Login

पारिजात.. गंध प्रेमाचा..! भाग -40

रावीसोबत जाण्यास सुमी तयार झालीय♥️♥️

आपण वाचत आहात एका गंधाळलेल्या प्रेमाची सुगंधित कहाणी.
पारिजात.. गंध प्रेमाचा..!



( मागील भागात :-


विराजच्या रूपात रावीला मोठे सरप्राईज मिळते. पण आनंद होण्याऐवजी सुमी आणि त्याने मिळून प्लॅन केला याचा तिला राग येतो. सायंकाळी सुमीच्या सांगण्यावरून ती त्याला बाहेर फिरायला घेऊन जाते. तेव्हा तो तिला प्रपोज करतो.
आता पुढे.)


**********


"माझे तुझ्यावर प्रेम आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे,  इवन मॉम आणि माझ्या मामाला सुद्धा! पण या क्षणी ही सुंदर भावना मला फक्त तुला सांगायची आहे.
रावी आय लव्ह यू..! आय लव्ह यू अ लॉट! खूप मिस केलं मी तुला, प्रत्येकक्षणी. पण जेव्हा वाटलं आता नाहीच जगू शकत तुझ्याविना, तेव्हा सगळं सोडून इथे आलोय, तुझ्याकडे."   तो बोलत होता.


"विराज, आय लव्ह यू टू!"

ती त्याच्या मिठीत केव्हा विरघळली, तिलाही कळले नाही.


सायंकाळच्या विविध रंगछटांनी नटलेले क्षितिज, नभीचा तो केशरी लाल गोळा, तिच्या चेहऱ्यावर विसावलेली सोनेरी किरणे अन त्यात उजळून निघालेल्या गालावर लालिमा चढलेली ती!

तिच्या टपोऱ्या डोळ्यात क्षणभर थिजला तो. पहिल्यांदाच इतक्या जवळून तो तिला बघत होता. `आणखी किती गोड असावं एखाद्या मुलीने? ´  मनातल्या प्रश्नाने त्याला हसू आले. आयुष्यात कुणीतरी आवडते काय, आणि आवडणारी व्यक्ती हो म्हणते काय? सर्व कसं त्याला स्वप्नवत वाटत होते.


"विराज सॉरी रे, मी लग्न नाही करू शकत तुझ्यासोबत."

एकाएकी रावी बोलली आणि एकदम जोराचा झटका लागावा तसा तो भानावर आला.

"ये वेडाबाई, आता काय झालं तुला अचानक?" त्याने विचारले. "आता जे कबूल केलं होतंस ते खोटं होतं का?"

"गप रे, काहीही काय? माझं खरंखूरं प्रेम आहे तुझ्यावर. पण मी प्रॉमिस केलं होतं ना?"
ती म्हणाली.

" कसलं प्रॉमिस? नी कोणाला?"   तो.

"अरे, स्वतःलाच. जोवर सुमीच्या अंगाला हळद लागणार नाही, तोवर मी लग्न करणार नाही, असं."   ती.

"ओह, तसलं प्रॉमिस होय. मी तर घाबरलोच होतो. आणि मॉमबद्दल म्हणशील तर हम है ना? आता बघ कसं सगळं सुरळीत होईल."
तिचा हात घट्ट पकडत त्यानं तिला आश्वस्त केलं.

"आपण ज्यावर प्रेम करतो ती व्यक्ती सोबत असणे ही किती भाग्याची गोष्ट. तू सहा महिने इथे नव्हतास तर तुझ्या आठवणीत दिवस कसे जायचे माझे मला माहीत. मॉम आणि सर इतके वर्ष एकमेकांशिवाय कसे राहिले असतील रे?" काहीशी हळवी होत ती म्हणाली.

" त्यांचं प्रेम खूप खोलवर रुजलंय गं. शरीराने दूर असले तरी मनाने खूप जवळ आहेत ते, केव्हाचेच!
आता आपण आहोत ना, आपण त्यांना एकत्र आणू आणि काय गं, आत्ता काय बोललीस? माझ्या आठवणीत असायचीस तू? पण तू तर कधी साधा मिस यू चा मेसेज देखील केला नाहीस मला? "
त्यानं मस्करीत विचारलं.

" तू तरी कधी मला मिस यू म्हटलं का रे? " लटक्या रागाने ती.

"कित्येक वेळा. दिवसाची सुरुवात तुझा फोटोतला चेहरा पाहून व्हायची आणि रात्रदेखील तशीच सरायची. तुझी आठवण आली नसेल असा एकही क्षण गेला नाही गं या सहा महिन्यात. `मिस यू पार्टनर! ´ असं कित्येकदा म्हणून झालंय. इथून जाताना तुझ्या डोळ्यातील अश्रुंनी मला आधीच ताकीद देऊन ठेवली होती, की तू जातोहेस खरा पण लवकर नाही परतलास तर याद राख."
बोलता बोलता आता तोसुद्धा भावनिक झाला होता.

ती त्याच्याकडे टक लावून ऐकत होती. `काही न बोलताही कसं कळत होतं याला माझ्या मनातलं?´

"पार्टनर, तुला माहीतीय तू परिस आहेस माझ्यासाठी. तुझा परिसस्पर्श झाला आणि माझ्या आयुष्याचे सोने झाले. अशीच कायम सोबत राहा माझ्या, पुन्हा मला काही नको."

तिचा हात हातात घेऊन तो बोलत होता.
ऐकता ऐकता तिच्या डोळ्यातील थेंब त्याच्या हातावर पडला आणि त्याच वेळी त्याच्या डोळ्यातील पाणी सुद्धा तिथेच येऊन विसावले.

पाण्यात पाय सोडून दोघे बसले होते. तिचे डोके त्याच्या खांद्यावर टेकलेले आणि हातात हात गुंफलेला. दोघेही निशब्द, तसेच बसून होते.

काही वेळ गेला नी विराजच्या मोबाईल रिंगने त्यांची तंद्री भंगली. एक मिस कॉल आणि त्यानंतर मेसेज, विराजचे ओठ रुंदावले.

"कुणाचे मेसेज बघून हसतोस रे?"  तिने तशीच मान कलती करून विचारले.

"काही नाही गं, कपंनीचे आहेत. निघायचं आपण?"  तिच्या भुरभूर उडणाऱ्या केसांना नीट करत तो म्हणाला.

" थांब ना रे, अजून पाण्यात आपण खेळलोसुद्धा नाही. आणि तो लालेलाल सूर्य बघ ना, कसा क्षितिजाला स्पर्श करतोय, त्याचं सौंदर्य तरी न्याहाळू दे. "
लाडिकपणे ती.

" बाई गं, पुन्हा कधीतरी येऊया खेळायला आणि आणखी थोडा वेळ थांबलो तर तुझे ते क्षितिज अंधारात गुडूप होईल, तेव्हा निघूयाच आपण."
तिचा हात पकडून उभा होत तो म्हणाला.

"अगदीच अरसिक आहेस रे तू! एवढा सुंदर नजारा पण बघत नाहीस." आपला ड्रेस झटकत ती म्हणाली.

"तुझ्यासारखी अभिजात सुंदरी सोबत असल्यावर आणखीन दुसरं काय बघायचं?"

तिच्याकडे बघत तो म्हणाला तशी लाजली ती.
" चल, काहीतरीच तुझं. "

" आय हाय! तुला लाजता येतं हे ठाऊक नव्हतं मला, चेहऱ्यावर किती लालिमा पसरलीय आणि तू मला आकाशात बघायला सांगतेस."  तो.

"विराज, पुरे आता. चल कुठे जाऊयात सांग." त्याला दटावत ती.

"जाऊयात कुठेतरी, पण आता मी ड्राइव्हिंग करणार."   तो तिचा हातून चावी घेत म्हणाला.

"तुला रे इथले काय ठाऊक?"  तिचा प्रश्न.

तो हसला. "गुगल मॅप आहे की."  ड्राइव्हिंग सीटचा त्याने ताबा घेतला मग तीही त्याच्या शेजारी जाऊन बसली.

थोड्यावेळाने त्यांची कार तिच्या आवडत्या हॉटेलपाशी येऊन थांबली. `होटेल पॅराडाईज ´ तिचे आवडते ठिकाण. मॉमसोबत डीजीओला नंबर लागल्याची पार्टी इथेच तर केलेली.


"वेलकम मॅम!"

दारात पाऊल टाकल्याबरोबर वेटरने अदबीने तिचं स्वागत केलं. एक कोपऱ्यातील टेबल खास त्यांच्यासाठी बुक केलेला. विराजने खुर्ची मागे घेऊन तिला बसायला लावलं.
बाजूला लाल हार्टशेपचे फुगे, तिथले डेकोरेशन, ती बघतच राहिली.

"आय एम इंप्रेस्ड! मिस्टर विराज, अरसिक म्हणता म्हणता चांगलेच रसिक निघालात तुम्ही."
त्याच्याकडे बघून गोड हसून ती म्हणाली.

वेटरने आणलेला केक तिच्या हाताने कट करून त्याचा एक तुकडा त्याने तिला भरवला. ती खूप खुश होती.

"वॉव! भारीच. पण तू हे सगळं केव्हा अरेंज केलंस रे?"   ती.

"लहान मुलासारखं उगाच प्रश्न विचारू नकोस गं."  खिशातून अंगठी काढत तो हसून म्हणाला.
ती त्याच्याकडे पाहतच होती. आज आपण खूप स्पेशल असल्याचा तिला फील येत होता.

"ब्युटीफुल गर्ल, विल यू मॅरी विथ मी?"

त्यानं परत विचारलं. तिने हसून लगेच मान डोलावली तशी त्यानं तिच्या बोटात नाजूकशी अंगठी घातली.


"किती सुंदर आहे ही रिंग! आणि अगदी परफेक्ट साईज. एवढं तुला कसं कळलं रे? कुठेतरी डाळ शिजतेय असा वास यायला लागलाय आता मला."
त्याच्याकडे रोखून बघत ती म्हणाली. त्यावर तो केवळ हसला.

"मॉम? तिला सामील करून घेतलं ना तू तुझ्या सगळ्या प्लॅनमध्ये?" ती.

"त्यांच्याशिवाय आणखी कोण तुला एवढं चांगलं ओळखतो?" त्यानं हसून विचारलं.

"विराज, इट इज नॉट फेअर! तू माझ्या मॉमला माझ्यापासून हिसकावून घेतलंस." ती छोटासा चेहरा करून म्हणाली.

"नौटंकी, एवढे दिवस मॉमच्या प्रेमात न्हाऊन लाडोबा झाली आहेस, आता जरा मलाही ते प्रेम अनुभवू दे. तसेही एव्हरीथिंग इज फेअर ईन लव्ह अँड वॉर!"
तिचे गाल खेचत तो म्हणाला.

"माय मॉम इज ग्रेट!"  आनंदाने ती.

"ते तर आहेच."  तो.

"शेवटी मॉम कुणाची?"  भुवयी उंचावून ती.

"तेही आहेच. चल तुझी आवडती डिश आलीय, खाऊन घेऊया." तो म्हणाला आणि मग ते जेवणाचा आस्वाद घेऊ लागले.


"मॉम, यू आर सो ss स्वीट!"

घरी परतल्यावर दारातच सुमीला मिठी मारत ती म्हणाली.

"ओह, कळलं तर तुला."  मिश्किल हसत सुमीने विचारले.

" जा, कट्टी तुझ्याशी. मला सोडून ह्याच्या प्लॅन मध्ये सामील झालीस ना? "
नाक फुगवून रावी.

"लाडोबा सॉरी ना."  सुमीने आपले कान पकडले.

" ह्या वेळेस माफ केले, मात्र पुढे खपवून घेणार नाही मी." रावीचे नाक फुगूनच होते.

"पण आवडला हं मला तुमचा प्लॅन."  डोळे मिचकावत ती.

"मॉम, तू ना खूप, खूप, खूप ग्रेट आहेस. माय मॉम इज द बेस्ट मॉम ईन द होल वर्ल्ड! आय लव्ह यू टू मच!"
सुमीला तिने घट्ट मिठी मारली.

" हो रे बच्चा, आय लव्ह यू टू!" तिला कुरवाळत सुमी म्हणाली.

"अरे, इट इज नॉट फेअर, तुम्ही दोघी एक होऊन मला विसरलात ना?"    विराज लहानसे तोंड करून म्हणाला.

" नाही रे, तुला विसरून कसे चालेल? ह्या आनंदाचे खरे कारण तर तू आहेस ना? "
सुमीने त्यालाही आपल्या कवेत घेतले.

कुणाची नजर न लागावी असा तो क्षण! उगाच सुमीला दिवेकर आजीच्या ऊबदार मिठीत विसावलेली ती आणि अनी आठवला, आणि तिने आपले डोळे बंद केले.


"चल, तुझ्यासाठी बाहेरूनच जेवण घेऊन आलोय आणि सोबत तुझी आवडती काजूकथली पण. तू हात धुवून ये फक्त, आज मी तुला भरवणार."   रावीने जणू फर्मानच सोडले.


"अगं, कशाला? मी जेवेन ना."
सुमी अवघडल्यासारखी बसली.

" नाही आज फक्त माझा हुकूम चालणार. तू आ कर बघू. " तिच्या बालिशपणावर सुमीला हसू आले.

"आत्ताच तू मोठी झाल्यासारखी वाटलीस मला, पण अजूनही लहानच आहेस गं."  ती.

" कितीही मोठी झाले ना मॉम, तरी तुझा बच्चाच राहणार आहे मी. " रावी तिला भरवत म्हणाली.

बाजूलाच बसून विराज दोघींना न्याहाळत होता. हे सुख त्याच्या वाट्याला कधी आलेच नव्हते. दोघींचे ते निर्व्याज प्रेम आपल्या डोळ्यात साठवण्याचा तो प्रयत्न करत होता.

"तू का बसलाहेस तिकडे? तुही भरव ना. आता तुझीही सासुमॉम होणार आहे ती. "

त्याला रावीने बोलावले आणि मग तोही त्यांच्यात सामील झाला.


"मॉम, माझी बॅग तर रेडी आहे. तू तुझी बॅग पॅक करून घे. सकाळी अगदी पहाटेला निघायचं आहे आपल्याला."

जेवण आटोपल्यावर रावी तिला सांगत होती.

" मी येऊन काय करू गं? जा ना तुम्ही दोघे. उगाच कबाब मे हड्डी! " सुमी.

"ये, कसला कबाब नी कसली हड्डी गं? तू मला प्रॉमिस केलं होतंस आठवते ना?" रावी.

"मला फसवून प्रॉमिस घेतलंस तू."  ती.

"ते मला काही माहीत नाही, तू येत आहेस म्हणजे येत आहेस. आपल्या बच्चूचे ऐकणार नाहीस तू?"
डोळे बारीक करत ती म्हणाली.

"अगं पण.." सुमी.

" मी काय म्हणतो मॉम, चलाच तुम्ही. आणि मामाला भेटून आमच्या लग्नाचं फिक्स पण करून टाका. काय पार्टनर? " रावीकडे बघून त्याने डोळा मारला.

"अं? हो मॉम, बरोबर बोलतोय तो. लग्नाची बोलणी करून टाकूया." काहीशी गोंधळून ती म्हणाली.

"काय रे तुम्ही मुलं? आज प्रपोज केलं आणि उद्या लगेच लग्नाची बोलणी? बरं वाटतं का हे?"
ती.

" अगं, काहीच प्रॉब्लेम नाहीये आम्हाला. हो ना रे? "
रावी विराजकडे बघून म्हणाली.

" हो, हो. नो प्रॉब्लेम!" तो.

"ओके, तुम्ही एवढं म्हणताय तर येते मी."

तिने हो म्हटलं नी दोघांनीही "येस" म्हणून एकमेकांना टाळी दिली.
.

.

.

क्रमश :


********

 रावी आणि विराजसोबत जायला सुमी तयार झालीये, आता तरी होईल का तिच्या अनीशी तिची भेट?

त्यांच्या भेटीचे साक्षीदार होण्यासाठी वाचा कथेचा पुढील भाग.

तोवर हा भाग कसा वाटला नक्की सांगा. सोबत फबी पेजवर देखील लाईक करत राहा.


🎭 Series Post

View all