पारिजात... गंध प्रेमाचा..! भाग -28

Doctor Sathe Remembers Some one Special.


आपण वाचत आहात एका गंधाळलेल्या प्रेमाची सुगंधित कथामालिका..
पारिजात.. गंध प्रेमाचा..!

( मागील भागात आपण वाचलं की रावीने विराजला सत्यतेची जाणीव करून दिल्यावर त्यानेही एक पाऊल पुढे टाकले . आणि मग डॉक्टर साठे व त्याच्यातील गैरसमजुतीची दरी लगेच मिटली. विराजने बनवलेली मॅगी आणि डॉक्टरांची भरगच्च मिठी ह्यातच त्यांच्यातील बावीस वर्षांपूर्वीचा दुरावा नाहीसा झाला.
आता पुढे…)

*********

     गोड म्हंटल्याबरोबर एकच गोष्ट नजरेसमोर आली.. कित्येक वर्षांपूर्वी खाल्लेले बेसनाचे लाडू.
मागे रावीने आणलेल्या लाडवातसुद्धा तीच सेम चव जाणवली होती.

   " तिचीच लेक असेल का ही?"

इतक्या दिवसांत पुन्हा आज त्यांना हा प्रश्न पडला.

     " नाही.. नसेल. पण गालावर तीच खळी आणि हनुवटीवरचा तो तीळ? तिच्यासारखा का भासतो? "

ते मनात हसले.
    " डॉक्टर साठे पृथ्वी गोल आहे हो. आणि एकसारखी दिसणारी माणसं असतात जगात. "
त्यांनी समजावलं स्वतःला.

  "... पण दोन व्यक्तींच्या हातची चव देखील सारखीच असते का?"
हा प्रश्न मात्र अनुत्तरीत करणारा होता..
मनातला प्रश्न बाजूला ठेऊन त्यांनी कुकर गॅसवर चढवला.


   " स्वीट काही करू नकोस. मी येतो बाहेरून घेऊन . "
हातात पिशवी घेवून विराज बाहेर पडला.
डॉक्टर कितीतरी दिवसांनी असं मन लावून किचनमध्ये काम करत होते.
विराज बाहेरून गुलाबजाम घेवून आला.
जेवणाचा सुगंध.. वरून प्रेमाचा तडका!
अहाहा! दोघेही तृप्त झाले. गुलाबजाम होतेच तोंड गोड करायला.
   कालच्या आणि आजच्या दिवसात किती फरक होता ना? काल विराजच्या मॉमचा स्मृतिदिन. आणि आज नव्याने निर्माण झालेल्या मामा भाच्याच्या नात्याची रोवलेली मुहूर्तमेढ!
हा आंनदाचा क्षण साठ्यांनी हृदयात साठवून ठेवला तर विराजने मोबाईलच्या कॅमेऱ्यात अलगद टिपला. आणि लागोलाग रावीला सेंड देखील केला.. थँक यू च्या कॅप्शनसह.


…कालच्या रात्रभराच्या जागरणामुळे आल्या आल्या जेवण उरकून रावीने मस्त ताणून दिले होते. उठली तेव्हा सायंकाळ झालेली .
डोळे उघडले तोच नाकाला कॉफीचा गंध जाणवला.


  " श्रु ss "
आळसावलेल्या आवाजात तिने हाक दिली.

  " एकटी एकटी काय कॉफी पितेस गं? "
झोपेमुळे झालेल्या जड डोळ्यांनी तिनं दटावलं.

  " बाई गं. किती हाका मारल्या तुला? पण तुझं हूं का चू नाही. मग वाटलं जास्तच थकली असशील म्हणून बसले एकटीच."
तिच्याजवळ येत श्रुती म्हणाली.

   " हो यार! कालची रात्र फारच हेक्टिक होती. "
तिनं शॉर्टली श्रुतीला त्या पेशंटबद्दल सांगितलं.

  " वॉव रावी. काय ग्रेट आहेस यार तू? केवढी क्रिटिकल केस तु हॅन्डल केलीस? "
ती  अभिमानाने म्हणाली. 
रावीनेही स्मित करत मान डोलावली.


  " आणखी एक सांगायचं आहे यार तुला."
रावी.


  "हूं."
श्रुती तिच्याकडे बघत म्हणाली.

  " विराजबद्दल. "
ती.

  " काय? त्यानं तुला प्रपोज केलं ? "
श्रुती टुणकन उडी मारून तिच्याशेजारी बसली.

  " अजिबात नकार देवू नकोस हं , मी आधीच सांगते तुला."
श्रुती.
रावीने बोलण्यासाठी उघडलेले आपले तोंड बंद केले.


  " सांग ना. "
श्रुतीची एक्साईटमेंट चांगलीच वाढली होती.


  " मंद आहेस का गं तू जरा? विराज म्हटलं की तुला एवढंच दिसतं का? "
तिच्याकडे बघत थोडया घुश्श्यात रावी म्हणाली.

  " सॉरी. नाही केलं का प्रपोज? "
लहानसा चेहरा करून श्रुती.

  " जावू दे. तुझ्याशी बोलणंच कठीण आहे."
मोबाईल घेवून बेडच्या खाली उतरत रावी.

" आता विराज म्हंटलं की हेच येतं डोक्यात तर काय करू? "
श्रुती तिच्या मागे जात म्हणाली.

  " श्रु ss हे बघ. "
हातातील मोबाईल बघत रावी आनंदाने म्हणाली.

  " काय  झालं?"
तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून श्रुती म्हणाली.

 " बरी आहेस ना? म्हणजे मध्येच चिडतेस काय? आनंदित काय होतेस, म्हणून विचारतेय. "
श्रुती.

  " ते सोड गं. आधी हे बघ."

  " वॉव! हँडसम विराज कुलकर्णी.." श्रुतीचे डोळे चकाकले.
   "... विथ डॉक्टर साठे?"
चेहऱ्यावरचे भाव बदलत होते तिचे.
"आणि कॅप्शनमध्ये काय लिहिलंय.. थँक यू??
रावी काय आहे हे ? "
श्रुतीला काही कळेना की काय चाललंय.

   " तेच सांगायचा केव्हाचा प्रयत्न करतेय मी? पण मला काही बोलू देशील तेव्हा ना?"
-रावी.

  " मग सांग ना आता. मी केवढी आतुर झालेय. हे दोघे एकत्र? कसे? "
-श्रुती.

  " श्रुती.. आय एम सो ss हॅपी यार!"
रावीने तिला मिठी मारली. डोळे उगाचच पाणावले तिचे.
आणि मग तिनं साठे सर आणि विराजच्या नात्याबद्दल सगळं सांगितलं.

" ओह! आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू डिअर. "
आपले डोळे पुसत श्रुती म्हणाली.
" तू किती मोठं काम केले आहेस तुला माहित आहे का? दोन तुटलेल्या मनांना जोडलंस यार तु. रिअली ग्रेट!"

  " मी केवळ त्याला सल्ला दिला. पण विराज इतक्या लवकर हे करेल , वाटलं नव्हतं गं मला. "
रावी म्हणाली.

  " मॉमला सांगते आधी."
असे म्हणून तिने सुमतीला कॉल करून सांगितलंही.

  " ग्रेट डिअर. तुला हवं तसं घडलं ना? आता नको जास्त इमोशनल होवू. "
रडणाऱ्या रावीकडे बघत सुमी म्हणाली.

  " इतक्या वर्षांनी नात्यातला गुंता सुटला त्यांच्या. खूप भारी वाटतंय गं मॉम.काही गिफ्ट घेवून जाऊ का गं सरांसाठी?"
रावी विचारत होती.

   " तुला वाटतं ना तर जा घेऊन .

  " काय देऊ गं त्यांना. त्यांना काय आवडतं ते मला कुठे माहितीये . एखादा पुष्पगुच्छ देऊ काय? "
रावी.

  " ते तर केव्हाही बेटर गं. तुझ्याठिकाणी मी असते ना तर मस्तपैकी आपल्या अंगणातल्या पारिजातकाची फुलं दिली असती. त्या सुगंधाची सर कशालाच नाही बघ. "


सहजपणे सुमती बोलून गेली आणि रावीच्या डोक्यात एक वेगळीच कल्पना आली.
 बोलून झाल्यानंतर काहीतरी मनाशी पक्के ठरवून फोन कट केला.
     पुढल्या दिवशी परत मॉर्निंग शिफ्ट. रावीला लवकर जाग आली.कधी नव्हे ते ती आज सकाळीच साडेपाच सहाला ला मॉर्निंग वॉक साठी निघाली.
समोरच्या चौकातील एका मोठया बंगल्याबाहेर प्राजक्ताचा सडा पडला होता. तिनं अलगद काही फुलं आपल्या ओंजळीत भरली आणि घराकडे परत फिरली..


   हॉस्पिटलला अगदी वेळेवर ती पोहचली . सगळं कसं प्रसन्न वाटत होतं. नेहमीचे हॉस्पिटल तिला काहीतरी बदलल्यासारखे दिसत होते. केबिनकडे जाणारे आणि रोज कठोर भासणारे डॉक्टर साठे आज हसरे दिसत होते. तिला वाटले तिच्याच मनाचे खेळ आहेत हे सारे. पण काही वेळाने सिमा नर्सला दुसऱ्या एका नर्सशी बोलतांना ऐकले. ती देखील हेच बोलत होती. `सर आज जरा जास्तच चांगल्या मुडमध्ये आहेत.´ तेव्हा रावीलाही पटले.. तिला वाटणारे हे केवळ तिच्या मनाचे खेळ नाहीत.

" गुडमॉर्निंग डॉक्टर रावी! "
ती आत येताच तिच्यापूर्वी त्यांनीच तिला ग्रीट केलं.

" व्हेरी गुडमॉर्निंग सर!"

सकाळी गोळा केलेल्या प्राजक्तफुलांची ओंजळ त्यांच्यासमोर धरत ती म्हणाली.

" तुमच्यातील दुरावलेले नाते पुन्हा जुळलेत ते नाते ह्या पारिजातकाच्या सुगंधाप्रमाणे नेहमीच दरवळत राहू दे. "
ती गोड हसत म्हणाली.

तिच्या हातातील ती प्राजक्तफुले आणि ओठांवरच्या गोड हसूने गालावर उमटलेली छोटीशी खळी..! ते बघून त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणात भाव बदलले. तो बदल रावीनेही टिपला.

" सॉरी सर..! मी काही चुकीचे बोलले का? "
त्यांच्या मनाचा अंदाज तिला येईना.

" अगं सॉरी काय त्यात? तू योग्यच बोलते आहेस. त्याचं काय ना मी देखील तुझ्यासाठी हेच आणलं होतं."
ते हसून म्हणाले.
आपल्या बॅगेतून त्यांनीही पारिजातकाची फुलं असलेला डबा बाहेर काढून तिच्यासमोर उघडला . ती सुंदर केशरी देठाची नाजूक पांढरी फुले बघून ती स्तिमित झाली.
  " आमच्या नात्यात भरलेल्या सुगंधाचा तू महत्वाचा भाग आहेस रावी. म्हणून तुझ्यासाठी हा सुवासिक पारिजात! ह्याच्या सुगंधाची सर कशालाच नाही बघ."

तिच्या ओंजळीत ती फुलं रिचवत ते म्हणाले.

क्षणभर तिला काही सुचेना.
मॉम जे बोलली होती तेचं तर सरांच्याही मुखातून बाहेर पडत होतं.

  `दोन व्यक्तींच्या विचारात इतकं साम्य?´

  `तिला आणि मलाही एकमेकांना हेच दयायला सुचावं? एवढं साध्यर्म्य?´

दोघांनाही एकाच वेळी सारखाच प्रश्न पडला.

" एक सांगू? "

" एक विचारू? "

रावी आणि सर एकाचवेळी बोलले.
त्या बोलण्याने दोघेही हसायला लागले.

"तू बोल आधी."
सर म्हणाले.

" नाही सर, तुम्ही विचारा पहिले." रावी.

  " नाही गं. सांग तूच , काय म्हणत होतीस?"
-ते.

  " खरं तर तुम्हाला काही द्यावे हे मनात होतेच पण हे पारिजात द्यायचं माझ्या मॉमने सजेस्ट केलं. "
ती म्हणाली.

  " मला फार आवडतो पारिजात. "
ते स्मित करून म्हणाले.


  " माझ्या मॉमलासुध्दा फार म्हणजे फार आवडतो.. तुम्हाला ठाऊक नाही पण आमच्या घरचा पारिजात ना माझ्यापेक्षा जास्त लकी आहे. कारण मी इकडे असते मॉमच्या प्रेमाची उधळण त्या प्राजक्ताच्या झाडावर होतं असते."
ती सांगत होती. मॉमबद्दल बोलतांना चेहऱ्यावर वेगळेच तेज जाणवत होते.
" मला ना सर असं वाटायला लागलंय की एकदा तुम्हाला भेटवायला हवं माझ्या मॉमशी .तुमच्या ना बऱ्याचशा चॉइसेस तिच्यासोबत जुळतात."
ती ओघात बोलून गेली.


ते हसले.

" हो हो. भेटायला हवं एकदा. एवढ्या गोड मुलीच्या आईला भेटायलाच पाहिजे ना. "
-ते.

ओपिडीला सुरुवात झाली आणि मग तो विषय तिथेच थांबला.


   …. घरी परतल्यानंतर बॅगेतील सामान बाहेर काढतांना ती फुले रावीच्या नजरेस पडली. तिच्या ओठांवर पुन्हा तेव्हा गोड हसू उमटलं.
` मॉम आणि सरांची भेट घालून दयायला हवी यार एकदा. ´
तिच्या डोक्यात पुन्हा सकाळचा विचार डोकावला.

  … रात्री झोपतांना डॉक्टरांच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. रावीने त्यांच्यासमोर धरलेली ती प्राजक्तफुलांची ओंजळ… तिच्या गालावरची गोड खळी आणि हनुवटीवरचा तो तीळ..!
सारंच नजरेसमोर तराळलं.

`इतक्या वर्षांचा काळ लोटला तरीही हृदयाच्या कप्प्यातील तो हळवा कोपरा का तिची सारखी आठवण करून देत असेल? आणि स्पेशली रावी समोर आली की का असं होतं मला? तिला बघून का सारखं मन भूतकाळात जातं? ´
बेडवर पडल्या पडल्या त्यांनी डोळे मिटून घेतले .

   ` रावी´ हे नावचं खूप स्पेशल होतं त्यांच्यासाठी.आपल्या ताईच्या मुलीचं नाव रावी ठेवणार होते ते.. पण त्याआधी ते नाव तर स्वतःच्याचं लेकीसाठी सुचलं होतं. मिटल्या डोळ्यातला ओलसरपणा जाणवायला लागला तसं ते पुसायला त्यांचे हात सरसावले.

"..पुरुषांनी रडू नये असं कोण म्हणतं? आलं रडायला तर रडून मोकळं व्हायचं ना.."

एकदा रावीनं म्हंटलेलं त्यांना आठवलं. आणि त्यांचे हात आपोआप मागे सरले. मिटलेल्या डोळ्यातून बाहेर पडणारे थेंब घेवून गेले त्यांना त्यांच्या भूतकाळात...

.

.

.


क्रमश :



       **********

आजच्या भागात एवढंच.

हा भाग कसा वाटला नक्की कळवा. आणि आवडला तर किमान एक लाईक देवू शकता ना? तो दयाच. कमेंट करा. लाईक करा नावासह शेअर करा.

पुढील भाग लवकरच..

🎭 Series Post

View all