Nov 26, 2020
कथामालिका

पसंत आहे मुलगी भाग १८

Read Later
पसंत आहे मुलगी भाग १८

भाग १८

 

पूर्वार्ध- मागच्या भागात आपण पाहिले की, सिद घरी दारू पिऊन आला होता आणि आशूने त्याला आधार देत घरात नेले होते, त्यानंतर तो झोपेतही आशूचेच नाव घेत होता पण तू मला फसवलं असंच तो सारखे बोलत होता. शेवटी आशू रूममध्ये खाली अंथरूण टाकून झोपली.

सकाळी उठून आशूने सिदच्या बाबांना रात्री घडलेलं काही सांगितले नाही. सिदचे दादा-वहिनी कामानिमित्तं मुंबईला शिफ्ट होण्याचा निर्णय घरी सांगतात आणि त्याचवेळेस आशू सिदला तिचा घर सोडून जाण्याचा निर्णय सांगते.

इथून पुढे-

 

सिद दुपारी कामाला गेला पण तरी त्याच्या मनात आशूचाच विचार येत होता, त्याला आशू बायको म्हणून नको होती पण आई-बाबांना हा विचार कितपत पचणार हा त्याच्यासमोर प्रश्न होता. त्याने घडाळ्यात पाहिले, पाच वाजून गेले होते. आत्तापर्यंत आशू गेली असेल का तिच्या घरी, पण ती तिच्या घरी जाऊन काय उत्तर देणार, उलट माझ्यापेक्षा तिलाच किती अवघड जाईल हे असं घर सोडून जाणं, का विचार करत नाहीये ती. सिदच्या डोक्यात विचारचक्र जोराने फिरत होते.

शेवटी न राहवून त्याने आशूला फोन केला पण तिने काही उचलला नाही. आता सिदला जास्तच टेन्शन येऊ लागलं. जर आशू तिच्या घरी निघून गेली असेल तर आपण घरी काय सांगणार याचा तो विचार करू लागला, आणि त्याला याची पूर्ण खात्री होती की घरचे सगळे त्यालाच ओरडणार कारण आशूला नाकारण्याचे त्याचे कारण हे त्यांच्या दृष्टीने क्षुल्लक होते.

तो त्याच टेन्शनमध्ये घरी आला., दबकत दबकत त्याने घरात पाऊल ठेवले तर त्याला किचनमधून मोठमोठ्याने गप्पांचा आणि हसण्याचा आवाज येत होता. त्याने हळूच जाऊन आत पाहिले तर आता आशू आणि त्याची आई फराळ बनवत बसले होते.

आशूला पाहून सिदचा जीव भांड्यात पडला आणि त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. तेवढ्यात आईने आणि आशूनेपण त्याच्याकडे पाहिलं..

आई म्हणाली, “चल सिध्दू, ये पटकन हात पाय धुवून..., फराळाचं खायला...”,

“अगं पण आई अचानक काय हे...?”, तो जरासा गोंधळत म्हणाला.

“अरे संदीप मुंबईला चाललाय ना.. म्हणून त्या दोघांसाठी थोडंफार फराळ बनवतोय आम्ही..., म्हणून दुपारपासूनच सुरू केलंय.., आता फक्त लाडू राहिलेत.., जा तू ये पटकन फ्रेश होऊन..” आई त्याच्याकडे न पाहता कामातच म्हणाली.

सिद मात्र आशूकडे पाहू लागला, आशूनेही त्याच्याकडे पाहिले, पण तिच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते.

थोड्यावेळाने सिद फ्रेश होऊन आला, सर्वांचे जेवण झाले आणि सिद झोपण्यासाठी रूममध्ये गेला.

आशू रात्री अकरा वाजता सगळं फराळाचं आवरून झोपायला रूममधून आली. सिद तिचीच वाट पाहत होता.

ती येताच तो आनंदाने म्हणाला, “बरं झालं तू गेली नाहीस.., आई- बाबांना खूप त्रास झाला असता. एकतर तुला माहितच आहे दादा वहिनीपण आता मुंबईला चालले आहे, त्यात तू तुझा हा निर्णय आई-बाबांना सांगितला असतास तर त्यांना खूप त्रास झाला असता.”

तो असं म्हणत पुन्हा बेडवर बसला, पण आशू रागातच बोलली, “मी त्यांना समजावेल, आज आईंना फराळ करण्यात मदत करायची होती म्हणून थांबले मी, पण उद्या मी त्यांना समजावेल.”

तिचं बोलणं मध्येच तोडत सिद म्हणाला, “असं नको करूस.”

आशू सिदवर नजर रोखत म्हणाली, “का.?

सिद नजर चुकवत म्हणाला, “त्यांना नाही सहन होणार गं, प्लीज ऐक”

आशू डोळे फिरवत म्हणाली, “मी म्हटले ना, मी समजावेल त्यांना.”

सिद म्हणाला, “नाही पचणार गं त्यांना तू सांगितलेलं.. प्लीज ऐक... प्लीज..”

“हे बघ तुला असं वाटतंय ना की मी फसवलं आहे तुला, तुझ्या घरच्यांना. तर आता मी लपवलेली गोष्टं सगळ्यांना सांगणंही गरजेचं आहे. तू तर तुझा निर्णय मला त्या रात्रीच सांगितला, तुझ्या वागण्यातून, तुझ्या नजरेतून. आणि मला तो समजलाय.. आता प्लीज मला माझा निर्णय घेऊ दे.”

“म्हणजे तुला हे लग्नं मोडायचंय..” सिद किंचितसा रागवत बोलला.

आशू शांतपणे म्हणाली, “अर्थात, आपल्यात काही नातंच नाहीये आता, तर मी इथं राहून काय उपयोग आहे”.

सिद फारच रागवत म्हणाला, “काय चाललंय ना माझ्या आयुष्यात मलाच कळत नाहीये, हे सगळं मला लग्नाआधीच का कळालं नाही असं वाटतंय आता मला”.

“म्हणजे जर तुला हे कळालं असतं तर तू हे लग्न कधीच केलं नसतं. राईट?” आशूने विचारले.

सिद तोंड पाडतच म्हणाला, “नसतं केलं..”,

हे ऐकून आशू ह्रदयाच चर्र झालं.

“मलाही जर आधीच माहित असतं ना की तू माझ्या चेहऱ्याच्या सुंदरतेवर प्रेम करतोय तर मीही हे लग्नं कधीच केलं नसतं.” आशू जरा रडवेली होत म्हणाली.

“केलं नसतं, असं झालं असतं. तसं झालं असतं, असं झालं नसतं. ह्या सगळ्या गोष्टी आता केवळ जर तरच्या आहेत. आता इथून पुढे काय करायचे मला खरं कळत नाहीये.” सिद हताश होत म्हणाला.

“मला समजतंय ना, आपण वेगळे होऊयात.., अजूनही वेळ गेली नाहीये, अजून पंधरा दिवसही नाही झालेत आपल्या लग्नाला. आपण हे लग्नं आत्ता मोडू शकतो”.

“तुला कळतंय का तू काय बोलतीयेस., लग्नं मोडणं एवढी सोप्पी गोष्ट वाटते का तुला”.

आशू मनावर दगड ठेवत म्हणाली, “हो.. जशी लग्न ठरवणं ही सोप्पी गोष्ट होती आपल्या केसमध्ये. नाही मी मुलाची नीट चौकशी केली”.

तेवढ्यात पुढे सिद म्हणाली, “नाही मी मुलीची नीट चौकशी केली”.

“चुकलंच आपलं”. दोघंही सोबत म्हणाले.

काही क्षण दोघंही शांत बसले.

सिद रूममधली शांतता भंग पावत म्हणाला, “थोडा विचार करूयात, लगेच निर्णय नको घ्यायला”.

