आणि काय...?”, ते संकेतला डोळा मारत हळूच म्हणाले.

बाबा.. प्लीज हं.. सिद जरासा चिडत उठला..

अहो काका, हनिमूनचं काय घेऊन बसलाय..., झालं चार महिने त्याला आम्ही विचारतोय त्याबद्दल... पण तो काय सांगत नाय... तूम्ही तो विषयच सोडून द्या..

असं कसं..?” त्याचे बाबा म्हणाले...

सगळ्या मित्रांसाठी पाणी आणायला आशू आत गेली...

अहो काका, आम्ही सगळे मित्र मिळून ट्रिपला चाललोय, गोव्यालाच..., मग म्हटलं सिदला येतो का..,

हे ऐकून सिद खूश झाला..

चालेल ना... ,डन... बाबा ते पैसे तुम्ही इथे फिरवा..

हो डन डन..., पण सिध्द्या, आम्ही सगळे कपल्स चाललो आहे, सो तुलाही जोडीने यायचंय हं..., अभ्या म्हणाला..

तसा सिद इकडे तिकडे पाहू लागला, आशूने सर्वांना पाणी दिले..

चालतंय की, आशू वहिनी येतील की मग..., जो काय हनिमून करायचा तोही होईल आणि मित्र मैत्रीणींसोबत एन्जॉयपण.. रिया पाण्याचा ग्लास घेत म्हणाली..

हो... ही बेस्ट आयडिया आहे मग.. सिदचे बाबा म्हणाले...,

सिद विचारात पडला.. मित्रांसोबत ट्रिप तेही आशूसोबत... जरासं त्याला ऑड वाटत होतं...

काय मग सिध्द्या येणार ना..., संकेतने विचारले

अरे.. ऑफिसमध्ये...

ए, ऑफिसबॉय... ऑफिसचं टेन्शन नो... सुट्टी सांगितलीय मी ऑफिसमध्ये...संकेत म्हणाला.

काय... असं कसं परस्पर सांगितलंस...?”

हे काय आता जस्ट फोन केला सरांना, सिदची गावाकडची आत्या आणि माझी मामी वारली..., एक आठवडा गावी जायचंय... अर्जंट....

सगळेजण हसले...

तुझं आणि माझं दूरचं नातं दाखवलंस की काय तू...?”, सिद चिडत पण हसत म्हणाला.

हो मग.. ट्रिपला जायचं म्हणजे जायचं...काय वहिनी येणार ना...?” संकेत म्हणाला.

आशू चाचरत म्हणाली, सांगते ना.. विचार करून...

हो... करेक्ट..., आम्ही दोघं तुम्हाला, विचार करून सांगतो...

सिद हे बोलेपर्यंत संकेतने रेल्वेचे तिकिटं बाहेर काढले.., मिस्टर, बुंकिग इज डन..., तुम्हाला यावंच लागणार आहे...,

जोडीने हं... अभ्या पुढे म्हणाला...

सगळेजण हसले पण सिद आणि आशू मात्र टेन्शनमध्ये होते...,

सगळे मित्रं मैत्रीणी आपापल्या क्रशसोबत येणार होते आणि सिद मात्र त्याच्या बायकोसोबत.., त्याला टेन्शन आलं होतं.., पण तरी त्याला जरा ब्रेक हवाच होता.. म्हणून त्याने कसंबसं ह्या ट्रिपला जायचं ठरवलं...

पण आशूचं काही पक्कं नव्हतं... पण सिद जाणार म्हटल्यावर आशूलाही जाणं भाग होतं..., आजपर्यंत तिने अशी लाईफ कधी जगली नव्हती.., आत्ता मिळणार होती... तिही नाही म्हणता म्हणता तयार झाली...