परकाया  भाग ३

In this part inauguration of the hospital done by Jay

परकाया  भाग ३

क्रमश: भाग २

वीरू बाईक घेऊन आला . तर वीरू एकदम खटाखट तयार होता . झगझगीत झब्बा आणि खाली चुणी वाली पॅन्ट .. फेटा आणि डोक्यावर टीका लावला कि लगेच एखाद्य लग्नाला जावा असाच तयार होईल असा आला

जय " काय रे वीरू , आपल्याला दवाखान्यात  जायचंय .. नाकी लग्नाला .. हे कसले कपडे घालून आलास "

वीरू " अरे .. हल्ली मी गावात असेच कपडे घालून फिरतो .. पुढल्या वर्षी पंचायतीच्या इलेक्टशन ला उभा राहणार आहे ना "

जय " अरे पण .."

वीरू " पण बिन काही नाही .. तू पण ते शर्ट काढ आणि हा झब्बा घाल "

जय " नो वेज !.. मी आहे तसेच येणार .. जीन्स आणि व्हाईट शर्ट .. "

वीरू " बरं .. ठीक आहे "

बोल बोलता दोघे घरातून बाहेर निघाले .. वीरू ला आता शूज घालून कंटाळा आला होता .. तो चप्पल शोधत होता .. तर पडद्या मागून ती मोरपिशी रंगाचा ड्रेस घातलेली मुलगी पटकन धावत पुढे आली .. त्याच्या चपला तिकडे ठेवून गेली पण .. जय ला पुन्हा तिचा चेहरा दिसलाच नाही इतक्या पटकन हे सगळं घडले होते .. कोण हि मुलगी .. जी कि मी चप्पल शोधतोय ह्यकडे लक्ष ठेवून मला चप्पल देऊन गेली यावर विचार करत होता ..

वीरू " अरे चल ना .. मध्येच कुठे विचारत जातोस काय माहित ?"

जय " वीरू .. ती मुलगी कोण होती रे ?"

वीरू " तुला कोण मुलगी सकाळ  पासून दिसतेय काय माहिती .. काय भुताटकी लागली का रे तुला " आणि हसायला लागला "

जय " अरे ती बघ .. तिने ड्रेस घातलाय ..  अशी इथून पळत गेली .. मला माझी चप्पल काढून दिली "

वीरू " अरे यार .. पकऊ नकोस .. चल .. लवकर "

गाडी वर बसता बसता ..

जय " थांब  एक मिनिट .. मी  माझे वॉलेट बॅगेतच विसरलोय .. पटकन घेऊन आलो "

वीरू " अरे .. हम हैंना । तू कायको टेन्शन लेता है ।"

दोघे  एका ठिकाणी गेले .. तिकडे एक मोठे हॉस्पिटल होते .. त्या हॉस्पिटल चे नाव होते " मातोश्री " आणि हॉस्पिटल ला डेकोरेशन केलेले . एखादे पूजा वगैरे आत मध्ये असावी अशी ..

जय " अरे .. आपल्या गावात कधी एवढे मोठे हॉस्पिटल बांधले रे "

वीरू " बस काय भावा .. तू शहरात गेलास .. पण इकडच्या लोकांनी काय करायचे .. तुझ्या बाबांनी खूप प्रयत्न करून हे हॉस्पिटल उभे केले आहे .. आणि आज बघ "

जय " आज त्यांनाच तिथे ऍडमिट करावे लागलेय .. चल आता लवकर मला बाबांना कधी भेटतोय असे झालेय "

जय वीरू साठी पण थांबला नाही आणि झपाझप पाऊले टाकून तो हॉस्पिटल च्या दिशेने जाऊ लागला . वीरू गाडी पार्क करून आलाच त्याच्या मागे . जय आतमध्ये गेला आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले . एक माणूस पुढे आला आणि त्याने जय आणि वीरू ला फेटे बांधले .. एक मुलगी पुढे आली तिच्या हातात आरतीचे ताट होते . ती मुलगी बहुदा तीच असावी कारण तिचा ड्रेस तर तसाच होता . पण तिचा चेहरा तिने तिच्या ओढणीने झाकला होता .. त्यामुळे चेहरा नीट दिसत नव्हता . जय कुतूहलाने त्या मुलीचा चेहरा बघण्याचा प्रयन्त करत होता पण ती मुलगी मोठया शिताफीने तिचा चेहरा त्याच्या पासून लपवत होती . त्या मुलीने एक बाईच्या हातात आरतीचे ताट दिले आणि त्या बाईने जय आणि वीरू ला ओवाळले .. आणि तिथल्या लोकांनी जय आणि वीरूला आतमध्ये नेले .

आत मध्ये एक मोठा असेम्ब्ली हॉल होता .. हॉल तुडुंब गावातल्या लोकांमुळे भरला होता . पुढे १० /१२ खुर्च्या होत्या .. जय आणि वीरूला त्या खुर्च्यांवर बसायला सांगितले .

जय " अरे हे काय आहे ? मला काही कळतच नाहीये ? बाबा कुठे आहेत ? हे  लोक आपल्याला इथे का बसवत आहेत ?"

वीरू "हा .. मी का .. येऊ का ? असे उगाचच म्हणून तिथून पसार झाला .. "

एवढ्या गावातल्या लोकं समोर मी एकटा खुर्चीत बसोलोय .. काय चाललेय हे त्याला कळे ना? बाबांना फोन करावा तर तो मोबाइल सुद्धा कसा काय तो घरी विसरला होता .. मधेच ती मोरपिशी रंगाच्या ड्रेस वाली सुंदरी त्याला दिसत होती .. ती खरोखरच तिथे आहे का ? मलाच एकट्याला दिसतेय असेही आता त्याला वाटू लागले होते ..

तेवढ्यात जय चे बाबा "आप्पा " आले .. अप्पांनी मस्त फेटा बांधला होता .. पिळदार शरीर यष्टी , त्यावर वरती कोट आणि खाली पॅन्टऐवजी पांढरे  धोतर.. पायात चामड्याच्या   चपला  ते जसे चालतील तसे कर... कर.. असा आवाज येत होता ..

जय ला बघून त्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर  झाले आणि जय ला पण त्यांना बघून आनंदाश्रूच आले .. अप्पांना काही झाले नाही हे बघून जय खुप  खुश झाला आणि धावत जाऊन अप्पांच्या पायाला हात लावून नमस्कार केला त्याने "

आप्पा , जय ,वीरू, दवाखान्याचे मुख्य डॉक्टर , एक दोन परिचारिका असे त्या खुर्च्यामध्ये बसले .

जय ने पुढे प्रेक्षकांमध्ये बघितले तर  आई , नंदिनी , आत्या , अत्याचा मुलगा पंकज असे सगळे बसले होते .

तेव्हा त्याला कळले कि आज ह्या हॉस्पिटल चे उदघाटन आहे  . आणि हे बांधण्यासाठी आप्पानी खूप मेहनत घेतलीय आणि त्याने दर महिन्याला त्यांना पाठवलेल्या पैशातून मोठा निधी उपलब्ध झालाय .. आणि त्यामुळेच आज गावात इतके मोठे हॉस्पिटल बांधले गेले आहे

तितक्यात तिथल्या अनाउंसर ने घोषित केले कि अप्पांचा मुलगा जय च्या हातून रिबीन कापायचे काम करायचे आहे आणि जय कडून आपल्याला एक वचन हवे आहे कि त्यांनी यापुढेही असेच नवीन गोष्टी गावात आणण्यासाठी मदत करावी ..

जय नको नकोच म्हणत होता पण अप्पांच्या पुढे आणि इतक्या लोकांच्या पुढे त्याला काहीच करता आले नाही .. तो जेव्हा रिबीन कापत होता तेव्हा मोरपिशी रंगाचा ड्रेस वाली मुलगी मात्र पुन्हा ओझरती त्याला दिसली .. ह्या वेळी त्याला तिचा पुसटसा चेहरा त्याला दिसला होता .. हि जी कोणी आहे ती खूपच नाकी डोळी कोणीतरी खूपच सुंदर आहे हे मात्र नक्कीच त्याला कळले होते .

वीरू " काय रे ? कुठे हरवलास ? आता असे बोलू नको हा कि तुला ती मुलगी इथे पण दिसली म्हणून .. नाहीतर मला तुला गावच्या मांत्रिक कडे न्यावे लागेल . तो शोधून काढेल कोण मुलगी तुला दिसतेय ते " आणि जोरात हसू लागला ..

जय मनातून खरा कावरा बावरा झाला होता .. मनात म्हणत होता " च्यायला .. खरच मला भूत बाधा झाली कि काय ?"

आप्पा मोठ्या दिमाखात गावात जय ची ओळख करून देत होते .. आणि जय आपला मान खाली घालून नमस्कार करत होता .. मग कोणी आशिर्वाद म्हणून त्याच्या पाठीत एक रट्ट्या देत होते .. कोणी त्याचे जेल लावलेले केस विस्कटून पुढे जात होते .. कोणी कोणी तर चेहऱ्यवरून हात फिरवून त्याची त्याच हाताने दृष्ट काढत होते .. जय सगळे निमुटपणे सहन करत होता ..

आप्पा " जय बघितलेस .. इतक्या लोकांचे आशीर्वाद आज तुझ्या मागे आहेत "

जय " आप्पा .. खरंतर मी काहीच केलेलं नाहीये .. जे केलेत ते तुम्ही केलेत "

आप्पा " नाही कसे .. तू मला पाठवलेला सगळा  पैसा मी या कामाला वापरलाय .. हा तेवढा पुरेसा नव्हता पण  ७५ % पैसा हा तुझाच आहे .. "

जय " पैसे देणे सोप्पे आहे हो .. पण इथे प्रत्यक्षात दोन मजली इमारत हॉस्पिटल म्हणून उभी राहणे काही सोप्पे नाहीये "

अप्पा " अरे .. पैसे असला कि सगळे होते .. असो .. "

जय " आप्पा .. तुम्ही खोटं बोलून का बोलावून घेतलंत मला ? मी किती घाबरलो होतो .. हातातले काम टाकून लगेच निघालो "

आप्पा " अरे ते तुझ्या मित्राला विचार .. मी त्याला म्हटलो .. तुझ्या मित्राला बोलावं . "

वीरू " बस काय आप्पा ? तुम्हला पण माहितेय उदघाटन ह्याच्या हस्ते करायचेय म्हटल्यावर हा आला असता का ? तुम्हीच सांगा ?"

