Jan 22, 2021
स्पर्धा

पसंत आहे मुलगी भाग 7

Read Later
पसंत आहे मुलगी भाग 7

भाग 7

 

मुलीकडचे लवकर हॉलमध्ये पोहचले होते.., दुपारी चार वाजता साखरपुडा होता आणि त्यानंतर रात्री सात वाजता हळदी समारंभ होता.., मुलीकडच्या पाहुण्यांनीच आर्ध्याहून जास्त हॉल भरलेला होता, सगळीकडे नुसता गोंधळ चालला होता.., कित्येक नातेवाईक हे आज-आणि उद्या तिथे मुक्कामी होते.., मुलाकडचे मात्र मोजकेच लोक होते.. गावाकडची काही लोकं आणि पुण्यातले नातलग.., त्यांचा एवढा गोतावळा नव्हता..

हॉलमध्ये पाऊल ठेवताच सिदच्या बाबांना एकदम लाजल्यासारखे झाले.., बाहेर दोन-तीन लक्झरी बस उभ्या होत्या.., ज्यातून मुलीकडचे पाहुणे आले होते.. पण मुलाकडून मात्र चार पाच कार मधून घरातली मंडळी आणि इतर नातेवाईकांसाठी एक मोठा टेम्पो केला होता...,

मुलाकडचे सगळेच मुलीची श्रीमंती पाहून थक्क झाले होते.. प्रत्येकीच्या गळ्यात गच्च भरुन सोन्याचे दाग-दागिने, भारीतल्या साड्या..., त्यांनी आणलेला आहेरही जरा जास्तच तोलामोलाचा होता.., मुलाकडचे हे सगळे फक्त पाहतच बसले होते..,

सिदचे बाबा, भाऊ.. वहिनी.. आई.. सगळेच मनोमन खूश होते.. पाहता पाहता घरातल्या शेंडेफळाला आज हळद जी लागणार होती.. जे काही होत आहे ते जरा घाईतच होत होते, पण तरी या सगळ्यांत सगळेच खूश होते...,

 बाहेर हॉलमध्ये, सर्व थोरामोठ्यांच्या औपचारिक गप्पा चालू होत्या.. नवरा-नवरीला मात्र चारशिवाय आपापल्या रूमच्या बाहेर यायची ताकिद नव्हती.., सिद तर नुसता आशूला पाहायला उतावळा झाला होता.., कधी तिला भेटतोय असं त्याला झालं होतं.., पण नियम होते, आता लग्न झाल्याशिवाय नवरा-नवरी एकमेकांशी बोलू शकत नाही..,

आशूही इकडे तिकडे सिमाला शोधत होती.., पण तिला कुणीच रूमच्या बाहेर सोडत नव्हते.., दोन-दोन मुली तिचा मेकअप करायला होत्या.. पण आशूला हे सगळं नको होतं.. ती ह्या लग्नाला मनापासून तयार नाहीये.. हे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं.., पण मुली ह्या लग्नाच्या दिवशी अस्वस्थच असतात अशा विचारात असलेल्या तिथल्या सगळ्या बायका तिच्या ह्या अस्वस्थतेकडे जाणून बूजून दुर्लक्ष करत होत्या..,

आशूचा मोबाईल ही तिच्या भावाकडे, डॅनीकडे होता.., तिने रूममध्ये तिच्या एका बहिणीला मोबाईल मागितला आणि सीमाला फोन करू लागली.. पण तिचा फोन स्विच ऑफ येत होता.., आता आशूला फार टेन्शन आलं होतं..,

जस-जसा वेळ पुढे जात होता तिचं टेन्शन आणखीनच वाढत होतं.., आणि नेमकी यायची ती वेळ आलीच... तीन वाजले.., आणि आता हळदीचा कार्यक्रम होणार होता.. हळदीसोबत होणारे काही विधी करण्यासाठी नवरा-नवरीला तीनलाच तयार व्हायला सांगितलं.., आशू तयार तर झाली होतीच.., नाही म्हणता म्हणता.. थोडाफार तिने मेकअप केला.., कारण नवरी ही सर्वांमध्ये उठून दिसली पाहिजे.., पण इथे तर नवरी सोडून बाकीच सगळे नटले-धटले होते.., सर्वांनी सर्व विधींसाठी वेगवेगळी थीम ठरवली होती...,

आशू मात्र एकदम सिंपल आणि सोज्वळ दिसत होती साडीमध्ये.. साधा मेकअप असला तरी तीच नवरी आहे हे तिच्या चेहऱ्यावरील नाजूक, अस्वस्थ भावांमुळे लगेच समजून येत होते..,

थोडा वेळ एकाग्र विचार करून तिने ठरवलं.., आपणच सिद्धार्थशी बोलायचं.. पण कसं हे तिला सुचत नव्हतं..,

सव्वा तीन पर्यंत नवऱ्या मुलाला स्टेजवर घेऊन या अशी भटजींनी घोषणा केली.., दोघंही स्टेजवर आले.., दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या..., सिद खूपच खूश होता.., पण आशू मात्रं फार कन्फ्युज्ड दिसत होती..,

साखरपुड्याची वेळ जवळ आली, तसे भटजींनी घोषणा केली, नवरा- नवरीला घेऊन या....

झालं, आताही आशू पुन्हा अस्वस्थ अशी स्टेजवर आली, पण सिदचा चेहरा आता जरा वेगळा दिसत होता..., आशूशी न बोलताही जो जणू खूप काही बोलून गेला होता...

साखरपुड्याचे काही विधी झाले आणि सिदने अंगठी घालण्यासाठी आशूचा हात मागितला.. आशू मात्र हात पुढे करायलाच तयार नव्हती.. तिची नजर नुसती सैरभैर झाली होती.., सर्वांच्या नजरा तिच्यावर होत्या.. आणि ती मात्र कावरी बावरी झाली होती..

“आशू बाळा हात कर पुढं”, आई म्हणाली..

पण आशू मात्र गप होती.. तिला वाटत होते, उठावे या पाठावरून आणि सर्वांना ओरडून माझे सत्य सांगावे...

पण तेवढ्यात सिद म्हणाला, “आशू... एवढी काय घाबरतेस अगं...?”

तशी आशू सावरली, त्याच्या बोलण्याने तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि त्याच धुंदीत तिने हात पुढे केला...

सिदने आशूच्या बोटात अंगठी घातली आणि त्या दोघांचा साखरपुडा संपन्न झाला...

 

मुलीकडच्या बायका हळू आवाजात चर्चा करतच होत्या, मुलगा भारी मिळालाय आशूला, सगळं माहित असूनही एवढा काळजी करणारा नवरा मिळायला भाग्यच लागतं.., खरं प्रेम करणारा नवरा मिळालाय... असं म्हणत सगळ्या बायका सिदचे कौतूक करत होत्या..

साखरपुड्याची साखर सगळ्यांना वाटली गेली, आशूला सिदच्या आईने छान सोन्याच्या बांगड्या केल्या होत्या, त्या तिला देण्यात आल्या, तिची ओटी भरली गेली.. आणि फायनली ह्या दोघांचा साखरपुडाही झाला...

 

पाच वाजेपर्यंत त्या दोघांचा साखरपुडा झाला.., दोघांनी एकमेकांच्या हातात अंगठी घातली आणि आशू सिदची अर्धांगिनी झाली.., साखरपुड्याने त्यांचे ते बंधन घट्टं झाले..., दुपारी चहा पोहेचा नाष्टा झाल्यानंतर सगळेजण हळदीची तयारी करू लागले...,

 

सिदचे सगळे मित्र तर फुल तयारीत होते की आज सिद्द्याला रंग लावतात तशी हळद लावायची..., सर्वच मित्र फारच उत्सुक होते.., कारण त्यांच्या ग्रुपमधलं हे पहिलं लग्न होतं, जे एवढ्या घाई-घाईत ठरलं होतं..,

सिदला त्याचे मित्र स्टेजवर घेऊन आले, हळदीची तयारी झाली होती.., सिद पाटावर बसला, त्याच्या आईने त्याला सुगंधी तेलात भिजवलेली हळद लावली.. एक-एक करून त्याच्या सगळ्या बहिणी, वहिनींनी, घरातील स्त्रियांनी येऊन हळद लावली..,

आता हळू-हळू सगळेजण सिदला येऊन हळद लावू लागले.., हळद झाल्यावर एकीकडे डीजे सॉंग लावलेले होते.. सगळे पुरूष मंडळी, स्त्रिया, लहान मुलं-मुली हळद खेळता खेळता डीजेवर थिरकू लागले...,

 

सिद मात्र पूर्ण अस्वस्थ होता.., त्याच्या चेहऱ्यावरून तो फार उत्साही दिसत होता.., पण मनातून मात्र तो पूर्ण अस्वस्थ होता...,

तेवढ्यात समोरून त्याला आशू येताना दिसली.., सगळ्या मुली घोळका करून तिच्यासोबत स्टेजवर येत होत्या..

अगदी त्याच्या स्वप्नातली परी दिसत होती आशू... सुंदर, सौज्वळ, नाजूक.., आणि सर्वात अतिसुंदर म्हणजे तिचे ते बोलके डोळे..., सिद काही वेळ तसाच स्तब्ध झाला.., तिची ती पिवळी साडी तिच्या गोऱ्या अंगावर अगदी उठून दिसत होती.. लाल पदर आणि अंगावर सोन्याचे नाजूक दागिणे.. हळद लावण्याच्या आधीच तिचा चेहरा पिवळा झाला होता... हळदीचा रंग आधीपासूनच जणू तिच्या अंगावर दिसत होता.., एवढी सुंदर मुलगी सिदने पहिल्यांदाच पाहिल्यासारखे तो तिचे रूप न्याहाळत होता..,

आशू मात्र त्याच्याकडे एकटक पाहत होती.. तिला त्याच्याशी बोलायचे होते.. पण सिदची नजर फक्त तिच्या सौंदर्यात हरवून गेली होती....,

“सिद चल.. अरे असाच बघत बसणारे का... चल..” अस म्हणत त्याचे मित्र त्याला नाचायला घेऊन गेले...

इकडे आशूला सिदची उष्टी हळद लागणार होती...,

जसा सिद मुलांच्या घोळक्यात गेला.. आशूचे ह्रदय अजूनच धडाडू लागले.. तिचा चेहरा घामाने डबडबू लागला..

“अगं आशू बाळा..., अशी घाबरते काय... बस...” सिदची आई तिला म्हणाली...

तसे आशूचे बाबा म्हणाले, “घाबरत नाही हो... जरा भांबावली आहे एवढ्या सगळ्यांना पाहून...” आणि त्यांनी तिच्या आईला तिला पाटावर बसवण्यास सांगितले...

तसे तिच्या आईने तिला पाटावर बसवले आणि तिच्या अंगाला हळद लावण्याचा विधी एकदाचा सुरू झाला...,

आशूच्या जीवाची नुसती घालमेल चालू होती..

तिकडे सिदही नाचता नाचता तिच्याकडे पाहत होता.. आणि आशूची तर नजरच हटत नव्हती.. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं.. ह्रद्यात चर्र होत होतं.. कारण तिला माहित होतं की आपण जे काही करत आहोत तो विश्वास घात आहे..,

तिच्या आईने तिच्या हातापायांना आणि गालावर सिदची उष्टी हळद लावली तशी आशूने आईला थांबवले..

“काय गं आशू काय झालं..?” आशूची काकू हसत म्हणाली..

“काही नाही हो.. ह्या सगळ्या गोष्टी नवीन आहेत ना तिला, म्हणून...”  असं म्हणत तिच्या आईने तिच्याकडे साफ दुर्लक्ष केले..

“हो ना.. पोर लहान आहे हो..” दुसरी काकू म्हणाली...

असं म्हणता म्हणता सर्वांनी तिला हळद लावली... आणि आशू त्यांना थांबवू शकली नाही...,

आज आशू ही सिदची झाली होती.. त्याची अर्धांगिनी.. त्याच्या अंगाची उष्टी हळद तिच्या अंगाला लागली आणि आशूला गरगरू लागलं..., तिचे तोल जाऊ लागले...,

सिद हे नाचता नाचता पाहत होता... त्याने तिच्याकडे पाहिले...,

आशूला चक्कर येत होती, पण कुणाचेच तिच्याकडे लक्ष नव्हते.. सगळेजण मस्त डिजेच्या तालावर नाचत होते..,

दोन्ही घरं एकमेकांमध्ये मिसळले होते.. नवरा-नवरी मात्र एकमेकांच्या डोळ्यात हरवले होते.., मोठमोठ्या आवाजात गाणी वाजत होती.. आशूचा भाऊ आणि बाबा तर कधीच धुंद होऊन नाचत होते.. जणूकाही त्यांनाच आज सर्वात जास्त आनंद झालेला होता.., आशूची आई तिच्याजवळच होती पण तिला तिच्या डोळ्यातले अश्रू दिसत नव्हते की तिला चक्कर येतीय हेही समजत नव्हते..

आशू तशीच हळदीचे अंग घेऊन बसली होती.., जो तो येऊन तिला हळद लावत होते आणि तिला नाचायला चल म्हणून आग्रह करत होते..

सिदला मात्र काहीसे वेगळे आहे जाणवले..., तो आज थांबू शकत नव्हता.., आशूच्या चेहऱ्यावरचे भाव त्याला काहीतरी वेगळंच सांगत होते.., तो नाचत नाचत गर्दीतून तिच्याजवळ आलाच...

त्या दोघांची नजरेला नजर भिडली, आशूच्या तर पोटात गोळाच आला.. सिदच्या डोळ्यात तिला एक वेगळंच प्रेम दिसलं.. काळजी दिसली...

“आशू.. तुला काही होतंय का..? अशी अस्वस्थ का वाटतीय...” त्याने गाण्यांवर थिरकतच तिला विचारले..

त्याने विचारलं आणि तिच्या डोळ्यातून गंगा जमूना वाहू लागल्या...

“काय गं.. टेन्शन वगैरे आलंय का लग्नाचं..?” सिद पुढे बोलला...

दोघंही जरा घोळक्यातून बाहेर आले..,

आशूला खूप बोलायचे होते पण तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता.. डोळ्यातले अश्रू गालावरच्या हळदीवरून खाली ओघळून येत होते...,

सिद आता घाबरला, “आशू...”  तो फक्त एवढंच बोलला..

आशूला तिच्या जवळचे सगळेजण आशू बोलायचे, आणि सिदने मारलेल्या प्रेमळ हाकेने ती संभ्रमात पडली की काय बोलू मी आता..., कालपर्यंत बारावी पास, मवाली म्हणून नको असणारा सिद तिला काही मिनिटांमध्ये हवा-हवासा वाटू लागला होता.., एवढ्या गर्दीत तिच्या आई-बाबांनाही तिचा विसर पडला पण तो तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहूनच तिच्याजवळ काळजीने आला...,

हे एक कारण पुरेसं झालं एकवीस वर्षाच्या आशूला सिदच्या प्रेमात पडायला...

“थांब.. मी पाणी आणतो.. अशी रडतेस काय वेडी..” सिद हसत म्हणाला आणि पटकन त्याने जवळच्या टेबलावरून छोटीसी पाण्याची बाटली आणली तिला दिली...

तिची मात्र घालमेल सुरूच होती.. काय बोलू कसं सांगू.. त्यात डिजेच्या आवाजामुळं कुणाचंच बोलणं कुणाला ऐकू येत नव्हतं..

तिने गटा-गटा पाणी पिले आणि पुन्हा त्याच्याकडे पाहू लागली...,

तेवढयात दुरून तिच्या बाबांनी पाहिले...

त्यांनी लगेच डॅनीला सांगितले...

आशू सिदला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती..

“मला बोलायचं आहे..” आशू म्हणाली..

“काय...?” सिदला ऐकू येत नव्हते.. “काय होतंय तुला..?” तो म्हणाला..

“मला बोलायचं आहे...” आशू जरा मोठ्याने बोलली..

तेवढ्यात आशूची आई तिथे आली,

“अरे.. जावईबापू.. असं लग्नाआधी नवरा-नवरींनी बोलायचं नसतं.. जे असेल ते लग्नानंतर... रित आहे ना अशी...” असं म्हणत सरळ तिची आई तिला घेऊन गेली..

सिद मात्र तिच्याकडेच पाहत होता.. त्याचे मित्र तिथे आले आणि त्यांनी त्याला नाचायला ओढले...,

*

संध्याकाळी आठपर्यंत हळदीचा कार्यक्रम पण संपला..,सर्वजण आता जेवणाला गेले..,  

नवरा-नवरी आपापल्या रूममध्ये आवरायला गेले..,

आशूला साखरपुड्यामध्ये जे काही घडलं ते आठवत होते.., त्याच्या एका नजरेवरून आज तोही तिला आवडला होता.. बाकी पहिल्या भेटीत आलेला अनुभव ती कधीच विसरून गेली...

पण तरीही त्याला खरं काय ते सांगावं असं तिला वाटत होतं.. पण ते काही आता शक्य नव्हतं..,

 

**

“डॅनी भाऊ, ती सीमा, इथे बाहेर दिसली मला...” डॅनीच्या मित्राने हॉलच्या बाहेरून त्याला फोन केला..

“काय सांगतो, कुठंय ती.. आता..” डॅनी ओरडतच बोलला..

“आता हॉलमध्येच येतीय..”

“अरे बिनडोक, अडव तिला तिथंच, आत येऊ देऊ नको...” डॅनी ओरडत बोलला...

तसे डॅनीच्या काही मित्रांनी सीमाला अडवले..., आणि हॉलच्या मागे घेऊन आले,,

“ए माझा हात सोडा.. सोडा मला..” सीमा ओरडू लागली...

तेवढ्यात तिकडून डॅनी आला, त्याचा विचित्र चेहरा बघून सीमा पुरती घाबरली..

“काय गं ये.. भवाने.. तुला सांगितलेलं ना तुझं तोंड दाखवू नको म्हून...”, त्याने सरळ तिचा गळा धरला.. आणि रागाने तिच्याकडे पाहू लागला..

“ए सोड मला.. सोड..” ती ओरडू लागली...

“तोंड बंद ठेव हा.. नायतर ते तोंड कुठं दाखवायच्या पण लायकीचा ठेवायचो नाय मी...” तो तिचे तोंड दाबत बोलला...

“ये त्या कल्प्याला फोन लावा रे...” तो विचित्र सूरात बोलला..

तसं त्याच्या मित्रांनी कल्पेशला फोन लावला आणि तिथं बोलावून घेतलं...,

कल्पेश लगेच आला..

सीमाला डॅनीने घट्ट पकडले होते.. तिच्या तोंडावर त्याचा हात होता..., कल्पेश येताच त्याने तिला त्याच्याकडे भिरकावले..

“ये, साल्या कल्प्या, तुला काय सांगितलेले, तुझ्या बहिणीला, घऱाबाहेर सोडू नको म्हून.. मग ही इथं आलीच कशी.. व्हयं रे..” त्याने कल्पेशची गुचुंडी पकडली...

“सॉरी भाऊ.., ती कशी आली समजलंच नाय... मी बाहेर होतो..”, कल्पेश हात जोडत म्हणाला..

“मग आता जा हिला घेऊन.. ताबडतोब, नाय तर बघ मी काय करतो हिचं पण आणि तुझं पण...” डॅनी चुटक्या वाजवत बोलला..

“ए, तुला सांगितलं ना... नको येऊस म्हणून..” असं बोलत कल्पेशने सीमाच्या कानाखाली मारली आणि तिला ओडून ताणून गाडीवर बसवले...

 

आणि हे सगळं सिदचा मित्र संकेतने पाहिले....,

 

क्रमशः

 

मी सर्व वाचकांची माफी मागते, हा भाग जरा उशिराच पोस्ट केला, पण इथून पुढे सगळे भाग मी लवकरात लवकर पोस्ट करते....,

 

 

 

Bhartie “शमिका.”