Nov 30, 2020
कथामालिका

पसंत आहे मुलगी भाग 17

Read Later
पसंत आहे मुलगी भाग 17

 

पूर्वार्ध – या आधीच्या भागात आपण पाहिले की, सिद आईला कामाला जातो सांगून लवकरच घराबाहेर पडला होता. तिथून तो कॉलेजला गेला होता. आदल्या रात्री आशूचे विद्रुप शरीर(सिदच्या दृष्टीने) पाहून त्याला घरी जायची इच्छा होत नव्हती. तिने व तिच्या घरच्यांनी त्याला फसवलं, अर्धी भाजलेली मुलगी त्याच्या गळ्यात टाकली अशी त्याची तक्रार होती. मनातली ही घालमेल त्याने बारमध्ये संकेतजवळ व्यक्त केली., प्रचंड दारू प्यायल्याने तो कोणतीच गोष्ट समजण्याच्या स्थितीत नव्हता. रात्री आशूचा फोन येताच त्याने तिलाही सुनावले, मला घरी येऊन तुझे विद्रुप शरीर पाहायचे नाहीये असं म्हणत त्याने तिला ती किती कुरूप आहे याची जाणीव करून दिली.

हे ऐकून आशू सुन्न झाली, सिदचा शब्द नि शब्द तिच्या मनावर घाव घालून गेला..

 

इथून पुढे-

 

रात्री बारा वाजेपर्यंत आशू तशीच बेडवर बसून राहिली, तिचं डोकं कसलाच विचार करण्याच्या परिस्थितीत नव्हतं आणि मन तर कधीच कोलमडून गेलं होतं. नाही तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं की नाही तिची कसली चिड-चिड होत होती.., तिचं तन मन संपूर्ण शांत झालं होतं.,

ती अशीच बेडवर पडून वर गर-गर फिरणाऱ्या फॅनकडे शून्य नजरेत पाहत होती.. तोच दारावर पडलेल्या जोर-जोरात थापांमुळे ती भानावर आली.

“अगं अश्विनी, सिद आला का गं..?”, सिदचे बाबा बाहेरूनच बोलले.

तशी ती तिचा ड्रेस आवरत, खांद्यावर ओढणी टाकत तिने दार उघडले,

“नाही बाबा अजून..” ती हळू आवाजात बोलली.

“काय..? अजून आला नाही.., अगं त्याला फोन कर, वाजले किती, ही काय वेळ झाली काय कामाची..,  सकाळी सातला घर सोडलंय त्याने.., इतका वेळ कसलं काम करतोय, कर फोन कर त्याला लवकर, माझा फोन उचलत नाहीये...” बाबा जराशे चिडत बोलले.

“हो बाबा”, असं म्हणत ती फोन घेऊन बाहेर आली.

तिने फोन लावला, दोन-तीन रिंग वाजल्या पण त्याने फोन काही उचलला नाही.

आशूला माहित होते की त्याने आज दारू प्यायली आहे, सिदचे बाबा कितीही फ्रेंडली असले तरी त्यांना त्यांच्या मुलांनी दारू प्यायलेले, घरी उशिरा आलेले आवडत नव्हते. एरवी मुलांच्या गळ्यात हात घालत फिरत, मज्जा मश्करी करणारे त्याचे बाबा अशावेळी त्यांना चांगलंच फोडून काढायला पुढे मागे बघत नसत.

आशू उगाच खोटं बोलली, “बाबा, तो गाडीवर असेल, मगाशी फोन केलेला मी, तेव्हा तो निघाला होता.. येईल इतक्यात तो, तुम्ही जा झोपा..”,

बाबा जरा शांत होत म्हणाले, “बोलणं झालंय हो तुमचं..?, बरं बर येऊदे त्याला मग बघतो त्याच्याकडे.., आता नको फोन करू, उगाच गाडीवर असेल.., येऊ दे त्याला आधी घरी...”

असं म्हणत बाबा झोपायला गेले आणि आशू बाहेर अंगणात येऊन थांबली..

आशूला अंगणात पाहून बाबा म्हणाले, “अगं एवढ्या रात्री काय बाहेर थांबतेस, जा झोप तू.., आला की मी बघतो त्याच्याकडं..”

आशू म्हणाली, “नाही नको बाबा, तुम्ही झोपा.. मी आहे..,, तो येतच असेल.. पाच मिनिटांत नाही आला की मग जाते आत...”

“बरं. जास्त वेळ थांबू नको बाहेर आणि तो गधडा आला की उठव मला.., आता डोळ्यावर झोप आलीय माझ्या, पडतो जरा..”

असं म्हणत बाबा झोपले, आशूने दार हळूवार लोटले आणि बाहेर अंगणात येऊन बसली..

आता तिच्या डोक्यात हळूहळू विचारांचे चक्र सुरू झाले होते.., काही दिवसांपूर्वी सिद तिला बिल्कुल आवडला नव्हता, त्याचे काम, त्याचे शिक्षण, त्याचे राहणीमान पाहता त्याच्यासाठी तिच्या मनात जागा नव्हतीच.., पण लग्न होताच तिला सिदचे चांगुलपण, निर्मळ मन, मनमोकळा स्वभाव.. कळला होता आणि त्याचा सहवासच तिच्यावर जादू करून गेला होता...,

तिला ते सगळे क्षण आठवत होते, त्याने तिच्यासाठी गायलेले गाणे, तिला समजवून सांगितलेली प्रेमाची व्याख्या, लग्नाचं महत्त्वं, जीवनसाथीच आपल्या जीवनातील महत्त्व..

आणि प्रेम हे शरिरावर नाही तर मनावर होतं.., हे सांगणारा तो सिध्दार्थ तिला आठवत होता, जो तिचं अर्ध भाजलेलं अंग पाहून किंचाळला होता..,

हे आठवून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.., आपण लग्न करून खूप मोठी चूक केली आहे. याक्षणी हे लग्न मोडून इथून निघून आपल्या घऱी जावं असं तिला वाटत होतं.. पण घरचा विचार करताच जेलर सारखे पुढे मागे असणारे तिचे बाबा आणि भावाचा चेहरा तिच्यासमोर आला. मुलगी माहेरी निघून आली याचा अर्थ लोक काय काढतात, तिच्याकडे कोणत्या नजरेने पाहतात.. याचा विचार करून ती तिथंच घुटमुळंत बसली होती..

तेवढ्यात समोरून तिला कुणीतरी बाईकवरून येताना दिसलं..

बाईक घरासमोर उभी झाली, संकेतने मागच्या सिटवर बसलेल्या सिदला उतरायला सांगितले..

तो कसा बसा धडपडत उतरला..

आशू हे पाहून पूर्ण घाबरून गेली होती..

संकेत पण गाडीवरून उतरला आणि सिदला आधार देत म्हणाला, “वहिनी, याने खूप दारू प्यायलीय.. प्लीज त्याच्या बाबांना सांगू नका, खूप ओरडतील ते...”

आशू काहीच बोलली नाही, ती फक्त सिदकडे पाहत होती, त्याला एका जागेवर धड उभे राहता येत नव्हते, संकेतने त्याला सोडले तर तो खालीच पडेल अशा अवस्थेत तो होता..

तेवढ्यात सिद म्हणाला, “काय लपवताय माझ्याकडून.., कोण ओरडेल मला.. हां...?” तो हलत डुलतच म्हणाला..

संकेतने त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाला, “साल्या गप ना.., का ओरडतोय..? काका येतील ना बाहेर..., आठवतंय ना मागच्यावेळेस थोडी घेतलेलीस तू तेव्हाच किती मार खाल्लेलास ते...” संकेत घाबरत बोलला.

आशूला काहीच समजत नव्हते ती अस्वस्थपणे इकडे तिकडे पाहत उभी होती..

संकेतच पुढे म्हणाला, “वहिनी., सगळे झोपलेत का घरी..?”

