भाग १९
पूर्वार्ध- मागच्या भागात आपण पाहिले की, आशू आणि सिदची त्यांच्या वैवाहिक भविष्यावर रात्रभर चर्चा होते, दोघांचे वाद होतात व अंतिमतः दोघं एका निर्णयापाशी येऊन ठेपतात- तो निर्णय म्हणजे घटस्फोट घेणे. आशूचे विद्रुप शरीर (सिदच्या म्हणण्याप्रमाणे) सिदला कधीच स्वीकारायचे नसते व शरीरावरून सौंदर्याची व्याख्या करणाऱ्या, टिपीकल मुलासोबत आशूला राहायचे नसते.
यामध्ये सिद फक्त स्वतःचा नाही तर घरच्यांचा व आशूच्या पुढील भविष्याचादेखील विचार करत असतो पण तिला तो मनापासून स्वतःची बायको म्हणवून घेण्यास तयार नसतो. आणि त्याचप्रकारे आशू त्याच्या विरूध्द विचार करते, ती समाजाचा, घरच्यांचा विचार न करता स्वतःच्या भविष्याचा विचार करते व सिदसोबत न राहण्याचा निर्णय घेते.
सकाळी सिद कामाला जात असताना ती त्याला शेवटचे सांगते की ती आज हे घर सोडून जाणार आहे व यावर सिदही खूपच वैतागून तिला ताबडतोब जाण्याचे सांगतो.
इथून पुढे-
सिद रागात कामाला निघून गेला व आशूही तिथून बॅग घेऊन थेट तिच्या घरी निघून गेली.
ती घराच्या रोडला रिक्षा थांबवून आपली बॅग घेऊन घराच्या दिशेने चालत येऊ लागली. तसे चौकातील काही कार्यकर्ते, घराशेजारी राहणाऱ्या काही बायका, माणसे तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. तिच्या हातात दोन मोठ्या बॅगा होत्या आणि त्या घेऊन ती खाली मान घालून चालत होती.
आता एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची मुलगी लग्नाला महिनाही पूर्ण न होता अशी बॅग घेऊन एकटीच घरी येत आहे हे पाहून सर्वजण तिच्याकडे टकामका पाहणारच. सर्वजण आपसात चर्चा करू लागले.
ती घराचे गेट उघडून घरात येऊ लागली तोच घरातून तिच्या आईने तिला पाहिले..
आशू गेट लावून आपल्या बॅगा आवरत घरात येऊ लागली आणि तेवढ्यात तिच्या आईने दारातच तिच्यावर एक घाबरलेला कटाक्ष टाकला...
आशूने आईकडे पाहिले आणि म्हणाली, “आत येऊ की नको...?”
आईला काय बोलावे काही सुचले नाही.., तिने घाबरतच तिला आत घेतले..
“अगं दोन दोन बॅगा घेऊन कशी काय आलीस तू..?, राहायला आलीस का, मग सिध्दार्थराव नाही आले का तुला सोडायला ?, अशी एकटीच कशी आलीस..” तिच्या आईने आल्या-आल्या प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.
“आई सर्व प्रश्नांची उत्तरं दारातच हवीयत का तुला..? तसं सांग हवं तर..” आशू दाराला खेटून रडका चेहरा करून उभी राहिली..
तिची आई एकदम अस्वस्थ झाली, “काय झालंय, तू अशी का बोलतीयेस.., अशी कशी अचावक आलीस, फोन नाही काही नाही.., मला बाई घाबरायला होतंय आता..??? तिच्या आईने तिच्या हातातल्या बॅगा घेतल्या व तिला हॉलमधल्या सोफ्यावर बसवू लागली.
आशू काहीक्षण डोक्याला हात लावून बसली.
तिच्या आईच्या ह्रदयाची धडधड वाढली आणि ती अस्वस्थपणे तिच्याकडे पाहू लागली.
“काय झालं आशू, सांग ना काय झालं, तू का अशी निघून आलीस...?, तिच्या आईने विचारले पण आशूने काही तिच्याकडे पाहिले नाही.
किचनरूममधून अलका मावशी म्हणजे घरातल्या कामवाल्या बाईने पाहिले आणि तिने ताबडतोब आशूसाठी पाणी आणले.
