पोपट हा पक्षी तर सगळ्यांनाच परिचित आहे. काही पक्षी प्रेमी तर पोपटाला पाळतात आणि तोही अगदी त्यांचा घरचा सदस्य होऊन राहत असतो. काही काही ज्योतिषी पोपटाचा वापर भविष्य सांगण्यासाठी करतात. हा पोपटाचा खेळ पाहायला बरीच गर्दी जमलेली असते. पोपट अगदी डौलदार चालीत पिंजऱ्यातून बाहेर येतो आणि एक पत्ता निवडतो त्यानुसार ज्योतिषी भविष्य सांगतो हा खेळ सगळ्यांना आवडतो. अनेकवेळा सर्कशीत देखील पोपटाचे खेळ असतात. तर आज आपण याच पोपटाबद्दल जाणून घेणार आहोत.
पोपट हा सगळीकडे आढळणारा एक पक्षी आहे. इंग्रजीमध्ये पोपटाला parrot असे म्हणतात. राघव, रघु हे त्याचे समानार्थी शब्द आहेत. नर पोपटाला राघू म्हणतात तर मादी पोपटाला मैना असे म्हणतात. पोपटाचे वैज्ञानिक नाव सिटाकुला क्रामेरी असे आहे. सिट्टॅसिडी या पक्षी कुलात जे पक्षी येतात त्या सगळ्यांना "पोपट" असे नाव दिले गेले आहे. या कुलात जवळजवळ ८२ वंश आणि ३१६ जाती समाविष्ट आहेत. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिकेत जेवढ्या पोपटाच्या प्रजाती आहेत तेवढ्या इतर कोठेही नाहीत. पोपट मुख्यतः उष्णकटबंधीय प्रदेशात राहतात परंतु त्यांचा पसार आता समशीतोष्ण आणि थंड प्रदेशातही झाला आहे. पोपटाचा मुख्य रंग हा हिरवा असतो पण ते विविध रंगात देखील आढळतात. त्यांचे रंग वेगळे असले तरी शरीर रचना मात्र सारखीच असते. शरीराची बांधणी ही आटोपशीर व लहान असल्याने पोपट दिसताना स्थूल किंवा गुबगुबीत दिसतात. पोपटाचा उगम ऑस्ट्रेलियन प्रदेशात झाला असे मानत असले तरी साधारण दीड कोटी वर्षापूर्वीचे अवशेष फ्रान्समध्ये सापडले आहेत.
त्यांची लांबी १० सेमी ते १०० सेमी पर्यंत असते. लाल रंगाची चोच बाकदार, आखूड आणि मजबूत असते. त्यांच्या चोचीचा वरचा भाग कवटीला जोडलेला असल्याने त्याची हालचाल कमी असते. त्याच्या या विशिष्ट चोचीच्या रचनेमुळे तो कठीण कवच असलेली फळे देखील सहज खातो. पोपट शक्यतो शाकाहारी पक्षी आहे पण काहीकाही पोपट हे किडे खातात. पोपटाला पेरू, मिरची हे फार आवडते. आपल्या पायाच्या पंजात पेरूची फोड किंवा मिरची धरून तो ती सहजपणे खातो. त्याच्या पायांच्या बोटाची रचना दोन बोटे पुढे व दोन मागे असतात आणि त्यावर खवले असतात अशी असते.
पोपटाचे पंख हे गोलसर आणि मजबूत असतात. पोपट थोड्या अंतरावर वेगाने उडू शकतात पण यांना जास्तवेळ उडता येत नाही. ऑस्ट्रेलिया मधील भूचर पोपट तर उडतच नाहीत. पोपटांमध्ये काही पोपटाची शेपूट ही लांब असते तर काहींची आखूड असते. पोपटाच्या बहुरंगी प्रजाती देखील असतात. बहुतांश पोपटाचे रंग हे गडद असतात. पोपटाच्या विशिष्ट बोटांच्या रचनेमुळे त्यांना सहजपणे एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडता येते.
पोपट हा शक्यतो फळे पंजात धरून त्याच्या साली सोलून आतील गर खातो पण बरेचसे फळ वाया घालवतो. पोपटामुळे बऱ्याच फळबागा, फुले आणि उभ्या पिकांचे नुकसान होते. पिकांची आणि फळ बागांची नासाडी होत असल्याने पोपटाच्या शिकारी करण्यात आल्या होत्या त्यामुळे पोपटाच्या बऱ्याच प्रजाती नामशेष झाल्या आहेत तर काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. एकेकाळी अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाच्या मध्यभागी कॅरोलायना प्रजातीचे भरपूर पोपट दिसायचे परंतु ते विसाव्या शतकातच नामशेष झाले आहेत. मॅस्करीन आणि नजीकच्या बेटांमध्ये तर पोपटाच्या शिकारीमुळे एकही पोपट शिल्लक नाही.
पोपट हा गटात राहणारा पक्षी आहे. सगळ्या पक्ष्यांमध्ये पोपट हे फार गोंधळ करणारे असतात. कधीकधी त्यांचा आवाज कर्णकर्कश वाटू शकतो. काही पोपटाच्या जातींना बोलायला शिकवल्यावर ते माणसासारखे बोलतात. पोपटाचे आयुर्मान हे ३० ते ४० वर्षे आहे. काहीकाही पोपट ८० वर्षे जगल्याचे देखील पाहायला मिळाले आहे.
