परक्याचे धन

कथा एका लेकीची


परक्याचे धन..


"आई तुला मी आवडत नाही का ग?" पियुने समीधाला विचारले.

" असं का ग विचारतेस? तू तर लाडोबा आहेस माझी?" सुमेधाने तिला प्रेमाने जवळ घेतले.

" तू आणि आजीच काल बोलत होता ना, की आत्तू आता त्यांची सून आहे. तिला कशाला प्रत्येक वेळेस बोलवायचे? मग उद्या माझे लग्न झाल्यावर तू माझ्याशी पण अशीच वागणार का?" दहा वर्षांच्या पियूने निरागसपणे विचारले. तिचा प्रश्न ऐकून काहीतरी विचारायला आलेल्या सुधाताई जागीच थबकल्या आणि सुमेधाकडे बघत राहिल्या.

सुधाताई आणि सुधाकरराव यांना तीन मुले. मोठा शैलेश, त्याची बायको समिधा, मुले पियु आणि अर्णव. मधली लेक चित्रा.. पियु आणि अर्णव हे दोघेही जुळे तिच्याकडेच वाढलेले, त्यामुळे तिचा लळा जास्त असलेले. चित्राच्या लग्नानंतर सुद्धा तिच्याकडेच ओढा असलेले. सुधाताईंचा धाकटा लेक प्रियांश. सध्या त्याच्याच लग्नाची बोलणी सुरू होती. मुलीकडचे घर बघायला येणार होते. सुधाताई आणि समिधाचे छान जुळायचे. त्यामुळेच आदल्या रात्री काय करायचे याची चर्चा सुरू होती. सुधाकररावांनी चित्राला बोलवूया असे म्हटल्यावर दोघींनी मिळून चित्राला आता काही नको सांगायला असे सांगितले. तेच बोलणे नेमके पियुने ऐकले. आता त्यावर काय उत्तर द्यावे हे मात्र समिधाला समजेना.

" अग आत्तूला घरी कामं असतात ना, आत्तूला सतत त्रास नको म्हणून आता बोलवायला नको असं म्हटलं मी." समिधा सावरून घेत म्हणाली.

" अर्णव आजारी होता. तो आत्तू आत्तू रडत होता तेव्हा आत्तू कामं सोडून आली होतीच ना.. आमच्या वाढदिवसाच्या वेळेस बाळ लहान होते तेव्हा तर ती स्वतः केक बनवून घेऊन आली होती. तेव्हा नाही का तिला त्रास झाला?" पियुचे प्रश्न संपत नव्हते. तिच्या प्रश्नांनी सुधाताई बेचैन झाल्या. त्यांच्या नकळत त्यांचा आवाज वाढला.

" पियु, आईने सांगितले ना एकदा. समजत नाही का? जा अर्णवसोबत जाऊन खेळ."

" आजी तू पण पार्शलिटी करतेस. माझ्याशी ओरडून बोलतेस आणि अर्णवशी गोड.. माझं बरोबर होते, तुला आणि आईला मी आणि आत्तू आवडतच नाही. मी जाते आत्तूकडे. मला नाही रहायचे इथे." पियु रडत तिथून निघाली. समिधा तिच्यापाठी जाईपर्यंत ती तिथून गेली होती. समिधा स्वतःशीच विचार करत बसली. काय ठरवले होते काय झाले.
चित्रा तिची धाकटी नणंद. दोन भावांची बहिण म्हणून लाडकी. बोलघेवडी आणि दिसायलाही सुंदर त्यामुळे घरातल्यांचे पानही तिच्याशिवाय हलायचे नाही. ज्याला त्याला जिथे तिथे चित्राच हवी असायची. नवीन लग्न झालेल्या समिधाला हे जड जात होते. इतकेच काय तिच्या लग्नातही फोटोग्राफर नवरीचे फोटो काढायचे सोडून चित्राच्या पाठी होता. समिधाला हळूहळू चित्राचा राग येऊ लागला होता. पण घरातले तिचे स्थान पाहता समिधाला काहीच बोलणे किंवा करणे अशक्य होते. मग तिने हळूहळू सुधाताईंना आपल्या बाजूला करून घेतले. मुलगी काय आज माहेरी उद्या सासरी हे माहित असलेल्या सुधाताईंचा कलही हळूहळू समिधाच्या बाजूने झुकू लागला. समिधा काही पावले उचलणार इतक्यात तिला दिवस गेले. तिच्या गरोदरपणात, बाळंतपणात चित्राची मदत होईल म्हणून तिने तेव्हा बोलणे टाळले होते. तिचे बाळंतपण झाले. सव्वा महिना माहेरी राहून समिधा सासरी आली. तेव्हाही एका बाजूला कॉलेजचा अभ्यास आणि दुसरीकडे ही जुळी मुले सांभाळायला समिधाला मदत अशी दुहेरी कसरत चित्रा करत होती. मुले समिधापेक्षा चित्राकडेच जास्त रमायला लागली तसा तिने मग तिच्या लग्नासाठी लकडा लावला. चित्राला जवळचेच स्थळ चालून आले. त्यामुळे लग्न झाल्यावरही चित्राचे माहेरी येणे जाणे सुरूच राहिले. हे कमी करण्यासाठी म्हणून आता समिधाने चित्राला घरच्या कार्यक्रमातून वगळायला सुरुवात केली होती.चित्राला समिधाचे हे वागणे समजत असेल का? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all