परक्याचे धन.. अंतिम भाग

कथा एका लेकीची


परक्याचे धन.. भाग ३


मागील भागात आपण पाहिले की समिधा चित्राला घरापासून तोडण्यात बर्‍यापैकी यशस्वी होते. आता बघू पुढे काय होते ते.


"बाबा, मग जयेश यायच्या आधी मलाच काही बोलायचे आहे." चित्रा ठामपणे बोलली.

" बोल.. खरंतर हे मी आधीच बोलायला हवे होते. पण म्हणतात ना बेटर लेट दॅन नेव्हर. तू कर सुरुवात."

" आई .. मला माहित आहे की मी इथे आलेलं तुला आवडत नाही. पण मला थोडा वेळ दे ग. वयाची पंचवीस वर्ष काढली आहेत मी इथे तुमच्या सगळ्यांसोबत. अचानक तुम्हाला वाटेल मी परक्याचे धन आहे. मग तुम्ही तसे वागू शकता. पण मी? कसं ग जमेल मला अशी लगेच आपली प्रेमाची माणसे तोडायला?"

" अग पण मी कधी असं म्हटलं?" सुधाताई बोलू लागल्या.

" आई, प्रत्येक गोष्ट बोलून दाखवायची गरज नसते. काही गोष्टी वागण्यातून समजतात. वहिनीचे लग्न झाल्यापासून मी बघते आहे. तुझे वागणे बदललेले. ती तुझी सून आहे. तुला नंतर तिच्यासोबत रहायचे आहे, सगळे मान्य. पण मी तुझ्याच पोटचा गोळा आहे ना ग? मग तुला तरिही कसं वाटू शकते मी परक्याचे धन आहे म्हणून? वहिनी तसं वागत होती कारण तिला माझ्यापासून असुरक्षित वाटत होते, तुझे काय ग? मला दुखावताना एकदाही तुला काहीच वाटले नाही का?"

" ताई, अग असं काही नसेल." प्रियांश आईची बाजू घेऊन बोलायला आला.

" हो? आज घरी पाहुणे आले होते तुझे लग्न ठरवायला, तरिही तुला लाडक्या बहिणीला सांगावेसे वाटले नाही? तुझे लग्न ठरले तर मला दुःख होईल का? पण तुला साधा फोन करून सांगावेसेही वाटले नाही. तुम्हा प्रत्येकाच्या अडीअडचणीला मी काय जयेश काय नेहमीच उभे असतो पण तुमच्या आयुष्यात तुम्हालाच आम्हाला समाविष्ट करून घ्यायचे नसते."

" हे असंच बोलायचे, वेळ आल्यावर हिस्सा मागायचा." समिधा बोललीच.

" वहिनी, तू बोलतेस हे? तू जेव्हा तुझ्या माहेरी हिस्सा मागत होतीस तेव्हा मीच तुला काय गरज आहे असं सांगत होते. मग हा विचार मी करीन असं वाटलं तरी का तुला? खरंतर मला तुझ्यासोबत खूप छान नाते हवं होतं ग.. पण तू तर माझं माहेरचं संपवायला निघालीस. दोष तुला देऊ तरी कशी? इथे माझ्याच आईला माझी काही पडली नव्हती."

" चित्रा शांत हो.. माझं खरंच चुकलं. मी आधीच या प्रकरणात बोलायला हवं होते. मी विचार केला की घरातल्या गोष्टींमध्ये का बोलायचे म्हणून मी शांत राहिलो. या चिमुरड्या पियुला जे कळले ते ही मला समजले नाही याचाच पश्चाताप होतो आहे मला." सुधाकरराव अपराधी स्वरात बोलत होते.

" पियुने?"

" हो.. पियुने. जेव्हा तिने विचारले तेव्हा माझे डोळे उघडले. छोटी मुले लक्ष देतात पण मोठे दुर्लक्ष करतात. याचेच उदाहरण. मला खरंच माफ कर चित्रा."

" बाबा तुम्ही माफी का मागताय? जिथे माणसांची मने साफ नसतात तिथे माफीने काही फरक पडतो का?"

"चित्रा, माफीने फरक पडत नाही. पण बोलल्याने नक्कीच पडतो. माझे चुकले. मी तुझा नेहमीच हेवा केला. त्या नादात मी तुझे किती नुकसान करते आहे. हे मला समजलेच नाही." समिधा बोलत होती.

" वहिनी, जे नुकसान व्हायचे ते होऊन गेलेच आहे. आता सध्या तरी यावर काहीच न बोलणे योग्य आहे. काळ जेव्हा या जख्मा भरून काढेल तेव्हाच खरं. निघते मी. तुम्ही लागा लग्नाच्या तयारीला."

" न चिडता येशील ना मदतीला?" सुधाताईंनी विचारले.

" मदतीला नाही येणार कारण वहिनी आहेच तुझ्या मदतीला. हो पण बाकी सगळीकडे येईन.. हक्क म्हणून नाही तर फक्त कर्तव्य म्हणून." चित्रा डोळे पुसत म्हणाली.बर्‍याचदा मुलींचे लग्न झाले की त्यांना परक्यासारखे वागवले जाते. कधी चुकून तर कधी जाणूनबुजून. प्रत्येक लेक ही हिश्शयासाठी हपापलेली नसते. तिला हवी असतात माहेरची मायेची माणसे. त्या बदल्यात तिच्या नशिबी येते ही परकी झाल्याची जाणीव. आत्या ही बर्‍याच घरातला दुर्लक्षित घटक असतो. त्या आत्याची , घरच्या लेकीची व्यथा मांडण्याचा हा प्रयत्न. कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all