दिनांक 03.12.2020
वेळ 02.19 AM
भाग २१
पूर्वार्ध –
आशू तिच्या माहेरी गेलेली होती, सिदचं आणि तिचं नातं पूर्णपणे संपवण्याचा तिचा विचार होता. पण सिदच्या मनात असं काही नव्हतं, एकदा लग्न झालं की ते मरेपर्यंत निभवावं लागतं अशा संस्कारात वाढलेला तो मुलगा असल्याने त्याला आशूचे हे वागणे सहन होत नव्हते. कट्ट्यावर मित्र त्याला समजावत असताना त्याला आशूच्या भावाचा फोन आला आणि त्याने अगदी उर्मट, दादागिरीच्या भाषेत त्याला घरी बोलावून घेतले. आशूच्या घरामागेच तिच्या बाबांनी व डॅनी भाऊने सिदला बोलावून घेतले व आशूला नांदवण्याची धमकी देत पंचवीस लाख रूपये देऊ केले. पण सिदने ते त्यांच्या तोंडावर हुडकावून लावत त्यांना त्यांची पायरी दाखवली. या सर्व गोष्टीमध्ये आशूची काही चूक नाही हे त्याच्या लक्षात आले आणि त्याने तिथेच आशूला घरी घेऊन जायचे ठरविले व शेवटी तिला घरी येऊन आला, तिच्यासमोर त्याने माफी मागितली व तो ज्याप्रकारे तिचे भाजलेले शरीर पाहून ओरडला, तिच्याशी दोन-तीन दिवस तुटक तुटक वागला, रात्री घरी आला नाही.. असे कधीच वागणार नाही असे तिला सांगितले व तिला घरी चलण्यास विनवणी केली. आणि घरी आल्यावर त्याने मनाशी निश्चय केला की त्या दोघांमध्ये नवरा-बायकोचं नात फुलेल तेव्हा फुलेल पण आत्ता मात्र काहीच नातं नसण्यापेक्षा मैत्रीचे नाते तरी असावे म्हणून तिच्यासमोर त्याने मैत्रीचा हात पुढे केला व आशूने त्याच्या ह्या विनवणीचा अर्थ समजून त्याच्या हो ला हो मिळवले...
इथून पुढे - - - -
आशूची भांडी मांडून झाली व सिदनेही थोडीफार तिच्या मध्ये लुडबूड केलीच... त्याला आज जरासे बंधनातून सुटल्यासारखे वाटत होते पण आशू मात्र थोडी मनातून निराश होती.. सिदने तिच्यासमोर मैत्रीचा हात पुढे केला होता कारण.... तिला त्यादिवशीची त्याची किंकाळी आठवली..., आणि या मैत्रीच्या प्रस्तावाचे तेच एक कारण आहे हे तिला समजले होते.
मैत्रीतूनच प्रेम होते हे कदाचित तिला ठाऊक नव्हते म्हणून ती त्याच्या ह्या मैत्रीच्या प्रस्तावावर नाराज होती... पण ही झाली आशूच्या मनातली एक बाजू. दुसऱ्या बाजूने तिला ह्या गोष्टीचे एवढे टेन्शनही घ्यायचे नव्हते कारण तिला आता तिच्या करिअरचा विचार करायचा होता..
दोघेही किचनमधून बाहेर पडले आणि तेवढ्यात सिदची आई आणि बाबा आत आले...
“अरे व्वा.. सिध्दू... बायकोला मदत करतो होय...?” आईने भुँवया उंचावत सिदला विचारले..
सिद हसत हसत त्याच्या आईकडे आला, “छे... मी काही मदत वगैरे नव्हतो करत काय तिला... असंच आपलं पाणी प्यायला गेलेलो...”,
बाबा हसले..., “आज काल जरा जास्तच पाणी पितो रे सिध्द्या...”
सिदने जरा डोळे मोठे करून म्हटले, “आता पाणीही प्यावं नाय का आमी..., एवढा खुपतो होय तुमच्या डोळ्यात मी....??”
आई-बाबा दोघंही हसले आणि सिदच्या ह्या गमतीशीर बोलण्यावर आशूलाही गालातल्या गालात हसू आले.
“गप खोटारड्या... बायकोला गुपचूप गुपचूप मदत करतो अन् मला मात्र काडीची मदत न करता नुसता पसाराच भरमसाठ करून ठेवतो.. आशू बाई नीट सांभाळ गं तुझ्या नवऱ्याला..., अशीच मुठीत ठेव नाही तर त्याला आवरणं म्हणजे एका लहान मुलाला सांभाळण्यासारखंच...” आई मजेत म्हणाली आई सोफ्यात येऊन बसली..
“ए आई.. काही पण काय .. आता तुझ्यासाठी मी तुझा लहान मुलगाच ना... आणि पसारा वगैरे काय.. कसला पसारा सांग गं..., सांगच तू... काय लहान आहे काय मी आता...?”
“अच्छा.. अच्छा अच्छा..” असं म्हणत बाबांनी बाहेरच्या दिवानावरचा बेड उचलला आणि त्याच्या आत असलेल्या वस्तू आशूला दाखवल्या....
त्यातला तो पसारा पाहून आशूला हसूच आले...
सिद जराचा लटक्या रागात आईच्या मांडीवर डोकं ठेवतं खाली बसला, “ऐ आई सांग गं ह्या शामूला... बायकोसमोर इज्जत काढतोय माझी.. काय वाटल बिचारीला.. हा असला वेंधळा पोरगा गळ्यात पडलाय म्हणलं की ती...”
सिदच्या तोंडून हे ऐकून आशू एकदम आश्चर्यचकित झाली, तिने सिदकडे पाहिले.. सिदनेपण तिच्याकडे पाहिले आणि स्माईल दिली...
तिला काहीच समजले नाही..
“एवढी इज्जतीची काळजी ना मग आता जरा शहाण्या बाळासारखं वागायचं.. असंच बायकोला मदत करायची..मग कसा संसाराचा गाडा कसा सुरळित चालतो...” त्याची आई म्हणाली.
बाबा हसत आईच्या शेजारी सोफ्यावर बसले आणि म्हणाले, “जशी मी तुझ्या आईला मदत करत आलोय.. काय गं सरिता...???”
सरिताबाई हसल्या... “काही तरीच.. तुम्ही आणि मदत...?? एकदाच काय ते मदत करायला आलेलात.. माझं काम वाढवून ठेवलंत... तुम्ही दोघं सारख्याला वारखे... पण आपला संदिप मात्र खूप मदत करतो मला..., तुमच्या दोघांसारखा नाही...”
“बाबा करा दादाला फोन.. बाबा लवकर करा फोन.. त्याला म्हणा जिथं असशील लवकर ये... आई मिसिंग यू...”
सगळेजण हसायला लागले.. आई त्याला धपाटा घालत बोलली... “येईलच तो.. धावतपळत येईल आईसाठी.. तुझ्यासारखं नाही...”
“ए आई काहीपण नाही.. मी ही जिथे असेल ना तिथून तुझ्यासाठी धावतपळत येईल...”
“जसा आज आशूला घ्यायला गेला तसा का...??” आईने मजेत विचारले..
तसं सिदने आशूकडे पाहिले, ती तशीच उभी होती.. वेगळ्याच विचारात होती...
सिदने काही सेकंद तिच्याकडे पाहिले, मनाशीच बोलला... तिच्या बाबतीत मी काही करत नाही पण अपसूक माझ्याकडून होऊन जातं... जसं तिला पसंत केलं, जसं तिच्याशी लग्न केलं आणि जसा आज तिला घेण्यासाठी तिच्या घरी गेलो...
सिद हे बोलेपर्यंत त्याच्या आई बाबांचे आशूकडे लक्ष गेले...
“अगं आशू अशी उभी काय ये बसं...” बाबा म्हणाले.
आशू विचारातून बाहेर आली... तसा सिद पण विचारातून बाहेर आला, दोघांची नजरानजर झाली.. सिदने तिला स्माईल दिली.. पण आशू तशीच गंभीर चेहऱ्याने सोफ्यात बसली...
“काय गं.. घरचे कसे आहेत सगळे.. आणि गेली होतीस तर राहायचं ना चांगली आठवडा भर...” सिदची आई आशूला म्हणाली.
“बरे आहेत सगळे घरी...” आशू म्हणाली...
“माहेर माहेर असतं बाई.. तिथं गेलं की राहायचं काही दिवस..., आई-वडिल असेपर्यंत ते आपलं असतं नंतर काय भाव-भावजयांचं राज्य...”
भावाचं राज्य म्हणता सिदच्या डोळ्यासमोर आशूचा भाऊ आणि तिच्या वडिलांचा चेहरा आला...
त्याचा चेहरा पडला...
आशू काहीच म्हणाली नाही...
“बरं.. चला झोपूया आता.. साडेअकरा वाजत आलेत...”, सिदचे बाबा म्हणाले.
तेवढ्यात सिद म्हणाला, “अरे च्छा... आम्हाला अभ्यास करायचाय आज...”,
तसे त्याचे आई- बाबा आश्चर्यचकित झाले...,
“काय..???” आईने विचारले...
“सरिता, चंद्र कुणीकडे उगवला गं आज.. जरा पाहून ये.. जा...”,
“काय तुम्ही पण चेष्टा करताय पोराची...”
“अगं त्याच्या तोंडात अभ्यास ऐकून झटका यायचा मला....” बाबा गमतीत बोलले..
तिघंही हसले पण आशू मात्र शांतच होती...
“चला चला.. तुमच्या रूममध्ये जाऊन काय तो अभ्यास करायचा तो करा..., सध्या तरी तिच तुमची रूम... संदिप नाही तोवर.. तोपर्यंत बांधूच वरती आपण दुसरी रूम...”,
“बाबा त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका... ती जबाबदारी माझी... वरची रूम मी बांधेल...” सिद म्हणाला.
तसं आशूने त्याच्याकडे पाहिले..
बाबाने अभिमानाने त्याच्याकडे पाहिले, पहिल्यांदा त्याच्या तोंडून असे जबाबदारीचे बोल ऐकून त्यांनाही बरे वाटले...
“तसंही संदिप आणि रूचा कधी येतायत इथे कुणाच ठाऊक.. त्यांचा दोन वर्षांचा प्रोजेक्ट का काय आहे तिथं..., कसं राहणारेत बाई..., त्याला फोन केला पाहिजे..” आई काळजीने म्हणाली..
“सरिता.. आता उद्या करूयात फोन.. पोहचलेत ते मगाशी फोन केला ना मी.. सारखं सारखं काय फोन करायचं त्यांना.. कामाच्या टेन्शनमध्ये असतील ते पण..., उद्या निवांत करू...” सिदचे बाबा म्हणाले.
“बरं..” आई म्हणाली..
“चला चला.. आता झोपूया.. ए पोरांनो पळा तुमच्या रूममध्ये...” बाबा उठत म्हणाले...
सिदने आशूकडे पाहिले.. तिच्या चेहऱ्यावर ऑडनेस त्याला लगेच कळाला.. ती अस्वस्थपणे स्वतःला सावरू लागली....
सिद लगेच म्हणाला, “शामराव.. आज तुम्ही झोपा रूममध्ये... आम्ही बसतो इथे बाहेर.. तसंही आज झोपणारे की नाही माहित नाही.. कारण खुद्द आशू मॅडम मला अभ्यासात मदत करणार आहेत... आता एवढ्या सहाच्या सहा पेपरचा उजळणी करायची म्हणजे रात्र तर जाणारच ना...”
तशी आई हसत म्हणाली, “मग रूममध्ये जाऊन करा ना काय तो रात्रभर अभ्यास...” हे बोलताना आईला हसू येत होते..
सिद पण हसतच उठला.. “अगं आई रूममध्ये अभ्यास कमी आणि...”
तो पुढे काय बोलणार इतक्यात बाबा हसत म्हणाले, “बसा बसा.. हॉलमध्ये बसून करा अभ्यास... अभ्यास झालं की वाटलं तर आवाज द्या... तोपर्यंत पडतो आम्ही आत... काय सरू”
“बाबा.. काही पण काय.. झोपा तुम्ही निवांत.. आज मी तुम्हाला तुमची प्रावयसी देतोय.. जस्ट एंजॉय...”
“ए वेड्या... अरे काय मित्रय काय मी तुझा.. एंजॉय वगैरे काय बोलतो..” बाबांनी त्याच्या डोक्यात टपली मारली..
सिद हसत म्हणाला, “मित्रच आहे राव शामराव तू माझा... पाच पावसाळे जास्त पाहिलेला माझा मित्र... माझा बेस्ट बाप...” सिदने त्यांच्या खांद्यावर हात ठेवत दुसऱ्या खांद्यावर त्याचे डोके ठेवत म्हटले...
आशू हे पाहतच होती.. बाप लेकाचे नाते हे असेही असते.. ती पहिल्यांदा पाहत होती..... तिच्या भावाचे आणि बाबांचे नाते आणि सिद आणि त्याच्या बाबांचे नाते.. ती फक्त तुलनाच करत बसली... काही मुलं दिसतात मवाली, त्यांचं राहणीमान मवाली असते, बोलणे चालणे बरे नसते.. पण ती मुलं मनातून किती सच्ची असतात हे तिला आज सिदकडे पाहून समजले होते.. कॉलेजातल्या डिग्रीपेक्षा संस्काराची डिग्री किती महत्त्वाची असते हे सिद आणि त्याच्या बाबांकडे पाहून तिला समजत होते.. त्यांच्या त्या मैत्रीपूर्ण वागण्याकडे पाहून तिला मनापासून समाधान वाटत होते...
“चल... करा अभ्यास.. सूनबाई... घ्या घ्या.. नीट अभ्यास घ्या आमच्या पोराचा.. यंदा पास झाला पाहिजे...” असं म्हणत बाबा रूमच्या दिशेने निघाले..
आईपण सिदच्या डोक्यावरून हात फिरवत त्याच्याकडे हसत पाहत आशूलाही कुरवाळून रूममध्ये गेली...
आई बाबा रूममध्ये जाताच सिद सुटकेचा श्वास सोडत सोफ्यात बसला..., “हुश्श.. ते रूममध्ये उगाच कोंडल्यासारखं होतं ना..., म्हटलं तिथं काय अभ्यास व्हायचा नाय.. होऊन होऊन भांडणंच होतील...” तो हसत म्हणाला..
“ह्म..” आशू एवढंच म्हणाली....
सिदने एकटक आशूकडे पाहिले... ती तशीच उभी होती...
“मॅडम बसता का सोफ्यावर... कारण असं उभं राहून तुम्ही माझी उजळणी घेणार असाल तर उगाच माझे पाय दुखतील...”,
आशू भावशून्य चेहऱ्याने खाली बसली...
तेवढ्यात सिदचे बाबा हसत रूमच्या बाहेर आले,
“सिध्द्या.. गधड्या.. अभ्यास करताय अन् अभ्यासाचं सगळं रूममध्येच की.. धर घे ही बॅग...”
सिद हसत उठला, “पिताश्री फार कष्ट घेतलेत हो... धन्यवाद हा... गुड नाईट...” असं म्हणत.. सिदनेच रूमचा दरवाजा ओढून घेतला आणि त्याचा हात कडीकडे वळाला..., त्याने रूमला बाहेरूनच कडी लावली.. पण पुन्हा त्याच्या मनातल्या विचारांना त्याने नियंत्रित केले व कडी खोलली...
तो पुन्हा सोफ्यात येऊन बसला...
“ही माझी बॅग लग्नाआधी पाहिली होती.. ती आत्ता पाहतोय...” तो हसत म्हणाला...
आशूने स्वतःची बॅग घेतली आणि म्हणाली, “मला स्वतःचा अभ्यास स्वतःला करता येतो.. असं दुसऱ्यांचा...”
ती पुढे काय बोलणार इतक्यात सिद हसत म्हणाला, “अगं तू तुझाच कर.. माझा कर असं नाही म्हणते मी...” सिद मोठ्याने हसला..
आशू जराशी चिडून म्हणाली, “कुणाचा अभ्यास घेता येत नाही मला...”
“बापरे मग कसा व्हायचा माझा अभ्यास.. मला कुणी शिकवल्याशिवाय नाय होत गं..., मूडच येत नाय.. पण मला यावेळेस पास व्हायचंय गं प्लीज.. तू थोडं फार सांगशील मला तर माझ्या ते लक्षात तरी राहील...”,
आशूने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले... “क्लास का लावत नाहीस.. आय मिन लावला नाहीस...?”
“ते.. सुंदर टिचर भेटल्याच नाय आजपर्यंत... नायतर आजपर्यंत पास झालो असतो...”, सिद हे बोलून गेला आणि तेवढ्यात तो स्वतः भानावर आला पण आशूला मात्र गोंधळात पाडलं..
ती पुन्हा अस्वस्थ झाली, अनकंफर्ट फिल करू लागली...
काही वेळ दोघं फक्त एकमेकांकडे पाहत होती आणि त्यांना कुठून सुरूवात करावी कळत नव्हतं...
कठिण असतं..., एक बंधनात्मक नातं ऊराशी असताना दुसरं स्वतंत्र नातं स्विकारण आणि त्या दिशेने कृती करणं...,मित्राचे रूपांतर नवऱ्यात होऊ शकते पण नवऱ्याचे रूपांतर मित्रात करणे जरा आशूला कठिणच जाणार होते....
आशू खूप बळ एकवटून बोलली, “तुझे फक्त लास्ट इयरचे सब्जेक्ट बॅक आहेत ना...?”
“हो..” सिद लगेच म्हणाला...
“मग तू आधी सगळे सब्जेक्ट एका कागदावर लिही आणि त्यातल्या चाप्टर्सचीपण नावं लिहून घे.. म्हणजे त्या धड्यांची नावं तुझ्या डोळ्याखालून जातील..”
सिद म्हणाला, “गुड आयडिया...”, त्याने लगेच वही काढली आणि वहीचे लास्ट पान उघडून तिथे लिहू लागला...
आशू जराशी गोंधळत म्हणाली, “वहीवर पहिल्या पानापासून लिहायला सुरूवात करतात लास्ट पेजपासून नाही...”
सिद हसत म्हणाला.., “आम्ही शेवटच्या पानापासूनच लिहितो.. म्हणजे जेव्हा सुरूवात करतो तेव्हाच त्या वहिचा तो एंड असतो.. नंतर ती वही पुन्हा हातात पडत नाही...” असं म्हणत त्याने बॅगेतून पुस्तकं काढली..
आशू जरा चिडत म्हणाली, “मश्करी किंवा टाईमपास म्हणून तू ही अभ्यासाची नाटकं करणार असशील तर प्लीज... मला माझा अभ्यास करू दे...”,
“बरं बरं..., पहिल्या पानापासून लिहितो.. तू म्हणतेस तर हा या वहीचा पहिला दिवस... ओके..??” त्याने वहीचे पहिले पान उघडले... आणि लिहू लागला...
आशू शांतपणे त्याच्याकडे पाहू लागली..
तो एकामागून एक धडे लिहू लागला.. काही पुस्तकात बघून तर काही न बघताच.. त्याचे ते वळणदार, मोत्यांसारखे अक्षर पाहून आशू मोहून गेली...
“एवढं सुंदर अक्षर..!!” तिच्या तोंडून हे बाहेर पडले...
सिद हसत म्हणाला... “खूप महिन्यांनतर पेन हातात घेतलाय गं.. चिडवू नकोस... सहसा माझी बोटं मोबाईलवर चालतात.. वहीवर सहसा कमी लिहितो मी...”
“लिहीत जा.. छान अक्षर आहे तुझं...”, आशू जराशी प्रसन्न चेहऱ्याने बोलली..
“खरं की काय..? आता तू म्हणतेस तर वाटायला लागलंय मला.. तसं मला सगळ्या मुली म्हणायच्या... तुझं अक्षर की नाही तुझ्यासारखंच हॅंडसम आहे म्हणून...” सिद मुलीच्या आवाजात अगदी त्याच हावभावात बोलला..
आशूला खरेतर हसायचे नव्हते पण ती हसली..., तिला म्हणायचे होते की परत कर एकदा.. पण त्यांच्यामध्ये अजून तेवढा कंफर्ट नव्हता की ती हसण्याशिवाय काही बोलू शकला नाही..
सिदच हसत म्हणाला, “तेच ना... सगळ्याच मुली वर्गातल्या.. ए सिद.. किती छान रे तुझं अक्षर.. असं म्हणायच्या आणि यायच्या त्यांच्या असाइनमेंट बुक घेऊन माझ्याकडे...”
“अनं तू त्यांच्या असाइनमेंट करायचा का..?” आशूने हसत विचारले..
“छे... मी त्यांनाच माझ्या असाइनमेंट करायला द्यायचो”. सिद वहित लिहित बोलला..
आशू हसत म्हणाली, “ते कसं...?”
सिदने एकदा आशूकडे एकटक पाहिले... तो थोडा तिच्या जवळ गेला आणि आणखीन तिच्या डोळ्यात डोळे घालत म्हणाला, “तुझे हे सुंदर डोळे.. माझ्या अक्षरासमोर काहीच नाहीत...”
आशूला काही समजले नाही.. तो अचानक असा समोर आल्यामुळे ती बावरली...
ती मागे सरकली... ती नजर चोरत म्हणाली, “म्हणजे..?”
“अगं म्हणजे काय म्हणजे.., तुझ्या ह्या डोळ्यांनी माझं ह्रद्य चोरलंय आणि तू माझ्या सुंदर अक्षराची वाहवा करतीयेस...वेडी कुठची?”, तो आणखीनच तिच्या जवळ येत म्हणाला..
ती काही क्षण बावरली पण नंतर त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला मागे सारत म्हणाली, “सिद्धार्थ.. आपलं ठरलंय ना फ्रेंड्स बनून राहायचंय.. मग हे काय...?”
पण हे बोलत असताना तिच्या ह्रदयाची धडधड वाढली होती, हात थरथरत होते.. आणि ते स्पष्टपणे सिदला जाणवले..
त्याने काही क्षण पुन्हा तिच्याकडे एकटक पाहिले आणि नंतर जोराजोरात हसू लागला....
तिला काही समजले नाही..
तो पुन्हा त्याच्या जागेवर गेला आणि लिहू लागला.. तो हसतच होता..
ती थोडी गोंधळत म्हणाली, “याचा अर्थ काय...?”
तो हसत म्हणाला, “येडीय तू...”
“म्हणजे...?” ती रागात म्हणाली...
“आमच्या क्लासमधल्या मुली... ह्या अशा माझ्या एक्शनवर रिएक्शन काय द्यायच्या माहिती... माझ्या असाइनमेंट पूर्ण करून द्यायच्या.. .आणि मी त्यांच्या शेजारी बसून त्यांच्याकडे असलेल्या नसलेल्या सौंदर्याची तारिफ करत बसायचो...” तो खूप मोठ्याने हसला...
ती मात्र फार चिडली... “फालतूपणा..” ती रागात म्हणाली...
तो हसत म्हणाला, “मज्जा यायची तेव्हा..., लय पोरं जळायची माझ्यावर...”
आशूला फार राग आला होता आणि तो तिच्या चेहऱ्यावर दिसत होता...
“तू हे असं फसवायचास का मुलींना.. अजूनही फसवत असशील.. तुलाच माहित...”
तो गंभीर होत म्हणाला... “मुलींना मी फसवलं पण जिच्या मी प्रेमात पडलो तिने मला फसवलं...”
आशूला याचा अर्थ कळाला ती लगेच म्हणाली, “मी तुला फसवलं नाहीये...”
“तुझं नाही बोलत गं मी...” सिद दुःखी चेहऱ्याने बोलला...
आशू आश्चर्यचकित होत म्हणाली, “मग...??”
“होती एक मुलगी माझ्या मनात...”
हे ऐकून आशूच्या पायाखालची जमीन सरकली.... “म्हणजे..???” ती खूप धडधडत्या ह्रद्याने बोलली..
“जाऊ दे ना ते आता.. ते काय आठवत बसायचं... तुला सांगू का.. आजपर्यंत ना मला जी गोष्ट हवीय ना ती कधी मिळाली नाही.. त्यामुळे ना जी गोष्ट मिळालीय ना ती मी माझी मानतो.. जे आहे त्यात माणसानं सुखी राहायचं असतं...”
“म्हणजे ती मिळालेली गोष्ट मी....?” आशू त्याला प्रश्न विचारात म्हणाली..
तो हसत म्हणाला, “तू काही गोष्ट आहे का.. आख्खीच्या आख्की मुलगी आहेस की... तो हसत म्हणाला.
“पण माझ्या आयुष्याची गोष्टच बनलीय तू...” हे वाक्य तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला...
“मश्करी करत नाहीये मी...” आशू सिरियसपणे बोलली.
“ओके सिरियस..” तो गंभीर चेहरा करत तिच्याकडे पाहत म्हणाला..
“तुझ्या आयुष्यात कुणी होती का....?” तिने विचारले..
“आहे...” तो शांतपणे म्हणाला...
तसं तिच्या काळजात धस्सं झालं.. ती थरथरत्या ओठांनी म्हणाली, “मग माझ्याशी लग्न ...”
“तू ही आवडलीस मला..” तो पुढे म्हणाला...
“म्हणजे... तु मला फसवलंयस....” तिच्या डोळ्यातून घळा घळा अश्रू वाहू लागले...
“कुणी तरी आपल्याला फसवलंय ही फिलिंगच किती त्रास देते ना...” सिद हसत म्हणाला..
आशूने तिचे डोळे पुसले आणि म्हणाली, “तू कवी आहेस म्हणून हे असं कोड्यात बोलतोस का.. स्पष्ट बोलता येत नाही का...?”
“नाही..., हे बघ.., तू मला फसवलं.. मी तुला फसवलं...झाली ना बरोबरी.. आता तू का रडतीयेस..?”,
“हे बघ सिध्दार्थ.. मी तुला अशा कोणत्या प्रकारे फसवलेलं नाहीये.. तू जे सांगतोय ते ऐकून मला त्रास होतोय... प्लीज जे काही असेल ते स्पष्ट सांग...”
“आता तू माझी फ्रेंड आहे म्हणून सांगतो, एक मुलगी माझ्या मनात होती अगदी कॉलेजमध्ये असताना..., माझ्या स्वप्नात होती, माझ्या ह्रदयात होती, माझ्या श्वासात होती...”
“पण आत्ता कुठंय ती...?” आशूने डोळे पुसत रागाने विचारले..
“तिच्या नवऱ्याच्या घरी.. आणि आत्ता यावेळी तर कुठे असेल कल्पना करूनच चीड येते...”,
आशू रागात म्हणाली, “तू हे आधी का सांगितलं नाहीस मला... म्हणजे तुलाही माझ्याशी लग्न करायचं नव्हतं तर का ही सगळी नाटकं केलीस.. आणि आत्ता तरी का अजून ही फ्रेंडशीपची वगैरे नाटकं करतोयस....”
“जे झालं ते झालं आशू.. आत्ता प्लीज त्यावर वाद नको घालूयात आपण.. प्लीज..” सिद विनवणी करत म्हणाला...
आशूचा अभ्यास करण्याचा पूर्ण मूडच गेला होता...
ती उगाच पुस्तकात डोकं घालून बसली... पण तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं...
सिदने मध्येच तिच्या डोळ्यासमोर वही धरली आणि म्हणाला, “झालं लिहून आता पुढे काय...?”
ती रागात म्हणाली, “प्लीज... तू तुझा काय तो अभ्यास कर... प्लीज....”
सिद तिच्याकडे पाहत म्हणाला, “तुला का राग येतोय एवढा..., तू मला फसवलंय हे समजल्यावर मला जसा त्रास झालेला तसाच तुलाही होतोय का....?”
आशू स्वतःला सावरत म्हणाली, “काय संबंध.. मला काही त्रास होत नाही..”
“मग रडतीयेस का तू..., तू ही प्रेम करायची का.. आय मिन करतेस का माझ्यावर....?”
आशूच्या ह्र्दयात धस्स झालं.. पण ती स्वतःच्या भावनांवर आवर घालत म्हणाली, “फ्रेंड्स आहोत ना आपण.. तर बाकीच्या विषयावर नको बोलायला..., आणि सिद्धार्थ मी तुला अजून पण सांगते.. जर आपल्यामध्ये हे असे सगळे प्रॉब्लेम्स असतील ना आपण हे नातं इथंच थांबवूया... प्लीज...”
“झालं का तुझं सुरू... तुला फक्त तोडण्याची भाषा येते का गं.. बापासारखी...” तेवढ्यात त्याने शब्द मागे घेतला...
ती म्हणाली, “काय....???”
“नाही नाही चुकून आलं.. मला म्हणायचं होतं... माणसानं जोडण्याची भाषा करावी ... तोडण्याची नाही...”
“तू मश्करी करतो की सिरियस बोलतो हेच मला कधीकधी कळत नाही...” ती पुढे म्हणाली..
“नविन आहेस तू.. हळू हळू कळेल तुला माझ्या मश्करीतलं गांभीर्य...” तो हसत म्हणाला...
“मी कन्फ्युज्ड होतीय.. मला काही समजत नाहीये... तुझं वागणं माझ्या डोक्यावरून जातंय..” ती अगदी निराशपणे त्याच्याकडे पाहत म्हणाली...
तो हलकेसे हसत म्हणाला, “मला समजायला वेळ लागेल, पण जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल...”
ती आणखीन रागात म्हणाली, “हे असे फालतू डायलॉग मारू नको हां.. इथं तुझ्या आणि माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि तू काय हे शब्दांशी खेळतोय...”
“भावनांशी खेळण्यापेक्षा शब्दांशी खेळलेलं पटतं मला..” तो हातातल्या पेनाने वहीवर रेघा ओढत म्हणाला,,
तशी आशू त्याच्या हातातला पेन ओढत म्हणाली, “का खराब करतोयस वही...?”,
तो परत हसला, “तू ना आमच्या क्लासमधल्या त्या सेक्रेटरी सारखी आहेस.. ती पण अशीच होती.. भारी खडूस होती...”
“अशा किती मुली आहेत तुझ्या आयुष्यात एकदा सांगशील का..?” ती फार व्याकूळ होत म्हणाली...
“नाही आयुष्यातली नाही ही... ही फक्त वर्गात होती..” सिद पुन्हा तिची खेचत म्हणाला..
ती फारच वैतागली.. ती रागात म्हणाली, “सिध्दार्थ प्लीज आपण थांबूया इथेच.. नको हे फ्रेंडशीपचही नाटक आणि नको काही.. प्लीज..”
“तू पण सिद बोल ना.. आवडेल मला.., हे सिध्दार्थ बोललेलं नाही आवडत मला.. माझे फ्रेंड्स मला सिदच बोलतात..” तो तिच्याकडे पाहत म्हणाला..
“अरे मी काय बोलतेय तू काय बोलतोय..?”
“नया है वह..” तो आणखीन तिची मश्करी करत म्हणाला...
ती आता फारच चिडली... “तू वेडा आहेस का..., मला तर आता काही समजत नाहीये...”
तो हसत म्हणाला..., “मला समजतंय...”
“काय???”
“की तू भारी चिडलीयस माझ्यावर..” तो हसला...
ती स्वतःचं डोकं शांत करू लागली.. “तुझी मश्करी झाली असेल तर सिरियसली बोलूया का आपण...?”
“बरं... हे बघ आशू.. मी तुला हेच सांगायचं प्रयत्न करतोय की आपण दोघांनी एकमेकांना फसवलंय.. आता हे क्लिअर झालंय.. पण आता मात्र ते सगळं विसरूया.. नवरा बायको व्हायचं की नाही ते ठरवूच पण सध्या मित्र मैत्रीण हे नातं ओके आहे..” तो सहज म्हणाला...
“तू हे सगळं इतकं सहज कसं बोलू शकतोस... एका मुलीशी लग्न झालंय तुझं आणि तुला ती फक्त मैत्रीण म्हणून हवीय.. ही कोणती पध्दत...?”
“मैत्रीपेक्षा निखळ नातं लग्नाचंही नाहीये..” सिद म्हणाला..
“मैत्री करत नाहीत ती व्हावी लागते...”, आशू म्हणाली..
“त्यासाठी एकमेकांविषयी चांगल्या भावना मनात असाव्या लागतात....” सिद
“फसवणूक केलेल्या माणसाबद्दल चांगल्या भावना नाही येत मनात...” आशू
“तूही फसवलंच आहेस मला...”, सिद
“तू दिलेला धक्का मोठा आहेस.. पचत नाहीये मला....”, आशू
“आणि तू दिलेला धक्का कुणालाच पचणारा नाहीये...”, सिद
सिद हे बोलला आणि आशूला फार वाईट वाटले.. तिच्या डोळ्यातून आधीच पाणी वाहत आहे आता आणखीनच तिला रडू आले..
सिद हळूच बोलला, “मला वाटतं मैत्रीत हे धक्के वगैरे चालून जातं..., एकमेकांना माफ करून टाकूयात...आणि मध्येच खचलेलं आयुष्य जरा पुढे नेऊया...”
आशू शांतपणे म्हणाली, “मला तुझ्याशीच कोणतं नात लावूशी वाटत नाहीये...”
सिद हसत म्हणाला, “ओके.. नाते नसले तरी चालेल पण एक माणूसकीच्या नात्याने माझ्यावर एक उपकार कर, प्लीज तुझ्या बाबांच्या घरी जायचा विचार परत करू नको.. हे लग्न तोडण्याचा विचार कधी करू नको..., मी माझ्या परीने तुला सगळं पुरवेल... पण हे लग्न मोडू नको.. कारण तू फक्त लग्न मोडशील पण आमचं हे छोटंसं घर आहे.. ते पैशांनी नाही माणसांनी भरलेलं आहे.. ते घर मोडून पडेल गं..., म्हणून प्लीज..., इतर नवऱ्यांसारखा तुला माझ्याकडून कधी मानसिक शारिरिक छळ होणार नाही असे मी तुला वचन देतो...”
आशू स्वतःचे डोळे पुसत त्याच्याकडे पाहत म्हणाली, “हे सिरियस आहे की मश्किरी...??”
तो हलकेसा हसत म्हणाला, “तुला जे समजायचं ते समज... हळू हळू समजेल तुला मश्किरी की गंभीर आहे माझं बोलणं ते....”
ती शांत बसली...
चल पुढचा अभ्यास करूया.... “प्लीज प्लीज मला एवढी ही एक्झाम पास करण्यात मदत कर.. तुला पाणीपुरीची पार्टी देईल...”
आशूला हे ऐकून हसू आलं... गालावर ओघळणारे अश्रू आणि चेहऱ्यावर आलेलें हलकसं हसू... हे काहीतरी वेगळंच कॉम्बिनेशन होतं...
हसता हसता रडणे माहित होते तिला...
रडता रडता हसायला शिकवले त्याने तिला....
“पाणी पूरी आवडत नाही मला..” ती हळूच म्हणाली..
“ओह माय गॉड... हे काय ऐकतोय मी... एका मुलीला पाणीपुरी आवडत नाही... हे तर असंभवच म्हणावं लागलं...”
ती हसत म्हणाली, “माझी चॉईस वेगळी आहे... इतर मुलींसारखी नाही....”’
तो हसला आणि क्षणभर तिच्याकडे पाहत त्याने विषय बदलत तिला अभ्यासातले सांगायला सांगितले...
त्यानंतर दोघांनी मिळून थोडाफार अभ्यास केला... सिदची मश्किरी, वहिवर रेगोट्या ओढणं चालूच होतं, आणि आशू त्याला मधून मधून ओरडत होती...
असं करत रात्री दोन पर्यंत त्यांचा अभ्यास झाला... आशूने सर्व चाप्टरमधले मेन पॉइंट्स त्याला समजावले आणि अकाउंटिंग पुस्तक हातात घेणार तेवढ्यात सिदने तिच्या खांद्यावर डोके टाकले... त्याला झोप लागली होती....
आशूने त्याच्या त्या निरागस चेहऱ्याकडे पाहिले... एखाद्या लहान मूलासारखा तो तिच्या खांद्यावर झोपी गेला होता... तिने समोर पाहिले तर समोर त्याच्या वह्या पुस्तकांचा सगळा पसारा तसाच होता... तिला आईंचे बोलणे आठवले... ती गालातल्या गालात हसली...
तिने पुन्हा एकदा त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले खांद्यानेच त्याला हलवत ती म्हणाली, “सिध्दार्थ.. झोप आली असेल तर झोप जा...”,
सिद ताडकन जागा झाली.. तिच्या खांद्यावरचं डोकं काढत तो म्हणाला, “तुला नाही झोप आली का....??”
“नाही.. तू झोप जा...”
“ओके... असं म्हणत तो बेडवर पडला आणि पडल्या पडल्या त्याला झोप लागली...
तिने नंतर सगळा पसारा आवरला आणि स्वतः सोफ्यावर बसून पुस्तक वाचत बसली....
क्रमशः
लग्न- मैत्री – आणि मग प्रेम की आणखी काही.... सिद-आशूच्या नात्याचा नवीन सुरू झालेला हा प्रवास कसा वाटतोय नक्की सांगा....
©Bhartie “शमिका”