आशूच्या आईने आशूला पाणी प्यायला दिले, तिने पाण्याचा घोट घेतला आणि म्हणाली, “आई, मला नाही राहायचं तिथं. प्लीज मला तिथं पाठवू नकोस पुन्हा... मला नाही राहायचं तिथं..”
हे ऐकून तिच्या आईच्या ह्रदयात धस्सं झालं.., पण तेवढ्यामध्ये तिने अलका मावशीला आत पाठवले.
आशूच्या तोंडून हे ऐकून हादरलेल्या तिच्या आईने कसे बसे तिला वर तिच्या रूममध्ये नेले.
“अगं आशू काय बोलतीये काय तू..?”, आशूला बेडवर बसवत तिची आई म्हणाली.
“आई, खरंच मला तिथं नाही राहायचंय.., शेवटी जे व्हायचं तेच झालं आहे आई..” आशू डोळ्यातले अश्रू गाळत म्हणाली.
“म्हणजे..??”, आईने ह्रदयावर दगड ठेवत विचारले.
“कसं सांगू आई तुला, सिध्दार्थ...”
आशू पुढे काही बोलायच्या आधी तिची आई म्हणाली, “नक्की काय कळालंय त्यांना....”,
आशूने जरासे आश्चर्यकारकपणे तिच्या आईकडे पाहिले.
“अगं आशू सांग ना, नक्की त्यांना काय कळालंय...?”,
आशू आणखीन चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह पाडून आईकडे पाहू लागली.
“अगं बोल आशू, नक्की काय समजलंय त्यांना, तू सांगितलेस की कुणी दुसऱ्यांनी...”,
आशू आता डोक्याला हात लावत म्हणाली, “आई, लग्नाच्या पहिल्या रात्री काय समजणार त्याला...?”,
आई जराशी शांत होत म्हणाली, “तुझ्या भाजलेल्या शरीराबद्दल समजले त्यांना...”,
“हो..” आशू पुन्हा खाली नजर घालत म्हणाली.
तिच्या आईने सुटकेचा एक निश्वास घेतला.
आशू पुढे म्हणाली, “आई तो माझं भाजलेलं शरीर पाहून ज्याप्रकारे ओरडलाय ना, ती किंकाळी माझ्या कानात बसलीये, माझ्याच काय, त्याच्याही कानात ती किंकाळी घुमत असणार.., माझे ते काळे-निळे झालेले अंग त्याच्याही नजरेसमोरून जाता जाणार नाहीये.., अगं कित्येकदा मीच माझे शरीर पाहून कितीवेळा अशी किंचाळले आहे, तो माझे शरीर पाहून किंचाळणे सहाजिकच आहे..., आपण समजलो होतो तसा नाहीये गं आई तो... माझ्या कुरूप शरीरामुळे त्याला खूप फरक पडतो.. जो की कोणत्याही पुरूषाला पडेल... नाही आवडत कुणाला अशी बायको. मग का तुम्ही मला त्याच्या आणि त्याला माझ्या गळ्यात टाकताय. तुम्हाला तुमच्या इज्जतीचा, प्रतिष्ठेचा प्रश्न आहे ना आई, तर माझा जीव घ्या पण मला तिथे पाठवू नका...”, असे म्हणत आशू हुंदके देऊन देऊन रडू लागली.
तिची आई तर हे सगळं ऐकून थक्कं झाली होती, कितीतरी मुलांनंतर एखाद्या मुलाने आशूला होकार दिला होता आणि तो आशूला समजून घेईल अशी तिच्या आईची भाबडी आशा होती. पण हे सगळं ऐकून तिला सगळं संपल्यासारखं वाटत होतं.
आशूची आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, “त्याच्या आई-बाबांचे काय म्हणणे आहे?”
आशू डोळे पुसत म्हणाली, “माहित नाही..”
“माहित नाही म्हणजे..?” आईने प्रश्न केला.
“त्यांना नाही सांगितलं अजून.. पण कळेलच त्यांनाही लवकरच...” आशू उत्तरली.
“कळेल म्हणजे, अगं मग तू इथं आलीच कशी, त्यांना काही माहित नाही तर..?” तिची आई जरा गोंधळली.
“अगं आई, मी नाही सांगितलं त्यांना काही, सिध्दार्थच म्हणाला तसं, त्याच्या आई-बाबांना तो त्याचं समजावेल.., आणि आम्ही दोघांनी डिवोर्सचा निर्णय घेतलाय सो..”
ती पुढे काही बोलणार एवढ्यात तिची आई जोराने तोंडावर हात ठेवत म्हणाली, “डिवोर्स.. म्हणजे सोडचिठ्ठी...?”
आशू तिच्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाली, “मग एवढी ओरडतेस काय..?”
“अगं आशू.... तुला समजतंय का तू काय बोलतीये...? महिना नाही झाला तुमच्या लग्नाला आणि आता लगेच तू सोडचिठ्ठीच्या बाता मारतीयेस..? अगं बाई, मला तर काही समजेना आता...” असं बोलत तिच्या आईने डोक्याला हात लावला..
“आई, नको टेन्शन घेऊस.., जे व्हायचं तेच झालंय..., मला नाही काही वाटते अगं.. मला तर चांगलंच माहित होतं हेच होणार आहे..., आणि इथून पुढे काय होणार आहे हे ही मला माहित आहे.. का आपण उगाच एखाद्याच्या आयुष्याशी खेळायचं ना..., तो जसा आहे तसा आहे, उडाणटप्पू असो, अडाणी असो, बेरोजगार असो..., पण तरी का म्हणून त्याने अशी बायको सहन करावी.., प्रत्येकाचे विचार, आवडी-निवडी वेगळ्या असतात.. प्रत्येकजण मनाची सुंदरता नाही बघत.. मी शोधतेय तो राजकुमार कल्पनेतच बरा वाटतो.. सत्यात कुणी असा कधी अवतरणार नाहीये...” आशू स्वतःच्याच दुखःवर हसत म्हणाली.
“अगं आशू पण तू त्यांच्या आई-बाबांशी काही बोलली नाहीस काही नाही आणि लगेच कशी अशी निघून आलीस अगं...?, निदान सिध्दार्थरावांचं काय म्हणणे आहे हे तरी ऐकलंस की नाही..?.”, आई आणखीन वैतागून म्हणाली.
“त्याचं म्हणणं हेच आहे, त्यालाही नाही राहायचंय माझ्यासोबत..., पण काय ना त्याची एक नजर माझ्या चेहऱ्यावरचं सौंदर्य पाहतीये आणि दुसरी नजर माझ्या कपड्यांच्या आतल्या काळ्या निळ्या झालेल्या भाजलेल्या, कुरूप झालेल्या अंगाकडे पाहतीये.., आणि यातच त्याचा गोंधळ होतोय... पण मी तुला लिहून देते, त्याचा हा गोंधळ जास्त दिवस चालणार नाही... लवकरच या गोंधळातून बाहेर पडेल आणि मला विसरूनही जाईल. बाकी ते गिटारवर दोन-तीन गाणी वाजवणं, एखादी कविता लिहिणं हा सारा काही देखावा झाला...”, आशू जराशी तिरस्कृतपणे म्हणाली.
“असं नसतं गं आशू बाळा.. तू मनानेच का त्यांचं मत गृहित धरतीये... एकदा जावईबापूंशी बोलायचं.. त्यांचं काय मत आहे ते जाणून घ्यायचं.. आता लग्नं झालंय, ते मोडणं कसं शक्यंय.., आणि मला अजूनही खात्री आहे, ही घटस्फोटाची वगैरे अक्कल त्यांची नाही तुझीच असणार.., उचलली बॅग आणि आलीस माहेरी.., एवढं सोप्पं नाही गं लग्न म्हणजे. लग्न म्हणजे केवळ दोन-चार दिवसांचा खेळ नाही गं.. लग्न म्हणजे एकच सरळ वाट... तिथे दोन जीवांनी चालत राहायचे असते, एकाचा दुसऱ्याला त्रास झाला तरीही भांडणतंटा करत का होईना सोबत चालायचे असते. कधी एकाने तर कधी दुसऱ्याने समजून घ्यायचे असते. कधी तू कमी पडशील तर कधी सिध्दार्थराव कमी पडतील. तुमच्यातली ती कमी दोघांनी मिळून पूर्ण करायची. तू जर ही अशी बॅग उचलून तडा-तडा निघून आलीस तर ते तरी काय म्हणणार, काय तुझ्या पाया पडणार, का तुला हात जोडून विणवणी करणार.., एक लक्षात ठेव चूक आपली आहे, आपण त्यांच्यापासून सगळं लपवलं आहे. मग सहनही आपल्यालाच करावं लागेल ना. असा राग दाखवून काय होणार आहे, होऊन होऊन दुसरं काही नाही तर हे लग्नं मोडेल आणि आख्ख्या आयुष्यभर ह्या रागाचा, अहंकाराचा तुला पश्चाताप होईल”.
आशू हे ऐकत होती पण तिला पटत नव्हतं, “म्हणजे आई मी हे सगळं सहन करायचं म्हणतीयेस तू, तो माझं तोंड पाहणार नाही, रात्रं-रात्रं बाहेर राहणार, नाही धड माझ्याशी एक शब्द बोलणार.. म्हणजे अशा ह्या मुलासोबत मी आयुष्य घालावायचं म्हणतीयेस.., का पण...?, माझं अर्ध शरीर भाजलेलं आहे म्हणून...?, आणि तू चूक आपली आहे म्हणतेस ना.. तर माझी चूक नाहीये.. मी त्याला हे सांगायचा खूप प्रयत्न केला.. खूप.. पण नाही शक्य झालं ते..., आणि जे व्हायचं तेच झालं, आमचं लग्नं झालं.. आणि तसं असलं तरी अगदी लग्नाच्या रात्रीपर्यंत मी त्याला हे सांगायचा प्रयत्न केला... पण नाही जमलं..., जे व्हायचं ते झालं, तो किंचाळला माझ्या परिस्थितीवर..., खूप मोठ्याने किंचाळला आणि त्यादिवशीपासून त्याने माझ्या नजरेला नजर दिली नाहीये.., शरीर भाजलंय माझं.. पण तो माझ्या चेहऱ्याकडेही पाहायला तयार नाहीये...., मग अशा मुलासोबत मी का राहावं...? त्याला त्याच्या आई-बाबांची काळजी आहे म्हणून मी माझं आयुष्यं का त्या घरात झुरत काढू आई...?”
“अगं आज ना उद्या होईल सगळं ठिक...”, आई तिला समजावत म्हणाली..
“आई तुला खरं असं वाटतं....?, अचानक एका-एकी माणसाचे विचार एवढे बदलतील...?, आणि बदलतील तरी का बदलतील...?, अगं माणसांचंच सोड.. उद्या तुझ्या मुलाला जर अशी एखादी मुलगी मिळाली तर....???”
आशूची आई तिला ओरडत म्हणाली., “आशू....”,
आशू हसली, “नाही सहन होत ना...?, तुझी कुरूप मुलगी तू दुसऱ्या मुलाच्या गळ्यात टाकतीयेस..., पण तशीच एखादी मुलगी आपल्या घरात आणताना तू दहावेळा पाऊल मागे घेशील..., आणि हिच जगाची रित आहे..., मग का आपण एखाद्याच्या आयुष्याशी खेळायचं..., लोकांचा विचार करून का आपण दोन्ही जीवांचे आयुष्य बर्बाद करायचे.. खायला लोकं नाही देणार मला किंवा त्याला.. मग का लोकांसाठी, समाजासाठी आम्ही एकत्र राहायचं...? त्याला अजूनही त्याला हवी तशी मुलगी मिळेल.. आणि मला हवा तसा मुलगा या जन्मात मिळेल की नाही माहित नाही... पण तरी मी हा जन्म का वाया घालवू.. लग्न सोडून इतरही गोष्टी आहेत... त्या गोष्टींचा विचार करू दे ना मला.”
आशूची आई अस्वस्थपणे रूममध्ये फेऱ्या मारू लागली..
“आशू अगं तुझ्या बाबांना कोण सांगणार पण हे?, त्यांना नाही समजायचं हे.., ते तुला कसेही करून सासरीच पाठवणार. मला तर याचीच भिती वाटते की तू घर सोडून आलीयेस हे त्यांना समजलं तर ते तुला नाही पण तुझ्या सासरच्यांना....”
आशूच्या आईच्या तोंडून हे निघताच आशूपण थोडी स्तब्ध झाली... तिच्या डोक्यात संचारणारा राग आपोआप शांत झाला, बाबांचा, तिच्या डॅनी दादाचा आणि त्याच्या क्रुर मित्रांचा चेहरा तिच्यासमोर येऊ लागला आणि त्याचसोबत सिध्दार्थचा भोळा-भाबडा चेहरा तिच्या डोळ्यासमोरून सरकला.
दोघींच्या डोळ्यासमोर पाच वर्षांपूर्वी घडलेला, तो मन खिन्न करणारा प्रसंग येऊन गेला.
आशूच्या फोनची रिंग वाजली आणि तशा त्या दोघी त्या विचारांतून बाहेर आल्या..
आशूने फोन हातात घेतला, तर सिध्दार्थच्या आईचा फोन होता..
आशूचे हात थरथरू लागले.., शेवटी आपण त्यांना न सांगता निघून आलो याची थोडीफार तिला खंत वाटू लागली.
तेवढ्यात आशूच्या आईने तिच्या हातून फोन हिसकावून घेतला आणि फोन उचलला.
“हा सरिताताई बोला ना, आशूची आई बोलतेय मी”.
“अहो, आशू आली ना तिकडे..???” त्याच्या आईने काळजीने विचारले.
“हो तर, अहो अशीच सहज आली. आता पुढच्या आठवड्यात तिची परिक्षा. म्हणत होती अभ्यास करायचाय, एक दोन आठवडे अभ्यासाला द्यावी लागतील. मग मीच म्हटलं थांब थोडे दिवस, म्हणून मग थांबली.”
“अहो ते सगळं ठिक आहे, पण ती मला सकाळी काही सांगूनही बाहेर पडली नाही, मला वाटलं सिदने सोडले तिला कॉलेजला”.
“हो, हो. जावईबापूंनीच सोडले वाटतं तिला कॉलेजला, तिथून मग ती इथेच आली”. तिची आई म्हणाली.
आशू आईला खुणवत होती की खोटे बोलू नको, पण तिची आई मात्र ऐकत नव्हती.
“अहो, सिद्धू तर म्हणाला, त्याला काही माहित नाही. म्हणून तर मी आशूलाच फोन केला ना,” त्याची आई जरा संभ्रमात म्हणाली.
“हो का, असेल मग तसंच..”, तिची आई चाचरत म्हणाली.
“बरं आशू कुठेय...”, सिदच्या आईने विचारले.
“अहो ती तिच्या मैत्रीणींना भेटायला गेली, खूप दिवसांनी आली ना माहेरी, मग काय गेलीय जरा गप्पा गोष्टी करायला”. तिची आई हसत म्हणाली.
“हो का, बरं बरं, ती आली की सांगा तिला फोन करायला, चांगली झापणारच आहे मी तिला. जायचं होतं माहेरी तर सांगायचं ना. सकाळी कधी निघून गेली काही पत्ता पण लागला नाही. त्यात ती काल म्हणाली मला की आता कॉलेजला जायची काही गरज नाही. तरी अशी अचानक कशी गेली, प्रश्न पडला ना मला, काळजी लागून राहते हो नुसती. त्यात आमचे चिरंजीवही तसेच. सारख्याला वारके. दोघंही कधी जातात कधी येतात कळतंच नाही हल्ली”. सिदची आई दोघांवर लटका राग काढू लागली.
“बरं तुम्ही सांगा तिला फोन करायला थोड्यावेळाने”. असं म्हणत त्याच्या आईने फोन ठेवला.
आत्तापुरतं तिच्या आईने हे प्रकरण पुढे ढकललं होतं पण आता पुढे काय करावे असा तिच्यासमोर मोठा प्रश्नचिन्ह होता.
क्रमशः
बाबा आणि दादाच्या धाकाला घाबरून आशू पाहण्याच्या कार्यक्रमात खोटी -खोटी लाजली तर होती, लग्नालाही उभी राहिली होती, पण आता आयुष्य कसे असे खोटे खोटे सरायचे, हे तिला समजत नव्हते. खोटा-खोटा संसार कसा करायचा हा तिच्यासमोर प्रश्न होता.
पाहुयात पुढे काय होतंय.
©Bhartie “शमिका”
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा