Jan 27, 2021
माहितीपूर्ण

परोपकार

Read Later
परोपकार

परोपकार:-

निवांत नदीकिनारा , आजूबाजूला गर्द हिरवळ आणि संध्याकाळची वेळ होती , बाईक रस्त्याच्या कडेला लावून हर्षल आणि निशा हातात हात घेऊन , एकमेकांना खेटून बसले होते. ते निसर्ग सौंदर्य, ती निरव शांतता आणि मनासारखी सोबत आणखी काय हवे. अशावेळी शब्द सुद्धा न उच्चरता खूप काही बोलता येते आणि अशाच काहीशा स्थितीत ते दोघे बसली होती.
" उठावसे वाटतचं नाही रे , असा वाटतंय सगळं थांबून जावं आणि जग इथंच स्थिर व्हावं. नको तो व्याप , नको ते रहाटगाडगे बस हा अंत असला तरी चालेल."
" अहो मॅडम, कवी कल्पनेतून बाहेर पडा. 7 वाजायला आलेत आणि आपल्याला पोहचायला अजून किमान 2 तास लागतील तर उठा आता आणि आवरा." खट्याळ हसत हर्षल म्हणाला. 
गोड अशी थोडी नाराजीनेच का ना असो पण स्माईल देत निशा उठली , कपडे झटकले आणि डोक्याला स्कार्फ बांधून बाईक वर मागे बसली. सेल्फ मारून  त्याने बाईक स्टार्ट केली आणि परतीच्या मार्गाला गाडी रस्त्यावर घेतली . थोड्या गप्पा , थोडे खट्याळ वाद असे करत साधारण 20 मिनिटे ते पुढे आले असतील तोच रस्त्याच्या बाजूला एक आजोबा आणि आजी दिसले. निर्जन रस्त्यावर अश्या अंधारात त्यांना बघून हर्षल ने लगेच बाईक थांबवली. 
" काय झाले आजोबा , असे एकटे दोघे अंधारात कुठे निघालात?" काळजीने आणि आपुलकीने विचारलेले ते शब्द ऐकून रडवेली आजी म्हणाली " माझा ल्योक हाय ना , त्यानं आम्हाला इथं सोडलं न येतू म्हणाला बग आणि आलाच नाय. आता या म्हाताऱ्याच्या बी के लक्ष्यात नाय अन माझ्या बी, काय करावं समजत नाय बग."
हर्षलच्या लक्षात आले की आता तो काही येणार.
यांना मदत कशी करावी याचा विचार करत असतानाच त्याला रुपेश शी झालेले बोलणे आठवले आणि लगेच त्याने त्याला फोन केला. त्याच्याकडून एका NGO चा नंबर घेऊन त्यांना कळवले.
तोपर्यंत त्याने बॅगेतून एक फरसाण आणि शेवेचा पूडा काढला . चुरमुरे होतेच बरोबर. त्यात मिक्स करून त्या दोघांना खायला दिले.
येताना वाटेत बिस्लेरी जी घेतली होती त्यातून त्या दोघांना पाणी प्यायला दिले.
 ते दोघे कृतकृत्य होऊन बघत असतानाच आणि  NGO ची गाडी आली आणि त्या आजी आजोबा ला घेऊन गेली.  जाताना त्याने जवळची 500 ची नोट आजोबांच्या खिशात कोंबली. 1 तास यातच मोडला . 
" तुझं नाव ना हर्षल नको असायला हवे होते . कर्ण शोभला असते , जेव्हा बघा तेव्हा याला मदत करु कधी त्याला करू. नुसता वाहिलेला आहेस लोकांना." वैतागत निशा म्हणाली.
तो नुसताच हसला.
 "चला निघू आता , घरी उशीर होणार आहे आणि मला तर हॉस्टेल वर आज शिक्षाच बघ."
तिचे बोलणे काहीच मनावर न घेता त्याने बाईक स्टार्ट केली आणि आता सुसाट निघाला. पुढल्या तासाभरात तो निशा च्या होस्टेल गेट वर होता. 
निशा गडबडीने उतरून बाय म्हणत धावत हॉस्टेल वर गेली . ५ मिनिटे झाली आणि तिचा मेसेज आला , "all ok" , तसा मग तो निघाला.
घरी पोहचला तर बाजूच्या घरी काहितरी गडबड जाणवली म्हणून गाडी पार्क केली आणि गेला तिथे तर त्याची आई पण तिथेच होती.
"काय झालं आई? " हर्षलने विचारले , तशी आई म्हणाली " अरे काकांना हार्ट अटॅक आलाय . संजीवनी हॉस्पिटलमध्ये नेले आहे , काकू गेल्यात सोबत पण इथे मुलांजवळ कोणी नाही म्हणून मी बसलेय. काय परिस्थिती असेल तिथे कोण जाणे."
तसा लगेच आल्या पावली तो पुन्हा निघाला आणि तडक संजीवनी हॉस्पिटल गाठले. रिसेप्शनला चौकशी केली आणि लगेच ICU जवळ गेला तर काकू दिसल्याच. हर्षल ला बघून त्यांना भरून आले , लगेच त्यांना समजावत बाजूला घेऊन बसला आणि म्हणाला " काकू मी आहे इथे , तुम्ही घरी जा. मंदार आणि सोनी घाबरलेत . इथली काळजी नको मी आहे ना!" 
हो नाही करत त्याने काकूंना मनवले आणि काकू निघाल्या , त्यांना उबेर करून दिली आणि त्याने डॉक्टर ला भेटून परिस्थिती जाणून घेतली.
घाबरण्यासारखे आता काही नव्हते मग लगेच घरी आईला फोन करून सांगितले आणि काकूंची चौकशी केली.  त्यांनाही निरोप द्यायला सांगितले.
कॅन्टीन मध्ये जाऊन थोडेसे खाल्ले , कॉफी घेतली आणि तसाच वेटिंग प्लेस ला तो रात्रभर थांबून राहिला.
सकाळी थोडा फ्रेश होऊन डॉक्टर ची परमिशन घेऊन आत काकांना भेटायला गेला " काय काका कसे वाटते आता?"
"ठीक रे , तू कधी आलास?"
"ते राहू देत हो , अहो जर चेंज हवा होता ना तर फिरायला जायचा प्लॅन करायचा ना हे काय ठिकाण आहे?"हसत मस्करी करत तो बोलत होता आणि काका कुठे तरी रिलॅक्स होत स्माईल देत हातानेच बोलत होते
येताय का आत्ता बरोबर डायरेक्ट घरपोच डिलिव्हरी करेन त्याने हसत विचारले.
काकांनीही हसत त्याला "नाही " म्हणले. 
"येतो नंतर , आराम करा . काळजी आणि विचार ला बाऊंडरी लाइन च्या बाहेर फेका "असे म्हणत त्याने काकांचा हलकेच हात दाबला आणि ICU च्या बाहेर आला तितक्यात फोन वाजला डिस्प्ले वरचे नाव पाहून जीभ चावली आणि हलकेच म्हणाला
" बोल निशा".
"अरे किती वेळ झाला वाट बघतेय , मला म्हणालास सकाळी 7.30 ला येतो आणि 8 वाजलेत बघ."
आता त्याला आठवले कालचे बोलणे पण या हॉस्पिटलच्या गडबडीत तो पार विसरून गेला होता.
" निशा , सॉरी पण मला आता नाही जमणार..अगं मी संजीवनी हॉस्पिटल ला आहे काल रात्रीपासून ,बाजूच्या पाटील काकांना ऍडमिट केलंय. तुझं तिथला आटोप,  मी 11 पर्यंत येतो , तू हो पुढे."
निशा जाम चिडली होती , " तुझ्या या स्वभावाचा न मला वीट आलाय . जेव्हा तेव्हा तुझे दुसऱ्यांना मदत करणे सुरू पण स्वतःचे काय? काही आहे त्याला किंमत ? आपल्याला तुझ्या महत्वाच्या कामासाठी जायचे होते तूच नाही तर मी काय करणार तिथे? तू बस आपल्या लष्कराच्या भाकऱ्या भाजत! कोण तुझ्या 
वेळी मदत करेल न याची वाट बघ. वेळ न येवो पण खरी ओळख तेव्हाच पटेल." रागाने तिने फोन कट केला.
हर्षल गप्प पणे घराकडे आला , काकूंना भेटला त्या हॉस्पिटल मध्ये निघालाच होत्या त्यांना सांगितले सविस्तर आणि स्वतःच्या घरी आला. 
"किती रे तू दगदग करतोस? कायम सगळ्यांसाठी धावायला तू तयार. स्वतःकडे पण बघ ,किती दमला आहेस. हे घे कॉफी सोबत ही खारी बिस्किटे खा आणि जरा आराम कर. रात्रभर बसून होतास काल हॉस्पिटलमध्ये."  आई म्हणाली.  पण स्वतःचा त्रास कधी दाखवायचा नाही या स्वभावातला तो हसत " मला काय धाड भरतेय , अग मी 24 वर्षांचा आहे तुझ्यासारखा 50 चा नाही " असे म्हणत आईला चिडवत तो वर त्याच्या रूम मध्ये गेला.
 "आयला, खरच आखडल्यासारखं वाटतंय रे " असे मनाशी बडबडत बाथरूम मध्ये गेला मस्त गरम पाण्याने अंघोळ केली आणि बाहेर येऊन बेड वर रिलॅक्स झाला.
थकलेल्या त्याला गाढ झोप लागली.
" अरे हर्षल , चल उठ , 1 वाजलाय जेऊन घे आणि पुन्हा झोप हवं तर "या वाक्यांने त्याने डोळे उघडले. आपण कुठे आहोत हे क्षणभर कळले नाही पण मग आई समोर दिसली तसा भानावर आला.
"काय म्हणालीस? 1 वाजला ?" लगेच मोबाईल चेक केला तर फक्त मेसेज होता " रिलॅक्स झालास की कॉल कर" निशा.
जरा हायसे वाटले , खाली जाऊन जेवायला बसला , ताटात भेंडीची भाजी , वालाचे बिरडे आणि कांदा भजी बघून एकदम खुष होऊन " वाह मम्मा क्या बात है " म्हणत आवडीने पोटभर जेवला.
" हर्षल चांगला PG झालास , नोकरी पण चांगली मिळाली होती तर मधेच जॉब सोडून दिलास. काय खूळ तर म्हणे मला काहीतरी वेगळे करायचे , अरे पण नक्की काय ? कधी विचार केला आहेस का? आणि असेल तर कधीतरी बोल ते सुद्धा. आम्हाला काळजी वाटते , बाबा तिथे देशाबाहेर.  तुझे असे तंत्र मी मात्र कायम काळजीत. लोकांना मदत करणे हे चांगले पण अरे कधीतरी माझा पण विचार कर. सतत आपले NGO , तर मित्र , कधी शेजारी पाजारी ." आई बोलत होती.
" जरा वेळ दे , रात्री बोलू " म्हणत तो रूम मध्ये गेला. बेड वर जरा स्थिर बसून  नकळत विचार करू लागला.
" मी जेव्हा 11 वि मध्ये होतो तेव्हा माझा अक्सीडेंट झाला , आईची मदत कोणी केली नाही . तीच बिचारी धडपडत सगळे करत होती , बाबा त्या वेळी सुध्दा देशात नव्हते . काय हाल झाले बिचारीचे अजूनही आठवते मला. अस कोणाला त्रास होऊ नये याचीच काळजी मी घेतो , त्यात काय वेगळे. मदत लोकांना वाटत असेल पण मी मात्र प्रामाणिक पणे जे करावेसे वाटते तेच करतोय. असो , आई म्हणते ते ही आहेच , निदान कल्पना दिली तिला माझ्या प्लॅन ची तर ती जरा कमी काळजी करेल." विचारांच्या गुंतात असतानाच मोबाईल वाजला, पलीकडून 
"हर्षल , अरे मनीष बोलतोय मी ".
"अरे हा कुठला नंबर?" 
"अरे ऐक ना नंतर सांगतो सगळे , आधी सांग तुझ्याकडे 15000 असतील का ? मला खूप अर्जेन्ट हवेत. मी करेन तुला परत लवकर."
मनीष तुझ्याकडे 'फोन पे' आहे का?"
"हो आहे " 
लगेच हर्षल ने ट्रान्सफर केले आणि स्वतःच फोन करून " अरे मिळाले का?" फक्त "हो , कॉल करेन" म्हणून कॉल कट झाला.
आई बघते आहे हे त्याच्या ध्यानीच नाही , लक्ष गेले तास थोडा ओशाळला.
" आता कोणाला पैसे दिलेस , अरे माझेच  चुकले.  तुझं नाव कर्ण ठेवायला हवे होते.
अरे सांग तरी ."
" मनीष ला " 
आता मात्र आई चिडली
 "अरे आधीचे तरी परत केले का त्याने? दरवेळी पैसे हवे असले की कॉल करतो आणि एरवी कधी विचारतो का?"
काहीही न बोलता हर्षल ने तयारी केली आणि येतो म्हणत घराबाहेर पडला , एक मेसेज केला आणि हॉस्टेल च्या दिशेने निघाला.
निशा वाटच बघत होती , त्याचा विचारी चेहरा बघून " काय झाला हर्षल ? तू हसत छान दिसतोस ".
गाडी एका कॉफी शॉप ला पार्क करत त्याने मनीष बद्दल आणि आई काय म्हणाली ते सर्व सांगितले.
" हर्षल , त्यांचे काही चुकत नाहीय. तुझी काळजी वाटणारच , अरे जगात खूप चांगले असून चालत नाही . लोक गैरफायदा घेतात , तूच आठव. मनीषचा लास्ट कॉल कधी आला होता. मदत त्याच्यावर करावे ज्याला जाणीव असते . लक्षात ठेव आई नाही पण लोक मूर्ख समजणार नाही याची काळजी घे.
मैत्री , नातं सगळं चांगलं रे पण थोडं व्यवहार ज्ञान पण आवश्यक आहे.
मदत करु नको असे नाही पण खरंच गरज आले त्याला कर , तुझे सोशल असणे वाईट नाही पण मर्यादा हवी त्याला." निशा  समजावत होती त्याला. 
थोडा वेळ सोबत घालवून तो घरी आला.
आई पुस्तक वाचत होती. तिच्या हातातील पुस्तक ओढून घेऊन हसला फक्त.  
" बोल काय आहे विशेष , नाही माझी आठवण आली आणि यावेळी घरात म्हणजे नक्कीच काही तरी काम आहे ."
" कशी ग माझी आई मनकवडी "
असे म्हणत  ती हसला.
"हां, पुरे बोल आता"
" आई, मी एक NGO जॉईन केली आहे. तिथे काम खूप आहे आणि त्याचे रिटर्न्स पण असतील. मला आता अनुभव हवाय , तुला माहीत आहे की मी मशिन सारखे जगू शकणार नाही. मला सतत काहीतरी वेगळे हवे , ज्यात समाधान , आनंद असावा.बाबांचा व्यवसाय आहे तो पुढे नेईल पण माझा स्वतःच म्हणशील तर मला स्वतःची NGO स्थापन करायची ,उद्या त्याचे कार्य वाढले की आणखी ही काही करता येईल. एखादे हॉस्पिटल ला पण कनेक्ट करता येईल , पुढल्या वर्षी निशाचे MBBS पूर्ण होईल मग तसा पण त्या दिशेने विचार करता येईल . स्वप्न तर आहे , मला तुला हसताना बघायचंय , पैसे महत्त्वाचे आहेत गं, पण  मला त्या लोकांसाठी काही करायला आवडेल ज्यांना खरच गरज असेल , त्यांच्यासाठी नाही की जे देखाव्याला भुलतात आणि स्टेटस मानतात."
हे सगळं ऐकताना आई जणू स्थिर मुर्ती झाली. आपल्या मुलाचे विचार ऐकून खूप अभिमान वाटला जो त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
"हर्षल ,मी आहे तुझ्या सोबत कायम. माझा आशीर्वाद आहे की तुझी सगळी स्वप्न लवकर पूर्ण होतील, आणि म्हणतात ना 'कर भला सो हो भला' तसे तू दुसऱ्यांचे कर माझा देव तुझे करेल असा मला पूर्ण विश्वास आहे. फक्त एक लक्षात ठेव , चांगलेपणाला जोड थोडी हुषारीची दे , खूप काम कर पण सोबत तशी निवड!  असे लोक काही कामाचे नाहीत जे फक्त तोंडावर गोड बोलतील आणि फिरलास की नाव ठेवतील."
"हो नक्की आई , आता यापुढे मी मनीष ला पैसे देणार नाही" खोडकर हसत आईला टोमणा मारला . त्या पण हर्षल च्या हसण्यात सामील झाल्या , आता त्या निवांत होत्या . त्या ने मार्ग सांगितलं होता , त्यावर त्याला चालू देण्याचे बळ देण्याची जवाबदारी घेऊन त्या अभिमानाने  उठल्या आणि त्याच्या डोक्यावर हात ठेऊन कॉफी बनवायला स्वंयपाकघराकडे निघाल्या.
आणि हर्शल कामाला लागला. ठरवल्या प्रमाणे त्याने NGO स्थापन केले केवळ दुसऱ्यांना मदत करायचे ह्या उद्देशाने. 
त्याच्या NGO ची ख्याती खूप लवकर सर्वदूर पसरली. निशा पण MBBS झाली आणि तिने NGO मार्फत अनेक लोकांना मोफत उपचार द्यायला सुरुवात केली. 
आणि 2 दिवसांपूर्वी त्याच्या या NGO ला सर्वोत्तम कामगिरी साठी राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला होता.
पुढच्या महिन्यात दिल्ली ला राष्ट्रपतींच्या हस्ते त्याला हा खास पुरस्कार प्रदान होणार होता.
बाबा सुद्धा आता VRS घेऊन भारतात च परतले होते आणि आई बरोबर निवांत क्षण उपभोगत होते.
बाबांच्या दृष्टीने आता ते दोघे ही खऱ्या अर्थाने रिटायर झाले होते.
राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाल्यावर अनेक मित्र, मैत्रीण, नातेवाईक यांचे फोन आणि शुभेच्छा हर्षल ला येत होत्या. 
लहानपणापासून मनावरती बिंबलेल्या मदत करणे या स्वभावाला आता मोठे स्वरूप प्राप्त झाले होते.
आज एका छोटेखानी समारंभाला काही मोजक्या लोकांना आई- बाबांनी बोलावले होते. 
निशा आणि हर्षल साठी एक 'फुल्ल टू सरप्राईज' असलेल्या या समारंभात बाबांनी त्यांच्या या कामाचे खूप कौतुक केले.
आई ला पण आज काही बोलायचे होते. ती म्हणाली, "माझ्या मुलाचा हा मदत करण्याचा स्वभाव पाहून मी खूप वैतागायचे पण ज्या दिवशी त्याने मला त्याची NGO ची संकल्पना सांगितली
 तेव्हा पासून माझा राग हा अभिमानात बदलला. 
देव, काही लोकांना खास कार्यासाठी या पृथ्वीवर पाठवतो असे म्हणतात.
माझ्या हर्षल ला पाहून मला वाटते की त्याला या जन्मात 'परोपकार' करण्यासाठी देवाने पाठवले आहे"
आईच्या या वाक्याने तिथे सगळ्यांनी जोरदारपणे टाळ्या आणि शिट्ट्या वाजवल्या.
आई बाबांच्या या समारंभामुळे हर्षल एकदमच वेगळी अनुभूती करत होता.
सगळ्यांना जेवण्याचा आग्रह करत तो एकदम हलक्या झालेल्या मनाने निशा सोबत गॅलरीत येऊन उभा राहिला.
आज आकाश लक्ख चमचमत होते. आकाशातील चांदणे जणू त्याच्या विचारांना साथ देत चमकत होते आणि पुढच्या यशासाठी खुणावत होते.
जणू परोपकार न समजता जे कार्य करायला तो निघाला होता त्यात त्याला भरभरून आशीर्वादच देत होते.
©®अमित मेढेकर

Circle Image

Amit Medhekar

Professional

I have completed my MS in psychotherapy and counseling and work mainly in REBT and CBT. I basically work on people's mind. Simple Living and High thinking is my motto!