पार्टी....

नवर्‍यांना अद्दल शिकवण्यासाठी बायकांनी केलेली पार्टी


पार्टी...


" आज सन्डे है , आज सन्डे है तो, तो, दारू पिने का दिन है..." सुयश आपल्या भसाड्या आवाजात गाणे म्हणत होता...
" तुझे काय चालू आहे हे?" प्रीतीने चिडून विचारले..
" आज तू कितीही चिडलीस ना तरी मी तुझे ऐकणार नाही.. कारण.. आज सन्डे है, आज सन्डे है तो दारू पिने का दिन है..."
" सुयश.. पण आज आपण बाहेर फिरायला जाणार होतो ना.." प्रीतीने प्रेमाने विचारले..
" होतो.. पण जाणार नाही.. आताच गोट्याचा फोन आला होता.. आम्ही दुपारी सगळे मित्र भेटणार आहोत.. आणि मग.. आज सन्डे...."
ते गाणे ऐकून वैतागलेल्या प्रीतीने मध्येच त्याला थांबवले आणि आवाजात भरपूर प्रेम ओतत ती म्हणाली..
" वहिनी घरी नाही का? "
" अरे मी तर विचारायलाच विसरलो.. थांब मी फोन करतो.."
" तू कशाला? मीच विचारतेना.."
"नाही.. तू अजिबात नाही.. तू त्यांच्या मनात काय काय भरवतेस.. मग माझे मित्र मला शिव्या घालतात.. आणि तसेही तुला फोन करायचा आहे तर कर.. आम्ही कोणाच्याही घरी भेटणार नाहीच आहोत.. " सुजय प्रीतीला चिडवत म्हणाला..
" पण मग उद्या ऑफिसला तू काय हँगओव्हर घेऊन जाणार?"
" नाही.. मी उद्या लीव्ह टाकणार.. आणि तू ऑफिसला गेलीस कि धुमाकूळ घालणार.."
प्रीतीने यावर काहिही बोलायचे टाळले.. ती शांतपणे स्वयंपाकघरात निघून गेली. ठरल्याप्रमाणे सुयश त्याच्या पार्टीसाठी निघून गेला.. जाताना नवीन शर्ट, भरपूर परफ्यूम मारून गेला.. जातानाही त्याचे प्रीतीला चिडवणे सुरूच होते.. सुयश गेल्यावर प्रीती विचार करत होती.. हळूहळू सुयशचे पिणे वाढत चालले होते.. आधी महिन्यातून कधीतरी एकदा होणारी पार्टी पंधरा दिवसांवर आली.. आणि आता ते आठवड्यावर येऊन ठेपले होते.. मुले आणि तिचे सासूसासरे उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी गावी गेले होते. त्यांना घ्यायला पुढच्या आठवड्यात गावी जायचे होते.. जे करायचे ते लवकरच करायला हवे होते.. प्रीतीने डोक चालवले आणि सुयशच्या सगळ्या मित्रांच्या बायकांना फोन लावला..
रात्री सुयश आला तेच गाणे म्हणत.."लोग कहते हैं के मैं शराबी हूं.." आज तो शेर बनून आला होता.. वाट बघत होता कि कधी प्रीती त्याला काही बोलते आहे आणि तो तिच्याशी मनसोक्त भांडेल.. पण आज उलटेच झाले.. तो आल्यावर प्रीती अजिबात म्हणजे अजिबात चिडली नाही.. उलट आल्या आल्या तिने विचारले,
" तू जेवणार का?"
भांडायला मुद्दा मिळाला म्हणून सुयशला आनंद झाला.. कारण तो बाहेर खाऊन आला होता..
" मला नाही जेवायचे.."
" हो का.. बरं झालं.. माझे जेवण झाले होते.. उरलेले फ्रीजमध्ये ठेवायचे कि नाही हेच कळत नव्हते.. तू झोप हां.."
" तू कुठे चाललीस ?"
" मी आज हॉलमध्ये झोपणार.. त्याचे काय आहे.. आता तू उलट्या करणार त्या वासाने मला मळमळणार.. मला रात्रभर झोप येणार नाही.. आणि मला तर उद्या ऑफिस आहे.. तुझ्यासारखी सुट्टी नाही.. त्यामुळे तू एन्जॉय कर.. मी जाते.."
सुयश पुढे भरपूर काही बोलणार होता.. पण त्याला उलटी व्हायला लागली म्हणून राहून गेले..
दुसर्‍या दिवशी सकाळी सुयश उशीरा उठला.. प्रीती ऑफिसला गेली होती.. आता अख्खं घर त्याचे होते.. सगळा वेळ त्याचा होता.. हवे ते करायला तो मोकळा होता.. त्याने मोबाईल हातात घेतला.. त्याला ऑनलाईन पाहून तिचा मॅसेज आला..
" तू काल रात्री जेवायला न आल्यामुळे उरलेले जेवण फ्रीजमध्ये ठेवले आहे.. ते गरम करून खाऊन घे.. आणि हो मावशी येतीलच.. तुझ्या चहासोबत त्यांचाही चहा ठेव.. आज तुला सुट्टी आहे तर तुला जी आवडते ती भाजी आणून ठेव.. गॅस संपला आहे.. तो बुक कर.. वाण्याची लिस्ट त्याला देऊन ये.. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गावाला ज्या वस्तू न्यायच्या आहेत त्या आणून ठेव.."
कामाची हि लिस्ट पाहून सुयशचे डोकेच फिरले.. आधीच कालचा हँगओव्हर आणि आता हे.. पण उलट बोलायची आता त्याची हिंमत नव्हती. कारण काल प्रीती काही बोलली नाही याचा अर्थ आजही बोलणार नाही असा नव्हता.. पण तरिही हार मानेल तो नवरा कसला.. तो तावातावाने मॅसेज टाईप करायला जाणार तोच परत प्रीतीचा मॅसेज "हो आज संध्याकाळी संध्याच्या घरी नक्की. मी ऑफिसमधून थेट तिथेच येईन.. स्टॉक कोण आणणार आहे?" मॅसेज वाचेपर्यंत तो डिलिटही झाला..
"काय मॅसेज पाठवलास? वाचायच्या आधीच डिलीट झाला?" सुयशने मॅसेज केला.
" वाचला नाहीस ना? हुश्श.. तुझ्यासाठी नव्हताच.. चुकून तुला सेन्ड झाला होता.." प्रीतीचा रिप्लाय.
पण सुयशच्या मनात आता पालीने चुकचुकायला नाही तर गाणे म्हणायला सुरुवात केली होती..
"दो घूंट मुझेभी पिला दे शराबी देख फिर होता है क्या?"
आता काही झाले तरी याचा पत्ता लावायचाच.. सुयशची सगळी दारू त्या एका मॅसेजने उतरली.. त्याने पटापट सगळी कामे उरकली.. इमरजन्सी असेल तर हाताशी असावेत म्हणून प्रीतीने लिहून ठेवलेल्या डायरीतला संध्याचा नंबर शोधून काढला.. त्याच्याखाली लिहिलेला पत्ता वाचल्यावर त्याची पेटली. संध्या म्हणजे गोट्याची बायको.. आपल्या बायकोकडे आपल्या सर्व मित्रांचे, त्यांच्या बायकांचे नंबर, पत्ता आहे.. आणि आपल्याला साधे आपल्या मित्रांच्या बायकांची नावे हि लक्षात राहू नये.. अरे थूत या जिनगानीवर.. पण खंत करायला आता वेळ नव्हता.. त्याला गोट्याला सगळे सांगायचे होते..
" गोट्या, कुठे आहेस? "
" कुठे म्हणजे ऑफिसमध्ये?"
" का तू सुट्टी काढली होती ना?"
" हो रे.. पण काय झाले माहित नाही.. त्या बॉसने बोलावून घेतले.. आता काय ? तू कशाला फोन केलास?"
हँगओव्हर मध्ये काम करणाऱ्या मित्राला हे सांगावे कि नाही असा सुयशला प्रश्न पडला.. पण तरिही त्याने सांगायचे ठरवले..
" तू घरी कधी जाणार?"
" आज काय विचारू नकोस.. दहापर्यंत पोचलो तरी खूप आहे. पण तू का हे सगळे विचारतो आहेस?"
" तुझ्या घरी बायकांची जोरदार पार्टी सुरू आहे.. अजून कोण असेल माहित नाही.. वहिनींचे तेवढे नाव कळले.."
" मी निघतो थांब ऑफिसमधून लवकर.. निघालो कि करतो तुला फोन.. मग बघू या बायका काय करतात ते.." तोपर्यंत गोट्याला बाकीच्या मित्रांचे सुद्धा फोन आले होते. सगळे आता त्याचे काम संपायची वाट पहात होते.. कितीही घाई केली तरी सुद्धा गोट्याला घरी पोचायला नऊ वाजले.. सुयश आणि बाकी सर्वजण त्याची वाट पहातच होते.. सगळे त्याच्या घरी गेले.. दरवाजाबाहेर "मुंगळा, मुंगळा.." जोरजोरात ऐकू येत होते.. गोट्याने स्वतःकडच्या चावीने कुलूप उघडले.. आत गेल्यावर त्यांना बारमध्ये आल्यासारखे वाटले.. गाणी , मंद दिवे, तोच हवाहवासा दारूचा वास.. सगळ्यांनाच परत थोडी घ्यावीशी वाटली. पण नाही.. आता हि वेळ नव्हे त्यांनी स्वतःच्या मनाला आवर घातला.. सुयश प्रीतीला शोधत होता.. ती एका कोपर्‍यात रडत असलेली दिसली..
" प्रीती, ए प्रीती चल घरी.."
" आप कौन भाईसाब.?"
" अग मी सुयश.. मला ओळखले नाहीस का?"
" शराब हर गम भुला देती है भाईसाब."
" बस कर हे.. आणि चल घरी.."
प्रीतीला खूप चढली होती.. "थोडीसी जो पिली है, चोरी तो नहीं कि है.." प्रीती गाणे म्हणत होती.. सुयशचे डोके चढत होते. प्रत्येकजण आपापल्या बायकोला घेऊन निघाले होते.. सुयशने प्रीतीला कारमध्ये बसवले.. तिला आता काय चालले आहे काहीच कळत नव्हते.. तिला सीटबेल्ट बांधेपर्यंत तिने त्याच्या अंगावरच उलटी केली.. तो वास त्याच्या डोक्यात तर गेलाच पण त्याचसोबत गाडी वॉशचा फटकाही बसला.. घरी येऊन प्रीतीला स्वच्छ करून झोपवायला त्याला बारा वाजले.


आता यांच्यानंतर सुयश आणि त्याच्या मित्रमंडळींना कोणी "बसायचे का?" असे जरी विचारले तरी त्यांना मळमळते.. कारण तुम्हाला कळले का?


कथा कशी वाटली नक्की सांगा...

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई..