Login

पसंत आहे मुलगी भाग 20

Siddharth a chocolate boy and a cool boy, who is don't tense about their future and he don't have any dreams.. and he don't want to marry anywhere. but when he meets ashwini, his thoughts changes strangely.. Ashwini, his bride to be.. he loved he

भाग २०

पूर्वार्ध- मागच्या भागात आपण पाहिले की आशू तिच्या माहेरी निघून जाते. तिला दारात पाहून तिच्या आईलाही धक्का बसतो. आशू त्या रात्री घडलेली सगळी हकिकत तिच्या आईला सांगते व तिची आई मात्र तिला समजवण्याचा प्रयत्न करते. खूप वेळ त्यांच्यामध्ये हेच संवाद चालू असतात. आणि अचानक आशूची आई तिला भूतकाळात घडलेल्या काही घटनांची आठवण करून देते आणि आशूच्या डोळ्यासमोर निष्पाप सिध्दार्थचा आणि तिच्या क्रुर बाबांचा आणि दादाचा चेहरा येऊ लागतो...

इथून पुढे....

ज्याप्रमाणे आशू सिदचा विचार करत होती, तसाच सिदपण ऑफीसमध्ये तिचाच विचार करत होता. रोज ऑफीसमध्ये सर्वांना भारी भारी जोक मारून, एकमेकांच्या नकला करून सर्वांना हसवणारा, प्रसन्न असणारा सिद दोन तीन दिवसापासून खूप नाराज दिसत होता. याचे कारण फक्त संकेतला माहित होते पण इतर जण त्याला आज सारखे त्याच्या मूडबद्दल विचारत होते पण सिद शांतपणे हसून त्यांना सर्व काही ठीक असल्याचे सांगत होता.

सिदची ही अवस्था संकेतला बघवत नव्हती, ऑफीस सुटताच त्याने सिदला बळजबरी त्याच्या गाडीवर बसायला सांगितले आणि त्याला कॉलेज बाहेरच्या, त्यांच्या नेहमीच्या कट्ट्यावर घेऊन आला.

सिद वैतागत म्हणाला, “राव, इथं का आलोय आपण इथं? इथं आलं ना की मला हा डोक्यावर ठेवलेला टेन्शनचा दगड फेकून देऊ वाटतो, सगळ्या जबाबदाऱ्या अशा झटकून टाकू वाटतात आणि इथल्या चहाच्या वाफेत, रस्त्यावरच्या वर्दळीत आणि तुम्ही ओढत असलेल्या सिगारेटीच्या धुरातही रमावं वाटतं रे... पण आता मी तसं नाही करू शकत..., संक्या घरी जावं लागणारे”, सिद असं म्हणाला आणि तेवढ्यात समोरून अभ्या आणि तेज्या चहाचे कप आणि सिदसाठी क्रिमरोल घेऊन आले.

सिद त्यांच्याकडे पाहून पुन्हा वैतागत म्हणाला, “यार यांना कुणी बोलावल इथं...?, तुमचा काही वेगळा प्लॅन असेल ना तर आताच बाय..., नाईट आऊट धिंगाणा वगैरे नाही घालायचाय मला संक्या... घरी जाऊ दे मला...”,

तसा अभ्या पुढे येऊन त्याच्या हातात चहाचा कप देत म्हणाला, “गपचूप चहा पितोस का आम्ही आमच्या पध्दतीने पाजू...?”,

अभ्या त्याच्या दिशेने चहाचा कप आणू लागला तसा सिद म्हणाला, “राव गरमे..., मश्करी नको...” सिदने तोंड वाकडं करतच चहाचा कप घेतला... तेज्याने त्याला हातात क्रिमरोल दिला.. आणि तिघांनी आपापला कप घेऊन सिगारेट शिलगवू लागले...

सिद एकदम त्यांच्याकडे रागाने पाहत म्हणाला, “धूर नकोय हा बिल्कूल मला... नायतर हा चहा पण तुम्हीच प्या मी जातो...”

“अरे अरे सिध्द्या.. एवढा काय वैतागतोयस...?” तेज्या शिलगवलेली सिगारेट मागे घेत म्हणाला, “अरे आम्हाला चहा जातो का तसा..., सिगारेट इज मस्ट ना...?”

सिद रागात चहाचा कप तोंडाला लावत म्हणाला, “डोक्यात जातोय तो वास..., मी गेल्यावर ओढत बसा सिगारेट...”,

तसा अभ्या हसत म्हणाला, “सिध्दू... वास नाकात जातो डोक्यात नव्हे....”

सगळेजण हसू लागले... सिद सर्वांकडे रागात पाहत म्हणाला, “माझ्या जातोय डोक्यात.. तुम्हाला काही प्रॉब्लेम...?, आधीच सांगतोय.. मला नाही आवडत तो सिगारेटचा वास..., माझ्यासमोर नका पीत जाऊ....”,

सिद असा म्हणाला आणि तिघांनी एकसोबत सिगारेट खाली फेकली आणि म्हणाले, “बरं..., फेकून दिली सिगारेट..., आज आम्ही सिगारेट नाही पित... बास...?”,

सिद हलकासा हसत म्हणाला, “साल्यांनो... नौटंकी बास झाली..., सात वाजत आलेत.. मला घरी जावं लागेल... काय वाढून ठेवलंय पाहावं लागल...”

तिघं त्याच्याकडे न समजल्यासारखे पाहू लागले..

सिद वैतागूनच म्हणाला, “जेवायला काय वाढलंय पाहावं लागेल...”

तसे तिघं हसले आणि म्हणाले, “काही पण असू दे.. आज आपण सोबत जेवूया..., अगदी तुझ्या आवडीचं सगळं खाऊ..., नो मटण ओन्ली चिकन.. ओके...?” संक्या म्हणाला...

सिद पुन्हा वैतागून काही बोलणार इतक्यात तेज्या म्हणाला, “लाव लाव वहिनींना फोन लाव.., सांग आज घरी उशिरा येणार म्हणून.. सांग सांग...”

तसं सिदने संकेतकडे पाहिले...,

संकेत शांतपणे,  “काकूंना फोन लाव..., त्यांना सांग..”,

सिद आता जास्तच वैतागून म्हणाला.. “अरे यार.. आईचे दिवसभरात किती फोन येऊन गेलेत.. मी एकही उचलला नाहीये... आता घरी जाऊन तिला काय उत्तर देऊ याचं टेन्शन आलंय मला, अन् तुम्ही रात्रीच्या जेवणाच्या बाता मारताय...”

तिघंजणं एकमेकांकडं पाहू लागले...

“काय सांगायचंय काकूंना..?”, अभ्या म्हणाला...

तसा सिद ओरडून म्हणाला, “संक्या सांग रे ह्याला काय सांगायचंय ते..., यार तुम्ही का माझं टेन्शन वाढवताय..? जाऊद्या मला घरी..., बघतो मी माझं...”

“बघतो मी माझं म्हणजे, काय झालंय सांगशील तर कळल ना आम्हाला सिध्दू..” तेज्या गंभीरपणे म्हणाला..

सिद हताश होऊन कट्ट्यावर बसला..,

संकेत त्या दोघांना डोळ्यांनेच शांत बसण्याचा इशारा करत म्हणाला, “ए सिध्द्या..., आज काय झालंय नवीन..?, घरी सांगितलं का तू..?, आई-बाबा तुला काही ओरडले का...?,

तसा सिद म्हणाला, “काही सांगितलं नाही..., पण आता सांगावं लागणार आहे कारण तुमची सो कॉल्ड वहिनी गेलीय निघून माहेरी..., मोठी मोठी प्रवचनं देऊन... यार ती तर असं वागत आहे जसं की माझ्यामध्येच काहीतरी खोट आहे.. आता तुला सांगतो संक्या, माझ्या घरचेपण मलाच दोष देणार..., बायको सोडून गेली म्हणून मलाच दोषी धरणारे..., म्हणून ना घरी जावं कसं हेच कळत नाहीये.. त्यात आज दादा-वहिनी मुंबईला चाललेत... या अशा वातावरणात कसं त्यांना तरी कुठं जावंसं वाटणारे....?, काही कळत नाहीये.. डोक्याचा भुगा झालाय..., अक्षरक्षः अरे....” असं म्हणत असताना सिदच्या डोळ्यात पाणी आलं, त्याला ते थांबवता आलं नाही..

तिघं जणं एकमेकांकडे पाहत होते, त्यांनी आज पहिल्यांदा सिदला रडताना पाहिलं होतं...

थोड्यावेळाने संकेतच त्याच्या शेजारी येऊन बसला आणि म्हणाला, “अशा कशा गेल्या वहिनी..? आणि गेल्या तर तू घेऊन ये..., हे बघ.. तुला कुणी दोष देत नाहीये सिध्द्या... पण खरोखरंच ही एवढी मोठी गोष्ट नाहीये की तुम्ही लग्नं मोडावं....”,

तेवढ्यात तेज्या म्हणाला, “संकेत भाऊ असं कसं म्हणतोस तू की ही एवढी मोठी गोष्ट नाहीये..., ही मोठी फसवणूक आहे आणि मुळात तशा मुलीशी सिदला राहायचेच नसेल तर का आपण फोर्स करायचा..?, आपणही आणि त्याच्या घरच्यांनीही त्याच्यावर फोर्स नाही केला पाहिजे..., सिध्दू... जा तू बिनधास्त घरी..., सांग आईबाबांना, असं नि असं आहे..., त्यांनाही शॉक बसल्याशिवाय राहणार नाही... एवढी मोठी फसवणूक कुणी कसं करू शकतं तुझ्याशी..., वहिनी घटस्फोट म्हणतायत ना देऊन टाक तू पण घटस्फोट... ,अरे अशा लाखोने मुली मिळतील तुला...”,

तेज्या त्याचे मत सांगत होता... सिद शून्यात नजरेत भावशून्य होऊन बसला होता...

तेवढ्यात अभि पण म्हणाला, “हो सिध्दू... तेज्या बोलतोय ते बरोबर आहे.., टेन्शन घेऊ नकोस..., तुझी काही चूक नसताना तू का एवढा स्ट्रेस घेतोय..., तरी आम्हाला वाटलेलंच की मुलीमध्ये काहीतरी खोट असणार... यासाठी लग्नासारखी गोष्ट कधीच अशी घाई गडबडीत करायची नसते..., एवढी वर्षं लग्नाचं नाव काढलं नाहीस... आणि अचानक एकाएकी चेहरा बघून मुलीला पसंती सांगून दिलीस...”

“अरे काय बोलतो अभ्या, सिदला आवडली होती वहिनी.., आणि लग्नाआधी एखादी मुलगी कशी स्वतःहून सांगेल की माझं असं असं आहे..., मुळात लग्नच एवढ्या घाईत झालं तिला सांगायला...”, हे बोलत असताना एकदम संकेतला सीमाची आठवण झाली. आशूची मैत्रीण सीमा. तिला सिदशी महत्त्वाचं बोलायचं होतं. हे संकेतला आठवलं आणि त्याच वेळेस सिदलाही हे आठवलं की आशू त्याला म्हणाली होती की, तिने त्याला हे सांगायचा खूप प्रयत्न केला.

संकेतला हळू हळू सर्व गोष्टींची लिंक लागत गेली, लग्नाच्या दिवशी हॉलच्या मागे घडलेला प्रकारही त्याच्या डोळ्यासमोरून सरकून गेला...

संकेत खूप तळमळीने म्हणाला, “हे बघ सिद मला तर नाही वाटत याच वहिनींची काही चूक आहे.. तू जा आणि त्यांना घेऊन ये..., त्यांनी सांगायचा प्रयत्न केला अरे तुला पण....”

तेवढ्यात तेज्या म्हणाला, “अरे पण झालं गेलं ते झालं.. आता लग्न झालंय.. आता समजलं ना सिध्दूला पण..., जर आता त्याला ती नाही आवडते तर तू का फोर्स करतोय संक्या.. मला हेच कळत नाहीये...”

“बरं.. बरं...”, संकेत डोकं शांत करत म्हणाला. “मी काही फोर्स करत नाहीये.. सिध्दू तुला काय वाटतं सांग..., तुझा काय विचार आहे सांग...?”

सिद शांतपणे म्हणाला, “मला नकोय यार हा राडा सगळा..., आमच्या घरात एकदा जोडलेलं लग्न कधी कितीही काहीही कारण असलं तरी नाही तुटत अरे..., तशी परंपराच नाही आमच्या घरी.. घटस्फोट आणि हे सगळं टोकाचं वाटेल रे घरच्यांना...”,

“अरे घरच्यांचं मरूदे.. तुझं सांग.., तुला काय वाटतंय...” तेज्या म्हणाला..

“मला ना समजत नाहीय, म्हणजे मला नाही माहीत मी तिच्यासोबत कसा आयुष्यभर राहणार आहे, कसं असणारे आमचं पुढचं लाईफ..., पण मला ना घटस्फोटापर्यंत नाही न्यायचं रे हे प्रकरण..., खरंच...”, सिद नाराजपणेच म्हणाला..

“म्हणजे तुला घटस्फोटही नकोय आणि वहिनींसोबत राहायचंही नाहीये...., म्हणजे तुला आयुष्यभर घुसमटत राहायचंय...?” तेज्या रागात म्हणाला....

“याला घुसमटणं नाही भाऊ... कुणामध्ये तरी जीव अडकणं म्हणतात..” संकेत आनंदाने म्हणाला..

