पारिजात.. गंध प्रेमाचा..! भाग -42

अनी आणि सुमी. परत एकदा ❤❤


आपण वाचत आहात, एका गंधाळलेल्या प्रेमाची सुगंधित कथा.

पारिजात.. गंध प्रेमाचा..!

(मागील भागात आपण अनुभवली अनी आणि सुमीची भेट, आता पुढे.)

*******

हा तोच.. पहिल्या भेटीत तिला दारात असाच धडकलेला तिचा अनी!
तिची ती अनिमिष नजर त्या काळ्याभोर डोळ्यात अडकली.. परत एकदा!

"सुमी?"
त्यांच्या मुखातून आनंदाने हाक निघाली. चेहऱ्यावर आनंद, आश्चर्य, अविश्वास सगळेच भाव उमटले. प्रवासाने थकलेला तिचा चेहरा प्राजक्त बघून फुलला होता. केस थोडे विस्कटलेले, पण बाकी तशीच, पूर्वीसारखी.

खरेच सुमीच का ही? तोच सावळा वर्ण, टपोरे डोळे, हनुवटीवरचा तीळ.. आणि नाक? तसेच अपरे!

" सुमी, अगं इथे कशी? कधी आलीस? कुणासोबत? "
त्यांच्या प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली.
तिचा हात त्यांच्या हातातच.
"काय वेंधळ्यासारखा विचारतोय, आधी आत तर ये."


आनंदाने त्यांच्या गव्हाळ वर्ण आणखी तेजोमय दिसत होता. हृदयाची स्पंदने आपोआप वाढली होती. डोळ्यात ढगांची गर्दी होत होती.
आणि ती..? तिच्याही डोळ्यात साचलं होतं आभाळ, अगदी भरगच्च! केव्हा कोसळेल, नेम नाही. ती अगदी गोठल्यासारखी त्याच्याकडे बघत होती. ज्याच्या आठवणीत अर्ध आयुष्य सरलं तो असा अवचित समोर उभा!


"सुमी, ये ना आत."
त्याने पुन्हा आग्रह केला.
"अनी.."
तिच्या तोंडून आपलं नाव ऐकून इतका वेळ रोखून धरलेले थेंब तिच्या हातावर रिचले.

"नकटू, किती वर्षांनी ही हाक ऐकली गं. अनी म्हणून हक्काने साद घालणारी कुठे होतीस तू?"

तिच्या नाकाला ओढत त्याने म्हटलं आणि तिच्या डोळ्यातील आभाळ रिते व्हायला लागले.


"मी नकटू? तू आंधळा.. एवढी मोठी दिसले नाही तुला मी? धक्का दिलास ना? सगळी फुलं खाली सांडली ."

"ये, मी धक्का नाही दिला हं, तूच मला येऊन धडकलीस."

" मला काय माहीत रे, तू दारात उभा राहणारेस म्हणून?"

तर मग मलाही कुठे माहीत होतं गं, तू अशी धाडकन आत येणार आहेस म्हणून? तिखट मिरची कुठली. "

" मी तिखट मिरची? मग तू ना कडू कारलं."

"तू जाडी म्हैस."
" कुठून जाडी दिसतेय रे, तूच ढोल्या.. "

पंचेवीस वर्षांपूर्वीचे भांडण जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहिले.
दोघांचा बांध मोकळा झाला.

पहिल्यांदा भेटलेले क्षण परत जागे झाले, ती भेट, ते भांडण. फरक एकच, तेव्हा त्यांच्यातील ना उमगलेल्या नव्या नात्याचा होणारा आरंभ होता आणि आता उमगलेल्या नात्याच्या परिपूर्णतेची सुरुवात होती.


विराजच्या खोलीतून बाहेर पडताना रावीच्या दृष्टीक्षेपात सुमी आली. ती काही बोलणार तोच विराजने तिला आत ओढलं.

"विराज, तिला गरज आहे माझी. मला जाऊ दे खाली."  रावी घायघुतीला आली होती.

"वेडी आहेस का पार्टनर? आता कुठे निघालीस तू? बोलू दे त्यांना."

"विराज, मॉम खूप इमोशनल आहे अरे, रडतेय ती. तिला आधार हवाय."

"तुझ्या सुमीचा अनी समोर असतांना आणखी कोणाच्या आधाराची गरज भासेल असं वाटतं तुला?"  तिला जवळ घेत तो म्हणाला.

"तुला माहीत नाही विराज, पण सरदेखील तेवढेच हळवे आहेत रे."  बोलतांना तिलाही दाटून आलं.

"पार्टनर, सगळ्यांची किती काळजी करशील? ते आता पूर्वीचे अनी सुमी नाहीत. एकमेकांना सांभाळून घेतील ते. आधी त्यांना बोलू तर दे, आपली गरज लागलीच तर नंतर जाऊ ना आपण."
तो तिला हळुवार प्रेमाने समजावत होता. ती शांत झाली, पण मनाची घालमेल सुरूच होती.


"सुमी.. तुला अजूनही आठवतं सगळं?"
"आठवायला मी काही विसरलेच कुठे? हृदयाच्या कप्प्यात तुझ्यासोबतचे प्रत्येक क्षण जपलेत, अगदी जसेच्या तसे."

दोघेही गप्प होते, पण मूक नयनांची भाषा एकमेकांना कळत होती. तिच्या अंतरीची हाक अनीच्या अंतरी भिडली होती.


"अशी दारातच थांबणार आहेस का? ये ना तू आत."
त्यांनी पुन्हा म्हटलं तसा तिने पाय टाकला.


"तू बस, मी पाणी घेऊन आलोच."
असं म्हणून ते आत गेले.


तिची नजर एकवार त्या सुसज्ज हॉलभर फिरली. किती नीटनेटकं, प्रत्येक वस्तू जिथल्या तिथे. भिरभीरणाऱ्या नजरेला शोकेसमधल्या वस्तूंनी तिला भुरळ घातली. अवॉर्ड्स, सर्टिफिकेट्सनी सजलेले शोकेस. तिचे डोळे ते सगळे टिपत होते. `डॉक्टर ऑफ द इयर´, `बेस्ट गायनॅकॉलॉजिस्ट´ असे कितीतरी अवॉर्ड्स. एका बाजूला फोटोचा कोलाज. आणि त्यातच एक फोटोफ्रेम.. विराजची!


पाणी घेऊन ते बाहेर आले. मन अजूनही अस्थिर होतं. पण नजर स्थिर होती, तिच्यावर रोखलेली.

`अजूनही तशीच आहे, तितकीच सुंदर, किंबहुना आणखीनच जास्त सुंदर. पण अवखळपणा जरासा हरवल्यागत वाटतो. कुठून आली ही? अशी अचानक? आणि धडकली तशीच अगदी पहिल्या भेटीसारखी. ती पहिली भेट, त्यानंतर माझ्या वाढदिवसाची भेट आणि नंतर झालेली अखेरची भेट.

अखेरच्या भेटीत ती साडी नेसली होती, ही तीच साडी. अबोली रंगाची. पहिल्यांदा नेसलेली, मालतीताईच्या लग्नातली. कलेजा तिथेच खलास झाला होता, वाटलं होतं त्याच मांडवात आपलंही लग्न उरकून टाकावं. पण लग्नाची मागणी घातली आणि होत्याचे नव्हते झाले, तिच्या आयुष्यातून निघून जाणं नशिबी आलं. तिच्या डोळ्यातील ते निर्मळ अश्रूदेखील मला थांबवू शकले नाही.´

`तेव्हा नेसलेली तीच साडी, आणि डोळ्यातील फुटलेला बांध. आजही अंगावर तीच साडी आणि टपोऱ्या डोळ्यातील दाटलेले तेच आभाळ!

सुमी.. तू अजूनही थांबलीहेस का? माझ्यासाठी?´

मनातल्या मनात त्यांचं विचारूनही झालं, पण शब्द बाहेर येईनात.


तिनं विराजच्या फोटोवरून नजर फिरवली, आणि तिथलेच एक पदक हातात घेतले. `Dr. A. Y. Sathe´, ते अक्षर तिच्या काळजाचा ठाव घेऊन गेले आणि डोक्यात लख्ख प्रकाश पडला.पदक जागेवर ठेऊन ती मागे वळली. मागे तिचा अनी उभा, हातात पाण्याचा ग्लास घेऊन.



"अनी, रावीचा डॉक्टर साठे म्हणजे तू आहेस? "
इतका वेळ गप्प असलेल्या सुमीने विचारलं. तिचा तो एक प्रश्न, आणि त्यांच्या मनातील इतर प्रश्नांची उकल होता होता पुन्हा वाढली.

"म्हणजे? तू रावीची मॉम?" तिच्यालागोलाग त्यांनीही आश्चर्याने विचारलं.


रावीला बघितल्यावर कित्येकदा वाटलं होतं, ही सुमीची लेक तर नाही ना? पण मनात एक वेडी आशा होती, सुमी लग्न करणं शक्य नाही, कधीच नाही.


"शी इज एव्हरीवन अँड एव्हरीथिंग फॉर मी. माय मॉम इज माय सिंगल मदर, बट शी स्प्रेड्स ऑल द शेड्स ऑफ एव्हरी रिलेशन्स ईन माय लाईफ!" चार दिवसांपूर्वीच रावी त्यांच्याशी हे बोलली होती. पण त्याचा नेमका अर्थ अजूनही लागेना.

सुमीच्या गळ्यात मंगळसूत्र दिसत नव्हते, `मग ही रावीची मॉम कशी? सिंगल मदर म्हणजे डिवोर्स झालाय की आणखी काही?´ प्रश्नांची यादी संपता संपेना.


" होय. रावी माझीच लेक."  ती अगदी शांतपणे म्हणाली. डोळ्यातही तोच शांत भाव!

अवसान गळल्यासारखे ते मटकन खाली बसले. ` इतकी वर्ष मनात एक वेडी आशा, सुमी येईल परत, माझ्याचकडे. मी तिला शब्द दिला होता, आयुष्यभर वाट बघेन म्हणून. आज ती समोर आली, तेही रावीच्या मॉमच्या रूपात.´

`अशी कशी तू मला विसरू शकतेस?´ मनातल्या प्रश्नानं छातीत दाटल्यासारखे झाले. श्वास जोरात सुरु झाला. त्यांनी डोळे मिटून घेतले.

"अनी, काय होतेय तुला? बोल ना. डोळे उघड, प्लीज. "
ती त्याच्या छातीवर हलका दाब देत म्हणाली.
त्याच्या ओठाला तिने पाण्याचा ग्लास लावला. " थोडं पाणी तरी पी, म्हणजे बरं वाटेल तुला. अनी बोल ना रे काहीतरी."
तिच्या डोळ्यातील थेंब त्याच्या गालावर विसावले आणि त्याने डोळे उघडले. ती थोडी झुकली होती. त्याचे काळेभोर डोळे थेट तिच्या टपोऱ्या डोळ्यांना भिडले. तिच्या डोळ्यात किती ती काळजी? किती ते प्रेम? सारंच कसं उतू जात होतं.

"अनी, बोल ना काहीतरी. ठीक आहेस ना तू?"
तिचा स्वर रडवेला झाला होता.

"सुमी, तू अजूनही माझीच आहेस ना गं?"
तिच्या डोळ्यात आरपार बघत त्यांनी विचारले.

तिला वाटलं, त्याला एक घट्ट मिठी मारावी आणि मोठ्याने सांगावे, " हो रे वेड्या, तुझीच आहे मी. ज्या क्षणाला तू माझा असल्याची जाणीव झाली त्या क्षणापासूनच मी तुझी झाले. तुझीच आहे आणि असेनही तुझीच, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत!"

"सांग ना गं सुमी, तू माझीच आहेस ना?"
हळवे होत त्यांनी पुन्हा विचारलं.


"सर, काय होतंय तुम्हाला? आर यू ओके?"
त्यांच्याजवळ रावी धावत आली. चेहऱ्यावर काळजीचे सावट पसरले होते. सुमीचा रडवेला आवाज तिच्यापर्यंत पोहचला, त्यामुळे तिथे येण्यास ती स्वतःला रोखू शकली नव्हती.

"मॉम, तू काही बोललीस का सरांना?" तिने सुमीकडे पाहिलं.

"मी एकदम बरा आहे गं, छातीत थोडं दाटल्यासारखं झालं होतं, बट नॉऊ परफेक्टली फाईन!" तिच्या गालावर हलकेच हात ठेवत ते म्हणाले.
त्यांनी बघितलं, हिच्याही टपोऱ्या डोळ्यात तीच काळजी, तेच प्रेम! सुमीचीच लेक शोभावी इतका सारखेपणा!


तिची ती जवळीक सुमी न्याहाळत होती.
`अनीविषयी किती आपलेपणा दडलाय हिच्या मनात. विराजच्या आधीच कशी हक्काने त्याच्याजवळ गेलीय. त्याच्याही डोळ्यात तिच्याबद्दलचे प्रेम दिसतेय की. बापलेकीच्या नात्याची वीण रुजलीय दोघांत. तिचे डॉ. साठे म्हणजेच माझा अनी आहे हे कळाल्यावर कशी रिऍक्ट होईल ही?´


तिच्या डोळ्यातले भाव विराज टिपत होता.


"अरे मॉम, आलात तुम्ही?"  तिच्याजवळ येत तो म्हणाला.
"मामा, एकमेकांना भेटलात का तुम्ही?"  तिथले वातावरण हलके करण्याचा त्याचा प्रयत्न सुरु होता.

"हे माझे मामा डॉक्टर अनिकेत साठे. आणि मामा, ह्या रावीच्या मॉम, डॉ. सुमती, गोल्ड मेडलीस्ट ईन बॉटनी!"  त्याने दोघांची फॉर्मल ओळख करून दिली. दोघांनी एकमेकांकडे बघून स्मित केलं.

"तुमच्या सुमीला घेऊन आलोय आम्ही, आता पुढे काय करायचं ते तुम्ही ठरवा."
त्यांच्या कानाशी जात कोणाला आवाज जाणार नाही, अशी अगदी हळुवारपणे ती म्हणाली.

त्यांनी चमकून तिच्याकडे पाहिलं, तिच्या ओठांवर गोड हसू होतं.
`कशी ही जगावेगळी मुलगी? स्वतःच्या आईच्या प्रियकरालाच तिच्याविषयी सांगते आहे? खरंच सुमीचीच लेक का ही?´


"मॉम, बसा ना तुम्ही. मी लगेच कॉफी घेऊन येतो."
"नको रे विराज, आम्ही निघतो आता."
ती म्हणाली.

"मॉम, थांबूया ना थोडावेळ."
रावीने आर्जव केले.

"बच्चा, प्रत्येकवेळेस हट्ट नको ना करू. आय एम नॉट फिलिंग कॉम्फर्टेबल, प्लीज." आवाजात एक जरब होती तिच्या.

"रावी, यू शुड बी गो नॉऊ, तसे मलाही निघायचंच आहे." रावीला ते म्हणाले, मग थांबण्यात अर्थच नव्हता.
विराजकडे बघून एक स्मित देऊन सुमी बाहेर गेली, तिच्यामागोमाग रावीचे पाऊल बाहेर पडले.


"अजूनही तुझ्या मनात आहे ना ती?"
त्यांच्या नजरेला नजर देत विराज विचारत होता.
ते त्याच्याकडे केवळ बघत होते.

"शी इज अ प्युअर सोल! एकदा गमावलेस तू तिला, परत तेच नको करू."
आपले दोन्ही हात त्यांच्या खांद्यावर ठेवत तो म्हणाला.


"मॉम, अचानक काय झालं तुला? अशी का निघून आलीस?"
कार सुरु करतांना रावी तिला विचारत होती.

"प्लीज, काही वेळ मला जरा एकटं सोडशील?"
खिडकीची काच खाली करत तिने डोळे मिटून घेतले.
काही न बोलता रावी ड्राईव्ह करायला लागली.

काही वेळापूर्वी दारात धडकलेला अनी  मनातल्या कप्प्यात अजूनही तसाच होता.


"...तुमने तो आकाश बिछाया,
मेरे नंगे पैरो में जमीं है.
पा के भी तेरी आरजू हो
हो, शायद ऐसे जिंदगी हंसी है.
आरजू में बहने दो,
प्यासी हूं मै प्यासी रहने दो.
रहने दो
कतरा कतरा मिलती है,
कतरा कतरा जीने दो
जिंदगी है, बहने दो
प्यासी हूं मै प्यासी रहने दो
रहने दो ना…"

कार सुसाट पळत होती. गाण्याचे आवाज कानावर आदळत होते. तिच्या डोळ्यातील आभाळ पुन्हा फाटले होते...


.

.

.

क्रमश :

********

आवडलाय ना हा भाग? आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा, नसेल आवडला तर तेही सांगा.

कमेंट तर कराच सोबत फबी पेजवर like करायला विसरू नका.


साहित्यचोरी गुन्हा आहे. तेव्हा लेखकांच्या मर्जीशिवाय कुणीही त्यांचे लेख इतरत्र शेअर करू नये. शेअर करायचे झाल्यास फेसबुकची लिंक शेअर करावी. धन्यवाद!

🎭 Series Post

View all