Feb 23, 2024
प्रेम

पारिजात.. गंध प्रेमाचा.. ! भाग -41

Read Later
पारिजात.. गंध प्रेमाचा.. ! भाग -41


आपण वाचत आहात एका गंधाळलेल्या प्रेमाची सुगंधित कहाणी.
पारिजात.. गंध प्रेमाचा..!( मागील भागात :-
विराज रावीला प्रपोज करतो आणि रावीदेखील ते एक्सेप्ट करते. आपल्या प्लॅननुसार ते दोघे सुमीला सोबत येण्यास तयार करतात.
आता पुढे.)

******"ओके, तुम्ही एवढं म्हणताय तर येते मी."

तिने हो म्हटलं नी दोघांनीही "येस" म्हणून एकमेकांना टाळी दिली.

" पण लग्नाची बोलणी इतक्यात करणार नाही हं."  ती म्हणाली, तसे तिघेही हसायला लागले.


"काय? कसा वाटला माझा प्लॅन? झाल्या की नाही मॉम तयार?"
झोपायला गेलेल्या विराजला रावी गुडनाईट म्हणायला गेली, तेव्हा त्यानं विचारलं.

"एकदम वर्स्ट प्लॅन. म्हणे लग्नाची बोलणी करायला या. नकार देता देता कसेतरी मनवले मी तिला, तेव्हा कुठे तयार झालीय ती."  रावी.

"अंत भला तो सब भला!  पण काहीही असो, जावई झाल्याचा फील यायला लागलाय मला."  तिच्याकडे बघून तो म्हणाला.

"गप रे, उगाच काहीही बोलू नकोस. निवांत झोप, सकाळी लवकर निघायचं आहे, गुडनाईट."

त्याने गुडनाईट म्हटल्यावर ती जायला वळली, पण दाराजवळ परत थबकली.

" विराज, सगळं काही नीट होईल ना रे? एकमेकांना बघून कसे रिऍक्ट होतील दोघं? मला जाम हुरहूर लागलीय बघ."
त्याच्याजवळ जात ती म्हणाली.

"डोन्ट वरी पार्टनर, सगळं नीट होईल. इतक्या वर्षांनी त्यांच्या भेटीचा योग जुळून येतोय, म्हणजे नियतीलाही ते मान्य आहे. सो, काळजी करू नकोस. तू फक्त तटस्थ रहा."
तिला मिठीत घेऊन त्यानं आश्वस्त केलं.
त्याच्या बोलण्याने तिला बरं वाटलं, मग ती झोपायला निघून गेली.


"मॉम, अगं ड्रेस का घातला? साडी नेस ना."  रावी.

"अगं साडी कशाला? प्रवासात ड्रेस कन्फर्टेबल वाटतो."  ती.

"पण मला तू साडीत जास्त आवडतेस. प्लीज नेस ना."  रावी.

" रावी, जरा जास्तच हट्टी झालीस असं वाटत नाही का गं तुला? "  ती.

" मॉम, प्लीज!"  तिची पापी घेत ती म्हणाली.
" पहिल्यांदा येत आहेस तू, श्रुतीवर एकदम इंप्रेशन पडलं पाहिजे की माझी मॉम किती सुंदर आहे ते."

"तुझ्या डोक्यात कधी काय येईल काही नेम नाही. ठीक आहे नेसते मी साडी."  तिने रावीला टपली मारत कपाट उघडले.

एखादी साडी तिथून बाहेर काढणार तोच रावीने बाजूला ठेवलेल्या साडीतील एक साडी तिच्या पुढ्यात ठेवली.
"मॉम, हीच साडी नेस तू. खूप सुंदर आहे."

साडीकडे पाहीले, नी सुमीचे भाव बदलले.
" नको गं ती साडी, दुसरी बघते."  ती.

"मॉम, हीच नेस ना,प्लीज. माझ्यासाठी."  रावीने गळ घातली.

" बच्चा, प्रत्येकवेळेस हट्ट करत जाऊ नकोस. नाही नेसायची मला ती." सुमी जरा मोठ्याने म्हणाली.

रावीच्या डोळ्यात टचकन पाणी आले, ती तशीच बाहेर निघून गेली. ती गेली आणि सुमीने साडीवर हात फिरवला.


`त्या दिवसानंतर कधी नेसलेच नाही ही साडी, पण अजून जपून ठेवलीय, कपाटात.. आणि मनाच्या कप्प्यातसुद्धा!´
सुमीचे डोळे भरून आले.


"मी माझं सामान काढलंय बाहेर, तू तुमच्या बॅग्स घेऊन ये ना."
विराज रावीला सांगत होता.

"सगळं सामान घेतलं ना नीट? आणि लाडू ठेवायला दिलेत ना तुझ्या पार्टनरने?"
खोलीतून बाहेर येत सुमीने विचारले.

"अख्खा डबाच घेतलाय."
रावी त्याचाकडे बॅग देत पुटपुटली.

"वॉव! काय सुंदर दिसताय तुम्ही!"
तो म्हणाला तसा रावीने पलटून पाहीले,
सुमीच्या अंगावर तीच साडी होती, रावीने बाहेर काढलेली!

"थँक यू मॉम!" तिला मिठी मारत ती म्हणाली.

"हं, पण प्रत्येक वेळी तुझा हा हट्ट नाही चालणार."  तिचे नाक ओढत सुमी म्हणाली.


रावी ड्राइव्हिंग सीटवर होती, मागे विराज आणि सुमी. तो सुमीला जरा चिपकून बसला होता. आरशात त्याला तसं मॉमच्या शेजारी बघून तिचा जळफळाट होत होता. सकाळी पाचची वेळ, रस्त्यावर फारशी रहदारी नव्हतीच, रावीने कार सुसाट पळवायला सुरुवात केली.
वाऱ्याच्या थंड झुळकेने विराजचे डोळे मिटत आले. सुमीच्या खांद्यावर डोके ठेऊन तो केव्हा झोपी गेला त्याला कळले नाही.
एफएम वर गाणे सुरु होते,

"देखो अभी खोना नही
कभी जुदा होना नही
अबसे युहीं मिले रहेंगे दोनो
ये वादा रहा इस शाम का
जाने तू या जाने ना
माने तू, या माने ना
तेरा मुझसे हैं पहले का नाता कोई,
यूही नही दिल लगाता कोई…"

सुमीने डोके टेकलेल्या विराजकडे नजर टाकली. किती शांत झोपला होता तो, जणू काही खूप घट्ट नातं असल्यासारखा सगळा भार तिच्यावर सोडून.

`खरंच याच्याशी काही नातं असावं का माझं? जेव्हापासून आयुष्यात आलाय, किती हक्काचा, आपला असा वाटतो.´

त्या विचाराने तिच्या ओठांवर हलकेच हसू उमटले.
रावीची आरशातून त्यांच्याकडे नजर गेली. एखाद्या छोटया बाळाने विश्वासाने आईवर सगळा भार झोकून द्यावा तसा निजलेल्या त्याला बघून तिच्याही चेहऱ्यावर स्मित आले. आईच्या प्रेमाला मुकलेला तो, ते प्रेम आता अनुभवतोय असं वाटलं तिला.

कारचा ब्रेक लागला, तशी त्याची झोप चाळवली.

"काय झालं? पोहचलो का आपण?"   डोळे चोळत त्याने विचारलं.

"नाही रे, थोडी पोटपूजा करूया."
समोरच्या छोटेखानी रेस्टॉरंटकडे बोट दाखवत ती म्हणाली.
तिथे पोहे आणि चहा पोटात टाकल्यावर ते पुन्हा कारकडे निघाले.

"आता तू ड्राईव्ह करायचस. मघापासून मॉमजवळ आहेस तर मला खूप जेलस फील होत आहे."  त्याच्याकडे चावी देत ती म्हणाली.

"अगं पण मला रस्ता कुठे माहीत आहे? "  तो.

" गुगल मॅप आहे की तुझ्याजवळ. त्याचा वापर कर."  ती.

त्यानं हसून चावी घेतली.

"पार्टनर, डोन्ट बी ओव्हरप्रोटेक्टिव्ह टू हर."  कारचे दार उघडता उघडता तो हळूच  म्हणाला.

ती मान हलवून मॉमशेजारी जाऊन बसली.

"आत्तापर्यंत त्याला आपल्या खांद्यावर झोपवलंस ना? आता मला पण झोपू दे."  तिला बिलगून ती लाडे लाडे म्हणाली.


" जळकू, खरंच येडं कोकरू आहेस तू." सुमीने तिचा 
 गालगुच्चा घेतला.


