Login

परीक्षा नसत्या तर मराठी निबंध (Pariksha Nastya Tar Marathi Essay)

Essay About Pariksha Nastya Tar. Marathi Vaicharik Nibandh.
आज शाळेतून घरी आल्या आल्याच आईने फर्मान काढलं; "तुझे परीक्षेचे वेळापत्रक आले आहे आठवड्यावर परीक्षा आली आहे त्यामुळे खेळायला जायचं नाही." हे आईचे शब्द ऐकून आपल्याकडून खूप काहीतरी मौल्यवान काढून घेतलं जातंय अशी भावना मनात दाटून आली. नाईलाजाने मी माझं आवरून नाश्ता केला आणि आईने सांगितल्याप्रमाणे अभ्यासाला सुरुवात केली.

अभ्यास करता करताच माझ्या डोक्यात एक विचार आला 'परीक्षा नसत्या तर?' किती मजा आली असती ना? अभ्यास केला काय आणि नाही केला काय काहीच फरक पडला नसता. परीक्षा नाही म्हणल्यावर कोणी नापास होणार नाही हे पक्कं झालं असतं त्यामुळे कसलीच काळजी करावी लागली नसती. परीक्षा येणार म्हणलं की शाळेत सतत तणावाचं वातावरण असतं. प्रत्येक विषयाचे शिक्षक त्या त्या विषयात कसे पैकीच्या पैकी गुण मिळवून दाखवायचे हे सांगत असतात. घरी तर विचारायलाच नको! परीक्षा आहे म्हणून खेळ, टीव्ही, मोबाईल सगळं सगळं बंद होतं.

दोन ते तीन तासांच्या पेपरसाठी कितीतरी दिवस आधीपासून तडजोड करत फक्त अभ्यासच करावा लागतो. खरंच या परीक्षा नसत्या तर खूप छान झालं असतं. अशी तडजोड कधीच करावी लागली नसती. मनात आलं तर अभ्यास केला नाही वाटलं तर नाही केला. किती सोपं झालं असतं ना आयुष्य? त्यात परीक्षा म्हणाल्यावर आजूबाजूच्या मित्र मैत्रिणींचे अभ्यासाचे कौतुक आपल्याच पालकांकडून ऐकून घ्यावे लागते. "ती किंवा तो बघ किती छान अभ्यास करून परीक्षेत पहिला नंबर मिळवतो आणि तू! जराही अभ्यास नको." हे वाक्य तर ठरलेलं असतं. दादा आणि ताईने पण कसा आई बाबांना त्रास न देता स्वतःच स्वतःचा अभ्यास केला आणि परीक्षेत चांगले गुण मिळवले हेही ऐकून घ्यावं लागतं. परीक्षा नसत्या तर निदान हे ऐकायला तरी लागलं नसतं.

परीक्षा नाहीत म्हणाल्यावर आई - बाबांनी पण अभ्यास कर असं सांगितलं नसतं. शाळेत होणाऱ्या क्रीडा, नृत्य आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमात कसलेही दडपण न घेता भाग घेता आला असता. कधीही मनात आलं की फिरायला किंवा सिनेमा पाहायला देखील जाता आलं असतं पण परीक्षा म्हणलं की हे सगळं बंद होतं. परीक्षा येणार म्हणून बाहेर जायचं बंद तर होतंच पण चटपटीत बाहेरचे खाद्य पदार्थ खायलाही बंदी येते. ऐन परीक्षेच्या वेळी आजारी पडायला नको म्हणून आई डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवते आणि फक्त सकस आहारच खायला मिळतो. परीक्षा नसत्या तर ही बंदी पण आली नसती. कधीही चमचमीत खाऊ खाता आला असता. पावसात मनसोक्त भिजता आलं असतं आणि एखाद दिवशी खूपच कंटाळा आला तर शाळेलाही दांडी मारता आली असती.

या परीक्षांनी तर नाकी नऊ आणलेत. त्यात गणिताचा पेपर म्हणलं की पोटात गोळाच येतो. इतिहासात सगळी सन लक्षात ठेवता ठेवता डोकं गरगरायला लागतं आणि विज्ञानात तर रासायनिक अभिक्रिया म्हणजे डोक्याचं वेगळंच केमिकल बनतं. परीक्षेसाठी का होईना खूप मेहनत घेऊन सगळं अभ्यासावं लागतं. बरं अभ्यास न करूनही मग चालणार नसतं! घरून आधीच फर्मान निघालेले असते; जर परीक्षेत नापास झालीस तर पुढच्या वर्षी सरळ हॉस्टेलला टाकणार. मग काय? अभ्यास करणं तर भागच आहे.

दुसरीकडे मात्र एक विचार येतोय तो म्हणजे परीक्षा झाल्या नाहीत तर कोणी अभ्यासच करणार नाही मग पुढच्या इयत्तेत जाऊन काही उपयोग होईल का? जर नुसतेच सगळे पुढे पुढे जात राहिले तर देशात अज्ञान जास्त असेल. अभ्यास कितीही कंटाळवाणा वाटत असला तरी आपल्या आणि देशाच्या भवितव्यासाठी अनेक विषयांचे सखोल ज्ञान, अभ्यास असणे गरजेचे आहेच.

असं म्हणतात आपण रोज आयुष्य जगत असतो तीही एक परीक्षा आहे. जसे जसे आपण मोठे होतो तसे आयुष्यही आपली परीक्षा घेऊ लागते मग जर आत्ताच परीक्षांना आपण घाबरलो तर जेव्हा आयुष्य आपली परीक्षा घेईल तेव्हा आपला त्यात निभाव कसा लागणार?

आपण आजारी असताना कितीही आवडत नसले तरीही कडू औषध घेतोच ना तसेच परीक्षा आपल्याला जास्तीत जास्त बळकट करणारे एक औषध आहे. आज जगभरात अनेक भारतीय आपल्या देशाचे नाव स्वतःच्या कर्तुत्वाने उंचावत आहेत त्यालाही त्यांचे ज्ञान आणि त्या मागचे परिश्रम कारणीभूत आहेत. आपला जेव्हा सर्वांगीण विकास होतो तेव्हाच आपण देशाचा विकास करू शकतो आणि जागतिक बाजारपेठेत आपली दखल घेतली जाते.

परिक्षांमुळेच हे मूल्यमापन करणे शक्य असते त्यामुळे परीक्षा होतायत ते चांगलं आहे. जरी थोडे दिवस मनाला मुरड घालून फक्त अभ्यास करावा लागत असला तरीही हे आपल्याच चांगल्या भवितव्यासाठी आहे म्हणून एवढी तडजोड तर करणं आलंच. परीक्षा झाल्या नाहीत तर कोणालाही वेळेचे महत्त्व राहणार नाही आणि सगळ्यात अमूल्य वेळ लोक वाया घालवतील.