पारिजात... गंध प्रेमाचा...! भाग - 9

एक भन्नाट लव्ह स्टोरी..!

आपण वाचत आहात एक भन्नाट प्रेमकथा...! गंधाळलेल्या प्रेमाची... पारिजातकाच्या सुगंधासारखी...!!

( मागील भागात आपण वाचली सुमी आणि अनीच्या प्रेमाची सुरुवात...

आता पुढे.... )

     *********************************


" बापरे !

एवढं मीठ..?? आता येथून गेलेलंच बरं.. "


तिनं किचन मधून काढता पाय घेतला.



" काय होतंय आज...??


अनीच्या एका प्रश्नामुळे माझं चित्तचं थाऱ्यावर राहत  नाहीये...! "


कॉटवर पडल्या पडल्या ती सकाळचा घटनाक्रम आठवत होती..


तो पारिजातकाचा वर्षाव...
ते सूर्याचं लाल रुपडं...
तो मंद वाहणारा वारा...
तो हलकेच खळाळणारा ओढा...
तो त्याच्या हातातील तिचा हात..
आणि...
तो तिच्या डोळ्यात बघत त्यानं विचारलेला प्रश्न...!!


लाजेनं शहारली ती...!


आता सायंकाळची वाट बघू लागली...



" काय सांगायचं असेल अनीला...??


त्यालाही मी आवडत असेल का..??? "


मनात विचार करून ती एकटीच हसत होती.


" काय चाललंय तुझं..?
का अशी हसत आहेस वेड्यासारखी..?? "


तिच्या डोक्यावर टपली मारत मालती म्हणाली.


".. आँ ss


तायडे...
लागलं ना..! "


डोकं चोळत ती म्हणाली.


" सुमे s..
फाजीलपणा करू नकोस हां..! काय चाललंय डोक्यात ?  किती मीठ टाकलं सकाळी भाजीत..?? "


- मालती.


".. अच्छा..!!   शेवटी लाडक्या लेकीकडे केलीच ना तक्रार आईने ? मी काही मुद्दामहुन जास्तीचे मीठ नव्हते टाकले... "


ती नाक उडवत म्हणाली.


" हो आहेच मी आईची लाडकी..! आणि तुला तर देवळाच्या पायरीवरून आणलंय उचलून.. "


तिला चिडवत मालती म्हणाली.


" ताई  ss "
सुमीनं तिच्यावर उशी भिरकावली.


" अगं हो.. खरंच.
तूच बघ... तुझं हे नाक आहे का माझ्यासारखं...?? आणि तो नाकाचा शेंडा कशी उडवतेस तू..?? कुणी करतं का सांग आपल्या घरी..??
म्हणून तर अनिकेत तुला नकटी म्हणतो...! "


तिची खेचायची चांगलीच लहर आली मालतीला.


"  येs! अनी मला प्रेमानं म्हणतो हां..! आणि नकटी नाही नकटु म्हणतो तो...! "


सुमी बोलून गेली.


" हं..?? काय म्हणालीस..?? "


मालतीने डोळे मोठे केले.


"  कुठे काय..? काही नाही..! "


चूक लक्षात घेऊन तिनं पटकन जीभ चावली.


" सुमा.. नसते उपदव्याप करू नकोस हा..
माझं लक्ष आहे तुझ्यावर..! "


तिच्याकडे रोखून बघत ती म्हणाली.


" आई ss..
बघ गं ताई मला चिडवतेय...! "


तिला टाळण्यासाठी सुमी रूमच्या बाहेर निघून गेली..


.
.
.
.
.


".. सुमी ss
रडू नको ना गं..."


तो तिला समजावत होता.


" कुठे रडतेय मी..? "


स्फुन्दत ती.


" मग डोळे ओले का तुझे..? "
- तो.


" माहित नाही.. "


नाकातील पाणी वर ओढत ती म्हणाली.


क्षण दोन क्षण असेच गेले.


"... अनी ss
नको ना रे इतक्यात परत जाऊस...! "


भिजल्या स्वरात ती म्हणाली.


" मलाही जायची इच्छा नाहीये गं.. पण बाबा येत आहेत उदया घ्यायला..
मग जावेच लागेल ना..??


सकाळी तुला हेच सांगणार होतो... पण तू बोलत नव्हतीस म्हणून ह्या वेळेला गच्चीवर बोलावलं तुला.. "


त्याचाही स्वर कुठेतरी भिजल्यासारखा वाटला तिला..


" अनी...! मीही आवडते का रे तुला...?? "



तिचा प्रश्न ओठांवर येणार तोच ताईची साद आली..


" सुमा ss.. "


पाठोपाठ ताईही गच्चीवर पोहचली.


" सुमा.. दिवा लावायचा सोडून काय करते आहेस ईथे..?? "


" काही नाही गं ताई.. चल. "


ती म्हणाली.


" सुमा... रडताहेस तू..?


काय रे अनिकेत परत भांडण झालं का तुमचं..?? "


त्याच्याकडं सांशक नजरेनं बघत ती म्हणाली.


"नाही गं ताई..! "
तो उसणं हसून म्हणाला..


" मालू...  अगं ये ss... तू देखील अडकली का वर..?? "

आईचा आवाज आला तसं  तिघे खाली गेले.

.

.


" असा कसा जातोय हा एवढया लवकर...?? सकाळी विचारलेला प्रश्न.. आणि आता लगेच विरहाचं बोलणं..
असा कसा आहे हा...?? "


मनात नेमकं काय होतंय कळत नव्हतं तिला..

सकाळी जी आनंदाची लहर उठली होती.. ती मात्र हरवली होती.. तो उदया  जाणार आहे हा विचार तिला अस्वस्थ करत होता..

डोळ्यातून ओघाळलेला थेंब तिनं अलगद टिपला..


"... तो जातोय तर का रडायला येतंय मला...??


एखाद्या परक्या व्यक्तीसाठी असं भरून का येतेय मला..??


खरंच तो फक्त मला आवडतो की आणखी काही....??
अनीच्या प्रेमात तर नाही ना पडले मी....??? "


तीचं स्वतःशीच हितगुज चाललं होतं..


" सुमा.. झोप आता ! जास्त विचार नको करू... "


ताईचा आवाज आला तशी तिनं आपली कूस बदलली...


दुसऱ्या दिवशी घराबाहेर पडूच नये असं तिला वाटत होतं.

आज ती फुलंही गोळा करायला गेली नाही..


... दहा अकरा वाजता दिवेकर काकूंकडे सुरु असलेली लगबग कानावर पडत होती.

ती बाहेर नव्हती पडली पण कान मात्र मागावर होतेच अनीच्या..


" आजी.. काळजी घे गं.. "


आजीला नमस्कार करतं तो उठला.


" होय बाळा.. तू ही येत राहा असाच अधेमध्ये.."
त्याचा गालगूच्चा घेत आजी म्हणाली.


" अनी.. उशीर होतोय .. "


बाबाचा आवाज ऐकून तो बाहेर आला.


मावशीला एक मिठी मारली.

डोळे पुसत त्यांनीही त्याची पापी घेतली..


घरातून बाहेर पडताच सुमीच्या घराकडे त्याचं लक्ष गेलं.


"काकू.. येतो हॊ मी...! "


हात उंचावत तो सुमीच्या आईला म्हणाला.


"अरे अनिकेत..! इतक्यात निघालास..??
सुमाला भेटलास की नाही..??


सुमा..

अगं अनिकेत निघाला बघ..! "


आई आत डोकावत म्हणाली.


तिचा काहीच आवाज आला नाही तर तोच आत गेला.


" सुमी..

तू साधं मला बाय पण करणार नाहीस..?? "


कॉटवर बसलेल्या तिला त्यानं विचारलं.


" अनी.. मी कट्टी आहे तुझ्याशी. "


नाकातलं पाणी पुसत ती म्हणाली.


" येsय नकटु.. असं रडू नकोस ना..! तू भांडतानाच गोड दिसतेस..! "


तिच्याकडे बघत तो म्हणाला.


" मी भांडते होय...? "


त्याला  चिडून फटका दयायला तिचा हात वर गेला तसं त्यानं तिचा हात आपल्या हातात घेऊन त्यावर एक पाकीट ठेवलं.


" सुमी.. मी गेल्यावर उघड हे.. "


तिच्या डोळ्यात बघत तो म्हणाला.


त्या क्षणी एक घट्ट मिठी मारावी वाटलं तिला. पण तिनं हलकेच आपला हात सोडवून घेतला..


जाणाऱ्या अनीला बघून गॅलरीतून ती कितीतरी वेळ हात हलवत होती...


.
.


... पाकिटात काय आहे हे बघायला तीचं मन उत्सुक झालं होतं...  सकाळच्या धांदलीत तिला जमेना.

शिवाय मालती ताई होतीच तिचा तिसरा डोळा उघडून...!


दुपारी आई वामकुक्षी घेत होती. मालतीही तिच्या प्रोजेक्ट मध्ये गुंतली होती..


हीच ती वेळ म्हणून भर उन्हात ती गच्चीवर गेली..


भिंतीला टेकून बसत धडधडत्या अंतःकरणाने ते पाकीट उघडलं...


काय होतं त्यात...???



सकाळी सकाळी कागदावर उतरवलेल्या त्याच्या भावना होत्या...

आणि सोबत होती  पारिजाताची दोन फुलं...

सकाळी त्यानं तिच्यासाठी वेचलेली...!


डोळे मिटून तिनं तो हवाहवासा सुगंध हुंगला... मनभरून....!


आणि त्यानंतर त्यानं लिहिलेली चिट्ठी तिनं अलगद उघडली....

तेवढ्यात कुणीतरी तिच्या हातचा कागद पटकन हिसकावला....


.
.
.
.
.
.
.


" सर.. पेशंट ला लेबर रूममध्ये शिफ्ट केलंय. "


नर्स डॉ. साठेंच्या केबिनमध्ये येत म्हणाली.


" डॉ. रावी..

पेशंटची डिलिव्हरी केलीय कधी...?? "


रावीकडे बघत त्यांनी विचारलं.


" होय सर. इंटर्नशिप दरम्यान. "
ती उत्तरली.


" चला मग लेबर रूममध्ये. मलाही बघू दे जरा तुमचं कसब. "


दोघं लेबर रूममध्ये गेले.


सर्व तयारी झाली होती.


टेबलवर एक पहिलटकरीण वेदनेणं विव्हळत होती.
रावीनं तिला चेक केलं नी मग अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने तिला बाळन्त केलं.


तिने केलेली डिलिव्हरी..!
तिची स्टीचेस मारण्याची पद्धत...!
वेदनेने विव्हळणाऱ्या त्या मातेला दिलेला धीर...!
आणि नवजात बाळ बाहेर आल्यानंतर तिचे चमकणारे डोळे....!


डॉ. साठे तिच्या कृतीने इंप्रेस झाले.



कालचा तिचा वेंधळेपणा बघून त्यांना वाटलं होतं की आजही ती गोंधळेल. पणआज तिच्यात एक  वेगळाच कॉन्फिडन्स होता.


आज तिने त्यांच्या मदतीशिवाय  तीन बाळंतपण पार पाडले. कोणत्याही गुंतागुंतीविना.

सर जाम खुश होते. तसं त्यांनी कॉम्प्लिमेंट देखील दिली.


"... वेल डन डॉ. रावी...!


आय लाईक युअर कॉन्फिडन्स...!! कीप इट अप डॉक्टर..! "


त्यांनी तिचं तोंडभरून कौतुक केलं.


ती अगदीच शॉक...!!


"  हेच का ते डॉ. साठे...?? ज्यांनी काल मला धु धु धुतलं. आणि आज एवढं कौतुक...????


तिच्या ऍप्रॉनची कॉलर आपोआपच टाईट झाली.


"... मॅम...

साठे सर म्हणजे फणस आहेत. वरून काटेरी आणि आतून अगदी गोड गरे असणारा..!


हां.. ! पण  हा गोडवा प्रत्येकाच्याच वाट्याला नाही येत.


यु आर लकीएस्ट वन...! "


सिमा सिस्टर सांगत होती.


" हॊ का सिस्टर..?? म्हणजे मी काहीच नं करता सर माझं कौतुक करत होते का? "


ती सीमाला म्हणाली.


" तसं नाही मॅम. लेबर रूममध्ये तर तुम्ही एकदम क्वालिफाईड डॉक्टर सारखंच काम केलंत. पण साठे सर वरून कितीही हार्ड वाटले ना तरी ते खूप सॉफ्ट हार्टेड पर्सन आहेत हे सांगायचं होतं मला..! "


- सीमा.


सीमाचं म्हणणं कितपत पटलं रावीला, माहित नाही. कारण तिनं केवळ स्मित केलं त्यावर.


आजचा पराक्रम कधी एकदा सुमतीला सांगते असं झालं होतं तिला.


शॉर्ट ब्रेक घेऊन ती तडक कॅन्टीनला गेली आणि तिला कॉल केला..


" हॅलो सुमी..! "
उत्साहात ती म्हणाली.


तिच्या अवेळी फोनकॉल नी तिने हातातील लाडू खाली ठेवला.


" बच्चा ss ??   तू ह्या वेळेला..? "
सुमतीने आश्चर्याने विचारलं.


" ऐक ना मॉम... आय एम सो ss हॅपी..! "
रावी म्हणाली.


" हॊ सुमी म्हटलंस तेव्हाच कळलं मला..!

काय झालं सांगशील तरी..?? "


पलीकडून ती.


".. अगं आज चक्क सरांनी माझं कौतुक केलं.. तेही सर्वांसमोर...!
फार भारी वाटत आहे गं. "


रावी अगदी उत्साहात बोलत होती.


" अरे वा..! प्रगती आहे म्हणायची.. किप इट अप डॉक्टर..! "


ती हसत म्हणाली.



" मॉम.. तू माहितीये अगदी सरांसारखीच बोलतेस..!


ते जाऊ दे.. खरं तर हे सगळं तूझ्या लाडवामुळे झाले.. "


- रावी.


" त्याचा काय संबंध...?? "


- ती.


" अगं आज सरांचा बर्थडे होता.. मला नव्हतं माहिती. मग वेळेवर त्यांना डब्यातला बेसनलाडू दिला मी.


आणि तूझ्या हातची चव तर जगात सगळ्यात भारी..!

लाडवाच्या त्या गोडव्यात बहुतेक विरघळले साठे सर...!! "


रावी हसत म्हणाली.


" बरं चल मॉम ठेवते मी.. सायंकाळी बोलूया..!


आणि हॊ... तुझ्यावरचा राग विसरले नाहीये मी..! सायंकाळी त्याचा वचपा काढेलच.
बाय..! "


ती कॉल कट करून opd ला गेली.


पेशंट चेक करता करता डॉ. साठे रावीचंही बारकाईने निरीक्षण करत होते.


"... थोडी वेंधळी आहे ही... पण हुशार आहे...!  एक वेगळाच स्पार्क आहे हिच्यात...!

कालची केस स्टडी आणि आजचे पेशंट चेक करण्यात खूप फरक जाणवतोय. एका दिवसातच खूप शिकलेय ही.


बस्स...!

ह्या दोन वर्षात माझ्या हातून तावून सुलाखून निघेल तर मौल्यवान हिरा घडवीन हिच्यात मी.


डॉ. रावी... यू ह्याव व्हेरी ब्राईट फ्युचर... !!  गो अहेड..!!! "


तिच्याकडे बघत ते  मनात म्हणाले.


थोड्यावेळाने तिची त्यांच्याशी नजरानजर झाली तशी आपसूकच तिचे ओठ रुंदावले..


तिच्या गालावर पडलेली छोटीशी खळी  त्यांचं लक्ष वेधून घेत होती..


" एवढया वर्षांत कित्येक स्टुडंट्स घडवले... पण ही मुलगी काहीशी वेगळी भासते... काहीशी आपली वाटतेय..!
का वाटतेय असं...?? "


ते मनात स्वतःशीच विचारत होते...

.

.

.

.

.

. क्रमश :


            *************************

कसा वाटतोय माझ्या पारिजाताचा सुगंध....??

आवडतोय ना ...??  मग कमेंट करून सांगा ना तसं..

नसेल आवडत तर तेही सांगा. काही सुचवायचं असेल तर हक्काने सुचवा..! तुमच्या सूचना स्वागतार्ह आहेत.

हा भाग आवडला तर लाईक, कमेंट आणि share करा...

🎭 Series Post

View all