पार्टी रिपोस्ट अंतिम भाग

कथा एका पार्टीची


मागील भागात आपण पाहिले की सुजयच्या मित्रांची पार्टी झाल्यावर प्रीतीने आपल्या मैत्रिणींना घरी बोलावले आहे. आता सुजयची पाळी आहे मावशींना मदत करायची..



बाहेर प्रीतीने गुलाबजाम, वेफर्स, सरबत असे सगळे तयार ठेवले होते.. सुजयने तिला विचारले," हे सगळे तर आहे, मग मी काय करायचे आहे?"
" किचनमध्ये गेल्यावर कळेल राजा.."
मान हलवत सुजय किचनमध्ये जाणार तितक्यात बेल वाजली.. दरवाजा उघडला तर त्या दिवशी जे मित्र आले होते, त्यांच्या बायका होत्या..
" अरे वा, भाऊजी, आज तुम्ही घरी?"
" हो , अग , तो म्हणाला कि दर वेळेस तुम्हीच का आमची सरबराई करायची आज मी करणार.. म्हटले कर बाबा.." प्रीती म्हणाली.." तुम्ही आत या ना.. बसून बोलू.."
" प्रीती किती पदार्थ ठेवले आहेस हे. संपतील का?"
"Surprise पदार्थ तर बाकी आहे अजून.."
" अरे वा.. काय आहे?"
" गरमागरम कांदाभजी... सुजय जाताय ना आत..."
" हो...."
" बरं झाले बाई , काही तरी वेगळाच पदार्थ ठेवलास.. भजी तर आवडते.. पण बाहेरची नको वाटते खायला.. आणि स्वतःच्या हातचे खायचा पण कंटाळा आला होता.."
या गप्पा ऐकतच सुजय आत गेला..
" मी काय करायचे आहे?" सुजयने मावशींना विचारले..
" जास्त काही नाही.. फक्त मला उभे कांदे चिरून द्यायचे.."
" बस..एवढच.. हात्तिच्या मी किती घाबरलो होतो.. आणा कांदे इथे..."
मावशींनी दोन किलो कांदे समोर ठेवले..
" हे एवढे??"
" हो एवढेच.. घ्या चिरायला.. मी बाकीची तयारी करते..."
सुजयला वाटले तेवढे काम सोपे नव्हते.. कांद्याचे दोन तुकडे करा, साले काढा.. मग उभे चिरा.. पहिल्या एकदोन कांद्यातच त्याची विकेट पडली..
" भरपूर झाले ना मावशी कांदे चिरून?"
त्या दोन चिरलेल्या कांद्यांकडे बघून मावशी म्हणाल्या," भाऊ, यात दोन तरी भजी होतील का? चिरा जेवढे दिलेत तेवढे, नाहीतर वहिनींना बोलावते.."
मग काय... कांद्यामागून कांदे सुजय चिरत गेला... ते कांदे त्याला रडवत गेले.. आणि प्रत्येक कांदा चिरताना तो आपल्या मित्राला शिव्या घालत होता.. शेवटी एकदाचे त्याचे कांदे चिरून झाले.. कांदे चिरून चिरून बोटं दुखायला लागली होती.. त्याचा बाहेर त्या बायकांमध्ये जायचा मूडही राहिला नाही.. पण प्रीतीची पार्टी काही त्याच्या पार्टीएवढी लांबली नाही.. सातसाडेसातच्या आसपास सगळ्याजणी घरी गेल्य.. मावशी सुद्धा सगळे आवरून गेल्यानंतर प्रीती बेडरूममध्ये आली...
" गेल्यापण सगळ्या एवढ्या लवकर?"
"हो. प्रत्येकीलाच घरी जाऊन स्वयंपाकपाणी करायचे होते.. आणि thank you so much प्रॉमीस पाळल्याबद्दल.."
" प्रीती मनापासून सॉरी.. त्या दिवशी आम्ही तुला आणि मावशींना खूप त्रास दिला.. कळलेच नाही कि साधे कांदे चिरताना पण एवढा त्रास होतो.. कोणतीही साधीशी वाटणारी गोष्ट जेव्हा करायला लागते तेव्हा कळते.. ती सोपी आहे कि अवघड.."
" गुड.. हे तुला कळले आहे.. आता तुझ्या मित्रांना पण कळेल..."
" ते कसे?"
" आता ह्या ज्या त्यांच्या बायका आल्या होत्या, त्यांनी तुला काम करताना पाहिले.. प्रत्येकीने एकेक शनिवार वाटून घेतला आहे.. प्रत्येकजण पार्टी करणार आहे.. मदत यु नो कोणाकडून घेणार..."
" माझी गुणाची बाय ती.." सुजय प्रीतीचे गाल ओढत म्हणाला..
" ती तर मी आहेच.. पण हि गोष्ट सध्यातरी आपल्या मध्येच ठेव.. नाहीतर आपल्याकडे जेवणच ठेवीन." प्रीती हसत म्हणाली..
सुजयने तेव्हा जरी तिला हसत साथ दिली तरी त्यानंतर कोणीही पार्टी हे नाव काढले कि त्याच्य डोळ्यातून पाणी वहायला लागते.. कारण तो अजिबात सांगत नाही...


कथा कशी वाटली ते नक्की सांगा..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all