आप्पा " नसताच आला "

वीरू " म्हणून जराश्या टेपा लावल्या त्याला .. कसा एका रात्रीत हजर झाला कि नाही बघा ?" आणि गडगंज हसू लागला  आणि त्याला साथ आप्पांनी  पण दिली .

जय " ठीक आहे .. मग मी उद्याच सकाळी निघून जाईन .. आप्पा मी आता घरी जातो .. जरा आराम करतो .. मग आपण बोलू ?"

आप्पा " हो चालेल .. मला पण तुझ्याशी महत्वाच बोलायचे आहे "

जय " ठीक आहे .. दुपारी बोलू निवांत .. मी पुढे जातो .. मला झोप येतेय "

आप्पा " जा .. जा .. आराम कर .. जा रे वीरू ह्याला सोडून ये .. परत ये काय .. इकडे गरज आहे तुझी ?"

वीरू " हो आलोच ह्याला सोडतो आणि येतो लगेच "

बाबांची तब्बेत बरी आहे हे बघून जय ला खूप आंनद झाला होता आणि तो आज वेळात वेळ काढून समीरा बद्दल आप्पांना  सांगून टाकणार होता .. तो मनातल्या मनात त्याचा विचार करत होता .. दुपारी जास्त वेळ न घालवता सांगून टाकून अप्पांची परमिशन घेऊन टाकावी .. मग काय झट मंगनी पट ब्याह चे मनात मांडे खातच तो घरी आला आणि त्याच्या रूम मध्ये जाऊन झोपला ..

कदाचित ४ तास तो गाढ झोपला असेल . काल दिवस भराचा कार्यक्रम ,लगेच रात्रीचा प्रवास आणि सकाळचा हॉस्पिटलचा उद्घाटनाचा प्रोग्रँम यात तो खूप दमला  होता .. तो जेवायला सुद्धा उठला नव्हता . आता जाग आली तर तर पोटात खड्डा पडलाय अशी भूक लागली होती . फ्रेश होऊन बाहेर आला तर बाहेर सगळे गप्पा मारत  बसले होते .. आत्या , अत्याचा मुलगा पंकज  सगळेच बसले होते ..

आई " अरे तू उठलास ? झाली का झोप ?"

जय " हो .. झाली .. आई भूक लागलीय .. मला जेवायला देना "

आई " हो रे .. बाळा .. तू चल बस तर आत मध्ये "

जय  आता मध्ये गेला

आईने सगळं स्वयंपाक त्याच्या आवडीचा बनवला होता . जय " अरे वाह पुरी .. बटाटयाची भाजी .. सही .. उम्म्म.. करत लहान मुलांसारखा पोट  भरून जेवला .

जय " काय कसली चर्चा चाललीय एवढी .. सगळे सिरिअसली गप्पा मारत आहेत "

आई " अरे .. आता काय सांगू .. पंकज   आणि आपल्या नंदिनी च्या लग्नाचं ठरवत आहेत "

जय " काय ? इतक्यात .. अजून किती लहान आहे ती ?"

आई " लहान कसली ? आता पुढल्या वर्षी काय ते ग्रॅज्युएशन होईल .. त्याच्या याआधी लग्न नको का ?"

जय " अग .. थोडे शिक्षण झाल्यावर तिला नोकरी वगैरे करायची असेल तर करू देत ना .. लगेच काय लग्नात अडकवता तिला " जय मनात म्हणत होता .. च्यायला माझ्या लग्नाचे बघा कि मी आता घोडा होत चाललोय )

आई " अरे पण तिचे लग्न झाल्या शिवाय तुझे लग्न पण करता येत नाही ना ? मग तुझे वय वाढत जातेय "

जय " हो ना .. म्हणजे .. मला काही घाई नाहीये .. मी काय अजून दोन वर्षांनी पण करेन ग "

आई " नाही ना .. पंकज  म्हणतोय आधी वसू चे  करू मग माझे करू "

जय "  वसु .. मग तिचा काय प्रॉब्लेम आहे .. ती तर दिसायला पण सुदर असेल ना .. म्हणजे लहान पणी तरी व्यवस्थितच दिसत होती "

आई " अरे दिसते पण सुंदर आणि अगदी गुणांची पोर आहे हो आपली वसू .. पण स्थळ काही चांगले येत नाहीये "

जय " मग ? आता "

आई " आता आधी आपल्याला वसू साठी नवरा शोधावा लागेल ना .. मग दोघांचे एकाच  मंडपात लग्न लावू "

जय मनात " दोघांचे नाही तिघांचे लावूं " माझे आणि समीरा चे पण लावू "

🎭 Series Post

View all