आशू जराशी हसत म्हणाली, “आता विचार करून काही फायदा नाही आहे., तू कितीही काही म्हणालास तरी मलाच आता ह्या लग्नात रस नाहीये”.,

हे ऐकून सिद चिडला, “म्हणजे मला इंटरेस्ट आहे असं म्हणायचंय का तुला..?? मलाही काहीच रस नाहीये, जा तू.., उद्या नाही आजच जा..., आणि माझ्या आई-बाबांना काय सांगायचं हे मी ठरवल. तू तुझ्या घरी आणि तुला जी लोकं तुझ्या लग्नाबद्दल विचारतील ना त्यांना काय सांगायचं ह्याचा विचार कर”.

“अच्छा म्हणजे तुला त्याचं टेन्शन आहे तर..?” आशू म्हणाली.

“मला काय पडलंय तुझ्याबद्दल, अशा किती मुली आजही मरतात माझ्यावर, पण मी तुझ्या...”

तो पुढे बोलायचा थांबला.

“मी तुझ्या रूपावर भाळलो, अर्तबाह्य रूपावर..” आशू सरळ-सरळ त्याला टोमणा देत म्हणाली.

“मला नाही माहित काय.., पण मला तू फसवलंय ह्या गोष्टीचा त्रास आयुष्यभर होणार आहे. त्यापेक्षा तू म्हणतीय तेच बरोबर आहे, आपण सोबत न राहणंच योग्य आहे. मी तुझ्या आयुष्याचा विचार करतोय, हे लग्नं तोडल्यावर माझ्यापेक्षा तुला जास्त त्रास होणार आहे, याचा विचार मी करतोय. पण तू मात्र तुझाच एट्यिट्यूड मला दाखवतीयेस”.

“मी एट्यीट्यूड दाखवते?, मी...?, म्हणजे तुला काय वाटतंय एखाद्या पुरूषाने स्त्रीला तिच्या शरीरात असलेल्या एका खोटेमुळे नाकारावे आणि त्या स्त्रीने मात्रं त्याच्या पुढे-पुढे करावे, त्याच्यासमोर भीक मागायची की मला सोडू नकोस, मला आयुष्यभर तुझी बायको मान. म्हणजे हा एवढा बरजबळीपणा का म्हणून चालावा, तर हे लग्न मोडलं की त्या मुलीला त्रास होईल, समाज तिला नावं ठेवतील म्हणून...??”

सिद डोक्याला हात लावून बसला होता, ही लहान आहे म्हणून असं बरळत आहे त्याला कळत होतं कारण लग्नं हा भातुकलीमधला खेळ नसतो. लग्न मोडणं हिला सोप्पी गोष्टं वाटतेय, हेच भाव त्याच्या चेहऱ्यावर होते.

“मी नाही मानत हे असलं काही, मला मुळात कधीच लग्नं करायचं नव्हतं.., पण काय दुर्बुध्दी सुचली आणि मी या बंधनात अडकले. मला नकोय हे बंधन, ही कुठेतरी बांधली गेल्याची भावना... प्लीज...” ती थोडीशी अस्वस्थ होत म्हणाली.

सिद वैतागतच म्हणाला, “एकतर फसवलंय तू मला, आणि तूच मला ऐकवत आहेस. यार चूक काय आहे माझी, का मलाच हे सगळं भोगावं लागतंय.., बाहेर सुंदर सुंदर मुली माझ्या मागे आहेत आणि मी...., अडकलोय या टेन्शनमध्ये”.

आशू रागाने बेडवरून उठत म्हणाली, “काही तासांचा प्रश्न आहे, सकाळी तुला इथे दिसणार नाही मी”. असं म्हणत तिने खाली अंथरूण टाकले आणि अंगावर ब्लॅंकेट घेऊन पडली.

सिद डोक्याला हात लावून बसला मनात म्हणाला, काय टेन्शन आहे हे, का लग्नं केलं मी या मुलीशी, नाही हिला हिची चूक मान्यं आहे नाही ती कोणती गोष्टं समजून घेत आहे.. असे किती जण आहेत ते सोबत आहेत पण त्यांच्यामध्ये काही नातं नाहीये..., मग हिला काय प्रॉब्लेम इथं राहायला.., मला माझ्या आई-बाबांना काय उत्तर देऊ याचं टेन्शन आहे पण हिला मात्रं कसलंच टेन्शन नाहीये, घरच्यांना, आजुबाजूच्या लोकांना कसे तोंड द्यायचे याचं..., फार कठिण आहे ही..., माझ्या काय अपेक्षा होत्या आणि काय नशिबामध्ये आहे...., असं मनात म्हणत तो बेडवर पडला आणि शून्य नजरेत छताकडे पाहत बसला.

 

आशू एवढं सगळं बोलली होती खरी पण तोंडावर ब्लॅंकेट घेताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. म्हणजे इतर मुलींसारखं ती काही सहन करणारी नव्हती, रोख-ठोक बोलून मनाला जे हवं तेच करणारी होती. पण तिच्यातली एक खोट तिचं आयुष्यं अशाप्रकारे बर्बाद करत होती. ती सिदला म्हणत तर होती की ती माहेरी जाणार पण आता मात्र तिच्या डोळ्यासमोर तिचे रागीट बाबा येत होते. उद्या जेव्हा आशू खरोखरंच माहेरी जाईल तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया असेल याची तिला भिती वाटत होती, आणि याच घुसमटीमध्ये तिला रडू आवरता येत नव्हतं..

हळूहळू तिच्या रडण्याचा आवाज वाढू लागला आणि ती कशीबशी डोळ्यातलं पाणी रोखायचा प्रयत्न करू लागली..

सिदला ती रडत आहे हे कळाले, तो तिच्याकडे तोंड करून झोपला.. तिने तोंडावर ब्लॅंकेट घेतले होते आणि आतल्या आत दबकत्या आवाजात रडत होती..

खूप वेळ तिचं रडू ऐकून सिद परत सरळ होत म्हणाला, “बास झालं, जास्त रडू नकोस..., नाहीतर डोळे सुजतील आणि उद्या सर्वांना वाटायचं की मीच तुझा कसला छळ वगैरे करतोय की काय....”,

 

सिदला खरेतर तिचे डोळे पुसायचे होते तिला धीर द्यायचा होता.., पण ते एक कारण होतं ज्यामुळे त्याचं मन काहीही करण्यास कचरत होतं.., थबकत होतं...,

काहीवेळाने सिदच्याही डोळ्यात पाणी आलं, त्यालाह राहवलं नाही.. पण माणसाचं एक वाईट मन असतं ते आपल्याला नेहमी वाईटच गोष्टी अधोरेखित करून सांगतं..आणि सिदच्या बाबतीतही तेच झालं होतं...

त्याचं चांगलं मन आशूचा विचार करण्यास तयारच नव्हतं.. त्यामुळे त्या रात्री ते दोघंही तशेच घुटमळत झोपी गेले.

*****

 

दुसऱ्या दिवशी आशूने सकाळी-सकाळीच घरातून बाहेर पडायचे ठरवले.. रात्री तिने पक्का निर्णय केला होता तर सिद मात्र अजून गोंधळात होता. त्याला आशू हवी होती पण तिचे विद्रुप शरीर नको होते, त्याला आशू हवी होती पण बायको म्हणून नको होती.

सकाळी सिद कामाला निघताना आशूही आईंची नजर चुकवत आपली बॅग घेऊन घराबाहेर पडली. तिने त्याला बाहेर येऊन सांगितले की, “मी चालले आहे.., तू आईंना काय सांगायचं ते पाहशील..., तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी कुणाला काही सांगितलं नाहीये.., आणि इथून पुढे काय, तर ते मी तुला लवकरच सांगेल..”

सिद मात्र फारच टेन्शनमध्ये म्हणाला, “म्हणजे डिवोर्स....?”

आशूने फक्त होकारार्थी मान हलवली..

सिद थोडावेळ अस्वस्थपणे इकडे तिकडे पाहत बसला... डोक्याला हात लावत तो अंगणातून फेऱ्या मारू लागला.. तिच्या हातातली बॅग पाहून त्याला फारच टेन्शन आलं...,

“बाय, मी निघतीये...”, ती हलकेसे स्मित देत म्हणाली, पण चेहऱ्यावरची नाराजी ती सिदपासून लपवू शकली नाही.

सिदही आता फार चिडला, तो तिच्यावर ओरडत म्हणाला, “खूप ऐकलं तुझं..., खूप.. प्रमाणाबाहेर ऐकलं.. आता जाच तू..., जा..., डिवोर्स घ्यायचाय ना तुला... डन..., झालाच म्हणून समज आपला डिवोर्स..., उद्याच कोर्टात जाऊन कुणीतरी वकील पाहतो मी...., लवकरच वेगळे होऊ आपण..., आणि तुला मी जे सांगतोय ते लक्षात ठेव, मी आज डिवोर्स देईल आणि माझ्या घरचे उद्या मला दुसरी मुलगी पाहतील..., अगदी सगळीच चौकशी करून..., पण तुझं काय होईल हे तू बघच...”,

सिद हे रागात म्हणाला आणि फास्ट बाईक घेऊन तिथून निघाला...

 

 

आशू सिदवर आणि सिद आशूवर खेकसत आहे, ओरडत आहेत. त्यांच्या नात्यातला प्रेमळपणा आता कोमेजून गेला आहे पण ह्या कोमेजलेल्या प्रेमातून पुढे दुसरे नाते तयार होईल का...?, आशू आणि सिद खरोखरच वेगळे होतील का...?,

ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे इथून पुढच्या भागांमध्ये नक्की मिळेल...

क्रमशः

 

इथून पुढे मी आठवड्यातून दोनदा भाग टाकत जाईल, एक तर बुधवारी आणि शुक्रवारी.

हे दोन दिवस चुकले की तुम्ही मला हमखास बोलू शकता.. आणि जर काही कामानिमित्त मला भाग टाकायला जमत नसेल तर तसं मी कमेंट करून सांगेल, नक्की!

आता तुम्ही म्हणाल, ही लेखिका नुसते आश्वासन देते..., पण काय करू खरंच खूप काम असते.., आता आज सलग तीन दिवस सुट्ट्या मिळाल्याने थोडाफार वेळ मिळाला आहे.., आणि सहसा शनिवार रविवारी कॉलेज जॉबलाही सुट्टी असते त्यामुळे शुक्रवारी मी थोडीफार रिलॅक्स असते. सो तेव्हा मी लिखाणाला वेळ देऊ शकते, पण बुधवारचाही मी नक्की वेळ काढत जाईल..,

काही कारणास्तव माझं लिखाणाकडे दुर्लक्षच होत आहे पण तुमच्या सर्वांच्या कमेंट वाचून मी वेळात वेळ काढून कथा लिहीतीय.. खूप खूप धन्यवाद..., आज मी थोडंफार लिहू शकतीये असा माझ्यात आत्मविश्वास येतोय ते तुमच्यासारख्या वाचकांमुळेच...,कधी-कधी भाग पोस्ट केल्यावर मला बारीक-सारीक चुका दिसतात पण त्याही तुम्ही समजून घेताय यातच भारी वाटतंय.., पण तुम्ही फक्त कथेचं कौतूक करण्यापेक्षा मला माझ्या चुकाही दाखवून देत जा.., कारण मला माझे लिखाण अजून सुधरायचे आहे, तर त्यास तुम्ही दिलेल्या समीक्षेचा नक्कीच हातभार लागेल...,

 

©Bhartie “शमिका