Feb 28, 2024
प्रेम

पारिजात.. गंध प्रेमाचा..! भाग -43

Read Later
पारिजात.. गंध प्रेमाचा..! भाग -43


आपण वाचत आहात गंधाळलेल्या प्रेमाची एक सुगंधित कहाणी.


पारिजात.. गंध प्रेमाचा..!


(मागच्या भागात आपण सुमी आणि अनीची भेट अनुभवली. पण त्यानंतर काही न बोलता ती तेथून निघून जाते. तिने असे का केले असावे, वाचा आजच्या भागात.)
******"एकदा गमावलेस तू तिला, परत तेच रिपीट नको करू."

आपले दोन्ही हात त्यांच्या खांद्यावर ठेवत विराज म्हणाला. आज त्यांना तो भाच्यापेक्षा एका सच्च्या मित्रासारखा भासला.

"तिच्याबद्दल तुला आणखी काय माहीत आहे?"   त्यांच्या प्रश्नातील हळवेपण त्याला जाणवले.

"बरंच काही. कदाचित तुला माहीत नसेल, ते सुद्धा!"  तो.

"म्हणजे? स्पष्ट काय ते सांग ना."  त्यांची उत्कंठता शिगेला पोहचली.

"बसून बोलूया?"  तो.

त्यांना जायचं होतं, पण आता सुमीबद्दल जाणून घेणं जास्त आवश्यक वाटत होतं.

ते बसले. तो स्वयंपाकघरातून कॉफी घेऊन आला. त्यांच्यापुढे मग ठेवत आपल्या कॉफीचे घोट घ्यायला त्याने सुरुवात केली.

"आतातरी सांगशील का?"  त्यांची उताविळता डोळ्यात स्पष्ट दिसत होती.

" तू त्यांना थांबवलं का नाहीस?"
त्यांच्या मनाचा वेध घेत विराजने विचारले.

"तिलाच जायचं होतं म्हटल्यावर मी कसं थांबवू?"
आपली नजर खाली करत ते म्हणाले.

"एकदा म्हटलं असतंस, `थांब!´ तर तुझी सुमी नक्कीच थांबली असती. आयुष्याची दोन तप थांबलीच की ती तुझ्यासाठी, आता केवळ एका हाकेची गरज होती रे."
-विराज.

"तुला कसं माहीती हे सर्व?"  त्यांनी त्याच्याकडे बघितलं.

" मामा, अरे स्वतः प्रेमात पडल्यावर दुसऱ्यांच्या वेदना आपोआप जाणवायला लागतात, अजून वेळ नाही गेलीय रे, तू तिला परत घेऊन ये ना."    तो.

"आणि रावी? तिच्या मॉमला मी परत बोलावलं तर तिला आवडेल?"  त्यांचा प्रश्न.

"अरे, सुमीला तिचा अनी परत मिळावा म्हणून हा सगळा घाट तर रावीनेच घातलाय. आवडेल म्हणून काय विचारतोस? तुम्ही दोघे एकत्र आलात तर सर्वात जास्त आनंद तिलाच होईल."
तो मंद हसून म्हणाला.

" आणि तिचे वडील? त्यांचं काय?"  ते.

" ह्या जगात मॉमशिवाय कुणीच नाहीये तिचं."  तो खिन्नपणे म्हणाला.

त्यांची प्रश्नार्थक नजर त्याच्यावर खिळली. त्यांना काय विचारायचं हे त्याच्या लक्षात आले. त्यानेही मग रावीच्या आयुष्याचे न उघडलेले ते पान त्यांच्यासमोर उघडे केले. एका क्षणात पूर्ण नष्ट झालेल्या कुटुंबाची ती दुःखद घटना ऐकून ते हेलावले.

"म्हणजे रावी ही मालतीताईची मुलगी. तो पारिजात सोडला तर मालतीताईच तर आमच्या प्रेमाची एकमेव साक्षीदार होती!" त्यांना खूप भरून आलं.

" हं, कदाचित म्हणूनच तिलाही तुम्हा दोघांना एकत्र आणायची ओढ असेल. मामा आता आणखी विचार नको करू रे, जा तू, तुझ्या सुमीला परत घेऊन ये."  तो.
 
"थँक यू!  राजा, मी लगेच निघतो."  त्याला आलिंगन देत ते पळतच बाहेर गेले."मॉम, तू अशी का निघून आलीस? आतातरी सांगशील का? आणि ते रडणे आधी बंद कर बघू."
कारमध्ये इतका वेळ शांत बसलेली रावी घरात आल्याबरोबर तिला जाब विचारायला लागली.

"सरांना किती वाईट वाटले असेल याचा जरासुद्धा विचार आला नाही का गं तुझ्या मनात?"  तिची नाराजी सुमीला जाणवत होती.

"खूप जवळचे आहेत तुला तुझे डॉक्टर साठे?"

" हो."

"माझ्यापेक्षाही?"

"काहीही काय गं? तुझी जागा कोण कशी घेऊ शकेल?"  तिला मिठी मारत ती म्हणाली.

"मग तरीही त्यांच्यासाठी का भांडतेस माझ्याशी?"  डोळे पुसत ती म्हणाली.

" माझी ममुडी! तुला नेमकं काय खातंय? तुला माहीत आहे ना, माझ्या मनात त्यांची स्पेसिफिक अशी एक स्पेस आहे गं. तू तिथे अशी का वागलीस मला उमगत नाहीये, म्हणून तुला विचारतेय. आणखी काही नाही गं."
अगदी मृदू आवाजात रावी बोलत होती.

"बरं सोड ते. तू आधी फ्रेश हो,  नंतर आपण बोलूया. तोवर मी तुझ्यासाठी मस्त कडक कॉफी बनवते."
ती स्वयंपाकघरात जायला वळली.

"बच्चू, तुला ठाऊक आहे, डॉक्टर साठे म्हणजे कोण आहेत ते?"   पाठमोऱ्या वळलेल्या तिला सुमतीने विचारले.

"कोण?"  रावी तिच्याकडे वळली.


" तुझे डॉक्टर साठे म्हणजे माझा अनी आहे, गं."
तिचे डोळे पुन्हा भरून आले.

"मला माहीत आहे अगं."
तिच्याजवळ येत ती म्हणाली.

आता चकित व्हायची पाळी सुमीची होती.तिला वाटलं होतं, अनी म्हणजेच डॉक्टर साठे,  हे ऐकल्यावर रावीला झटका बसेल, पण इथे उलटेच घडले होते.


"सॉरी मॉम, खरे तर मला नुकतेच काही दिवसांपूर्वी कळले. तुला सांगणार होते पण असे सांगण्यापेक्षा सरप्राईज द्यावं असं मला वाटलं."
आपले कान पकडत रावी छोटुसा चेहरा करून म्हणाली.

" म्हणजे तू मला मुद्दाम तिथे घेऊन गेलीस?"  ती. 

" हो, घेऊन तर गेले होते, पण उंबरठ्याबाहेरच थांबवलेदेखील. तू आत आलीस ते त्यांच्याविषयीच्या असणाऱ्या आंतरिक ओढीने."
-रावी.

"तिथंवर देखील का घेऊन गेलीस बच्चा? मी आनंदी होते ना गं. शांत पाण्यात खडा फेकून मारावा आणि त्या पाण्यात असंख्य तरंग उठावेत तसं झालंय आता. नुसती सैरभैर झालेय मी. त्याला बघून स्वतःला नाही सावरू शकले मी."

"खरंच मॉम, तू आनंदी आहेस? दिवसातले कित्येक क्षण अनीच्या आठवणीत झुरतांना तुला पाहिलंय गं मी."
तिच्या मर्मावर रावीने घाव घातला.

"आणि त्यांना बघून सावरासावर करायची गरजच काय? जे मनात होतं ते का तू बोलली नाहीस ?"

"तुला कळत कसं नाहीये रावी, माझा अनी म्हणजे तुझे डॉ. साठे आहेत. विराजचे मामा!"  सुमी प्रत्येक शब्दावर जोर देत म्हणाली.

"सो व्हाट? त्याने काय फरक पडतो?"   रावी.

"फरक पडतो बच्चा, तू लहान आहेस अजून. तुला नाही कळायचे."

"आणि आनंदी होते का म्हणून विचारलंस ना? हो होते मी आनंदी. तुझं माझं छोटुसं कुटुंब, सोबत अंगणातला पारिजात आणि भूतकाळातील माझा अनी.. हे आयुष्य पुरेसं होतं मला. आयुष्यभर मनात जपलेला अनी असा या वळणावर, ह्या रूपात भेटेल असं वाटलं नव्हतं गं मला."
मी सुखी होते ना रावी, का त्याच्याशी भेटवलंस?"

डून सुकलेल्या डोळ्यात परत पाणी जमायला सुरुवात झाली.


"स्वतःलाच कितीदा फसवशील अगं? एकदा भूतकाळातून बाहेर पड ना. वर्तमानातल्या तुझ्या प्रेमाला पारखून तर बघ. सरांच्या डोळ्यातील भाव कळलेच नाहीत असे मला नको भासवू. जशी तू थांबलीस तसे तेही थांबलेत.. फक्त तुझ्यासाठी! आजवर त्यांनी स्वतःला थोपवलं होतं कारण तुझ्याकडे कधी परत येणार नाही असे आजोबांना त्यांनी वचन दिले होते. मनावर दगड ठेऊन ते वचन त्यांनी निभावलंय. पण तू हे का विसरतेस की आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुझी वाट पाहीन म्हणून त्यांनी तुलादेखील एक वचन दिले होते. मॉम, आजही ते त्यांच्या सुमीच्या वाटकडे डोळे लावून बसले आहेत गं. एक वचन तर त्यांनी पाळले, आता दुसऱ्या वचनाच्या पूर्ततेची तुझी पाळी आहे. खूप झाले आजवर, आता एक पाऊल तू पुढे टाकून तर बघ ना."

हळुवारपणे रावी तिला समजावत होती. तिचा तो ठाम पण मृदू स्वर, क्षणभर सुमीला मालतीताईचीच आठवण झाली. अगदी तिच्यासारखीच रावी बोलतेय असं तिला वाटलं.

" तू म्हणतेस तसे इतकं सोप्पं नाहीये बाळा हे!"  सुमी म्हणाली.

"कठीण तरी काय आहे त्यात? सांग तर मला."  ती.

"कसं सांगू? इतक्या वर्षांनी मी त्याला बघितले आणि सगळा भूतकाळ जशाचा तसा डोळ्यासमोर उभा राहिला. तो माझ्या मनात आहेच पण मी त्याच्या मनात आहे हे पहिल्याच नजरेत मला जाणवलं. मीही भावनेच्या भरात वाहत होते आणि मग लक्षात आलं की हा अनी केवळ माझा अनीच नाही तर तुझे साठे सरसुद्धा आहेत, ज्यांच्याकडे मला तुझ्या आणि विराजच्या लग्नाची बोलणी करायची आहे. एकाच व्यक्तीला दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून नाही पाहू शकले गं मी. मला थोडा वेळ हवाय. स्वतःला सावरू तर दे."
-सुमी.

"एक सांगू? स्वतःच्या भावनेवर आवर घालून सावरू बघत असशील तर तसे नको गं करू.  उगाच सगळा गुंता होईल."  ती.

"गुंता तर ऑलरेडी झालाय बच्चा. विराजच्या मामासोबत तुमच्या लग्नाची बोलणी करतांना मनातील अनी बाहेर डोकावला तर? तर मी काय करू?"

"हेच की माझ्या आनंदासाठी तू स्वतःचा आनंद नको हरवू. विराज आणि माझ्यामुळे तुमचे नाते बदलेल ही भीती तुला अस्वस्थ करत आहे ना? असे असेल तर त्याच्यासोबतचे सगळे नाते संपवायला मी तयार आहे."  ती.

"वेडी आहेस का रावी? आपले प्रेम हरवणे काय असते हे मी चांगल्याने अनुभवलेय. चुकूनही हा भलता विचार मनात आणू नको बाळा."  हळवी होत सुमी म्हणाली.

" मग मॉम तुही तुझं परत मिळालेलं प्रेम हरवू नकोस ना. विसर ना सगळं, माझी मॉम आहेस हे सुद्धा विसर आणि सरांकडे फक्त सुमीच्या नजरेने बघ. पुढचे पाऊल उचलणे कठीण होणार नाही मग."  तिला प्रेमाने मिठी मारत ती म्हणाली.

"खरंच शक्य होईल का गं हे? तेही या वयात?"  सुमी.

" मॉम, प्रेमाला वय नसते अगं. हे मी तुला सांगायला हवं का? नकळत्या वयात प्रेमात पडलीस तरीही ते प्रेम आजवर मनाच्या कुपीत जपलेस की. आता तर वयाने, अनुभवाने इतकी प्रगल्भ झालीस,  मग कुणाची भीती? "

" हा समाज!  स्वीकारेल हे सगळं? "

" कोणत्या समाजाबद्दल बोलतेस मॉम? ज्या समाजाच्या भीतीपोटी आजोबांनी तुझ्या लग्नाला नकार दिला, त्या समाजाला तू कधीपासून घाबरायला लागलीस? आतापर्यंत एकटी जगली तेव्हा कुणीच विचारायला नाही आलं, आताही कोणालाच फरक पडणार नाही. इतक्या वर्षापासून प्रेमात आहेस, थोडं हातपाय हलवायला शिक जरा, नाहीतर नाकातोंडांत पाणी जाऊन उगाच तळाशी जाशील."  तिचा हात हातात घेत रावी.

"किती छान समजावते आहेस बच्चा! असं वाटतेय, तू नाही तर तुझ्या मुखातून मालतीताईच बोलतेय."

"तुझ्याकडूनच शिकलेय, शेवटी तुझीच लेक ना मी."  हसून ती म्हणाली.

" केवळ लेक नाही, तू तर सर्वस्व आहेस माझं. पण तूच सांग तुझ्या होणाऱ्या सासऱ्यांकडे त्या नजरेने कशी बघू? "
सुमी.


" नाही हं मम्मा. ते तर विराजचे सासरे होतील. तुझा अनी मला फक्त माझा डॅडू म्हणूनच हवाय."  ती गोड हसून म्हणाली.

"रावी.."
तिचा चेहरा लाजल्यासारखा झाला. "जरा जास्तच बोलायला लागलीस हं तू!"  तिचे नाक खेचत ती म्हणाली.

"अगं, खरंच! दोन वर्षांपासून सर म्हणून कंटाळलेय मी. आता आयुष्यभरासाठी मला त्यांना फक्त डॅडू म्हणायचंय."  तिच्या गालाला गाल घासत रावी म्हणाली.
 इकडे "थँक यू! विराज." म्हणून ते बाहेर पडले. नेहमी आवडणारी कॉफी आज त्यांना नकोशी होती. अंगात अठरा वर्षाच्या तरुणासारखा उत्साह संचारला होता. कुणी डॉक्टर साठे म्हणून नव्हे तर आज केवळ सुमीचा अनी बनून तिला परत आणायचा निर्धार करून त्यांनी कार स्टार्ट केली. सुमीच्या भेटीने सगळ्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या होत्या. मनात एकच आस, कसलेही स्पष्टीकरण न मागता तिला सोबत आणायचे. एवढे दिवस एकटीने सगळं भोगलं आता तिच्या आयुष्यात फक्त आणि फक्त आनंद भरायचा. बस्स! ती सोबत हवीय, आणखी पुन्हा काही नको.
विचार करत ते ड्राईव्ह करत होते, तोच त्यांचा मोबाईल खणखणला. हॉस्पिटल मधून कॉल होता, इमरजन्सी केस असल्यामुळे त्यांना त्वरित बोलावले होते. इतका वेळ फुलपाखरू बनून उडणारे मन अचानक परत आपल्या जागेवर आले. आधी कर्तव्य महत्वाचे म्हणून त्यांनी आपली कार हॉस्पिटलच्या दिशेने वळवली.
.

.

.

क्रमश :

**********

आजच्या भागाने  सुमी अशी अचानक का निघून गेली असावी, या शंकेचे निरसन नक्कीच झाले असावे, अशी आशा करते. तिच्या मनातील विचार तुम्हाला योग्य वाटले की नाही आणि आजचा पार्ट कसा वाटला, नक्की कळवा. सुमी आणि अनीची ही कथा निर्णायक वळणावर पोहचलीय. पुढचा पार्ट हा अंतिम असेल. तोवर वाचत रहा, कमेंट करा, लाईक करा. धन्यवाद!ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//