Feb 22, 2024
प्रेम

पारिजात.. गंध प्रेमाचा..! भाग - 45 अंतिम (पूर्वार्ध स्पेशल!! )

Read Later
पारिजात.. गंध प्रेमाचा..! भाग - 45 अंतिम (पूर्वार्ध स्पेशल!! )


आपण वाचत आहात, एका गंधाळलेल्या प्रेमाची सुगंधित कहाणी.
पारिजात.. गंध प्रेमाचा..!


************थोड्याच वेळात तयार होऊन ते खाली आले. पिस्ता कलरची शेरवानी घातलेले.. अगदी राजबिंडे रूप! सगळे त्यांचीच वाट बघत होते. त्यांची नजर मात्र सुमीला शोधत होती.

"वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!" लाडूंनी भरलेली प्लेट त्यांच्यासमोर धरत सुमी म्हणाली.
आणि ते तिच्याकडे बघतच राहिले.. पुन्हा एकदा!

पुन्हा एकदा  समोर तीच उभी!  चेहऱ्यावर निरागसता, डोळ्यातील अवखळपणा अगदी तसेच, पुन्हा एकदा!

सकाळी त्यांनी थांबवले असते तर कदाचित ती थांबली असतीही, पण तेव्हा हा अवखळपणा नसता दिसला. काहीशी गोंधळलेली, बावरलेली असती ती. मनातील सर्व किल्मिष बाजूला सारून आता ती स्वतःहून परतली होती, तेव्हा ती पूर्वीचीच सुमी भासत होती!

सकाळी काही क्षणासाठी ती त्याची सुमी होतीच, पण तिच्यात रावीची मॉमसुद्धा दिसत होती.
आता समोर असलेली सुमी फक्त त्याची होती, तिच्या अनीची.. पुन्हा एकदा!


"वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा अनी!  तुझ्या आवडीचे लाडू आणलेत, घे, ना. तोंड गोड कर."  ओठांवर गोड स्मित ठेऊन ती तशीच उभी होती.

हे तेच गोड हसू, मालतीताईच्या लग्नात हरवलेले. अंगावर अजूनही तीच साडी, तिच्या लग्नात घालून मिरवलेली. ते सगळे क्षण डोळ्यांपुढे उभे राहिले पुन्हा एकदा!


त्याला तसे एकटक बघताना पाहून तिच्या टपोऱ्या डोळ्यात सक्त ताकीद देऊनही पाणी जमा व्हायला लागले.


"सुमी, तू इथेच आहेस होय! घाबरलो होतो ना मी. मला वाटलं की माझ्यावर रागावून तू निघून गेलीस की काय? माझं प्रेम मी परत हरवले की काय?"
तिच्या हातातील लाडूंची प्लेट बाजूला ठेवत ते म्हणाले.

" अशी कशी रे तुला सोडून परत जाईन? आधीही एकमेकांच्या मनात होतोच की आपण. आपल्या प्राक्तनात आपणच आहोत हे एवढ्या वर्षांनी का होईना पण नियतीलाही मान्य झाले. म्हणूनच आज परत भेटलोय ना?" त्याला घास भरवत ती म्हणाली.

त्यानेही तिला घास भरवला. विनातक्रार तिनेही तो खाल्ला.

"सुमी? तुला तर गोड आवडायचे नाही ना? तरीही खाल्लेस?" तो.

"प्रेमात पडल्यानंतर तुझ्या सवयी माझ्या कधी झाल्या, नाही रे आठवत."  बाहेर पडू पाहणाऱ्या अश्रुंना डोळ्यात थोपवत ती म्हणाली.

ते तिच्याकडे पाहतच राहिले. तिला आवडणारी कॉफी त्यांच्या आवडीची केव्हा झाली, ते तरी कुठे सांगू शकले असते?

" मघापासून बघतो आहेस, पण कशी दिसतेय ते एकदाही सांगितले नाहीस. सांग ना अनी, कशी दिसतेय मी?"
तिने त्याच्याजवळ येऊन प्रश्न केला.

" खूप सुंदर ! "
तो म्हणाला.

" बस! एवढंच? अजूनही तूला कौतुक नाही का रे करता येत?"
ती तोंड फुगवून जायला वळली आणि त्यांना मालतीताईच्या लग्नातला प्रसंग आठवला. पुढ्यात उभे तेच नितळ सौंदर्य, तीच अवखळ अदा! पुन्हा एकदा!

पाठमोऱ्या झालेल्या तिचा हात त्यांनी पकडला,
" खरं सांगू? असं वाटतंय की याच क्षणी आपलंही लग्न व्हावं!

एवढी सुंदर दिसते आहेस ना सुमी की आता तुझ्यापासून दूर नाही राहवतंय मला! "

तिचा हात हातात घेऊन तिच्याजवळ जात ते बोलले.
तब्बल पंचवीस वर्षांनी झालेला हा स्पर्श!
त्या स्पर्शानेच ती शहारली!

त्यातच त्याचं ते मधाळ बोलणं, तिला ताईच्या लग्नाच्या मांडवातील ती भेट आठवली. लाजेनेचं ती चूर झाली.


जवळ येत त्याने हलकेच तिच्या हनुवटीला उचलून तिचा चेहरा ओंजळीत पकडून वर केला.

" सुमी.
लग्न करशील माझ्याशी?"

तिच्या डोळ्यात डोळे घालून त्यानं विचारलं.

त्या काळ्या डोळ्याच्या डोहात ती हरवली, स्वतःला विसरून..
पुन्हा एकदा!
"मॉम.. प्लीज, से येस! प्लीज, प्लीज. ह्यांच्याएवढं प्रेम करणारं पुन्हा तुला दुसरे कोणीच नाही मिळणार! डोन्ट लूज दिस चान्स."

एका हाताचे बोटं क्रॉस करून आणि दुसऱ्या हाताने विराजचा हात घट्ट पकडून रावी एका कोपऱ्यात उभी होती. हिने मध्ये कसली गडबड करू नये म्हणून विराजच तिला तिकडे घेऊन गेला होता. ही अशी पुटपुटायला लागली, तसे विराजने तिच्या ओठांवर आपला हात ठेवला.

"पार्टनर, काय चाललंय तुझं? तुझ्या आवाजाने त्यांचे लक्ष विचलित होईल ना." तो तिच्या कानाशी कुजबुजला.
आतापर्यंत ती त्याच्याशेजारीच त्याला पकडून उभी होती. पण आत्ता त्याच्या बोटांचा स्पर्श तिच्या ओठांना होत होता. त्या मखमली स्पर्शाने तिच्या अंगावर शहारा आला. तिने आपले डोळे त्याच्यावर रोखले.

त्याने नजरेनेच "काय" म्हणून विचारले.डोळे खाली करून तिने त्याच्या बोटांकडे इशारा केला, तसे त्याने कळून चटकन आपला हात मागे घेतला.

त्याला तसे बघून तिला हसू येत होते, पण तिने स्वतःवर आवर घातला. आपल्या ओठांवर बोट ठेऊन ईशाऱ्यानेच त्याने तिला गप्प राहायला सांगितले."सांग ना सुमी, लग्न करशील माझ्याशी? समाज, जात, वय.. साऱ्यांचे बंधन झुगारून कायमची माझ्याजवळ राहशील? उरलेले आपले संपूर्ण आयुष्य माझ्यासोबत घालवशील?"

त्यांचे डोळे सुमीच्या डोळ्यांत स्थिरावले होते. बोलतांना तो काळाभोर डोह काठोकाठ भरला होता.

"पुढील जन्म, सात जन्म वगैरे असतात की नाही, काही माहीत नाही रे मला. पण होय, या जन्मातले उरलेले संपूर्ण आयुष्य मला तुझ्याच सानिध्यात घालवायला आवडेल. अर्धे आयुष्य तर असेच सरले रे, आता सगळी बंधने झुगारून तुझ्यासोबतीने म्हातारे व्हायला आवडेल मला.
अनी, तू पहिल्यांदा मला लग्नाबद्दल विचारले होतेस तेव्हा मी उत्तर देऊ शकले नाही, पण आता सांगतेय, तुझ्याशी लग्न करायला मला आवडेल!"


त्याच्या मस्तकाला आपले मस्तक टेकवून ती म्हणाली. इतका वेळ दोघांनीही रोखून धरलेले अश्रू एकाच वेळी डोळ्यातून खाली ओघळले आणि एकमेकांत मिसळून गेले."येssसss! दॅट्स लाईक माय मॉम!" रावी जल्लोषात ओरडणार तोच विराजने पुन्हा तिच्या ओठांवर हात ठेवला.
"रावी, गप ना जरा. त्यांना पुढे बोलू तर दे." तो परत कुजबुजला. तिने इशाऱ्याने हात बाजूला करायला सांगितले पण ह्यावेळी त्याने मुद्दाम तिच्याकडे दुर्लक्ष केले.


"थँक यू सुमी.. थँक यू सोss मच! तुला माहीत नाही मी किती किती खुश आहे, आय लव्ह यू सो, सो, सो मच!"
आनंदाने तिला उचलून गोल गिरकी घेत ते.

"हो,  हो माहीत आहे मला. आधी खाली उतरव बघू. पडेन ना मी, आत्ता कुठे तुझ्यासोबत स्वप्नं पाहायला सुरुवात केलीय, इतक्यात पडायचं नाहीये रे मला."  ती.

" सुमी, अजूनही तशीच आहेस, निरागस,अवखळ."  अनीने तिला खाली ठेवले.

"आणि पडलीस तरी मी आहे ना, मी सावरेन तुला."  तिच्या डोळ्यात बघत ते म्हणाले.

"अनी, तू कायम सोबत आहेस हे मला ठाऊक होतं रे, पण तुझी साथ द्यायला मीच कमी पडले. ह्यापुढे असं नाही होणार, मी तुझ्यासोबत असेन..नेहमी! अनी आय लव्ह यू टू!" डोळ्यांच्या पापण्या न हलवता ती अगदी हळुवार म्हणाली.

नजरेत कैद झालेल्या तिला त्यांनी आपल्या ऊबदार बाहुपाशात कैद केलं. त्यांच्या मिठीत ती केव्हा विसावली तिलाही कळले नाही.

एवढी वर्ष ह्याचीच तर वाट होती, एक हक्काचा आपला माणूस, ज्याच्या मिठीत विसवल्यावर सगळ्या गोष्टींचा विसर पडावा. सगळी दुःख हरवून जावीत. आयुष्याच्या अंगणात फक्त सुखाचा सडा पडावा. सगळे आयुष्य गंधाळून जावे, त्या पारिजाताच्या सुगंधाप्रमाणे!रावीच्या तोंडावर ठेवलेल्या हातावर ओलसरपणा जाणवला, तसे विराजने तिच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याने लागलीच आपला हात बाजूला केला. " काय झाले पार्टनर? तू का रडतेस? सगळे ठीक चाललेय ना?"  तो.


"हो रे वेड्या, ठीक चाललेय सगळे. मी रडत नाहीये. हे तर आनंदाश्रू आहेत. किती वर्षांपासून मी या क्षणाची वाट बघत होते. एखाद्या आईला आपल्या लेकीची जी हुरहूर असते ना ती मी अनुभवलीय. सारखं वाटायचं, कुठूनतरी अचानक माझ्या सुमीचा अनी तिच्या समोर यावा आणि तिच्या सर्व दुःखावर हळूच प्रेमाची फुंकर घालावी. खूप सोसलंय रे तिने. अनी आयुष्यातून गेला आणि ती पूर्णपणे तुटून गेली होती. माझ्यात तिने तिच्या अनीला शोधलं. होतं नव्हतं सर्व प्रेम माझ्यात ओतलं. मी म्हणजे तिचे सर्वस्व झाले. सगळी नाती तिने निभावली. कधी प्रेमानं समजावणारी माझी मॉम, कधी हक्काने भांडणारी मैत्रीण तर कधी हट्ट करणारी सुमी झाली. आनंदी होतो आम्ही, पण तिच्या मनाचा तो हळवा कोपरा दरवेळी तिचे एकटेपण अधोरेखित करायचा.

कळायला लागल्यापासून माझ्या मनात एकच ध्यास होता, सुमी आणि अनीची लव्हस्टोरी पूर्ण करायची! आज ती पूर्ण होतेय, त्या आनंदाचे हे अश्रू आहेत."   ती हळवी झाली होती.

"तुला माहीतीय विराज, मॉमबद्दल मी खूप पजेसीव्ह आहे अरे. तिला मी असे कधी दुसऱ्यासोबत शेअर करूच शकले नाही. लहानपणी शाळेतल्या मैत्रीणी घरी आल्या आणि तिच्या मागेमागे करू लागल्या की जाम चिडायचे मी. तू तिला आपली मॉम बनवलेस, तेव्हाही तुमचं बॉण्डिंग बघून मी जेलस झाले होते. आज मात्र या क्षणी अशी कोणतीच भावना मनात नाहीये. ती जेवढी माझी आहे ना तेवढीच ती तिच्या अनीची आहे, किंबहुना त्यापेक्षा जरा जास्तच.

आज दोघांना असं बघून मनात एकच भावना आहे.. आनंदाची, पूर्णत्वाची! दे आर हॅपी टुगेदर! आय एम अल्सो हॅपी, टू, टू, टू मच हॅपी!"
त्याच्या खांद्यावर आपली मान ठेवत ती म्हणाली.

"येस पार्टनर, दे बोथ डिजर्व्ह धिस हॅपीनेस! लेट्स सेलिब्रेट दिस मोमेंट्स टूगेदर!"
तिच्या खांद्याला हलके थोपटत तो म्हणाला.

"विराज, आधी मला एक प्रॉमिस कर, पुढे कधी काहीही झालं, माझं चुकलं तरी नेहमी माझ्यासोबत राहशील ना? माझा नवरा बनताना माझा मित्र आहेस हे तर विसरणार नाही ना?"

" माय डिअर, सगळ्यात पहिले तुझ्याशी पार्टनरशिप केली, ती मैत्रीच्या नात्याची! नवराबायको म्हणून कधी आपल्यात खटके उडतीलही, तेव्हा प्रियकर होऊन मी तुला नक्कीच मनवेन. पण इतर वेळी मात्र आपली मैत्री नेहमीच अबाधित राहील, आय प्रॉमिस यू!" तिचा हात हातात घेत तो.सुमी आणि अनी एकमेकांच्या मिठीत हरवले होते.


"हूं हूं ss" मोठ्याने खाकरत रावी आणि विराज समोर आले.

"सो, लव्हबर्ड्स तुमचे झाले असेल तर केक कट करायचा?" रावीच्या आवाजाने दोघेही मिठीतून बाहेर झाले.

"म्हणजे तुम्ही दोघांनी लाडू खाल्लेत, पण आमचं काय? आम्ही केव्हाची वाट पाहतोय."
मिश्किल हसत विराज.

त्या दोघांच्या बोलण्याने सुमीने लाजून चेहरा झाकला.

"मॉम, कसली भारी लाजतेस यार तू? माझे सर तर फिदाच होऊन जायचे. काय हो सर?"
तिने मोर्चा अनीकडे वळवला.

" तुझ्या मॉमच्या प्रत्येकच अदावर मी केव्हाचाच फिदा झालोय!" तिला टाळी देत ते म्हणाले.

थोड्यावेळाने त्यांनी केक कापला. सगळ्यांनी "हॅपी बर्थडे टू यू!" चा ताल धरला होता.

" मग काय ठरवलंय? चट मंगनी पट ब्याह? की आणखी काही? "
केक भरवताना विराजने अनीला विचारले.

"आणखी काही म्हणून काय विचारतोस रे? मी यांना सर म्हणून खरेच कंटाळलेय, आता फक्त डॅडू म्हणायची वाट बघतेय." अनीच्या गळ्यात पडत रावी म्हणाली.

" रावी, तू तर केव्हाच माझी लेक झाली आहेस. फक्त ऑफिशियल स्टॅम्प तेवढा बाकी आहे."  तिचे गाल ओढत अनी.
 
"वा! रे, ती तुझी लेक मग मी कोण?"  लटक्या रागाने विराज.

" तू ना? तू घरजावई  या घराचा! हो ना डॅडू?"  भुवई उंचावत अनीकडे बघत ती.

" नो प्रॉब्लेम! चालेल मला."  त्यांच्या मिठीत सामील होत विराज म्हणाला.

ते चौघे एकमेकांच्या सोबत होते. अनी आणि सुमी, सोबत विराज आणि रावी.  एका आनंदी चौकोनी कुटुंबाचे चित्र आज पूर्ण झाले होते. "एक सेल्फी तो बनती है!" म्हणत रावीने मोबाईलचा कॅमेरा ऑन केला.
"खीचॅsक!" कॅमेऱ्याच्या आवाजाने मोबाईलमध्ये तो क्षण कैद झाला, सोबतच त्या चौघांच्या मनाच्या कॅमेऱ्यात देखील ती फोटोफ्रेम बंदिस्त झाली.
.

.

क्रमश :

***********

क्रमशः? लिहिणार नव्हतेच, पण लिहिले. हा पार्ट अंतिमच, पण पूर्वार्ध!  कथेचा शेवट आणि उत्तरार्ध वाचा उद्याच्या भागात.

तोवर हा भाग कसा वाटला नक्की सांगा. आणि फेसबुक पेजवर देखील लाईक आणि कमेंट करून सांगा.


साहित्यचोरी हा गुन्हा आहे. तेव्हा लेखकांच्या मर्जीशिवाय त्यांच्या कथा, काही भाग किंवा प्रसंग इतरत्र कुठे शेअर करू नये.  धन्यवाद!
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//