Mar 03, 2024
प्रेरणादायक

परिसस्पर्श. भाग -४(अंतिम)

Read Later
परिसस्पर्श. भाग -४(अंतिम)

परिसस्पर्श.

भाग चार.(अंतिम भाग.)


निशांत फारसा हुशार नव्हता. त्याचे मेरिट हुकले होते तरी पेमेंट सिटवर त्याने मेडिकलला ऍडमिशन घेतली होती. मुलगा डॉक्टर होतोय याचा शलाकाला खुप अभिमान होता. आणि इकडे पुढे काय करायचं हा एकच प्रश्न मनूला रात्रंदिवस छळत असायचा.


निशू सुट्यामध्ये घरी आला होता. तो डॉक्टर होणार नी आपण काहीच नाही याची एक खंत सतत मनात सलत राहायची.


"मनू डोळे मीट ना. मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणले आहे." तो किचनमध्ये येत म्हणाला.

"मला नकोय कसलं गिफ्ट." ती मागे सरत म्हणाली.

"का नको? परवा तुझा वाढदिवस होता ना, त्याचं गिफ्ट आहे हे. शकूनी दिलं असतं तर नाही म्हंटलं असतंस का? आणि तसेही या गिफ्टबद्दल मीच सुचवलं निशूला. आता डोळे मीट बघू." शलाका तिला प्रेमाने दरडावत म्हणाली.


तिने ते गिफ्ट उघडून बघितले. प्रशासकीय सेवेसाठी असणारी काही पुस्तकं त्यात होती आणि सोबत एक माहितीपत्रक देखील.

"थँक यू मॅडम." शलाकाला मिठी मारत ती म्हणाली.

"थँक्स निशू मला योग्य मार्ग दाखवल्याबद्दल."

निशांत तिला अंगठा दाखवत मंद हसला.


आता मनूच्या डोक्यात एकच ध्येय होते, प्रशासकीय सेवेतील अधिकारी बनण्याचे.


बारावीनंतर तिने सरळ आर्टसला प्रवेश घेतला. दिवसा कॉलेज. शलाकाकडची कामं आणि घरातील सगळं सांभाळून जोमाने अभ्यासाला भिडली. तिचे वडील घरबसल्या जमेल तशी तिला मदत करत होते. आजोबा वारले. आजी तर खाटेवरचीच झाली होती. कोणतेही क्लासेस न लावता स्वबळावर तीन वर्ष मेहनत घेवून तिने एमपीएससीची प्री एक्झाम दिली आणि तिला विश्वास नसतांना ती चांगल्या गुणांनी पास झाली. मेहनतीचं चीज झालं होतं.


ह्या रिझल्टने तिचा आत्मविश्वास दुणावला. आणखी जास्त जोमाने अभ्यास करून तिने मेन्स क्रॅक केली तेव्हा तर वडील एका पायावर नाचायला लागले. इंटरव्हिव बऱ्यापैकी पार पडला… आणि काही दिवसातच टीव्ही वर न्युज झळकली,


 'एक घरकाम करणारी मुलगी बनलीय डिप्युटी कलेक्टर..'

"मानिनी मॅडम कसं वाटतंय तुम्हाला?" न्यूज चॅनलवाले तिला विचारत होते.

ती हसली.


"मुळात घरकाम करणारी मुलगी. ही न्युजच चुकीची आहे. कारण काम हे काम असतं. मी जर हे काम केले नसते तर खाल्लं काय असतं? कोणतेही काम लहान नाही. हां पण आपली ध्येय मोठी असू द्या." ती सांगत होती.


"एक शेवटचा प्रश्न.. तुमच्या यशाचे श्रेय कुणाला द्याल?"


"परिसाला"" ती हसून म्हणाली.


सगळे आश्चर्याने पाहत होते.


"एक स्वप्न.. आईने पहायला शिकवलं. मोठं ध्येय ठेवण्याचं. आई हिच माझा परिस. तिच्या त्या परिसस्पर्शाने मी ध्येयवादी बनले.

आणि निशू, शलाका मॅडम.. ह्यांनी मला योग्य वाट दाखवली. तेही आहेतच माझ्या आयुष्यातले मार्गदर्शक..आईनंतरचे."


तिने धावत जावून शलाकाला मिठी मारली.


"अरे मी देखील बाजूलाच आहे. आणि माझं व्याजासह देणं ही तुझ्यावर बाकी आहे." निशांत म्हणाला.


"थँक्स निशू. तुझ्यामुळेच सर्व शक्य झालं. सांग ना किती व्याज झाले तुझे. तु जे म्हणशील ते देईन मी."

त्याला मिठी मारत ती म्हणाली.

"बघ हां. दिलेला शब्द फिरवू नकोस." तो.

"नाही रे. तू बोल तर."

"माझ्या हास्पिटलचे इनॉग्रेशन तुझ्या हस्ते करायचंय मला. कुठेही व्यस्त असलात तरी यावं लागेल. काय डेप्युटी कलेक्टर मॅडम आत्ताच अपॉइंटमेंट घेवून ठेवतोय." तो हसत म्हणाला.

तिनेही हसून प्रॉमिस केले त्याला.


आजी आणि बाबा तिचा कौतुकसोहळा भरल्या डोळ्यांनी मनात साठवत होते. त्यांना घेवून ती लाल दिव्याच्या गाडीमध्ये बसली.

बाजूच्याच सिटवरून शकू आपल्या परिसस्पर्शाची उधळण करत आहे असा मनूला भास झाला. 

त्या परिसस्पर्शाने तिच्या आयुष्याचे सोने झाले होते.


समाप्त.

©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

फोटो गुगल साभार.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//