परक्याचे धन.. भाग २

कथा एका लेकीची


परक्याचे धन.. भाग २


मागील भागात आपण पाहिले की समिधा तिच्या नणंदेला घरापासून दूर करायचा प्रयत्न करत असते. बघू आता पुढे काय होते ते.


" हॅपी बर्थडे... पियु आणि अर्णव." चित्राच्या लग्नानंतरच्या मुलांच्या पहिल्याच वाढदिवसाला चित्रा मुलांसाठी खूप सार्‍या भेटवस्तू घेऊन आली होती. मुले आत्याला बघूनच खुश झाली होती.

" अय्या चित्रा आलीस का तू? खरंतर आम्ही यावेळेस मुलांचा वाढदिवस अगदी घरातल्या घरात करायचे ठरवले होते." समिधा बोलली. ते ऐकून चित्राचा चेहरा उतरला.

" हो.. पण तो घरातल्या घरातला वाढदिवस तुझ्याशिवाय पूर्ण कसा होणार?" शैलेश चित्राला हसवायचा प्रयत्न करत बोलला. चित्राने कसनुसं हसायचा प्रयत्न केला पण जयेशला तिची परिस्थिती समजली.

" आम्हाला जरा बाहेर जायचे आहे. आम्ही फक्त मुलांना भेटायला आलो होतो. निघालो तर चालेल ना वहिनी?" जयेशने समिधाला विचारले.

" आता बाहेर जायचे आहे म्हणताय तर मी काय बोलू?" समिधाच्या चेहर्‍यावर समाधानाचे हास्य होते. मुले नाराज झाली तरिही चित्रा तिथून निघाली. हे आणि असे अनेक प्रसंग येत गेले की चित्राला जाणिव करुन दिली जायची की हे घर आता तिचे राहिले नाही. ती काही बोलायची नाही पण हळूहळू तिने माहेरी येणे कमी केले होते. इतकेच काय बाळंतपणालाही ती येणे टाळत होती. पण सुधाकररावांचा आग्रह ती मोडू शकली नाही. सुधाकरराव , शैलेश तिला बोलवायचे, पण आईच्या आणि समिधाच्या वागण्यामुळे मी येणे टाळते आहे हे त्यांना सांगावेसे तिला वाटायचे नाही. सुधाताईंचा जीव आधी खालीवर व्हायचा पण आता त्यांनाही त्याची सवय झाली होती. समिधाच्या मनासारखे होऊ लागले होते. समिधाच्या डोळ्यासमोरून सगळे प्रसंग गेले. सगळे सुरळीत सुरू असताना आता पियुने गोंधळ घातला होता. प्रियांश तसाही बाहेरगावी राहणार होता. त्याच्या बायकोचे म्हणून समिधाला टेन्शन नव्हते. उद्याचा कार्यक्रम पार पाडला की पियुशी बोलायचे असे तिने मनाशी ठरवले आणि ती कामाला लागली. सुधाताईंच्या मनाला मात्र पियुचे शब्द टोचत राहिले.

दुसर्‍या दिवशी पाहुणे आले. समिधाने सगळी व्यवस्था करून ठेवली होती. पियु नंतर शांत झाली म्हणून तिनेही परत विषय काढला नाही. मुलीकडचे बसले होते. तसेही फोटो बघून पसंती झालीच होती. पुढे लग्नाची बोलणी सुरू होणार तोच बेल वाजली. कोणाला उठू न देता पियु पटकन दरवाजा उघडायला धावली.

" काय ग पियु, असं काय ते तुझे वागणे? याच वेळेस ये म्हणून हट्ट करायचा? थांब आईला सांगते." चित्राचा लाडिक तक्रार करणारा आवाज ऐकू आला. चित्राला बघून समिधाच्या कपाळावर आठी पडली. चित्राने आतले पाहुणे बघितले. काय चालू असावे याचा तिला अंदाज आला. आपल्या घरातल्यांवर मान खाली घालायची वेळ येऊ नये म्हणून ती पटकन बोलली.

" आई, अग खालीच होते. खूप तहान लागली म्हणून वर आले. पाणी पिऊन पटकन निघते. घरी मुलं वाट बघत असतील."

" त्या निमित्ताने आलीस तरी. मी फोन करून जिजूंना सांगतो.. ही माझी लाडकी चित्राताई.." प्रियांश चित्राची ओळख करून देत म्हणाला.

" हो.. अगदी लाडाची.." अवघडलेलं वातावरण हलकं करायचा चित्राने प्रयत्न केला. पण सतत तिचे डोळे भरून येत होते. हेच का ते ठिकाण, जिथे आपलं सगळं बालपण गेलं. तिथेच का एवढं परक्यासारखं वाटावं. तिला उमजत नव्हतं. डोळ्यात कचरा गेल्याचे सांगून ती आईच्या खोलीत जाऊन थांबली. तिथे तिने आसवांना मोकळी वाट करून दिली. रडणे थांबल्यावर तोंड धुवून ती बाहेर गेली. पाहुणेही निघत होते. ते जाताच चित्राही उठली. पियु, अर्णवला बाय करून निघाली.

" चित्रा जायची घाई करू नकोस. मला बोलायचे आहे तुझ्याशी." सुधाकरराव बोलले.

" बाबा, घरी मुलं वाट बघत असतील." चित्राने आवाजात कोरडेपणा आणायचा प्रयत्न केला.

" मी जयेशला फोन केला आहे. तो मुलांना घेऊन इथेच येतोय. बस तू ही."


काय बोलायचे असेल सुधाकररावांना? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all