आशू रडक्या सुरात म्हणाली, “हो..”,

“बरं झालं.., हे घ्या याला घेऊन जा रूममध्ये.., जेवण वगैरे झालंय आमचं डायरेक्ट झोपू द्या ह्याला, नाहीतर काका उठतील आणि....” असं म्हणत त्याने सिदला पुढे केले..

आशू मात्रं मागे सारली गेली, सिदचे ते किंचाळणे, फोनवरून तिला अपमानात्मक बोलणे तिला आठवत होते.. आणि आता हे असं दारू पिऊन घरी येणं... तिला आता राग आला होता...

“अहो वहिनी हे घ्या याला घेऊन जा..”, तो डगमगणाऱ्या सिदला आशूच्या दिशेने सारत म्हणाला..

आशू म्हणाली, “नाही.. नको.. ते..”, तिला काय बोलावे समजेना..

तोच संकेतने सिदला सोडले आणि त्याचा तोल गेला..,

त्याचा तोल जाताच आशूने त्याला पकडले.., आशूच्या खांद्यावर हात टाकून तो खाली मान घालून उभा राहिला, त्याचे डोळे अर्धझोपेत होते, हात पाय थरथरत होते..,

आशूला त्याचा वास आला तसं तिने एका हाताने नाकावर हात ठेवला...,

संकेत मात्र स्मितीत होत म्हणाला, “चला गुडनाईट वहिनी.., आज जरा जास्तच दारू प्यायला तो.., बट डोन्ट वरी, रोज नाही पित तो..., म्हणजे सहसा पित नाहीच.., बट ते...” तो जरा चाचरला.. त्याला काय बोलावे समजेना

पण आशूला बरोबर समजले.. तीने डोळ्यानेच संकेतला जा म्हणून इशारा केला.

संकेत आशूला बाय करून निघून गेला..

आता आशूने सिदकडे पाहिले, त्याने डोळे मिटले होते, आशूच्या खांद्यावर डोके ठेवून तिच्यावर पूर्ण रेलून तो डुलक्या घेत होता..

आशूला हे सगळं नको होतं, तिलाच खरतर आता किळस येत होती.. पण आता काही पर्याय नव्हता...

ती त्याला घेऊन दारापाशी आली.., दारातून आता पाहिले तर आई-बाबा गाढ झोपले होते..

तिने तसेच सिदला आत आणले, सिद पण तिच्या खांद्यावर हात टाकून तिच्यावर रेलत तिच्यासोबत डुलत डुलत चालत आत आला..

तिने त्याला बेडरूममध्ये आणून बेडवर झोपवले आणि तशीच घाबरत बाहेर आली आणि दरवाजा लावून घेतला..

एकदा आई-बाबांकडे पाहून ती बेडरूममध्ये आली..

सिदला तिने जसे बेडवर टाकलेले तसाच तो वेडा-वाकडा बेडवर झोपला होता.

आशूने रागाने त्याला सरळ झोपवले, त्याच्या अंगावर ब्लॅंकेट टाकले. एकदा तिने त्याच्या त्या घामाघूम झालेल्या चेहऱ्याकडे तिरस्कृतपणे पाहिले, तिच्या डोळ्यात अश्रूंसोबत रागही तरळत होता...

तिने खाली अंथरूण टाकले आणि उशी घेण्यासाठी बेडवर वाकली.., तेवढ्यात सिदने तिचा हात पकडला..,

त्याचे डोळे बंद होते पण त्याने असा अचानक हात पकडल्याने ती बिथरली, त्याच्या हातातून तिचा हात सोडवू लागली..

“प्लीज मला सोडून जाऊ नको.., मी प्रेम करतो तुझ्यावर..., मी प्रेम करतो तुझ्यावर...”, असं तो झोपेत बरळत होता...

आशूने हे ऐकले आणि तिला क्षणभर त्याला काय प्रतिक्रिया द्यावी हे समजले नाही..

त्याने तिला त्याच्याजवळ ओढून घेतले आणि तिच्या पोटाभोवती हाताचा विळखा घालत म्हणाला, “पण तू मला फसवलं..., तू मला फसवलं..., तू फसवलं मला..., तू फसवलं मला आशू...”

