परकाया  भाग ५७

in this part jay ask vasu about anything left untold about vasu and natasha

परकाया  भाग ५७

क्रमश: भाग ५६

 जय ने वीरू ला कॉल केला .. इथली सगळी परिस्थिती त्याने वीरू ला  पण सांगितले

वीरू " यार जय .. काय झाले आपल्या वसू ला ?"

जय " बघ ना .. वीरू .. मी थकलोय आता .. खूप काही गोष्टी घडत आहेत .. प्रतेय्क रात्र काहीतरी घडत असते .. रात्री तिच्या वर पहारा ठेवावा लागतोय .. रात्री ती अचानक घरातून बाहेर जाते .. काहीपण करते .. खूप लक्ष ठेवावे लागतेय .. आणि आता तब्बेत खालावू लागलीय तिची .. "

वीरू " जय .. मी येतो तिकडे ? तो आपल्या इकडचा  मांत्रिक आहे त्याला घेऊन येऊ का ?"

जय " चालेल ना .. वसू ला ह्या सगळ्यातून मुक्त करण्यासाठी मी आता काहीही करायला तयार आहे .. "

वीरू " ठीक आहे .. मी त्याला घेऊन येतो .. तो काय म्हणतोय  ते तुला सांगतो .. "

जय " वीरू .. घरी सध्या कोणाला सांगू नकोस .. नंदू ची डिलिव्हरी होऊन जाऊदे .. मग मी सांगेन "

वीरू " वेडा झालास का ? इतके दिवस नाही .. आपल्याला वसू ला जितक्या  लवकर बाहेर काढता येईल तेवढे लवकर मोकळे करायला पाहिजे "

जय " हो रे पण आता घरात कळले तर घरात प्रॉब्लेम होईल "

वीरू " ठीक आहे.. मी संध्याकाळी तुला फोन करतो  "

जय आपली माणसे जमवू लागला होता .. त्याने वसू च्या कॉलेज मध्ये जाऊन प्रिंसिपल मॅडम ला सांगितले " कि वसू ची तब्बेत सध्या ठीक नहिये तर सारख्या सुट्ट्या होण्या पेक्षा ती सध्या घरी राहून Phd ला ऍडमिशन घेईल .. phd झाली कि नोकरी करेल परत . त्याही म्हणाल्या कि ठीक आहे त्या केव्हाही जॉईन करू शकतात ..

जय ने ऑफीस मध्ये स्पेशल परमीशन मिळवून त्याचे वर्क फ्रॉम होम करून घेतले .. टीम चा सपोर्ट घेतला ..

जय ने राघव ला पण विश्वासात घेतले .. राघव चा अभ्यास जोरात सुरु होता .. यातून वसू ला बाहेर काढण्यासाठी तो मोठं मोठे धार्मिक ग्रंथ वाचत  होता .. नोट्स काढत होता  .. काही मंत्र लिहत  होता ..

जय - "राघव , तुझ्या गुरूं चा काही कॉन्टक्ट होतोय का ते बघ ना " आपल्याला मदत होईल त्यांची "

राघव " हो मी त्यांना मेल पाठवलाय .. ते कॉन्टॅक्ट करतील आपल्याला "

पुन्हा पुन्हा  मिळालेल्या माहिती वर विचार करत होते .. रिचा ची आई भेटणे हि एक महत्वाची गोष्ट घडली होती ..  राजीव , जॉन , अरमान   यांना भेटून रिचा बरोबर नक्की काय झाले याचे रहस्य उलगडणार  होते . लवकरात लवकर .. रिचा ला मुक्ती मिळवून देऊन वसुला तिच्या पासून मुक्ती देणे गरजेचे होते .. हे वाटतंय तितके सोप्पे नव्हते . वसू च्या जीवाला धोका होता .

अजून अरमान ..कोण आहे ? आणि तिचा आणि नताशा , रिचा चा काय संबंध आहे? नक्की काय घडलेय ? कोणी घडवलंय ? नताशा कुठे आहे ? असे  बरेच प्रश्न अनुत्तरित होते .. रिचा ने वसू च निवडली असावी

राघव " जय वसू ची पत्रिका बघायला मिळेल का ?"

जय " माझ्याकडे नाहीये .. मी मागवतो पण "

राघव " मागवू नकोस .. मी तयार  करतो  मला फक्त जन्म वेळ . तारीख  आणि प्लेस सांग .. बाकीचं मी बघतो "

जय ने त्याला हवे असलेले सगळे डिटेल्स राघव ला दिले "

राघव पण phd चे काम आहे म्हणून २ महिन्याच्या सुट्टीवर गेला म्हणजे त्यालाही पूर्ण वेळ काम  करता येईल

एक आठवड्यातच जय ने त्याने त्याची टीम तयार केली

जय ला वीरू चा कॉल आला

 वीरू " जय , मी इथल्या मांत्रिकाला भेटलो तर तो म्हणतोय कि तिलाच इकडे आणा .. त्याच्या इथे मंदिरात तो तिचे भूत उतरवेल "

जय " अरे .. पण मी गावी आलो कि अख्या गावभर चर्चा होईल ना मग "

वीरू " ते आपण बघू ना .. तू काय कर इकडे ट्रिप ला आलाय असे दाखवायचे .. आणि मग आपण त्याच्या मंदिरात जाऊ "

जय " अरे खूप रिस्क आहे त्यात "

वीरू " हो पण आता हा मांत्रिक चांगला आहे .. आपण करून बघायला काय हरकत आहे ?"

जय " ठीक आहे .. आई , आप्पा , आणि नंदू पासून लपले पाहिजे रे .. आणि पंकज .. त्याचे काय ? तो कसा रिऍक्ट होईल काय समजत नाहीये मला "

वीरू " एक काम कर .. तू पंकज ला फोन करून याची आयडिया दे .. झाली तर त्याची पण आपल्याला मदतच होईल "

जय " अरे वीरू .. पंकज ची मला जाम  भीती वाटते रे .. त्याने नंदू ला सांगितले तर .. या अवस्थेत नंदू ला काही धक्का नको बसायला "

वीरू " बरं .. ठीक आहे .. ते पण नंतर बघू .. सिचवेशन नुसार ठरवू "

जय " ठीक आहे .. मग मी राहुल , समीरा , वसू , राघव ..तिकडे येतो .. कधी येतोय ते तुला कळवतो "

वीरू " अरे कधी काय कधी .. ? तो म्हणाला अमावास्येला रात्री आपण मंदिरात पाहिजे .. "

जय " वीरू .. वसू ला काही होणार नाही ना ... मला जाम  भीती वाटते रे "

वीरू " चांगला विचार कर जय .. आपण हरून चालणार नाही .. "

जय " जमले तर रिचा शर्मा च्या आईला आणि भावाला पण आणू का ?"

वीरू " हो चालेल आण .."

जय " ठीक आहे .. मी तुला प्लॅन ठरला कि सांगतो”

 संध्याकाळी राहुल आणि समीरा घरी येणार होते . वसू  संध्याकाळच्या जेवणाची तयारी करत होती . जय ने मुद्दामून राघव ला पण घरी बोलावले होते .. त्यांना वीरू ने बोललेला प्लॅन सांगायचं होता .. अजून पुढे काय करता येईल हे ठरवायचे होते ..

वसू " जय. आपण सिक्युरिटी गेट कडून नताशा च्या फ्लॅट चावी घ्यायची का ? कारण आता मला नताशा ची पण काळजी वाटायला लागलीय .. तिच्या सोबत पण काही चुकीचे घडत नसेल ना "

जय " तेच तर ना ? एकतर या सगळ्यात तीच सहभागी आहे किंवा ती सुद्धा कोणत्या तरी प्रॉब्लेम मध्ये आहे ?"

वसू " त्या दिवशी तिला माझ्या शी गप्पा मारायच्या होत्या तर मी तिला सांगितले आपण नंतर बोलू ते ती नंतर आलीच नाही रे "

जय " वसू .. तू नीट आठव अजून काही सांगायचे राहिले नाही ना .. तुझ्या आणि  नताशा मध्ये असं कि जे घडलेय पण तुझ्याकडून सांगायचे राहिलेय .. काही असेल तर सांगशील कारण तुमच्या दोघीं मध्ये झालेला प्रत्येक संवाद अतिशय महत्वाचा आहे "

वसू " तसे तर मी सगळे सांगितलय .. अजून काही आठवले तर सांगेन तुला "

जय " कुछ तो मिसिंग है .. रिचा नावाच्या मुलीने तुझे शरीर पकडण्यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे ? असे काहीतरी जे कि दोघीं मध्ये कॉमन आहे त्यामुळे तिला तू आवडलीस .. किंवा तुझ्यातच तिला इंटरेस्ट वाटला .. "

हे ऐकल्यावर वसू च्या चेहऱ्यावरचे हावभाव थोडे बदलले .. जराशी घाबरली ती .. तिला माहितेय कि काहीतरी एक गोष्ट तिने जय पासून पण लपवून ठेवलीय .. आणि हे जय ने पटकन हेरले सुद्धा .

जय " वसू .. बोलना .. काय असे घडले होते कि तू मला सांगितले नाहीयेस "

वसू उठून किचन मध्ये निघाली " मला काम आहे किचन मध्ये .. इतके जण येणार आहेत मला वेळ नाहीये गप्पा मारायला "

जय ने तिचा हात पकडला " झालेय तेवढे बस झाले बाकीचे मी ऑर्डर करतो .. हे जाणून घेणे मला जास्त महत्वाचे आहे "

वसू " तू चीडशील माझ्यावर ..  तो चक्क वेडेपणा होता .. आता मला तसे अजिबात वाटतं नाही "

जय " काय बोलतेय तू ? मला काही समजत नाहीये "

वसू " सकाळी चहा घेऊन गेल्या नंतर पुन्हा रात्री ती आली तेव्हा मी खूप दुःखात होते .. तुझ्या आठवणीने माझा जीव नुसता कासावीस होत होता .. त्यात तू समीरा बरोबर बंगलोर ला गेलास म्हटल्यावर मला का कुणास ठाऊक खूप अस्वस्थता येत होती .. सारखा तुमच्या दोघांचा विचार मनात येत होता . आता तुम्ही काय करत असाल .. आता तू तिची चप्पल आणि पर्स उचलून घेतली असशील , आता तुम्ही दोघे जेवत असाल .. सॉरी पण एक क्षण असे वाटले किती आता तुम्ही दोघे .. शी मला आता सांगायला पण लाज वाटतेय .. पण म्हणतात ना एमटी माईंड इज डेविल्स होम.. तसे झाले होते ..

 दुसरे मन मला खूप कोसत होते .. जय आणि समीरा दोघे एकमेकांचे आहेत .. काय होतंय त्यांनी एकमेकांना पाहिजे ते दिले तर .. मी तर खुश होयला पाहिजे .. मी दोघांची मैत्रीण आहे .. जय माझ्या साठी काय काय करतोय .. समीरा ने तर मी त्याच्याशी केलेले लग्न सुद्धा मान्य करून नाते टिकवले .. किती विश्वास आहे दोघांचा माझ्यावर आणि मी .. दोघांच्या खुशीवर जळतेय .. मला कशाचे दुःख होतेय .. या अशा द्विधा मनस्थितीत आणि एका वेगळ्याच स्टेट ऑफ माईंड मध्ये मी होते .. तेवढ्यात बेल वाजली .. बाहेर नताशा होती .. फुल ड्रिंक घेऊन आली होती .. मी तिला खूप वेळ घरी जायला सांगत होते ती जाईच  ना .. शेवटी मी दार लावून घेतले तर ती बाहेरच थांबली .. मी इथेच झोपते .. मला ते हि  पाहवेना .. शेवटी मी तिला घरात घेतले .. आम्ही दोघी सोफ्यावर बसलो होतो बराच वेळ .. ती तिची एकटीच बडबड करत होती .. कोणीतरी अरमान नावाचा तिचा बॉयफ्रेंड आहे तो तिला चिट करतोय असे तिला वाटत होते .. त्यामुळे ती खूप दुखी होती .. अल्मोस्ट माझ्या खान्द्यावर डोके ठेवून रडत होती .. तिच्या त्या गोंधळात माझे अश्रू डोळ्यातच राहिले .. तिला मी एक कप कॉफी केली आणि तिला बेड वर झोपून दिले .. मी खाली चटई वर झोपले ..

