Jan 27, 2021
स्पर्धा

पसंत आहे मुलगी भाग 6

Read Later
पसंत आहे मुलगी भाग 6

भाग ६

 

“सिध्द्या खरंच तू आशू वहिनींशी बोललाच नाही अजून...?” तेज्या सिदला म्हणाला..

“अरे कसा बोलू..? तिचा नंबर पण नाही माझ्याकडं...? तिच्या बाबांना नाही आवडत लग्नाआधी मुला-मुलींनी बोल्लेलं..”

तेज्या जरा चिडला.. “असं कुठं असतं का..? आता लग्नाआधी मुलं-मुली फिरतात, सर्वकाही करतात तरी घरच्यांना पत्ता लागत नाही.. आणि इथं तुम्हाला साधं भेटू पण देत नाहीए...”

“मला ना सिध्द्या झोल वाटतोय...” संकेत म्हणाला..

“नाही रे.. झोल वगैरे काही नाहीये.. फक्त मला एकदा तिच्याशी बोलायचं होतं...” सिद संकेतला म्हणाला..

“नाही रे अशा खूप केसेस पाहिल्यात मी.. मुलीकडचे लवकर लग्न उरकतात आणि नंतर काय ते समजतं.. मग काय.., पश्चाताप करण्याखेरीज मुलाकडं काहीच उरत नाही.. ”

“ए गपे.. आशूला मी पाहिलं आहे... तिच्यात काही खोट असूच शकत नाही...” सिद म्हणाला.

“अरे तुला काय एका भेटीत समजणार आहे होय..? कुठे बाहेर अफेयर वगैरे असेल.. आता कार्यकर्त्याची मुलगी म्हटल्यावर.. असेल काहीतरी, बापाला नसेल खपलं.., म्हणून..”

“संक्या गप हा... असं काही नाहीये... प्रॉब्लेम तिच्यात नाहीय.. माझ्यातच आहे.., मला तिला विचारायचंय, तुला खरंच मान्य आहे ना कमी शिकलेला नवरा, छोटे काम करणारा नवरा..., कारण आई-वडिलांनी ठरवून दिलं म्हणून लग्नं केलं असं म्हणणारी नकोय मला.., तिला मनापासून आवडलो पाहिजे यार मी...”

 

“बस का भावा.. एवढ्या मुली मागं लागतात तुझ्या.. त्यांना आवडतोस मग वहिनींना का नाही आवडणार...” अभि त्याला म्हणाला..

 

“ये गप रे.. त्या बावळट मुलींचं नको सांगू मला... मला जी मुलगी पाहताक्षणी आवडली असेल ती म्हणजे आशू... एवढ्या वर्षात कोणत्या मुलीकडे नजर वर करून पाहिले नाही.., पण आशूकडे मात्र मला पाहतच राहावेसे वाटत होते...,, ती मला हवीय रे.. पण अशी हिसकावून किंवा जबरदस्तीने नाही.. मनापासून तिनेही मला लाईक केले पाहिजे.., मुलींनाही आपापली चॉईस असली पाहिजे....” सिद जरा गंभीरपणे म्हणाला..

“मी ना आता फक्त जॉबवर कॉन्स्नट्रेट करायला हवंय यार.... कारण मला तिच्या लायक बनायचं आहे... ती माझ्यापेक्षा जरी लहान असली तरी तिचे स्थान हे नेहमी माझ्यावरच असेल...,” सिद एकदम भावनिक झाला..

“अरे झालं ना मग भावा.. तुला कॉन्फिडन्स आहे ना..? की काही गडबड नाही म्हणून.. मग का भेटायचंय म्हणून तगादा लावलांयस.. उलट तू जितना तरसेगा उतना तुमपें प्यार बरसेंगा.. मैरे यार...” असं म्हणत अभिने त्याच्या खांद्यावर हात टाकला..

“झालं.., दोनच दिवसांचा प्रश्न आहे.., दोन दिवसांत तर या टायमिंगला तू कुठे असशील हे तुलाच माहित...” अभि डोळा मारत म्हणाला..

तिघंही जोरजोरात हसले..

“ए गपा रे... पूजा वगैरे झाल्याशिवाय नसतं तसं काही...”

“ठिक आहे ना.. म्हणजे सात दिवसांनी..” असं म्हणत तेज्याने पण त्याच्या पाठीत धपाटा मारला आणि सगळे परत हसू लागले..

पण सिद नाराजच होता... त्याला लग्न करायचं तर होतं.., पण लग्नाआधीपासूनच त्याला ते अनुभवायचं होतं., पण इथे तशी काहीच लक्षणं दिसत नव्हती...

***

 

“या या.. आमच्या लाडक्या बहिणीच्या लाडक्या मैत्रीण मिस सीमा.. या या... तुमचे सहर्ष स्वागत आमच्या लगिन घरात...” डॅनी तोंड वेडेवाकडे करत तिला टोमणा मारत म्हणाला..

“आशू कुठंय...?” सीमाने रागातच विचारले..,

“कुठं असणार..? दोन दिवस तर इथंच असेल.. पण लग्न झालं की जाईल तिच्या नवऱ्याच्या घरी...” डॅनी म्हणाला.

सीमा लगेच घराच्या गेटच्या दिशेने निघाली....

“काय काम आहे का तुझं...?” डॅनीने रागात तिला थांबवत विचारले..

“लग्न आहे ना तिचं.. तर तिच्या जीग्री मैत्रीणीशिवाय कसं होईल..?” सीमा पण त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली..

“ए.. तू का तिचं लग्न मोडायचा प्रयत्न करतेस दरवेळेस.., मैत्रीण आहेस ना तिची तर जरा चांगला विचार कर ना तिच्याबद्द्ल...” डॅनी रागाच्या सूरात बोलला.

“एका बारावी पास, ऑफीस बॉय सोबत लग्न लावून देऊन तुम्ही काय चांगला विचार करताय का..?

“ते आम्ही आमचं बघू.. तू का मध्ये मध्ये करतीय.. एकदाचं ठरलंय लग्न तर का मोडायचा प्रयत्न करतीय..”

“हे बघं.. मी काही तोडायचा वगैरे प्रयत्न करत नाहीए.. तिचं लग्न आहे तर मी तिला भेटायचं पण नाही का..,? सीमाने शांत होत विचारले.

“काही गरज नाही तू भेटण्याची.. तुला आमंत्रण दिलंच आम्ही तर ये.. आता प्लीज जा.., निघ..,”

“काकू कुठंय..?” सीमा जरा ओरडून बोलली, पण घरात फारच वर्दळ होती म्हणून कुणाच त्याकडं लक्ष गेलं नाही..

“गपचूप जातेस का.., का हकलवून लावू.. थांब पप्पांना सांगतो.. मग ते बरोबर तुला हकलून लावतील..”

सीमाला आता राग आला.. “ए भिती कुणाला दाखवतोस रे.., तुला लाज वाटली पाहिजे स्वतःच्या बहिणीशी असं वागतोस.. एवढी जड झालीय का तुम्हाला दोघांना ती..?” सीमा जरा ओरडून बोलली..

“तुला सांगितलं ना एकदा.. आम्ही आमचं बघू ती जड झालीय की नाही.. तू निघ.. आणि तुझ्या त्या बेवड्या बापाला तुझं लग्न लवकर उरकून द्यायला लाव नायतर...”

सीमाला फारच राग आला.. “शी.. किती गलिच्छ बोलतोस.. तुझ्याकडं ना मी पाहिलं असतं.., पण आशूमुळं मी गप आहे.., मैत्रीण आहे ना ती माझी.., पण तू लक्षात ठेव.., तीचं लग्न मी त्या बारावी पास मुलाशी होऊ देणार नाही.., आणि झालंच तर त्याला मी तिच्याबद्दल सगळं सांगितलेलं असेल..”,

डॅनी चिवतळला.. “आणि तू कसं सांगतीस तेही मी बघतोच... निघ चल.. निघ...”

डॅनीने अक्षरशः तिला हकलवून लावले.. त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता.. त्याने लगेच खिशातून फोन काढला..

“ए.., कल्प्या.. तुझ्या बहिणीला जरा आवर.. स्वतःचं बघ मग दुसऱ्याचा विचार करायला सांग...”

“डॅनी भाऊ काय झालं पण..?” कल्पेश, सीमाचा भाऊ अगदी घाबरत बोलला..

“ती दोन दिवस घरातून बाहेर पडली नाय पाहिजे.. आणि आमच्या घरी तर बिल्कुलच दिसली नाय पायजे.., माझ्या बहिणीच्या लग्नात जर ती दिसली तर बघंच तू काय करतो मी ते.., मोबाईल काढून घे दोन दिवस तिचा... आणि जर तिने काही राडा घातला ना माझ्या बहिणीच्या लग्नात तर तूही गेला आणि तीचं तर विचारूच नको...”

“ठिक आहे..,” कल्पेश घाबरतच बोलला आणि त्याने फोन ठेवला..,

 

*****

“काय हो आशूची आई.., पण लग्नाला फारच घाई केलीत हो.., एक आठवड्यात कधी लग्न ठरतंय होय..?” शेजारच्या काकू म्हणाल्या..

“का आपली आशू मुलाला फारच आवडली..? म्हणून त्यानेच घाई केली लग्नाला..?” दुसऱ्या काकू म्हणाल्या..,

तशी आशूची आई हलकेचं हसली, “हो ना.. तसंच झालं..” असं म्हणत आई उठून लगेच दुसरीकडे गेली..

इकडे आशूच्या मनाची अगदी घालमेल चालू होती.. दोन दोन मुली तिच्या हाता पायावर मेहंदी काढत होत्या.., सगळीकडे नुसता कालवा चालू होता..आणि तसाच तिच्या मनातही विचारांचा कालवा चालू होता.. तिला समजत नव्हते काय करावे ते.. सीमा आताच येईल नंतरच येईल म्हणून ती नुसती दाराकडे पाहत होती..

“आशू दिदी.. तुझ्यासाठी आहे..” अचानक एक लहान मुलगी हातातली चिठ्ठी दाखवत हळूच तिच्या कानात म्हणाली..

आशूला प्रश्न पडला.. तिच्या दोन्ही हातांना मेहंदी होती..

तिने हळूच त्या मुलीला ती चिठ्ठी उघडून दाखवायला सांगितली...

‘आशू, सॉरी.. सिध्दार्थशी बोलू शकले नाही मी.. त्याच्या मित्रांशी बोलणं झालं पण त्याची गाठ पडली नाही., दोन दिवस आहेत अजून.. धीर सोडू नकोस... दा. आत ये. दि. नाही...’

तिने शेवटचे शब्द शॉर्टकट मध्ये लिहिले होते.. दादाने आत येऊ दिले नाही... असे होते ते, जे आशूला समजले.

 

सीमाने लिहिलेली ही चिठ्ठी होती.., आशूने पटकन वाचली आणि खबरदारीपणे त्या मुलीला कचऱ्याच्या डब्यात ती टाकायला सांगितली...

आशूचे ह्र्दय धडधडंत होते.. दोन दिवसांवर कसलं, उद्याच हॉलवर जायचंय.. म्हणजे आजची एक रात्रच आहे माझ्याजवळ.., उद्या कशी बोलणार आहे ही सिमा.... आशू टेन्शनमध्ये होती..

 

आशू प्रमाणेच सिदही इकडे तिला भेटून तिच्याशी बोलण्यासाठी व्याकूळ झाला होता.. तुला खरोखरच माझ्याशी लग्न करायचे आहे का हे सिदला विचारायचे होते.. पण वेळ कुत्रं मागे लागल्यासारखी पळत होती.., पाहता पाहता आजचा दिवसही गेलेला होता.., दोन्ही घरांमध्ये माना-पानाची देवाणघेवाण झाली होती, पण नवरा-नवरींच्या विचारांची काही देवाणघेवाण झालेले नव्हते.. एकविसाव्या शतकात अगदी अशक्य वाटणारी ही गोष्ट... !!!

सिद पूर्ण विचारांमध्ये बुडाला होता.., घरातले सगळेचजण दमले होते त्यामुळे लवकरच झोपी गेले होते.. वनबीएचके असलेल्या त्या छोट्या घरामध्ये सगळेच पाहुणे लोकं मावता मावत नव्हते.. सिद बाहेर अंगणात अंथरूण टाकून पहुडला होता..

आज त्याला खूप एकटे वाटत होते.. लग्न तर ठरले पण पुढे काय.. सगळं नीट होईल ना, तिला माझा स्वभाव, माझ्या करिअर बद्दल काही शंका तर नसतील ना.. तिच्या बाबांनी दबाव वगैरे आणला असेल का तिच्यावर.., आजच्या काळात कोणती मुलगी माझ्यासारख्या मुलाला लग्नासाठी हो म्हणू शकते..,

त्याच्या मनात प्रश्न येत होते.., कारण त्याला आशूकडून होकार येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते... उद्या हॉलवर जायचे होते.., उद्याच हळद, साखरपुडा होणार होता.. आणि परवा लग्नं.... एवढ्या लवकर सगळं होईल असा त्याने विचारच केला नव्हता... तास भर त्याचे विचारमंथन चालू होते..

फोनच्या रिंगने तो भानावर आला...

“बोल अभ्या..एवढ्या रात्री फोन..”

“अरे हो सिध्दू...” अभ्या गंभीरपणे बोलला...

“काय रे काही सिरिअस...?”

“अरे.., फेसबुकवर एका मुलीचा मेसेज आलाय.. सीमा नावाच्या, तुझ्याशी बोलायचं आहे तिला..,”

सीमा... कोण सीमा... माझ्याशी काय बोलायचं आहे... सिदने विचारले..

“माहित नाही... बट खूप सिरियस आहे असं बोलत आहे.. आणि तिने तुला खूप शोधलं फेसबुकवर पण तू सापडला नाही म्हणून तिने मला मेसेज केलाय.. मेबी त्यादिवशी कॉलेजमध्ये पण आलेली हिच...”

“काय...??? कोण आहे पण ती..??? मला ओळखते का..??? विचार तिला..”

“अरे ती काही सांगायला तयार नाही.., फक्त तुझ्याशीच बोलायचं आहे तिला... इट्स वेरी सिरियस एंड सिक्रेट.. त्यामुळे तिला तुझ्याशीच बोलायचे आहे...असं म्हणतीय ती..”

“अभ्या.. त्या पूजासारखं काही प्रकरण नाही ना.. एकतर लग्न ठरलंय राव माझं.. काही व्हायच्या आतच संपायचं... त्या मुलीला सांग लग्न आहे माझं नंतर बघू काय सिक्रेट ते...” सिद जरा वैतागतच बोलला..

“सिध्दू.. ही तशी मुलगी नाही वाटत रे.. मेबी खरंच काहीतरी सिरियस काम असेल तिचं...” अभि सिरियसपणेच बोलला..

सिद जरा शांतच बसला..

“तुझा नंबर मागत आहे...”

“अभि...” सिद ओरडत बोलला.. “भावा प्लीज माझा नंबर देऊ नकोस... उगाच मुली मागं लागतात आणि प्रकरण घरापर्यंत येतं.. कुठं कोणत्या नाटकात पाहतात आणि मला तुम्ही खूप आवडलात वगैरे बोलतात.. एकतर मुलींचं मन तोडायला जमत नाही मला.. आणि आता तर लग्नंय माझं दोन दिवसांत.. उगाच राडा व्हायचा..” सिद पुन्हा वैतागत बोलला..

“चल बाय.. झोप तू मित्रा.. उद्या लवकर ये हॉलवर जायचंय... दोन दिवस तिथंच मुक्काम असणारे.., मित्राचं लग्नयं हा भावा.., लवकर ये...” सिद हसत म्हणाला.

“अरे पण या मुलीला काय सांगू..,?” अभिने विचारले.

“तू ये उद्या.. बघू आपण काय ते.., चल बाय..”असं म्हणंत सिदने फोन ठेवला.., आणि झोपायचा प्रयत्न करू लागला...

आता ही सीमा कोण..  मी इथं आशूला भेटण्यासाठी तरसतोय, आणि ह्या नवीन नवीन मुली काय मला भेटतात...

त्रस्त अशा विचारांतच तो झोपी गेला...

 

क्रमशः

 

Bhartie "शमिका"