********
"खीचॅsक!" कॅमेऱ्याच्या आवाजाने मोबाईलमध्ये तो क्षण कैद झाला, सोबतच त्या चौघांच्या मनाच्या कॅमेऱ्यात देखील ती फोटोफ्रेम बंदिस्त झाली.
आज सुमीच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज आले होते. तीन दिवसांपूर्वी अनीच्या अंगाची उष्टी हळद रावीने तिला लावली होती. दुसऱ्या दिवशी त्यांचे रजिस्टर्ड लग्न पार पडले. काल रावी आणि विराजचा लग्नसोहळा मोठया थाटामाटात संपन्न झाला.
आज त्या चौघांचे ग्रँड रिसेप्शन होते. त्या अभूतपूर्व सोहळ्याला हॉस्पिटलच्या सर्व लोकांनी आवर्जून हजेरी लावली. हॉस्पिटलमध्ये काटेरी फणस असलेल्या डॉक्टर साठेंच्या मधाळ गोड सुमीला भेटण्यास सगळे उत्सुक होते. सोबतच हँडसम विराज आणि त्याची ब्युटीफुल पार्टनर हादेखील सगळ्यांचा चर्चेचा विषय होता.
रावीची बेस्टी `श्रु´ जरा जास्तच आनंदी होती. रावी आणि विराज असे एकत्र यावेत हे कधीपासून तिच्या मनात होते. लग्नात रावीची करवली म्हणून मिरवण्याचा मान तिला मिळाला, मग काय? स्वारी अगदी खुश!
अनीच्या वाढदिवसापासूनचे पुढचे हे आठ दिवस खूपच धांदलीत गेलेत.
आता मात्र चौघे अगदी आनंदात होते. रावीला तिचा अधिकृत डॅडू मिळालाय आणि विराजला त्याच्या वाटणीचे मॉमचे प्रेम!
.
.
.
सहा वर्षानंतर..
आज वाढदिवस! पण कुणाचा?
"परी ss, ऐक ना!
असं नाही करायचं बाळा, आपल्याला तयार व्हायचे आहे ना?"
अंगावर जांभळ्या रंगाची साडी ल्यालेली, गळ्यात नाजूकशे मंगळसूत्र, बांगडया आणि कानातले एकमेकांना मॅचिंग, हलकासा मेकअप आणि ओठांवरची लिपस्टिक! स्वतः छानशी तयार होऊन परीचे आवरून द्यायच्या मागे ती लागली होती. पण ते द्वाड बाळ तिच्या हाती काही लागेना.
दुडूदुडू धावत इवलीशी पावलं सुमीजवळ येऊन विसावली. आपल्या साडीचा पदर नीट करत ती हॉलमध्ये येत होती.
"बच्चा, तू तर लाडोबा आहेस माझा!"
तिचा गालगूच्चा घेत सुमी म्हणाली तसा रावीचा चेहरा उजळून निघाला.
"पण परी तुझा लाडोबा आहे ना, तर माझ्या लाडोबाचा लाडोबा माझा डबल लाडोबा!" त्याची पापी घेत ती म्हणाली.
कुर्ता पायजमा घालून मस्तपैकी तयार होऊन सकाळीच बाहेर गेलेले डॉक्टर आत येत म्हणाले.
"वॉव! माझी आवडती फुलं.. पालिजात." आनंदाने तो.
" तुला माहीतीय? आपल्या घरातील हे सुंदर फूल म्हणजे कोण?" त्याच्या नाकाला नाक घासत त्यांनी विचारले.
"कोण?" आपले गोबरे गाल फुगवून तो.
"माझी मम्मा म्हणजे पालिजात? " त्याच्या पिटुकल्या चेहऱ्यावर भलेमोठे आश्चर्य!
"आणि मग मी कोण?"
" किती मस्त छुगंध !" त्याने तो गंध मन भरून हुंगला.
"लव्ह यू टू रे माझ्या गोडुल्या !"
रावीने त्याला घट्ट मिठी मारली.
"डॅडा, आता ती माझीपण पाल्टनल आहे. तू पण तिची किशी घेतांना मला विचालत जा हं."
तयार झाल्यावर सुमीने त्याला देवबाप्पाला नमस्कार करायला लावला. मग दोघींनी मिळून त्याचे औक्षण केले. लाडक्या आजीने तयार केलेला केक त्याने कापला. सगळ्यांनी त्याला केक भरवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. घरच्याघरीच साधासा छोटेखानी कार्यक्रम पार पडल्यानंतर ठरल्याप्रमाणे बाहेर जायचे म्हणून सगळे कारमध्ये जाऊन बसले.
"आपण नेमके कुठे जात आहोत?" कार मध्ये बसल्या बसल्या रावीचे प्रश्न सुरु झाले.
"पंधरा मिनिटापासून मी तेच ऐकत आहे. आता कुणाशी बोलणारच नाही मी." ती तोंड फुगवून बसली.
खरं तर तिच्या लाडक्या परीचा असा सकाळीच घाईघाईत बर्थडे साजरा करावा लागला, याचा तिला राग आला होता. तिने दिवसभराचा कार्यक्रम प्लॅन केला होता, पण या तिघांनी मिळून तिचा पूर्ण प्लॅन विस्कटून टाकला होता, आणि भरीस भर म्हणून तिचा लाडोबा देखील त्यांच्यात सामील झाला होता.
ती चिडत होती, तिला तसे बघून इतरांच्या चेहऱ्यावर आनंद उमटत होते.
आश्चर्याने गर्दीतून वाट सारत सर्वांसोबत रावी समोर आली. पुढचं दृश्य पाहून तिच्या डोळ्यात पाणी तरळले.
समोर नव्या हॉस्पीटलची नवी सुसज्ज इमारत तिची वाट पाहत उभी होती.
वेटिंग रूम, तिची केबिन, ओटी, ऍडमिट पेशंटसाठीच्या खोल्या. संपूर्ण हॉस्पिटल एकदम भारी पण या सर्वांत तिच्या मनाला भावली ती एक छोटीशी वस्तू.. जी तिचे लक्ष वेधत होती.
डीजीओची एंट्रन्स पास झाल्यावर सुमीसोबत केलेली पहिली पार्टी तिच्या डोळ्यासमोर फेर धरू लागली. तेव्हा किती उत्साहात ती बोलून गेली होती, `डॉक्टर रावी सुमती!´ आणि आज त्याच नावाची नेमप्लेट बघून तिला भरून आले.
लग्नानंतरची सहा वर्षे कशी भुर्रकन उडून गेली होती.
लग्न झाले, त्यानंतर तिचा कॉन्व्होकेशनचा कार्यक्रम, मॉमने इकडे करवून घेतलेली ट्रान्सफर, शांताकाकूला राहायला दिलेले तिथले घर. सुरुवातीचे तीन चार महिने ह्यातच गेले.
नंतर विराजसोबत वर्षभरासाठी अमेरिका!
तिथून सगळं सेटल केल्यावर ते भारतात परतले, ते `गोड बातमी´ घेऊनच!
मग काय? तिचे डोहाळे, त्या तिघांनी मिळून लाड पुरवणे ह्यात नऊ महिने कसे गेले कळलेच नाही. सर्व सुरळीत असतांना प्रसूतीच्या ऐन वेळेला बाळाने पोटात केलेली शी आणि मग वेळेवर सिजेरिअन सेक्शन करून अनीने बाहेर आणलेला तो चिमणा जीव!
तेव्हाही हाच गंधाळलेला ऋतू सुरु होता.
बारशाला नाव ठेवतांनाही तोच गंध मनात भरून सुमीने हळूच बाळाच्या कानात कुर्रर्र करून नाव सांगितले होते..
चार वर्षांपूर्वी तू याच दिवशी आई झालीस. आज तुझ्या लेकाचा वाढदिवस तसाच एक आई म्हणून तुझाही वाढदिवसच ना! त्यामुळे आजच्याच दिवशी हे हॉस्पिटल तुला सुपूर्द करायचे असे आम्ही सर्वांनी मिळून ठरवले होते."
सुमी तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली.
परीने तिच्या हातात तो पुष्पगुच्छ दिला.
विराज आणि अनीने तिला शुभेच्छा दिल्या.
"वन फॅमिली पिक?"
त्याला कडेवर उचलून बाकीच्यांकडे बघत तिने म्हटले तसे तिघेही तिच्याभोवती गोळा झाले.
********समाप्त ********
आणि आज अशाप्रकारे ही कथा संपलीय. तुम्हाला ती कितपत आवडली ते लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा.
आपल्या फेसबुकच्या पेजवर देखील ह्या शेवटच्या भागाला भरपूर लाईक्स येऊ द्या!
********
पारिजातचा हा शेवटचा भाग.. अंतिम भाग!
ही कथा लिहिताना ह्या कथेचा भाग कधी होऊन बसले, कळलेच नाही. कधी सुमी बनून अनीच्या आठवणीत झुरले, तर कधी रावी होऊन सुमीला सावरण्याचा प्रयत्न केला. लिहितांना कित्येकदा रडले. आजचा हा शेवटचा भाग, त्यात सगळा आनंदीआनंद आहे, तरीही `समाप्त´ लिहिताना डोळ्यात पाणी आलेच.
ही कथा होती सुमी आणि रावी या मायलेकीची! ही कथा होती सुमी आणि अनीच्या प्रेमाची ! सुमीवर निखळ प्रेम करणारा अनी ते काटेरी फणस असलेले डॉक्टर साठेची! ही कथा होती प्रेमाला पारखे झालेल्या विराजची!
ही कथा होती प्रत्येकाच्या मनात रुजलेल्या पारिजाताची!
अकरावीत असतांना मी लिहिलेली ही एक छोटीशी कथा होती, आता परत नव्याने लिहिताना ती एवढी मोठी होईल असे वाटले नव्हते.
पहिला भाग लिहिला, तेव्हाच मनात शेवटचा पार्ट लिहून झाला होता. रोज तो छोटा परिमल मला दस्तक देऊन जाई, "बाई गं, तुझ्या मनात तर आहे मी पण लेखणीतून कधी उतरवणार?" मी त्याला म्हणायचे, "गप रे. इतक्यात तू बाहेर येशील तर माझ्या कथेचे काय? तिला गुंडाळावे लागेल ना. तुझ्या जन्माचा आनंद आहेच, पण तो भाग मात्र कथेचा शेवटचा भाग असेल. तेव्हा सध्या माझ्या मनातच रहा."
आज त्याची इच्छा पूर्ण झाली. आपले बोबडे बोल घेऊन आलाच तो!
सगळ्या पात्राप्रमाणे तोही तुम्हाला नक्कीच आवडेल.
सर्वांचे खूप खूप आभार! हे प्रेम असेच राहू देत.
धन्यवाद!!
साहित्यचोरी हा गुन्हा आहे. तेव्हा लेखकांच्या मर्जीशिवाय त्यांच्या कथा, प्रसंग कुठेही शेअर करू नये. शेअर करायचे झाल्यास फेसबुकची लिंक नक्कीच शेअर करू शकता.
धन्यवाद!