थोड्या वेळाने मला जाग आली तर हि आपल्या गॅलरीत टेबल वर उभी राहून आत्महत्या करणार होती .. त्या दिवशी तू जसे मला वाचवलेस ना तशीच मी तिला वाचवली ..  तिला एक कानाखाली मारली .. तिला म्हटले तुला मरायचंच आहे ना तर तुझ्या घरी जाऊन मर .. माझ्या  घरातून कशाला असले उदयोग करतेस

तेव्हा ती खूप रडली .. मला म्हणाली .. माझे अरमान वर खूप प्रेम आहे .. मला त्याच्या शिवाय जगणे असह्य होतंय .. कितीही ड्रिंक्स घेतले तरी त्याची आठवण जात नाही .. मला यातून बाहेर पडायचंय .. मला तुझ्या सारखा संसार करायचाय .. तर पटकन मी म्हटले माझा हि संसार एकतर्फीच आहे .. माझा नवरा माझा मित्र आहे नवरा नाहीये .. पण त्याचे माझ्यावर मैत्रीण म्हणून खूप प्रेम आहे .. मी पण तुझ्या सारखा दोन वेळा जीव देण्याचा प्रयत्न केला .. त्यानेच मला वाचवले .. आणि आता माझ्या कडून वचन घेतलेय त्याने कि मी मरणाच्या गोष्टी करणार नाही .. केवळ त्याला वचन दिलंय म्हणून मी हे एकाकी जीवन जगतेय.. .. तिने मला घट्ट मिठी मारली ..म्हणाली म्हणजे साल्या आपण दोघी एकाच नाव मध्ये प्रवास करत आहोत

मग ती मला म्हणाली " तू एक चान्स दे तुझ्या नवऱ्याला .. मी एक चान्स देते माझ्या बॉयफ्रेंड ला .. जर त्यांनी ऐकले तर ठीक नाहीतर आपण दोघी ह्या दोघांना मुक्त करून टाकू .. तू माझ्या बरोबर चल .. मी तुला माझ्या मम्मा कडे नेईन .. तू मी आणि माझी मम्मा आपण तिघी एकत्र राहू .. माझी मम्मा  या जगातली स्ट्रॉंग वूमन आहे .. माझ्या डॅड   नि तिला जेव्हा मी ५ वर्षांची आणि माझा भाऊ ३ वर्षांचा होता तेव्हाच सोडली .. माझ्या मम्माने आम्हा दोघांना शिकवले , वाढवले ..  आणि  मी बॅड गर्ल सारखी तिला एकटीला सोडून इकडे आलीय .. खरं सांगू का तुला बघून असे वाटतंय कि मी जी पहिली होते ना तशीच चांगली होते .. तुझ्या कडे बघून मला माझी मी आठवते .. तर आपण दोघी माझ्या मम्मा कडे जाऊ काय ?"त्यावर  मी तिला म्हटले त्याची काही गरज पडणार नाही .. मी आता लग्न करणार आहे .. माझा नवरा माझ्या साठी चांगला नवरा बघतोय .. तर ती हसायला लागली .. म्हणाली साला .. तुला कोणाच्या तरी गळ्यात बांधून हा मोकळा होईल मग .. तर मी तिला ओरडले .. एकही वाकडा शब्द मी त्याच्या बद्दल ऐकून घेणार नाही .. पुन्हा असे काही बोललीस तर माझा हात आणि तुझा गाल असेल  .. तर ती मला म्हणाली " तू ना एकदम साधी आहेस .. या इथे तुझ्या भावनांची कोणालाच कदर नाहीये .. मी तुला ओळखलीय .. तुझे डोळे मला खूप आवडतात .. असे वाटत त्यांच्याकडे बघतच बसावं .. आणि ती झोपून गेली ..

🎭 Series Post

View all