असं तो बरळत होता...

थोडावेळ त्याच्या बोलण्याने मोहरलेली आशू हे ऐकून परत भानावर आली..., त्याच्या हाताचा विळखा सोडायचा ती प्रयत्न करू लागली...

 

 

 

****

सकाळी दोघांनाही जाग आली नाही, सिदच्या आईने पण लवकर दोघांना उठवायची तसदी घेतली नाही.

बाबा मात्र सिदच्या नावाने जप करत होते, “गधडा काल उशिरा आला, मला त्याला विचारचंय एवढा कुठे गेलेला की रात्रीचे बारा वाजले तुला..” बाबा चहा पिता पिता बोलत होते.

“अहो असेल हो काम, कसली पार्टी होती ना त्याच्या कामात.. म्हणून झाला असेल उशीर.. तुम्ही नका हा आता ओरडू...” आई काम करता करता बोलली..

 

नऊ वाजता सिदलाच पहिली जाग आली, तो आळस देत उठला.. त्याचं सगळं अंग दुखत होतं.., रात्री एकाच अंगावर झोपल्याने अर्ध शरीर पूर्ण अवघडून गेलं होतं.. तो तसाच रेंगाळत उठला.. त्याला काहीच आठवेनासं झालं होतं.., त्याने काल दारू प्यायलेली एवढं त्याला आठवत होतं.. पण आपण इथं कसे आलो हे काय त्याला आठवत नव्हतं.. त्याने डोळे चोळत आजू-बाजूला पाहिले आणि त्याला खाली आशू झोपलेली दिसली.. त्याने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले..

तो एकटक तिच्याकडे पाहत बसला. “झोपेतही किती छान दिसते ही..” आपसूकच त्याच्या तोंडून निघालं..

काहीक्षण तो एकटक तिच्याकडे पाहत बसला.., आणि अचानक त्याने तिच्यापासून नजर फिरवली.. त्याला ते तिचं अर्ध जळलेलं शरीर डोळ्यासमोर दिसू लागलं... तो रागाने तिथून उठला..., बेडवरची उशी जोरात तिथंच आपटली आणि रागारागात ब्लॅंकेटची घडी घालू लागला...

या आवाजाने आणि डोळ्यावर पडणाऱ्या सूर्याच्या किरणांमुळे ती ताडकन उठली..., सिद समोर उभा राहून ब्लॅकेटची घडी घालत होता.

अचानक दोघांच्या नजरा भिडल्या..

सिद काहीक्षणातच ती नजर हटवत रूममधून बाहेर पडला..

आशू पण जराशी स्वतःला सावरत उठली...,

 

****

आज सिदने ऑफिसमध्ये हाफडे सांगितला आणि अंघोळ वगैरे करून नाष्टा करायला हॉलमध्ये आला.

बाबा फक्त त्याची वाट पाहत होते, तो नाष्टा करायला येताच बाबांनी त्याच्यावर प्रश्नांचा मारा केला..

“काय रे काल कधी आलास..?” बाबांनी विचारले

सिद हे ऐकून स्वतःच विचारत पडला, तो आठवू लागला..

तेवढ्यात आशू किचनमधून बाहेर येत म्हणाली, “बाबा, काल तुम्ही झोपायला आत आलात तेव्हाच... सॉरी तुम्हाला उठवायचे विसरले मी...”

हे ऐकून सिद आशूकडे पाहू लागला.. ती रागाने त्याच्याकडे पाहत सोफ्यावर येऊन बसली..

“अरे पण ही काय वेळ झाली काय यायची सिद.., काय कारण काय एवढं..”, बाबा त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाले.

तो नजर चोरत म्हणाला, “काम होतं....”,

तेवढ्यात दादा आणि वहिनी नाष्टा करायला येऊन बसले.. दोघंही शांतच होते..

सिदच्या आईने लगेच दोघांना नाष्टा दिला, इकडे बाबा सिदला सुनावतच होते आणि तो त्यांना उडवाउडवीचे उत्तर देत होता..

सगळेजण आज सोबतीने नाष्टा करायला बसले...

सिद आणि आशू काही बोलत नव्हते, आई-बाबा पण शांतच नाष्टा करत होते.. तर रोज भरपूर बडबड करणारे दादा वहिनी पण काहीच बोलत नव्हते.

शेवटी न राहवून बाबांनी संदिपला विचारलेच. आधी त्याने काही उत्तर दिले नाही. पण नंतर वहिनी म्हणाली, “बाबा, आम्हाला दोघांना मुंबईला शिफ्ट व्हावं लागणारे...”

हे ऐकून सगळ्यांनी तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं.

पुढे संदिप म्हणाला, “कंपनीच्या मुंबई ब्रँन्चमध्ये रिप्लेस्ड केलंय आम्हाला, मिन्स दोघांचं प्रमोशनही झालंच आहे बट काम मात्रं मुंबईच्या ऑफीसमधून करावं लागणार आहे सो...” संदिप हळू आवाजात बोलला.

हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला, आई काळजीने बोलली, “मुंबईला का?, पुण्यात नाही का चालणार.. तिकडं मुंबईला कसं राहणार तुम्ही...?”

वहिनी आईंना समजावत बोलली, “अहो आई तिथं पाहू ना आम्ही, कंपनीकडून काही कॉर्टर्स मिळणार आहेत तिथं राहू आम्ही...”,

हे ऐकून आईला तर फारच काळजी वाटू लागली.

सिद काहीच बोलत नव्हता, तो शांतपणे नाष्टा करत होता.

बाबा पुढे म्हणाले, “प्रमोशन झालं ही चांगली गोष्ट आहे.. पण मुंबईला शिफ्ट व्हायचं म्हणजे जरा टेन्शन रे...”

“अहो बाबा काही टेन्शन नाही, मी एकटा किंवा ही एकटी नाहीये.. आम्ही सोबत आहोत.., सोबत असल्यावर काय प्रॉब्लेम...?”

आई तर काळजीतच होत्या. त्यांना काही सुचत नव्हते.

“हे बघ संदीप, तुमचं काम आहे हे ठिक आहे, पण दोघं तुम्ही अजून बाहेर कुठं राहिला नाहीत रे ..आता कसं राहणार, मुंबई सारख्या शहरात नवीन तरण्याताठ्या मुलीला पाठवायला भिती पण वाटती रे.., एकतर तिथं कुणी आपलं नातेवाईक पण नाही.. काळजी वाटतेय खूप..”

संदीप आईंच्या खांद्यांवर हात टाकत म्हणाला, “आई बिल्कुल काळजी करू नकोस.. अगं दर विकेंडला पुण्यात येत जाऊ आम्ही, मग तर बास...”

आई मात्र हसल्या नाहीत.. त्या काळजीतच होत्या..

शेवटी बाबाच धीर करत म्हणाले, “ठिक आहे.. तुमचं करिअर महत्त्वाचं आहे..., दोघं पण सोबत आहात तर काय काळजी करायचं कारण नाहीये..., कधीपर्यंत शिफ्ट व्हायचं आहे तिथे...?”

संदिप म्हणाला, “बाबा दोन दिवसांतच जायचंय...”,

हे ऐकून आई आणखीनच काळजीने म्हणाली, “दोन दिवसांत...?? अरे एवढी काय घाईय..”

संदिप आईला समजावत म्हणाला, “अगं आई काम आहे.., काम करायला नको का...”,

हे ऐकून आई शांत बसली...

 

***

नाष्टा होताच सिद बाहेर पडला.. आशूने अंगणात त्याला थांबवले,

तो तिच्याकडे न पाहताच बोलला, “काही काम होतं का..?”

ती रागाने म्हणाली, “मला बोलायचंय तुझ्याशी..”

तो निघत म्हणाला, “जे घडायचंय ते घडून गेलंय आता बोलून काय फायदा..?”