दोन तासांनी त्यांची कार शहरात पोहचली. रावीच्या मनाची हुरहूर आपोआप वाढायला लागली. एक लांब श्वास घेऊन ती स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करीत होती.
पंधरा मिनिटातच कार विराजच्या घराच्या वळणाला लागली. पुढच्या काही क्षणात ते घराच्या आवारात पोहचले देखील.


आज डॉक्टर एकटेच घरी होते. मागच्या वर्षी विराज बोलत नसला तरी सोबत होता. न बोलताही एखादा बुके देऊन तो त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायचा. हॉस्पिटल मध्ये वाढदिवसाला शुभेच्छा देतांना रावीने त्यांना लाडू दिले होते, ते आठवले. आणि मग दिवेकर काकूच्या घरी असतांना सुमीच्या हातच्या लाडवांची चव जिभेवर रेंगाळायला लागली. कॉफीचा मग घेऊन आरामखुर्चीवर डोके टेकवून ते बसले होते.

बाजूलाच मोबाईलवर किशोरकुमारच्या दर्दभऱ्या आवाजात गाणं वाजत होते,


"..बरसो बीत गये
हमको मिले बिछडे,
बिजुरी बनकर गगन मे चमकी
बीते समय की रेखा,
मैने तुमको देखा
मन संग आखं मीचौली खेले आशा और निराशा
फिर भी मेरा मन प्यासा
मेरे नैना सावन भादो… "

तो भावपूर्ण स्वर त्यांच्या काळजात घर करू लागला.

`डॉ. साठे, आज डोळ्यात पाणी नको. वाढदिवस ना तुमचा?´
मनाने त्यांना समजावलं, तरी डोळ्यांच्या कडा पाणावल्याच. मग पापण्यांनी हळूच त्यावर पांघरून घातले.


घरात आवाज जायला नको म्हणून विराजने कार आत न घेता बाहेरच थांबवली.

"मॉम, विराजला सोडून येते मी, तुही चल ना."
रावीने गळ घातली.

"नको अगं, प्रवासाने शीण आलाय. कधी थोडावेळ पडते असं झालंय. तू लगेच ये त्याला सोडून, मग आपण निघूया. तुला पण हॉस्पिटलला जायचं आहे ना? "
सुमी थकल्या आवाजात म्हणाली. प्रवासाने खरंच ती थकली होती.

"ठीक आहे, मी येते लगेच."  त्याला सामान काढण्यात मदत करत ती म्हणाली.

"बाय मॉम, पण तुम्ही आला असता तर बरं वाटलं असतं."  तो.

"अरे नको, आता आहेच काही दिवस मी इथे तर भेटेनच की." ती.

"असू दे रे, मलाही मग उशीर होईल."  त्याला ओढत रावी म्हणाली.

"काय झालं अगं? तू मॉमला आग्रह का नाही केला?"
आश्चर्याने विराज रावीला विचारत होता.

ती हसली.

"इथवर घेऊन आलोय ना आपण? आता तिचे तिला कळू दे. मनातील ओढीने ती स्वतःच कशी ह्या घराच्या उंबरठ्याकडे खेचल्या जाईल बघच तू." ती.

" हुशार आहेस गं!" आनंदाने तो.

" माहीतीय रे मला, एवढ्या वर्षांत मॉमला मी ओळखते, अगदी चांगल्याप्रकारे. " ती."टिंग टॉंग s"
दारावरची बेल वाजली आणि डॉक्टरांनी डोळे उघडले.

`रेखाताई येवढया लवकर येणं शक्यच नाही, मग सकाळी सकाळी कोण आलं असेल?´ असा विचार करून त्यांनी दार उघडले.

"सरप्राईजs.."
आत येत दोघांनी एकत्रच गलका केला.

"अरे? तुम्ही अचानक कसे काय? तेदेखील एकत्र?"
डोळ्यात आश्चर्य होतच, पण चेहऱ्यावर आनंद फुलला होता.

"आज तुझा बर्थडे, आणि मी येणार नाही असे होईल का?"
त्यांना मिठी मारत विराज म्हणाला.

हो, पण तू भारतात कधी परतलास? ना फोन, ना कसला मेसेज. काय गं कुठे भेटला हा तुला?"
रावीकडे नजर वळवत ते.

"ती खूप मोठी स्टोरी आहे हो सर, पण सौं बात की एक बात.. इकडे बघा, मी हो म्हणालेय याला."
आपल्या बोटातील अंगठी दाखवत ती म्हणाली.

"ओह! ही गोम आहे तर. खूप खूप अभिनंदन!"
"दोघांचे कान पिळत ते म्हणाले.

"तुम्ही रागावलात तर नाही ना? तुम्हाला न सांगता मी याला हो म्हणाले तर? "  तिचा निरागस प्रश्न.

"रागावू कशाला? मी तर खूप,  खूप खुश आहे. माझ्या मनात केव्हाचीच वसलीस तू, फक्त तुमच्या दोघांना ते ठरवायचं होतं."
ते प्रसन्नपणे म्हणाले.


" थँक यू सो मच सर. तुम्ही किती गोड आहात."  त्यांना तिने मिठी मारली.

" माझ्या वाढदिवसाची ही सुंदर भेट मला आवडलीय. जा सामान ठेऊन या, मी मस्तपैकी कॉफी बनवतो."
ते म्हणाले.
त्यांचा मूड एकदम फ्रेश झाला होता.

"चालेल." म्हणून दोघे सामान घेऊन विराजच्या रूमकडे जायला निघाले.पाच मिनिटे झाली तरी रावी परतली नाही म्हणून कारमधून सुमी बाहेर आली. एक हवाहवासा मंद सुगंध तिच्या नाकात भिनत होता. साठेंच्या अंगणातला भरगच्च पारिजात तिला जणू खुणावत होता. एका अनामिक ओढीने तिची पावले त्या झाडाकडे वळली. अंगणात पडलेला फुलांचा सडा आणि बहरलेले ते झाड..!
तिच्या भूतकाळातील पारिजात नकळत मनात डोकावला. ती फुले ओंजळीत घ्यायचा मोह तिला आवरला नाही. खाली बसून ती नाजूक फुले तिने अलगद वेचली. ओंजळ भरली तशी ती उठायला गेली. उठतांना तिची नजर सुसज्ज अशा त्या टुमदार बंगल्यावर फिरली आणि स्थिरावली, बंगल्याच्या मध्यभागी असलेल्या नावावर!

`पारिजात´

अंगणात बहरलेला पारिजात आणि घरावरचे ते नाव.

`प्राजक्ताच्या प्रेमात असलेल्या या माणसाला भेटावं का?´
मनात आलेला प्रश्न तिला दारापाशी घेऊन गेला."रावी,  बाहेर  परत कोणी आहे का गं?"
विराजसोबत निघालेल्या रावीला डॉक्टरांनी विचारले.

" अं, हो. मॉम थांबलीय बाहेर. सामान ठेवलं की मी जातेच."
त्यांना उत्तर देऊन ती विराजसोबत आत गेली.

`काय मुलगी आहे, आई सोबत आली नी तिला आतदेखील बोलावलं नाही.´

तिला आत बोलवावं म्हणून ते दार उघडणार तोच दार लोटून सुमी आत यायला निघाली… आणि धडकली त्यांना.

हातातील सारी फुलं खाली विखूरली.


"ये, काय रे? डोळे डोक्यावर घेऊन चालतोस काय? सगळी फुलं सांडली ना."
खाली पडलेली फुलं गोळा करत असतांना तिच्या तोंडून बाहेर पडलं.

"सॉरी, सॉरी, माफ करा."
तिला उठायला हात देत ते म्हणाले.
त्यांच्या हातात हात देत ती उभी होतांना त्या चेहऱ्यावर तिची नजर खिळून राहिली.
तोच निमगोरा वर्ण, तेच काळेभोर डोळे…
हा तोच.. पहिल्या भेटीत तिला दारात असाच धडकलेला तिचा अनी!
तिची ती अनिमिष नजर त्या काळ्याभोर डोळ्यात अडकली.. परत एकदा!

"सुमी?"
त्यांच्या मुखातून आनंदाने हाक निघाली.

.

.

. क्रमश :

************

सगळ्यांना आतुरता होती, ती भेट झालीच शेवटी. आता पुढे काय? त्यासाठी वाचा पुढील भाग.

आणि तोवर  हा भाग कसा वाटला नक्की सांगा.लाईक, कमेंट करायला विसरू नका.  तुमचे एक लाईक देखील पुढे लिहायला नवी प्रेरणा देत असते.तुम्हाला काही सुचवायचे असेल तर नक्की सुचवा. तुमच्या सूचना स्वागतार्ह आहेत.

साहित्यचोरी गुन्हा आहे, तेव्हा लेखकांच्या मर्जीशिवाय त्यांचे लेख इतरत्र शेअर करु नये.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//