तसा अभ्या संकेतवर रागवत म्हणाला, “संक्या, प्रेमाची फिलॉसॉफी पुस्तकात, नाटकात नि सिनेमात ठिक वाटते..., इथं सिदचं उभं आयुष्य आहे..., आणि संक्या...सिध्दूच्या जागी तू असता तर तू काय केलं असतं रे..., त्याला ज्ञान पाजाळून काही फायदा नाहीये.. एकदा त्याच्या जागी उभं राहून विचार कर...”

संकेत हसत म्हणाला, “जर माझ्या लाईफमध्ये अशी मुलगी आली असती ना तर हे एवढंसं कारण मला तिच्यावर प्रेम करण्यापासून रोखूच शकलं नसतं..., कारण प्रेम हे आंधळ असलं तरी ते डोळस असतं.. जे पाहायचं तेच त्यात पाहिलं जातं...”

अरे संक्या...प्रेमात जात, पात, रंग, उंची वगैरे पाहिली जात नाही.., हे फक्त काल्पनिक विश्वात अरे, रिअल लाईफमध्ये नाही......, इथे कोणता नाटक सिनेमा चालू नाही, सिदच्या आयुष्याचा प्रश्न आहे..”

आय डोन्ट नो.., पण मी नसता केला विचार..., आणि इन फ्युचरही माझ्यावर अशी वेळ कधी..., किंवा वेळच कशाला...., सिध्द्या.. तू काय विचार करतोय ते सांग..., तू आशू वहिनींना नाकारलंस ना तरी मी तिला कधीही, कुठल्याही क्षणी आपलंस करू शकतो...”,

संकेत एवढं बोलला आणि सिध्द्या त्याच्या अंगावर धावून जात म्हणाला, “साल्या.. वहिनी म्हणतो ना...?, आणि हे असं बोलतो...???”

संकेत मोठमोठ्याने हसत म्हणाला, “भाई..., या दोघांची फालतू बडबड विसर आणि वहिनींना घेऊन ये..., तू तिच्याच प्रेमात पडलायस..., तिच्या आयुष्यात दुसरं कुणी आलेलं पाहून जळतेय ना तुझी..., समजून जा..., तुझा जीव अडकलाय तिच्यात..., प्रेमात पडलाय तू वहिनीच्या...., जा गप अन घेऊन ये...”

संकेत हे बोलला आणि सिदने त्याची कॉलर सोडली..., जरासा लांब येऊन तो अस्वस्थपणे इकडे तिकडे बघू लागला...

तेवढ्यात त्याला एक फोन आला...,

फोन अननोन नंबरवरून होता.. सिदने उचलला..

“नमस्कार, सिध्दार्थ दाजी, उर्फ सिद.. बरोबर ना...?”,

सिद म्हणाला, “कोण बोलतंय..?”

“अहो असं काय करता.. आता दाजी म्हणतोय म्हणजे तुमच्या बायकोचा भाऊ ना मी...”

सिद शांतपणे म्हणाला, “बोला..”

“ओळखलं ना पण तुम्ही, मी कोण आहे ते....?”

“हो ओळखलं, दिनेश भाऊ बोला...”

डॅनी मोठमोठ्याने हसत म्हणाला, “दाजी..., डॅनी भाई बोलतात मला.. तुम्ही एटलिस्ट डॅनी तर बोला...  ते कसंय ना दिनेश वगैरे बोललं की शाळेत गेल्यासारखं वाटतं...”,

“ह्ममम... बोला ना, काय बोलताय...?”

“काय बोलायचं आता..., जेवले का, झोपले का, उठले का.. हे बोलायला डॅनी तुमच्यासारख्या माणसाला फोन करणारे का....?” डॅनी हसत म्हणाला.

“मला समजत नाहीये.., नीट काय ते बोला”. सिद शांतपणेच बोलला.

“बरं.., घरी या तुम्ही जरा..., बोलायचंय महत्त्वाचं...”,

सिद जरा गोंधळून बोलला, “बोला ना.. ऐकतोय मी...”

“अहो काय सिध्दार्थराव..., घरी या म्हटलं मी... काय ऐकता तुम्ही...?”

सिद जरासा चिडत म्हणाला, “आत्ताच सुटलोय मी कामावरून, घरी जायचंय..., काय असेल ते बोला ना फोनवर...”,

“अरे बापरे.. दाजी,.., सरकारी नोकरी लागली की काय...????” असं म्हणत डॅनी परत हसला.

सिद शांतपणे म्हणाला, “ठेवू का फोन, जर तुम्हाला काही बोलायचं नसेल तर...”

डॅनी जरासा चिडत म्हणाला, “अय..., गप येतो घरी की जिथं आहेस तिथून उचलून आणायला पोरं पाठवू....??”,

हे ऐकून सिदच्या डोक्यात राग गेला.. तो पुढे काही ओरडून बोलणार इतक्यात समोरून फोन कट झाला होता..

त्याचा अस्वस्थ चेहरा पाहून त्याचे मित्र म्हणाले, “सिद्धू काय झालं.. कुणाचा फोन?”

सिदने फोन ठेवला आणि म्हणाला, “आशूच्या भावाचा फोन होता.., फार उर्मटपणे बोलतोय, दादागिरी दाखवायला सुरू केली वाटतं...., मला ना वैताग आलाय वैताग...”, सिद जोरात जवळच्या भिंतीवर हाताची मूठ आपटत म्हणाला... “कुठून दुर्बुध्दी सुचली आणि या असल्या हरामखोर मुलाच्या बहिणीशी लग्न केलं मी... आता तेच होणार... भांडणं आणि फक्त भांडणं..., तरी संक्या मी सांगतोय तिला... घटस्फोटापर्यंत नको जायला... यार माझी फसवणूक झालीय... पण मी एका शब्दाने तिला बोललो नाही की जा माहेरी किंवा निघून जा म्हणून..., यार मलाच काय धमकी देतायत ही लोकं...., खरंच लय मोठ्या अडचणीत सापडलोय यार मी.....” सिद भिंतीवर रागाने हात आपटू लागला..

“सिद भाऊ शांत हो रे..., शांत हो...” तेज्या पुढे येत म्हणाला...

“घाबरतोस काय... चल आम्ही हाय की..., आम्ही पण येतो... काय खाणार थोडीच आहे तो डॅनी का फॅनी... तू डॉन असशील तुझ्या एरियात... काय आपण पण काय बांगड्या घातल्यात काय हातात..., चूक नसताना काय ऐकायची दादागिरी...., चल सिध्द्या... आम्ही हाय....”

सिद डोक्याला हात लावत म्हणाला.., “मला हेच नको होतं रे... हेच नको होतं... आणि हेच झालंय... माझ्या आयुष्याची वाट लागलीये...”

“सिद शांत हो..., आम्ही येतो म्हटलं ना... चल.. काय बोलतायत वहिनीच्या घरचे ते तर बघू ना... मग पुढचं ठरवू... आणि तू घरी सांग हे.. नाहीतर आई-बाबा टेन्शन घेत बसतील...”

“मला नाही हिंमत रे संक्या... ह्या असल्या गोष्टी खरंच नाही पचणार त्या दोघांना..., जीव जाईल त्यांचा..., खूप साधं सरळ जीवन जगत आलोय आम्ही आजपर्यंत... तुम्हाला तर माहितच आहे...”,

“नको टेन्शन घेऊ चल....”, संकेत त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला...

आणि पुढच्या काही मिनिटांत सिद आशूच्या घराजवळ पोहचला... सिदला पाहून लगेच दोन तीन मुलांनी त्याला घराच्या मागच्या अंगणात यायला सांगितले... सिद चक्रावला, फास्ट गाडी घेऊन तो आशूच्या घराच्या मागच्या अंगणात गेला आणि त्याच्या मागे त्याचे मित्र पण आले...

सिदने समोर पाहिले तर तिथे आशूचे बाबा, तिचा डॅनी भाऊ आणि त्यांच्यासोबत काही माणसं होती... सर्वांच्या चेहऱ्यावरचे विचित्र भाव पाहून सिदच्या डोक्यातला राग अजून वाढला... पण तिथे आशूचे बाबा असल्यामुळे तो स्वतःच्या रागावर ताबा ठेवत त्यांच्या समोर जाऊन उभा राहिला...

डॅनी काही बोलणार इतक्यात आशूच्या बाबांनी सिदला विचारले, “काय वाद झाले काय आशू मध्ये आणि तुमच्यात....?”

सिद काहीच बोलला नाही...

“नाही झाले असतील... पण आता ते वाद सगळे विसरायचे..., आता काय लग्न झालंय.. लग्न झाल्यावर वाद हे होणारच..., पण आमची मुलगी जरा जास्तच हट्टी आहे... राग आवरत नाय तिला पण..., शेवटी काय बाप तशी लेक..., आमच्यावरच गेलीय..., रागारागात आली ती घरी... नांदायचं नाही म्हणतीय..., पण तुम्ही नका घेऊ तिचं मनावर..., आता काय जे झालंय ते झालं..., लग्नाला सात दिवस होऊ नाही तर एक दिवस होऊ शेवटी लग्न झाल्यावर गोष्टी बदलतात.. आता कसला आलाय घटस्फोट.. उलट साध्या गोष्टी सगळ्या अवघड होऊन बसतील...., तुमच्यासाठी...” आशूचे बाबा हे ठळकपणे सिदकडे पाहून म्हणाले...

सिद काहीच बोलत नव्हता, तो फक्त ऐकत होता...

“तर मी काय म्हणतोय... उगाच वाढीव खर्च करण्यापेक्षा... तुम्हीच समजवा आमच्या मुलीला आणि घेऊन जा घरी... कारण काये.. ती हट्टी आहे, बालिशपण आहे..., पण तुमचं तसं नाय ना..., पुढं होणारे दुश्परिणाम तुम्हाला चांगलेच कळत असतील... न्हाय का...? त्यात लग्नाला सात दिवस झालेत..., आता सात दिवसात काय काय होतंय ते तुम्हाला आम्ही काय सांगणार...”

हे ऐकून सिदच्या अंगात राग संचारत होता पण तो कंट्रोल करत हे सगळं ऐकत होता...,

काहीवेळ कुणीच काही बोलले नाही..., आणि इकडे तिकडे पाहून आशूच्या बाबांनी खिशातून काही पैशांचा बंडल बाहेर काढला आणि सिदच्या हातावर ठेवत म्हणाले, “पंचवीस लाख आहे..., हुंडा म्हणून देता आले नाही... आता हेच हुंडा समजून घ्या... आणि मुलीला नांदवा”

सिदला तर हे पाहून आणखीनच त्रागा झाला...., तो रागाने त्यांच्याकडे पाहू लागला...

“आणि फक्त एवढंच नाही हा... हवं तेव्हा तुम्ही, हवं ते मागू शकता..., काय देऊ..? फोर व्हिलर घेऊन देऊ... तशी आता आम्ही ही स्कॉर्पिओ वापरत नाही... हवी असेल तर घेऊन जा...” आशूचे बाबा जवळच्या गाडीकडे बोट दाखवत म्हणाले...

“हां.. आणि नोकरीचा पण काही प्रॉब्लेम असंल तरी सांगा..., आमदाराच्या गाडीवर ड्रायव्हर हवाय ना पप्पा..., चांगला पंचवीस तीस हजार पगार आरामात भेटंल...” डॅनी हसत म्हणाला...

सिदला हे सगळं पाहून खूप मोठा पश्चाताप होता... त्याचे मित्रही दुरून हे सगळं पाहत होते...

सिदने काही क्षण विचार केला आणि तो पैशांचा बंडल परत त्यांच्या हातावर ठेवत म्हणाला, “लग्न म्हणजे मुलगी विकणं...., पैसे घ्या आणि मुलीला नांदवा.. असा घान विचार करणारे आम्ही नाही हा.........., तुमचा पैशांचा माज तुमच्याकडं... आमच्या समोर नाय...”,

एवढं म्हणत सिद निघाला...

“आशूला घेऊन जाताय ना...?”, आशूच्या बाबांनी कठोर शब्दांत विचारले...

सिदने पुन्हा काहीक्षण विचार केला आणि म्हणाला, “तिच्यासाठीच आलोय....”,

 हे ऐकून आशूच्या बाबांच्या आणि दादाच्या चेहऱ्यावर जरासं स्मित झळकलं...., दिवसभर खाली गेलेली मान आत्ता कुठे वर आली...,

“बरं..., जा जा... घेऊन जा तिला..., पण आत्ता जे घडलं ते काय सांगू नका तिला..., म्हणजे तसं काही नाही..., पण हे कळल्यावर ती बळं यायची नाय तुमच्यासोबत....”

असं म्हणत तिचे बाबा आणि डॅनी जवळच्या गाडीत बसले, मागे उभी असलेली काही माणसंपण बसली आणि ती गाडी तिथून निघून गेली....

सिद पुढच्या दाराने आशूच्या घरात आला..., आशू तिच्या खोलीत होती... तिच्या आईने त्यांना पाणी विचारले पण सिद शांतपणे म्हणाला, “आशूला घ्यायला आलोय..., कुठेय ती...?”,

तिच्या आईने आशूला आवाज दिला... तेवढ्यात सिद म्हणाला, “वर खोलीत आहे का, मी जातो वर....”,

असं म्हणत सिद वर आशूच्या खोलीकडे आला..., सिदचा आवाज ऐकताच आशूने लगेच खोलीचा दरवाचा उघडला...

सिद बाहेरूनच बोलला, “घरी येतीयस ना...?”,

आशूला काय बोलावे सुचले नाही... ती इकडे तिकडे पाहू लागली...

“चल लवकर खूप उशीर झालाय.. दादा वहिनी पण जाणारेत आज...” तेवढ्यात सिदला त्याच्या आईचा फोन आला...

“हे बघ आईचे फोनवर फोन येतायेत...” सिद फोन दाखवत म्हणाला..

आशू काहीच बोलली नाही.. हा इतक्या सहजपणे कसं हे सगळं बोलतोय याचा ती विचार करत होती.

“हा आई..., येतोय... हो हो येतोय घरी..., हो अगं आशूला घेऊन येतोय... आलोच...” असं म्हणत त्याने फोन ठेवला.. आणि आशूकडे पाहत म्हणाला, “चल आवर लवकर, मी खाली आहे....”

आशू त्याला थांबवत म्हणाली, “मला नाही यायचंय पण...., मी माझं मत तुला...”

सिद तिच्याकडे रागाने पाहत म्हणाला, “नको करू हे असले हट्टं..., गपचूप घरी चल..., काय तुला काय सॉरी म्हणायचंय का मी...? तर आय एम सॉरी... चुकलंच माझं, तुझ्याकडे पाहून किंचाळलो मी, दारू पिऊन घरी आलो, दोन तीन दिवस तुझ्याशी रूडली वागलो... बास चुकलं माझं... खूप मोठी चूक झाली..., इथून पुढं नाही होणार असं..., मी चुकी केली मी माफी मागितली..., आता घरी चल.., जे काही असेल आपल्या आपल्यामध्ये पाहू..., गावजमा नको करायला...”,

आशूला त्याच्या ह्या बोलण्याने तिची चूक गवसली होती आणि त्याच्या बोलण्यातून तिला एक वेगळाच उत्साह आला... तरी ती शांतपणेच म्हणाली, “एक आठवडा राहते इथं.. आय मिन विचार करते.. तू ही कर..., आई-बाबांचा विचार करून, लोकांचा विचार करून आयुष्याशी का खेळायचं एकमेकांच्या...?”,  

सिद तिच्याकडे रागाने पाहत म्हणाला, “एकदा सांगितलेलं कळत नाही तुला...?, चल म्हटलो की चलायचं.... मला तू कशीही करून माझ्या घरी हवीयस... दॅट्स इट..., जो काय विचार आहे तो आपल्या घरी जाऊन करू..., पण मला तू इथं नकोयस...” सिद अगदी ठामपणे म्हणाला...

आशूने त्याला विचारले, “का...??”,

सिद तिच्याकडे पुन्हा रागाने पाहत म्हणाला, “तुझ्या का ची उत्तर नाहीत माझ्याकडे... आई वाट पाहत आहे... लवकर आवरून खाली आलीस तर बरे होईल...”

असं म्हणत तो तिथून खाली आला... आणि आशू भिंतीला टेकून रडू लागली.... आता तिच्या डोळ्यात आलेले अश्रू हे आनंदाश्रू होते... दिवसभर ती विचार करत होती, सिद येईल की नाही येईल..., आणि शेवटी तो आला होता..., तिला घ्यायला..., त्यामागचे कारण तिला माहित नव्हते.. पण तो आला होता, तिच्या नसण्याने त्याला फरक पडत होता.., याची तिला नकळत जाणीव झाली आणि तिचे डोळे भरून आले....,

क्षणार्धात तिने तिचे आवरले आणि खाली निघून आली....

दोघेही आपल्या घराच्या दिशेने निघाले...

सिदने आशूला आणले हे पाहून त्याचे बाबा गालातल्या गालात हसत म्हणाले, “पाहिलेस सरिता.., तू म्हणत होतीस आठवडा भर माहेरी गेलीय आशू... पण आपला पठ्ठ्या तर एक रात्रं तिच्याशिवाय राहू शकत नाहीये आता...”

सिद आणि आशूने हे ऐकले पण दोघांनीही याच्यावर काही प्रतिक्रिया दिली नाही....

थोड्यावेळाने संदिप आणि वहिनी मुंबईला निघाले आणि सर्वांनी त्यांना निरोप दिला...,

आई-बाबा बाहेर शतपावली करायला गेले आणि आशू घऱातले कामे आवरू लागली...,

सिद किचनमध्ये आला आणि तशी आशू दचकली..., सिद म्हणाला, “पाणी प्यायला आलोय...”

आशूने फक्त मान हलवली.....

“बाय द वे, तू माहेरी फक्त अभ्यासासाठी गेली होतीस...????”, सिदने विचारले..

आशू बावचळली..., ती शांतपणे म्हणाली, “माझ्या आईने खोटं सांगितलं...”,

“अच्छा म्हणजे खरोखरच निघून गेली होतीस..., पण सासू बाई हुशार हा..., मुलीचा संसार सुखी होण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतायेत.. नाहीतर...”

तेवढ्यात आशू म्हणाली, “नाहीतर...????”

“नाहीतर तू...”, सिद चाचरत बोलला...,

“ह्म...” आशू किचनमधले भांडी आवरू लागली...

सिद तिथे काही वेळ थांबला आणि तिथून निघाला, तेवढ्यात आशू म्हणाली, “सुखी संसार..??? मला तर आपला संसार होईल का नाही यावरच शंका आहे...”

तसा सिद विषय बदलत म्हणाला, “तुझे पुढच्या आठवड्यात पेपर म्हणजे माझेपण असणार जवळपासच... यार अभ्यास करायला हवाय मी... यावेळेस काही करून केट्या क्लिअर करायच्यात मला...”

आशू शांतपणे म्हणाली, “युनिवर्सिटीच्या वेबसाईटवर टाईमटेबल आलंय... चेक कर...”

“यार.. नाही पाहिलं मी.. आणि तुला सांगू अभ्यास तर काडीचा झाला नाहीय माझा... तू पण लास्ट इयर बी कॉम ना....?”, सिदने विचारले..

आशू भांडी घासता घासता म्हणाली, “हो...”

सिद हसला...., “तू फ्रेशर बॅच आणि मी..... ऐतिहासिक काळातलीच बॅच म्हणावी लागणार...”

आशू हलकीशी हसली...,

“पण सिलॅबस थोडाफार सेम असतो ना गं...?” सिदने विचारले...

“हो मे बी.. पहावे लागेल...” आशू म्हणाली..

“मग आज रात्री पाहुया.. थोडं फार हेल्प करशील मला..., काय पण करून केट्या क्लिअर करायच्यात मला यावेळेस...” सिद म्हणाला..

आशूने होकारार्थी मान हलवली....

सिद शांतपणे आशूकडे पाहत उभा राहिला....,

तिची भांडी घासून झाली तसे सिदने एक एक करून ती मांडू लागला...,

आशू आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली...

सिद तिच्याकडे पाहत म्हणाला, “नवरा बायको नाही... पण निदान मित्र मैत्रीण बनून तरी राहूया आपण... आपल्यात कधी काय जुळेल की नाही ते बघता येईल पुढच्या पुढं... पण आता मात्र वेळ देऊया ना एकमेकांना....”,

आशूला मोठा धक्का बसला.., म्हणजे याने मैत्रीण म्हणून मला घरी आणले... तिच्या मनात हेच उद्गार आले....

“आशू...???” त्याने तिला विचारातून बाहेर काढत म्हटले, “बोल ना... देऊया ना वेळ...???”

ती भुँवया उंचावत म्हणाली, “सोबत राहून....?”

सिद हलकेसे हसत म्हणाला, “हो.. मग त्यात काय झालं...?”,

आशू म्हणाली, “सोबत राहतात ते नवरा बायको असतात, मित्र मैत्रीण नाही”

“हो बरोबर आहे... मग आपण नवरा बायकोच आहोत की.. दुनियेच्या नजरेत... पण आपण घरात, एटलिस्ट या रूममध्ये तरी मित्र मैत्रीण बनून राहूया..., प्लीज...” सिद म्हणाला..

आशू थोडीशी भावुक होत म्हणाली, “आय कॅन अंडरस्टॅंड...” असं म्हणत ती भांडी मांडू लागली...

“अगं तसं काही नाहीये...” सिद उगाच तिची समजूत काढण्यासाठी म्हणाला..

आशू फक्त हसली आणि भांडी मांडून झाल्यावर किचनमधून बाहेर निघाली...

क्रमशः

आता सिदने आशूसमोर मैत्रीचा हात तर पुढे केला आहे... पण आशूला ही अनोखी मैत्री भावेल का..., स्वतःचा नवरा जेव्हा आपलं लग्नाचं नातं नाकारून केवळ मैत्रीचं नातं स्वीकारायला सांगतो, तेव्हा काय वाटले असेल तिला, यावर तिचे खरे काय मत असेल...? नवरा बायको एकाच घरात राहून केवळ मित्र मैत्रीण बनून राहू शकतात...?,

आता हे कळेलच येत्या भागांमध्ये..