ती रागात बोलली, “मला खरंतर तुझ्याशी एक मिनिटही बोलायचं नाहीये.., पण”

तो तिच्याकडे वळत म्हणाला, “मग का बोलतीयेस माझ्याशी..? नको ना बोलू.. मला बिल्कुल इच्छा नाहीये..”

आशूचा स्वाभिमान दुखावला गेला ती पण रागात म्हणाली, “मलाही काही इंटरेस्ट नाहीये तुझ्याशी बोलण्यात.., मला फक्त एवढंच सांगायचं होतं की मी हे घर सोडून चाललीय, मला नाही राहायचंय इथं.., ज्यादिवशी तू तिरस्कृतपणे मला पाहून किंचाळला त्याच दिवशी आपलं नातं संपलंय.., मीच ते नातं दोन दिवस ताणण्याचा प्रयत्न केला पण आता बास..., तू दारू पिऊन येणार आणि तुला आधार देत तुझी सेवा करायला तुझी नोकर नाहीय मी..., मला बघून दूर पळण्यापेक्षा मीच इथून जात आहे...”,

आशू हे बोलत होती आणि हे ऐकून सिदच्या काळजाचे तुकडे तुकडे होत होते.., तो अस्वस्थ होत म्हणाला, “कुठे चाललीय तू.., आणि आई-बाबांना काय सांगायचं मग... त्यांना हे समजलं तर ते...”

ती त्याचं बोलणं मध्येच तोडत, हसत म्हणाली, “मला विश्वास आहे, ते तरी तुझ्यासारखे नीच विचारांचे नसतील.. ते मला समजून घेतील..., आणि तुला असं वाटतंय ना की मी तुला फसवलंय.. तर मी नाही फसवलं तुला.., मी तुला खूपदा हे सांगण्याचा प्रयत्न केला पण नाही सांगता आलं तुला हे..., पहिल्या भेटीपासून ते त्यादिवशी तू किंचाळण्याच्या आधीही मी तुला सांगण्याचा प्रयत्न केला... पण...”

ती रडू लागली...

सिद पण जरा भावूक झाला, तिच्या अशा परिस्थितीबद्दल त्यालाही वाईट वाटत होते..पण त्याला ती वस्तूस्थिती स्विकारणं जमत नव्हतं.. कारण ती कुणा मित्राची किंवा भावाची बायको नाही तर त्याची स्वतःची बायको होती.., इतर कुणाची असती तर तो, सुंदरता ही मनात असते, शरीरात नसते. असे प्रवचन देत सुटला असता...., पण इथे मात्रं स्वतःला प्रवचन तो देऊ शकत नव्हता, नाही त्याचे मन या गोष्टीचा स्विकार करत होते, नाही त्याच्या डोक्याला हे पटत होते....शेवटी प्रत्येक पुरूषाला सुंदरच स्त्री बायको म्हणून हवी असते, असंच त्याने त्याच्या वागण्यातून दाखवून दिले होते, आणि केवळ सुंदर नाही तर तिचं संपूर्ण शरीरही हे सुंदरच असलं पाहिजे..., लेखक म्हणून सुंदरतेविषयी मोठमोठे लेख लिहिणारा तो सिध्दार्थ आज मात्रं आशूकडे पाहायलाही तयार नव्हता कारण तिचे ते अर्धे भाजलेले अंग त्याच्या डोळ्यासमोर येत होते.. तिचे मन सुंदर आहे की कुरूप याकडे तो मुद्दामहून दुर्लक्ष करत होता की परिस्थितीमुळे त्याला केवळ तिचे विद्रुप शरीरच(सिदच्या दृष्टीने) दिसत होते, हा एक प्रश्नच!

क्षणभर दोघांच्या डोळ्यासमोर अंधार दाटला, दोघांच्याही मनात एकच घालमेल सुरू होती... आता पुढे काय...? हे लग्न तोडायचं, की असंच दोन दिशेला तोंड करून संसार करायचा????

 

क्रमशः

©Bhartie “शमिका”