पोपटाचे निवासस्थान हे नैसर्गिक ढोलीत असते. पोपट कधीही इतर पक्ष्यांप्रमाणे घरटे बांधत नाहीत. ते झाडाच्या ढोलीत, दगडांच्या फटीत किंवा इमारतींच्या भिंतींमध्ये पडलेल्या भेगेला आपले घरटे बनवतात. मादी या ढोल्यांच्या आतल्या बाजूला अंडी घालते. काहीकाही जातींचे पोपट हे वाळवीच्या वारुळात देखील अंडी घालतात. ऑस्ट्रेलियात आढळणारे रानटी बजरिगार जातीचे पोपट मात्र ढोलीच्या आत मात्र गवत टाकून घरटे बनवतात. ऑस्ट्रेलियातील हिरव्या पोपटाची एक जात मात्र प्रजननाच्या वेळी झाडांवर समूहाने घरटी बांधतात आणि एका वस्ती प्रमाणे राहतात.
मादी एकावेळी दोन ते पाच अंडी घालते. कधीकधी आठ अंडी देखील घालते. पोपटाची अंडी आकाराने लहान आणि पांढरी असतात. साधारण तीन आठवड्यांनी अंड्यातून पिल्ले बाहेर येतात. जन्माला आल्यावर ती पिल्ले फक्त मांसाचा गोळा असतात आणि दुबळी असतात. पोपट अर्धवट पचवलेले अन्न काढून पिल्लांना भरवतात.
भारतात पोपटाच्या पाच ते सहा जाती आहेत. यातील तीन जाती सर्वत्र आढळतात तर बाकीच्या काही विशिष्ट प्रदेशात आढळतात.
१. राघू:- या पोपटाचे वैज्ञानिक नाव सिटॅक्युला यूपॅट्रिया असे आहे. हे पोपट थव्यांमध्ये राहतात. पुष्कळ लोक या जातीचे पोपट पाळतात आणि त्याला बोलायला शिकवतात. यांचे निवासस्थान हे घनदाट वृक्ष असते. वरच्या बाजूला गवती हिरवा आणि खलाच्या बाजूला फिकट हिरवा असा याचा रंग असतो. याची चोच लाल रंगाची, आखूड, वाकडी आणि मजबूत असते. त्याच्या मानेवर गुलाबी रंगाचे कडे असते जे पुढच्या बाजूने काळे असते आणि चोचीच्या भागाला चिकटलेला असते. याचा आकार कबुतरा एवढा असतो. याची शेपूट टोकदार व लांब असते. मनुष्यवस्तीमध्ये असणाऱ्या मोठ्या झाडांमध्ये आणि शेतामध्ये हे पोपट वारंवार येत असतात. ते शेतात आल्यावर अन्न खाणे कमी आणि त्याची नासधूसच जास्त करतात. हे सतत आवाज करत असतात. रात्री देखील हे पोपट थव्याने झाडावर गोळा होतात आणि गोंगाट करतच झोपतात. यांचा उडण्याचा वेग जास्त असतो आणि उडताना ते डौलदार दिसतात. यांचा प्रजननाचा काळ डिसेंबर ते एप्रिल असतो.
२. कीर:- कीर या पक्ष्याचे वैज्ञानिक नाव सिटॅक्युला क्रॅमरी असे आहे. हे पोपट मैदानी प्रदेशात व डोंगराळ भागात १५२५ मीटर उंचीवर राहतात. या पोपटाचे नाव त्याच्या आवाजावरून पडले आहे. या प्रकारच्या मादी पोपटावर गुलाबी रंगाचे कडे नसते. हा पोपट शक्यतो झाडांवर राहतो. याचा आकार साळुंकी पेक्षा थोडा मोठा असतो. या पोपटाला राघूचे लहान रूपही म्हणता येईल. हा पोपट गावांत, खेड्यात आणि विरळ जंगलात दिसतो त्यामुळे हा सगळ्यांच्या परिचयाचा आहे. हे पोपट पण शेतात घुसून नासधूस करतात. राघू प्रमाणे हेही कर्कश आवाज करतात. हेही थव्यांमध्ये राहतात आणि रात्री झाडांवर झोपतात. या पोपटांना कसरतीचे खेळ शिकवले तर ते शिकतात. बंदूक उडवणे, मशालीचे वेटोळे फिरवणे हे खेळ तो सहज खेळू शकतो. हे पोपट बोलायला देखील शिकतात. याचा प्रजननाचा काळ फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान असतो.
३. तोता:- या पोपटाचे वैज्ञानिक नाव सिटॅक्युला सायानोसेफाला आहे. हा पोपट मुख्यतः अरण्यात राहतो परंतु तो लागवडी खाली असलेल्या जमिनीवर देखील येतो. हे पोपट हिमालयाच्या १८३० मीटर उंची पर्यंत देखील हे आढळतात. दाट जंगलात यांचे थवे असतात. यांचा आकार साळुंकी एवढा असतो. या पोपटाच्या नराचे डोके निळसर पांढऱ्या रंगाचे असते. याच्या शेपटीचे शेवटचे टोक पांढरे असते आणि मध्ये मध्ये निळी पिसे असतात. त्याच्या हनुवटी पासून निघालेले काळे वलय त्याच्या मानेवर असते. नराच्या खांद्यावर तांबडा डाग असतो. या पोपटाच्या मादीच्या डोक्याचा रंग निळसर करडा असतो. मादीच्या खांद्यावर तांबड्या रंगाचा डाग नसतो. यांच्या मानेवर पिवळ्या रंगाचे कडे असते. यांची चोच शेंदरी रंगाची असते. हे पोपट बिया आणि रानफळे खातात. याचा आवाज "ट्युई ट्युई" असा असतो. इतर पोपटांच्या तुलनेत तो काहीसा मंजुळ असतो. हे पोपट पिंजऱ्यात बाळगले जात नाहीत. यांचा प्रजनन काळ जानेवारी ते मे पर्यंत असतो.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा