परिसस्पर्श. भाग -१

वाचा मनूची प्रेरणादायी कथा.
परिसस्पर्श.
भाग -एक.

"निशूबाबा, हे घ्या. भरकन दूध पिऊन घ्या."

"उम्म.. नको ना मला शकूकाकू. दूध अजिबात आवडत नाही मला." लहानगा निशांत नाक मुरडत म्हणाला.

"असं कुठं असतं बाबा? दुध नाही पिणार तर मोठे कसे होणार?"

"मम्मा तर मला म्हणते की अभ्यास केला की मी खुप मोठा होईन. तू म्हणतेस की दुध पिलं की मोठा होणार? कोण खरं बोलतोय तूच सांग?"

"निशू बाबा , मॅडम म्हणतात ते अगदी बरोब्बर आहे. शिक्षणानं माणूस मोठा होतो. पण ते मोठेपण पेलवायला ताकद हवी की नाही?दुध पिल्यानं शक्ती मिळते आपल्याला." शकू त्याला प्रेमाने समजावत होती.

तिचं ऐकून निशू गटागटा दुध प्याला त्याला कधी काही आवडलं नसलं तरी शकूने समजावले की लगेच तो ऐकायचा. शलाका, त्याची मम्मा नेहमी म्हणायची, माझ्यापेक्षा शकू निशूच्या जास्त जवळ आहे.

… शकू आणि निशूचा हा संवाद पायरीवर बसून खेळता खेळता ती ऐकत होती.

"खरंच दुध पिल्यानं शक्ती येत असेल का? मग मला का कधीच दुध देत नाही?" तिच्या छोटुसा चेहरा मनात आलेल्या त्या प्रश्नानं आणखीनच आक्रंदला.

स्कूलबसच्या हॉर्नने शकूने हातातली कामं बाजूला सारून निशूला आवाज दिला.

"निशू बाबा, बस आलीय. चला लवकर." एका हातात त्याची बॅग आणि दुसऱ्या हातानं त्याचं बोट पकडून तिने त्याला बसमध्ये बसवले आणि मग परत येऊन उरलेल्या कामाला लागली.

पायऱ्यावरती खेळून कंटाळलेली ती टेबलापाशी आली. तळाशी दोन चार घोट दुध उरलेला निशूचा उष्टा ग्लास अजूनही तिथेच होता. त्या ग्लासकडे आशाळभूतपणे ती नजर रोखून उभी होती.

"मनू.. काय बघतेस? दे तो ग्लास इकडे. विसळून ठेवते."

शकूच्या आवाजाने तिने तो ग्लास उचलून तिला दिला. त्यातील दुध सिंकमध्ये ओतून शकू धुवायला लागली. तिची नजर मात्र अजूनही त्या ग्लासकडेच.

"मनू असं नाही बघायचं." शकू तिच्याकडे डोळे मोठे करून म्हणून म्हणाली.


"आई तू खोटं का बोललीस निशूशी?" छोटया मनूने तिलाच विचारलं.

"काय खोटं बोलले?" शकूच्या कपाळावर आठया होत्या.

"हेच की दूध पिल्यानं शक्ती येते म्हणून?"

"बाई गं. खरंच बोलले मी." शकू हसत म्हणाली.

"मग तू मला का कधीच दूध देत नाहीस?" तिच्या निरागस प्रश्नाने शकूचा चेहरा खर्रकन उतरला.

तिच्या डोळयांपुढे उभी राहिली घरातील वास्तविकता. खाटेवर असलेले दोन म्हातारे सासुसासरे. एका अपघातात पाय गमावलेला नवरा.
घरात कमवणारी ती एकटी.. आणि खाणारी पाच तोंडे. दुधाच्या रतिबासाठी कुठून खर्च करणार?

"सांग ना मला का देत नाहीस दूध?"
मनूच्या प्रश्नाने ती भानावर आली.

हातातील कामं बाजूला ठेवून शकूने तिला ओट्यावर बसवलं.

"तू लहान होतीस ना तेव्हा खुप दूध प्यायचीस माझं. त्यामुळंच तर किती ताकद आलीये तुझ्यात माहितीय का?"
 
"खरंच?" आपले इवलेसे डोळे विस्फारून ती म्हणाली.

"मग नाहीतर काय? रविवारी मला पंजा लढवताना हरवलंस की नाही?" शकू.

"हो गं आई. मी आहेच ताकदवार." मनूच्या डोळ्यात चमक होती आता.

"आई पण तू मला निशूसारखं मोठया शाळेत का नाही पाठवत? माझी शाळा किती छोटी आहे माहितीय का?" आपले गाल फुगवत ती म्हणाली.

शकू तिला काय उत्तर देईल? वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
फोटो गुगल साभार.

🎭 Series Post

View all