परिस्थिती

A story of a girl Pooja who against his father's wish married to a boy Prathmesh from a poor family. They were invited for dinner where her father compared Prathmesh with her elder sister's husband Sadanand, who was a rich man. Both Pooja and Prathme

पूजा व प्रथमेश यांना पुजाच्या घरी आमरस खाण्यासाठी बोलावलं होतं. प्रथमेशची जाण्याची इच्छा नव्हती. त्याला माहित होतं त्याच्या गरीब परिस्थितीची त्याला जाणीव करवून दिली जाणार होती. पण पुजाने हट्ट धरल्यामुळे तो कसाबसा तयार झाला. पुजाचं माहेर व सासर एकाच गावात होतं.

ते त्यांच्या स्कुटीवर तेथे जाऊन पोहोचले. प्रथमेशने बघितलं तिथे एक लक्सरी गाडी उभी होती. त्याला कळलं की रुपाली व सदानंद पण आलेले आहेत. रुपाली ही पुजाची मोठी बहीण व सदानंद हे तिचे पती. सदानंद एका मोठ्या आय. टी कंपनी मध्ये कामाला होता. तसेच त्याचे बाबाही चांगल्या पदावर होते. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बळकट होती.

ते दोघे आत गेले. प्रथमेशला बघताच पुजाच्या बाबांच्या चेहऱ्यावरील हास्य मावळलं. पुजाच्या आईने त्या दोघांचं स्वागत केलं. नेहमीप्रमाणे पुजाच्या वडिलांनी प्रथमेशला टाळण्याचा प्रयत्न केला. जास्त सदानंदशीच बोलू लागले.

ते म्हणाले, "अरे तुझ्या लक्सरी कारबद्दल सांग जरा मला."

सदानंद त्यांना सांगू लागला. प्रथमेशचा अंदाज खरा ठरला होता. त्याला माहीतच होतं की हे होणारच. पुजाचे वडील अजूनही त्याच्यावर नाराजच होते.

पुजाच्या वडिलांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. मोठ्या मुलीप्रमाणे आपल्या लहान मुलीचं पण लग्न एका श्रीमंत घरी करण्याचा त्यांचा बेत होता. पण पुजाचे प्रथमेशवर प्रेम जडले होते. त्यांचे पहिल्याच भेटीत झालेले भांडण कसे एवढ्या घट्ट प्रेमात बदलून गेले हे त्या दोघांनाही कळलं नव्हतं. पूजा ही घरची लाडकी होती. तसंच तिने स्वतः च काही बरं वाईट करून घेऊ नये, ही भीतीही होती. त्यांनी तिला खूप समजावलं पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही. शेवटी त्यांना लाडक्या मुलीच्या हट्टापुढे नमावं लागलं.

इकडे किचनमध्ये पुजाची आई पुजाकडे एकटक बघू लागली. किती फरक होता तिच्या आणि रुपालीच्या साडीमध्ये! पुजाने साधीशीच साडी नेसलेली होती. तिच्या आईचा चेहरा थोडा गंभीर झाला. तसंच तिच्या अंगावर एक दागिना सुद्धा नव्हता. बांगड्या पण साध्याच होत्या आणि दुसरीकडे रुपाली. शेवटी आईचं मन तिचं ; पण तश्या परिस्थितीतही ती दुःखी वाटत नव्हती. रुपाली व पुजाचे दागिने, साडी जरी वेगवेगळे असले तरी त्यांच्या गालावरील हास्याची लकेर मात्र समान होती. दोघीही खुश होत्या. ते बघून तिला समाधान वाटलं.

नंतर सगळे जेवायला बसले. पुजाच्या आईला खूप बरं वाटत होतं. दोन्ही मुलींची लग्नं झाल्यानंतर त्यांचं घर सुन्न भासत होतं. त्यांना नेहमी एकटं-एकटं वाटायचं. पण आज सर्वांना सोबत बघून त्यांना आनंद झाला होता.

जेवता-जेवता पुजाचे वडील म्हणाले, "अरे सदानंद तू नवीन फ्लॅट बुक केला ना. आम्हाला घेऊन चल बघण्यासाठी."

सदानंद म्हणाला, "हो नक्की. या आठवड्यात काम पूर्ण होईल फ्लॅट चं. मंग जाऊ आपण."

प्रथमेश गंभीर झाला होता. तो खाली बघू लागला. पूजाला ते जाणवलं.

ती विचार करू लागली, "का आलो आपण? प्रथमेश नाही म्हणत होता तरी मी का हट्ट केला. बाबांना पण हाच विषय मिळाला होता का? खरंच ते अजूनही नाराजच आहेत. एवढा काय द्वेष करायचा? उगाच आलो आपण."

तिला वाटत होतं की उठून जावं लगेच. नेहमी तिचे वडील त्यांच्यासमोर जाणूनबुजून असं बोलायचे. तिच्या आईने विषय बदलला. रुपालीने पण मदत केली त्यांचं लक्ष दुसरीकडे नेण्याची.

संध्याकाळ झाली होती. अंधार पडू लागला होता. त्यामुळे त्यांनी निघायचं ठरवलं. पुजाचे आईबाबा पण बाहेर आले. प्रथमेश ने स्कुटी चालू करण्याचा प्रयत्न केला ; पण ती चालू होत नव्हती. तो अजूनच दुःखी झाला. तो वारंवार प्रयत्न करू लागला.

तेवढ्यात रुपाली म्हणाली, " जाऊद्या सुरु होत नसेल तर. आम्ही सोडतो तुम्हाला. "

प्रथमेश म्हणाला, "उद्या ऑफिस ला जायचं आहे. त्यामुळे दुरुस्तच करावं लागेल. त्यामुळे वाईट वाटून घेऊ नका तुम्ही. पूजा तू जा त्यांच्याबरोबर."

रुपाली म्हणाली, "हो पूजा, चल."

तिने नकार दिला. ती प्रथमेश सोबत चालू लागली. आपली पत्नी कोणत्याही परिस्थितीत आपल्याबरोबर आहे व खुश आहे, हे बघून प्रथमेशची सर्व नाराजी, दुःख व राग क्षणात उडून गेला. त्याने एक क्षण पुजाकडे बघितलं. दोघांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं होतं.

परिस्थितीसमोर हात टेकायचे नसतात तर परिस्थितीचा सामना करायचा असतो हे तिच्या वडिलांकडून तर शिकली होती. त्यांची परिस्थिती पण सुरुवातीला वाईट होती. पण तिची आई नेहमी त्यांच्यासोबत होती. तिला तिच्या आईसारखंच बनायचं होतं.

इकडे तिच्या वडिलांना तिने त्यांच्या मर्जीविरुद्ध एका सर्वसाधारण कुटुंबातील मुलाशी लग्न केल्याचा राग पण होता आणि ती खुश असल्याचा आनंद पण होता. आईलाही बरं वाटलं. त्यांनी त्या परिस्थितीला तोंड दिलं होतं. त्यांची मुलगी सुद्धा देत होती. तिचीही परिस्थिती बदलेल अशी त्यांच्या मनात आशा होती.

आवडल्यास share नक्की करा.

©Akash Gadhave