पसंत आहे मुलगी
भाग ११
सिद - आशूचे देव-दर्शन वगैरे झाल्यानंतरचे दोन-तीन दिवस हे तर फक्त एकमेकांना पाहण्यातच गेले.. लग्न घाई-गडबडित झाले असल्यामुळे पाहावी तशी दोघांची हौस-मौस झालीच नव्हती..., नाही कसले नवीन नवरा नवरीचे खेळ, नाही कसली मजा-मस्ती....,
सिदचे दादा- वहीनी दुसऱ्याच दिवशीपासून कामाला जायला लागले आणि आता सिदही जॉबला जाणार होता...,
आज आशू तिच्या माहेरी जाणार होती.., तिचा भाऊ सकाळी नऊलाच तिला घ्यायला आला..., सिदला तर तिला जाऊच देऊ नये असे वाटत होते.., कारण त्याला तिची एवढी ओढ लागलेली की, ती आता कधी संपणार याची काही खात्री नव्हती..
म्हणजे आपल्याला एखादी मुलगी पाहताक्षणी आवडावी, तिच्याशीच आपले थोरा-मोठ्यांच्या आशीर्वादाने लग्न व्हावे..., आणि तिच्यामध्ये आणि आपल्यामध्ये साधा पाच मिनिटांचाही प्रेमळ संवाद न व्हावा... हा म्हणजे अतिरेकच... तो संतापला होता...,
***
सर्वजण हॉलमध्ये बोलत बसलेले होते आणि आशू बेडरूममध्ये तिची बॅग आवरत होती..., सिद सर्वांची नजर चुकवून बेडरूममध्ये आला....,
तशी आशू नेहमीसारखी बैचैन झाली....
सिदला हे समजले आणि तो जरा संतापलेल्या स्वरात म्हणाला..., “का यार तू एवढी दचकतेस..., अगं मी तुझा नवरा आहे..., पाच दिवसांपूर्वी आपलं लग्नं झालंय..... पण तू मात्र अजून माझ्याशी बोलत नाहीएस... काही प्रॉब्लेम आहे का.....?”, तो त्याच्या मनात आलेलं सगळं बोलत होता...,
आशू इकडे तिकडे बघू लागली..., तिला काय बोलावे समजत नव्हते....,
“तुला मी आवडलो नाहीये का..., काही दडपण आहे का तुला...”, त्याने विचारले..
आशू अजूनही काहीच बोलत नव्हती...,
आता सिदचा राग वाढतच चालला होता.. आणि स्वतःची दया येत होती...
“अरे यार.. मी काही तुझ्यावर जोर-जबरदस्ती करत नाहीये... मी जस्ट फ्रेंडली तुला विचारतोय...., कारण तू माझी बायको आहेस आणि मी तुझा नवरा..., आपलं दोघांचं नातं हे चार-पाच दिवसांचं नाही तर आयुष्यंभराचं आहे..., खरंतर आपण लग्नाआधी काहीच बोललो नाही.., एवढं घाईत लग्न झालं की माझं तुझ्याशी लग्नं झालंय हे पण मला स्वप्नंच वाटतंय..” तो जरा शहारत बोलला...
“पण आता झालंय लग्न..., तू सांग मला.., तू बोल माझ्याशी..., तू माझ्याशी बोलत नाहीएस... मला खूप अपराध्यासारखं वाटतंय..., आय नो.. तु हुशार मुलगी आहेस.., कॉलेजमधली टॉपर मुलगी तू.., तुझ्या अपेक्षा खरंच फार मोठ्या असणार.. एखादा मोठा इंजिनिअर, डॉक्टर किंवा बिझेनसमन...., मी काय, एक बेरोजगार मुलगा..., जो मित्र-मैत्रीणींमध्ये चार दोन शेर वगैरे मारतो.. जमेल तसे काही विचार लिहून लोकांमध्ये वाचून दाखवतो..., आणि आता कुठे एका ऑफीसमध्ये ऑफीसबॉयचं काम धरलंय...., माझ्या सारख्या सेट नसलेल्या मुलाशी तू लग्न करतेस हाच मला प्रश्न होता...., पण तू तर होकार दिलास मला..., मी माझं भाग्यचं समजतो....”, सिद खूपच भावूक झाला होता..., आणि त्याच्या तोंडून हे सगळं ऐकून आशूच्या पण डोळ्यात पाणी तरळत होते..., आपण ज्या राजकुमाराच्या शोधात होतो तो हाच आहे..., अशी भावना तिच्या मनात तयार झाली होती....,
“पण आता का अशी वागत आहेस तू...., तुला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं का..., काही प्रॉब्लेम आहे का.. सांग मला प्लीज... तू म्हणशील ते करायला मी तयार होईल..., तू म्हणशील तर मी माझ्यावर असलेलं केट्यांचं ओझं क्लिअर करून ग्रॅज्युएशन कंम्लीट करेल..., तुला वाटेल ते करेल...., तू म्हणशील ते...., पण प्लीज एकदा माझ्याशी मनमोकळेपणाने बोल..., प्लीज..., मला सोडून जाऊ नकोस... तो फारच कळवळीने बोलत होता.... तो तिच्याकडे पाठ करून उभा राहिला..., का माहित पण त्याला मनात असं वाटून गेलं की, हिला मी आवडलो नाहीये..., कदाचित आज गेल्यावर ती परत येणार नाही, मला सोडून जाणार..., म्हणून तो मला सोडून जाऊ नको... असं बरळत डोळ्याला हात लावून उभा होता...
आशूने दिर्घश्वास घेतला..., तिला त्याची ही अवस्था पाहून खूपच वाईट वाटत होते..., आता तरी आपण ह्याला सगळे सत्य सांगितले पाहिजे.., असा विचार करून तिने बोलण्यासाठी तिचे इतका वेळ गप असलेले ओठ उघडले आणि तेवढ्यात बाहेरून आईंचा आवाज आला,
“अगं आशू... ये लवकर बाहेर... भाऊ वाट पाहतोय तुझी....”
हे ऐकून सिद जरा भानावर आला... त्याने डोळे पुसले आणि तिच्याकडे पाहत हलकेसे स्मित केले..., “आज जा तू..., पण जेव्हा येशील ना तेव्हा मी तुला कुठेच जाऊ देणार नाही...” तो असं बोलला आणि आशूने ओठांवर आलेले शब्द गिळले....,
सिदला बरोबर समजले, हिला आपल्याशी खूप काही बोलायचं आहे..., त्याने तिच्याकडे प्रेमळ नजरेने पाहिले आणि पुढे म्हणाला,
“पहिल्यांदा एखाद्या मुलीच्या मी प्रेमात पडलोय..., जी काही न बोलताच मला सगळं काही समजू लागलंय..., तु नक्कीच कोणत्यातरी प्रॉब्लेममध्ये आहेस...,”
तो तिच्या जवळ आला..., तिच्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवला....,
“तू कितीही मोठ्या प्रॉब्लेममध्ये का असेना, मी तुझी साथ कधी सोडणार नाही...., आणि माझी पण एकच इच्छा आहे की, तू ही मला कधीच अंतर द्यावं नाही...”, तो हे बोलताना त्याची नजर हळूच खाली गेली आणि डोळ्यातून एक टिपका खाली पडला....,
आशूचेही इथं डोळे भरले होते...., सिदने तिच्याकडे पाहिले आणि क्षणाचाही विचार न करता तिला घट्ट मिठी मारली..., आशू बिथरली..., पण आज सिदने मारलेली मिठी जाणून बुजून नाही तर ती आपसूक मारलेली होती..., आशूला पण त्याच्या त्या मिठीत एवढी उब जाणवली की तिनेपण दोन्ही हात त्याच्या पाठीवर घट्ट केले....,
दोघांच्याही डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या... त्याचं कारण त्यांनाही उमजत नव्हते..., पण आज त्यांना एकमेकांच्या मिठीतून बाहेर निघू वाटत नव्हते....,
तेवढ्यात आई बेडरूमचा दरवाजा उघडून आत आल्या...., दरवाजा उघडला गेल्यावर ते दोघे एकमेकांपासून दूर झाले...,
सिदच्या आईला जरा लाजल्या सारखं झालं....., “अरे सिध्दू तू इथेस का..., मला वाटलं कुठे बाहेर वगैरेच गेला..., म्हणून मी अशी दरवाजा उघडून....”, त्याची आई जरा चाचरत बोलली...,
इकडे सिद-आशू पण जरा बावरले होते..., आईने त्यांच्या डोळ्यातले पाणी पाहिले, पण तिला ते पाहून आनंदच झाला..., पाच दिवसांतच यांच्यामध्ये एवढं बॉन्डींग झालं की आज वेगळे होताने अक्षरशः रडत आहेत.. हे पाहून कोणत्या मुलाची आई सुखवणार नाही...,
त्याची आई अलगद आशूच्या जवळ आली... तिला धीर दिला आणि म्हणाली, “काहीच दिवसांचा प्रश्न आहे आशू..., तू अशी जा आणि अशी ये..., तुझा हा लाडका नवरा तर तुझी वाट पाहतोयच..., पण ही तुझी आईही वाट पाहतीय हे विसरू नको हां.....”,
सिदच्या आईच्या तोंडून हे शब्द ऐकून तिच्या डोळ्यांतून अजूनच अश्रू वाहू लागले.... आनंदाश्रू होते ते..., एवढी चांगली लोकं पण असतात????, एवढी प्रेमळ सासू... इतका चांगला नवरा जो नवरा कमी आणि मित्रंच जास्त वाटू लागलाय... असा ती विचार करत होती... स्वतःला ती भाग्यवान समजू लागली होती
सिदला पण जरा हलके झाल्यासारखे वाटत होते..., पाच दिवसांचे ओझे हलके झाल्यासारखे वाटत होते.., त्याने पण हसतच आशूला निरोप दिला..., आणि तिला परत कधी घ्यायला जायची ह्याची दिवसेंदिवस वाट पाहत बसला....,
***
संकेतने सारखा आशूची मैत्रीण सीमाच्या नंबरवर कॉन्टॅक्ट केला, तिला मेसेज केले.. तिचा नंबर स्विच ऑफच दाखवत होता..., पण काही दिवसांनी त्यानेच ते बंद केले..., आता हा संसार सिद आणि आशू वहिनींचा आहे.., मग ते पाहून घेतील काय ते..., आणि जर त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेलच तर आम्ही मित्र आहोतच की सोबत त्यांच्या...., असा विचार करून संकेतने पण जरा तो विचार बाजूला सारला...,
***
दुसऱ्या दिवशीपासून सिद नियमित कामाला जाऊ लागला..., त्याचे बोलणे खेळीमेळीचे असल्याने, तो लगेच ऑफीसमध्ये रमून पण गेला.., मध्ये जसा वेळ मिळेल तसा तो काही ऑनलाईन पुस्तकं वाचत होता, काही लिखाणही करत होता..., पण म्हणावा तसा त्याला लिखाणाला वेळ मिळत नव्हता..., पण ठिक आहे, सध्या त्याला त्याच्या संसारात लक्षं द्यायचे होते.., आशूला कधीच तिच्या नवऱ्याकडून काही कमी पडले नाही पाहिजे.. असा तो विचार करत होता..., आणि त्यांची ती पहिली अनोखी मिठी आठवली की त्याला खूप जोमाने काम करू वाटत होते..., इतकी वर्षे सिंगल असलेल्या सिदला आता कुणासाठी तरी आपण आणि आपल्यासाठी कुणीतरी हक्काचं.. आयुष्यभराची साथ देण्यासाठी आहे याची जाणीव झाली होती....,
***
आशू कॉलेज एक्सटर्नल करत होती.. त्यामुळे तिला रोज कॉलेजला जायची गरज नव्हती.., तशीही तिची आता परिक्षाच होती..., म्हणून काही बुक्स घेण्यासाठी ती कॉलेमध्ये निघाली..., पण डॅनीने तिला अडवले...
तिने रागाने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला, “झालंय आता लग्नं माझं..., आता का दडपण आणताय माझ्यावर...”
तेवढ्यात तिचे बाबा तिच्यासमोर आले..., “झालंय ना लग्न... मग आता का शिकायचा अट्टहास...??, लागलेत ना पाव्हणं पण कामाला..., कमवताते ना तुझ्यासाठीच ते..., तर काय फायदाय आता शिकून....,काय शिकून कामाला जायचंय तुला... लग्नं झालंय तुझं आता.. जरा घरात रमायचं बघ... मुलींनी कसं घरातच बरं असतं..., मुलगी ही घरची लक्ष्मी असते.., ती घरातच शोभते..., रोज अशी कॉलेज-कॉलेज करत बाहेर जाशील तर सासरचे नावं ठेवतील...,” आशूचे बाबा तिच्याकडे न पाहता म्हणाले..
“काय संबंध...., मुळात तुमचे हे विचार ना तुमच्या जवळच ठेवा..., तो तर असा आहे की तो स्वतःहून मला शिकवायला, मला माझे स्वातंत्र्य द्यायला तयार आहे..., तो माझ्यासाठी वाट्टेल ते करायला तयार आहे बाबा....”, ती आज पहिल्यांदा तिच्या बाबांशी मोठ्या आवाजात आणि आत्मविश्वासाने बोलत होती....,
“अगं तो काय तो... काहीतरी मान दे नवऱ्याला....”, डॅनी म्हणाला...
“दादा तू नको सांगू मला... कुणाला कसा मान द्यायचा ते....”, ती त्याच्यावर पण रागावून बोलली...
आशूचे बाबा मात्र मनातून खूश होते... फायनली आपल्या मुलीवर कुणीतरी जीव ओवाळून द्यायला तयार झाला... आणि आपल्या मुलीलाही तो आवडू लागला...., त्यांचे निम्मे टेन्शन संपले होते..., लग्नाच्या आदल्या दिवशी असलेली आशू आणि आत्ता त्यांच्यासमोर सिदवर विश्वास दाखवणारी आशू.... खूप फरक जाणवत होता...,
आजपर्यंत त्यांनी तिच्यावर टाकलेले दडपण आता कुठे सार्थकी लागल्यासारखे त्यांना वाटत होते..,
तिच्या बाबांनी तिला कॉलेजला जायची परवानगी दिली...
तिला बाबांमधला पण हा नवीन बदल पाहून आनंद झाला..., डॅनी तिला सोडवायला कॉलेजला गेला...,
आशूचे सर्वांनी अभिनंदन केले, मित्र मैत्रिणींनी तिला पार्टी वगैरे मागितली..., पण आशूची नजर सीमाला शोधत होती..., तिची जीवाभावाची मैत्रीण काही तिला कुठेच दिसत नव्हती...,
*****
संध्याकाळी जेवताना बाबांनी सिदच्या मनातल्या प्रश्नाचे उत्तर म्हणून विषय काढला...
“लवकरच वर एक रूम बांधायला हवी..., संदिप.. काही पैसे असतील तर दे मला..., माझ्याकडे आहेत थोडेफार..., एक-दोन आठवड्यात करून टाकू काम हे....., आपल्या चिरंजीव सिध्धू साठी....” ते सहज नेहमीच्या मूडमध्ये बोलले...
“हो बाबा.., लगेच देतो..., खरेतर आपल्याला टाकायचीच होती वर रूम..., पण लग्न फारच लवकर झालं ना...., कळलंच नाही...”,
सिद हे नुसतं ऐकत होता..., आपला भाऊ आणि बाबा अजूनही त्याच्यासाठी एवढं करत आहेत हे पाहून त्याला त्यांच्याबद्दल फारच आपुलकी वाटत होती...,
“आणि काही दिवसांचा प्रश्न आहे ना..., तर सिद भावोजी आमच्या बेडरूममध्ये झोपतील... का देवरजी....???”, सिदची वहिनी नेहमीप्रमाणे त्याची मश्करी करत म्हणाली....
खरेतर वहिनीकडून हे ऐकणं म्हणजे फारच नवल होती..., कोणती भावजय आपल्या दिरासाठी एवढं करू शकते..., ती घरातली मोठी सून, सहाजिकच तिला या गोष्टीचा अहंकार चढणार..., पण तसं काहीही न होता तिने सरळसरळ एक दोन महिने तिची रूम सिदला द्यायची ठरवली…
घरात सगळेचजण वहिनीच्या ह्या निर्णयाने आनंदित होतेच..., कारण तसंही आता सर्वात जास्त सिदला एका रूमची गरज होती..,
पण तरी बाबा म्हणालेच.., “लवकरच वर रूम पण टाकुया आपण...”,
हे सगळं ऐकून सिदला आनंदही झाला होता.., पण तेवढीच स्वतःची लाजही वाटत होती..., आता आपणही आपल्या घरासाठी काहीतरी केलं पाहिजे..., असं त्याला वाटू लागलं....,
****
आशू आज पहिल्यांदा फार आनंदित होती..., तिचा आनंद आज गगनात मावेनासा झाला होता.., आजपर्यंत तिला प्रत्येक मुलाने रिजेक्ट केले होते.., पण सिद वर मात्र तिला एवढी खात्री झाली होती की.., कोणत्याच गोष्टीने त्याला आता फरक पडणार नव्हता..., एवढा तो तिच्या प्रेमात पडला होता..., बाबांनी आपल्याला एवढा चांगला मुलगा शोधला यावर तिला विश्वासच बसत नव्हता.., काल पर्यंत कमी शिकलेला, मवाली वगैरे म्हणून सिदला मनातून नावं ठेवणारी आशू आज त्याच्या आठवणीत रात्रंभर जागी होती..., प्रेम वगैरे अशा गोष्टी ती कधीच मानत नव्हती पण आज का जाणे ती सिदच्या प्रेमात पडली होती...,
रात्रंभर तिच्या ओठांवर एक गाणं तरळत होतं...,
कहते है खुदा ने इस जहान में सभी के लिए
किसी ना किसी को हैं बनाया हर किसी के लिए
तेरा मिलना हैं उस रब का इशारा मानू
मुझको बनाया तेरे जैसे ही किसी के लिए....
तिला आता आस लागलेली कधी ती पुन्हा सासरी जात आहे..., तिला सिदची खूप आठवण येत होती..., कारण ती पहिल्यांदा कुणाच्यातरी प्रेमात पडली होती..., प्रेम ही भावना ती हळू-हळू समजत होती..., आणि हे प्रेम आकर्षण नाही तर खरं प्रेम आहे हे सिदच्या ऊबदार मिठीत तिला जाणवले होते...,
इकडे सिदपण आतुरतेने तिची वाट पाहत होती..., त्या क्षणाची त्याला आस लागलेली..., त्याला तिचा हात हातात घेऊन तिला खऱ्या अर्थाने साता जन्माची वचने द्यायची होती..., त्याच्या सुख-दुखाःत तिची साथ मागायची होती..., त्याला आणि तिला एकमेकांमध्ये आयुष्यभरासाठी गुंतून जायचे होते....,
क्रमशः
Bhartie “शमिका”
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा