Feb 23, 2024
प्रेरणादायक

परिसस्पर्श. भाग -३

Read Later
परिसस्पर्श. भाग -३

परीसस्पर्श.

भाग-तीन.


मनू मोठी होत होती. आता तिलाही हळूहळू आईच्या बोलण्याचा अर्थ कळायला लागला होता. आई सोबतीला होतीच. आता शिकून आई म्हणते तशी खूप मोठे व्हायचे. हे एकच ध्येय तिने पुढे ठेवले होते.


इकडे सगळ्यांचे करता करता शकू खंगत चालली होती. मध्येच कधी पोटात कळ दाटून यायची. पोट फुगल्यासारखे दिसायला लागले. हल्ली अंगावरही जास्त जावू लागलं होतं. वयानुसार असे होत असेल म्हणून ती फारसं लक्ष नाही द्यायची. तसेही तिच्याशिवाय घरात करणारे कुणीच नव्हते. एके दिवशी दुखण्याने कहर केला. पाळी पंधरा दिवसांपासून थांबली नव्हती. मनू तिला जबरदस्तीने दवाखान्यात घेवून गेली.


डॉक्टरांना थोडा संशय वाटला म्हणून त्यांनी तिचे सॅम्पल लॅबमध्ये पाठवले आणि त्यांची शंका खरी ठरली. गर्भाशयाच्या कॅन्सरने आत सगळीकडे घेराव करून टाकला होता.

पुढच्या चार महिन्यातच शकू तिच्या लाडक्या मनूची साथ सोडून निघून गेली.


तिसरा दिवस झाला आणि मनू शलाकाच्या दारात उभी राहिली.

"मनू? तू का आलीहेस?" शलाका.

"मॅडम.. आता आई नाहीये तर तिच्या जागेवर कामाला मी येईल." मनू उत्तरली.

"तुला जमेल का पण?" शलाकाचा प्रश्न.

"न जमायला काय झालं? आईसोबत यायचे तेव्हा कधी तिला मदत करायचे." डोळे पुसत ती म्हणाली.

"अगं पण काही दिवस थांबली असती ना. शकूला जाऊन तीनच दिवस झालेत." तिच्या पाठीवर हात फिरवत शलाका म्हणाली.


"सगळी सोंग आणता येतील पण पैशांचं सोंग नाही ना आणू शकत मॅडम? मी लागते कामाला."

आत जाऊन तिने किचनचा ताबा घेतला.


प्रत्येक क्षणाला आई डोळ्यापुढे दिसत होती. अश्रुंना थोपवत कसेबसे तिने कामं पूर्ण केली. फार मोठी नव्हतीच ती. नुकतेच चौदावे वर्ष लागले होते. ह्या वयात तिला आईची जास्त गरज होती. पण तीच निघून गेली. शलाकाला तिच्या मनाची जाणीव होत नव्हती असं नव्हे पण तिचा करारी स्वभाव माहिती होता तिला. त्यामुळे पैश्यांची मदत करायला ती कचरायची. मात्र ती काम करत असली की मदतीला अधेमध्ये असायची.


हळूहळू वर्ष सरलं.


"मनू,अगं एक्झाम फॉर्म भरायचा आज शेवटचा दिवस आहे ना. तू भरला की नाही?"

निशांत तिला विचारत होता. तो तिच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा होता तरी लहानपणापासून दोघांची चांगली गट्टी होती.


तिने नकारार्थी मान हलवली. आलेले सर्व पैसे घरखर्चात जात होते. एक्झाम फॉर्म भरायला तिच्याकडे काहीच उरले नाही.


"हे पैसे घे आणि जा फार्म भर." तो म्हणाला.


"नाही, निशू नको. पुढल्या वर्षी भरेन." ती म्हणाली.

"वेडी आहेस का मनू तू? थोड्याशा रकमेसाठी तु वर्ष वाया घालवणार? घे हे. आणि समज की तुला असेच नाही दिले. शकूकाकूने म्हटल्याप्रमाणे जेव्हा तु कोणीतरी खुप मोठी होशील ना तेव्हा व्याजासह मला परत देशील."

तिच्या हातात पैसे कोंबत तो म्हणला. डोळे पुसत अक्षरशः ती शाळेकडे धावतच निघाली.

दहावीत तिने शाळेतून टॉप केलं, तेव्हा तिला कोण आनंद झाला होता. सायन्स घेवून पुढे डॉक्टर व्हावे असे मनात खूपदा यायचे पण पुन्हा प्रश्न पैश्यांजवळ येऊन थांबायचा.


निशांत तसा हुशार होता पण यावेळी त्याचे मेरिट हुकले होते तरी पेमेंट सिटवर त्याने मेडिकलला ऍडमिशन घेतली होती. मुलगा डॉक्टर होतोय याचा शलाकाला खुप अभिमान होता. आणि इकडे पुढे काय करायचं हा एकच प्रश्न मनूला रात्रंदिवस छळत असायचा.


काय वाढून ठेवले आहे मनूच्या आयुष्यात? वाचा पुढील अंतिम भागात.

:

क्रमश:

©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)

फोटो गुगल साभार.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//