Mar 01, 2024
प्रेम

पारिजात.. गंध प्रेमाचा..! भाग -38

Read Later
पारिजात.. गंध प्रेमाचा..! भाग -38


आपण वाचत आहात एका गंधाळलेल्या प्रेमाची सुगंधित कथामालिका…

पारिजात.. गंध प्रेमाचा..!

( मागील भागात आपण पाहिलं, डॉ. साठेशी सुमीला कसे भेटवायचे या विचारात असतांना रावीला सुमीचा आजारी असल्याचा फोन येतो. ती रावीला तातडीने स्वतःकडे बोलावते.
आता पुढे.)


*********`काय झालं असेल मॉमला? ती पूर्वी कधी असं वागली नाही आणि आज अचानक? परत हार्मोनल इंबॅलन्सचा खेळ सुरु झालाय का हिचा? ´

तिचा विचार करत ती डोक्याला हात लावून बसली.

मॉमच्या विचाराने रात्री उशिरा केव्हातरी तिचा डोळा लागला.
झोपायला झालेला विलंब, त्यामुळे साहजिकच ती सकाळी उशिरा उठली. उठल्यावर नेहमीच्या सवयीप्रमाणे तिने मोबाईल बघितला तर त्यावर मॉमचा मेसेज आलेला..

"बच्चा, येतेस ना तू आज?"

तिने मेसेज वाचला आणि आपल्याला जायचं आहे याची तिला आठवण आली.


"गुडमॉर्निंग! सर."

रावीचा फोनवरचा गोड आवाज ऐकून डॉक्टरांची सकाळ गोड झाल्यासारखी वाटली.
" गुडमॉर्निंग! काय डॉक्टर, आज अचानक फोन? हॉस्पिटलला दांडी मारायचा विचार आहे का?"

त्यांनी हसत विचारलं, त्यावर ती हसली.

" ऍक्च्युअली सर, हो. मॉमला अचानक बरं नाहीये त्यामुळे मला जावं लागेल. तेच सांगायला मी कॉल केलाय."
ती उत्तरली.

"का गं, काय झालंय?"   ते.

" ते तर माहीत नाही, पण मधेमधे तिचे मूड स्विंग्स होत असतात. मग तेव्हा मला तिच्यासोबत राहावेच लागते."   ती.

"ओह! पण तूच का? म्हणजे घरी इतर व्यक्ती आहेत ना. तू बोलली होतीस ना मागे की घरी सगळेच असतात म्हणून?"
त्यांनी सहज विचारलं.

"हम्म! ते सर्व म्हणजे तीच आहे. शी इज एव्हरीवन अँड एव्हरीथिंग फॉर मी."   ती.

"म्हणजे..?"
त्यांना काही कळलं नाही.

"म्हणजे, माय मॉम इज माय सिंगल मदर, बट शी स्प्रेड्स ऑल द शेड्स ऑफ एव्हरी रिलेशन्स ईन माय लाईफ!"

तिचे हे उत्तर म्हणजे त्यांच्यासाठी एक धक्का होता.
" काय? हे बोलली नाहीस तू मला."    ते म्हणाले.

"ती खूप मोठी स्टोरी आहे सर. आल्यावर नक्कीच सांगेन तुम्हाला. तूर्तास जाऊ मी?"
तिच्या आवाजात मॉमबद्दल वाटणारी काळजी त्यांना स्पष्ट दिसत होती.

"हो, जा तू आणि दोन दिवस राहिलीस तरी चालेल."

ते म्हणाले तसे तिला हायसे वाटले, तशी दोन दिवसांची रजा तिला हवीच होती. त्यांना `थँक यू ´म्हणून लगेच तिने कॉल बंद केला आणि निघायच्या तयारीला लागली.
बसमध्ये बसल्यावर तिच्या डोक्यात, मॉमला इकडे कसं घेऊन यायचं? हेच सुरु होते. काहीतरी मार्ग निघेलच असा विचार करून कानात हेडफोन घालून ती निवांत बसली, तेव्हा कुठे तिला थोडे बरे वाटले.
रिक्षावाल्याला पैसे देऊन ती काळजीत, घाईने आत आली, तोच तिच्या नाकात तिच्या आवडीच्या वेलची घातलेल्या शेवयांच्या खिरीचा सुगंध दरवळला.

"मॉमs.. "   तिने घातलेली साद घरभर गुंजली.

"बच्चा, किचनमध्ये आहे रे मी. ये इकडेच."   सुमती आतूनच बोलली.

"काय करते आहेस तू?"   डोळे तिच्यावर रोखत रावीने विचारले.

"अगं तुझ्यासाठी ना खीर करते आहे."  मुद्दाम तिच्याकडे न बघता सुमी म्हणाली.

"ते मला दिसतेय,  पण तुला तर बरं नव्हतं ना गं ?"
रावीने सांशकतेने विचारले.

" हो रे बच्चा, ती रात्रीची गोष्ट आहे. आता मी एकदम ठणठणीत आहे बघ."
तिच्याकडे हसरा कटाक्ष टाकून ती म्हणाली.

"तुझ्या डोक्यात कसली खिचडी वगैरे तर शिजत नाहीये ना?"


"नाही गं. कसली खिचडी?  तुझी मॉम आहे मी, तुला भेटायला बोलावू शकत नाही का? "
सुमीच्या नाकावर लटका राग होता.

" माझी मॉम आहेस म्हणूनच तर डोक्यात असले विचार येतात. "
रावी हळूच पुटपुटली.

"काही म्हणालीस का?"   गॅस बंद करत सुमीने विचारलं.

नाही म्हणून रावीने मान तर हलवली पण मॉमच्या मनात काहीतरी वेगळेच आहे असं तिला सारखं वाटत होतं.

"जा, तू फ्रेश होऊन ये, तोवर मी जेवायला पानं घेते."   तिने रावीला तिच्या खोलीत पिटाळले.

जेवायला बसल्यावर देखील तिला सुमीच्या मनाचा अंदाज येईना.

"मॉम तू खरंच बरी आहेस ना?"     तिने पुन्हा विचारलं.


" हो गं. "   ती.

"मग रात्री तसा कॉल का केलास?"    रावी.

"अगं रात्री खरंच थोडं विचित्र वाटत होतं मला."     गडबडून सुमी.

तिचा तो गोंधळ रावीच्या नजरेतून सुटला नाही.


"म्हणजे नेमकं काय झालं होतं तुला?"    तिच्या डोळ्यात आरपार बघत तिने विचारले.

त्या नजरेने पुन्हा पुढे खोटं बोलण्याचे धाडस सुमीला होईना.


"अगं खीर तर खाल्लीच नाहीस तू? "    तिच्यापुढे पातेलं ठेवत सुमी म्हणाली.

खीर म्हणजे रावीचा जीव की प्राण. हे शस्त्र बरोबर कामी पडेल असे सुमीला वाटले पण तिचा गनिमी कावा तिच्यावरच उलटला.
रावीने ते पातेले शांतपणे बाजूला उचलून ठेवले आणि पुन्हा तिला विचारले,

"मॉम, काय चाललंय तुझं?"

"कुठे काय गं?"    आपले शस्त्र तिने खाली टाकले.   "छोटासा प्रॅन्क केला होता मी." चेहरा लटकवून ती.


"प्रॅन्क? माझ्यासोबत? का?"      तिने आश्चर्याने म्हणाली.

"कारण तुझी आठवण येत होती म्हणून. घे आता खीर खा."
तिला सुमतीने खीर भरवली.

"वॉव! मॉम, इट्स टू डेलीशीअस!"


त्या खिरीच्या चवीत ती सगळे विसरून जाईल असे सुमीला वाटले, पण खिरीचा मनसोक्त आस्वाद घेऊन झाल्यावर तिने पुन्हा विचारलं,

" मॉम, ही प्रॅन्कची आयडिया कुठून सुचली गं? "
भुवया उंचावून रावी.

" अगं, ती कॉलेजची मुलं असं अधेमधे करत असतात ना, म्हणून सुचलं."
सुमी.

"तुला माहीत आहे, असं प्रॅन्क केल्यावर समोरच्या व्यक्तीने जे मागितले ते द्यावं लागतं?"
तिच्याकडे बघत रावी म्हणाली.

"असं काही नसतं हं."     सुमी.

"अगं हो खरंच, असतं असं."     रावीच्या चेहऱ्यावर आता फुल्ल कॉन्फिडन्स होता.

" काय हवंय तुला? "     आपला चेहरा छोटा करत सुमीने विचारले.
"असं नाही, आधी प्रॉमिस कर की मी जे म्हणेन ते तू देशील." रावी.

सुमीने आपले डोळे किलकीले करून तिच्याकडे पाहीले.

"अशी बघू नकोस, मला प्रॉमिस कर."
रावीने हात समोर केला.

मनात विराजच्या नावाने खडे फोडत सुमीने तिच्या हातावर हात ठेवला.
"प्रॉमिस! हं, सांग आता, काय हवंय तुला?"

"तू माझ्यासोबत दोन दिवसांसाठी येत आहेस."    रावी हसून म्हणाली.

" कुठे? "
सुमीचा निरागस प्रश्न.

"कुठे काय? जिथे मी राहते तिथे."      रावी.

"अच्छा, तुझ्याकडे होय. ठीक आहे येईन ना मी."
सुटकेचा श्वास सोडत सुमी म्हणाली. तिला वाटलं रावी आणखी काही मागेल, पण तिने तिच्याकडे यायला म्हटलं तर ती लगेच तयार झाली.

"थँक यू मॉम!"
रावीने तिला आनंदाने मिठी मारली, ती खूप खुश होती कारण सुमी तिच्यासोबत यायला इतकी सहजतेने तयार होईल असे तिला वाटले नव्हते.
दुसऱ्या दिवशी सकाळी रावी उठली तर सुमी निवांतपणे कॉफी पीत बसलेली तिला दिसली.

"काय गं मम्मा, आज कॉलेज नाही का?"
तिच्याजवळ जात रावीने विचारलं.

"नाही रे बच्चा, सुट्टी टाकलीय मी."   ती.

" का गं? "   रावी.

" सहज गं, रोज रोज कॉलेजला जाऊन कंटाळा आलाय मला. " कॉफीचा घोट घेत ती.

"तुझे ना लक्षण काही ठीक दिसत नाहीये मला. पुन्हा कसला प्रॅन्क नाहीये ना?"
तिच्यावर आपली नजर रोखून रावीने विचारले.

"छे गं, काहीतरीच काय?"
तिच्याकडे बघून गोड हसत सुमी उत्तरली.

दुपारी तुपातील भाजणीच्या सुवासाने रावीने स्वयंपाकघरात पाऊल टाकले.

" काय गं मॉम, काय करतेस?"    ती.

" बेसनलाडू!"    सुमी लगेच उत्तरली.

तुपात मंद आचेवर अगदी मनं लावून बेसन भाजणाऱ्या सुमीकडे रावी बघतच राहिली.

`कालपासून मॉम किती आनंदी दिसते आहे? तिच्या अनीला भेटण्याची चाहूल लागली असेल का तिच्या मनाला? उद्या सरांचा वाढदिवस! तिच्या लक्षात असेल का हे? म्हणून एवढया प्रेमानं दरवर्षीसारखं लाडवाचा घाट घातलाय. उद्या तिच्या अनीला भेटेल तेव्हा कशी रिऍक्ट होईल ही?´

विचाराच्या तंद्रित असतांना डोळ्यातील टिपूस अलगद गालावर येऊन विसावलं. ते पुसण्याची तसदी घ्यावी असेही तिला वाटले नाही. अगदी एकसारखे गोल, सुबक लाडू वळणाऱ्या सुमीकडे ती तल्लीन होऊन बघत होती.
एवढी तल्लीन, की दारावरची बेल वाजतेय हे सुद्धा तिच्या कानावर येत नव्हते.


"बच्चा, अगं केव्हाची बेल वाजतेय. जरा दार उघडून बघ तरी कोण आले आहे, ते?"
एकावर एक लाडू रचत सुमीने तिला आवाज दिला.
तिची तंद्री भंगली.

" अगं हो, उघडते दार. "   म्हणून ती हॉलमध्ये आली.

डोळ्यातील पाणी पुसून तिने दार उघडले,

आणि…
दारात उभा असलेला विराज तिला दिसला. क्षणभर तिला तो भास आहे असेच वाटले. आपले डोळे पुसून, परत परत चोळून तिने पुन्हा पाहिले,   खरंच तो विराजच आहे, हे पटले तिला.

आल्या आल्या झालेल्या तिच्या दर्शनाने तो सुखावला.
थ्री फोर्थ घातलेली ती, घरच्या अवतारातील तिचं नैसर्गिक सौंदर्य आणि त्याला असं अवचित बघून तिच्या चेहऱ्यावरचा उडालेला गोंधळ, त्याला त्याची मिस गोंधळेकर आठवली.तिला बघून एवढ्या प्रवासाचा शीण कुठल्याकुठे पळाला होता.

"पार्टनर, आलेल्या पाहुण्याला अशी दारातच अडवशील की आत यायला थोडी जागा देशील?"   तो मस्करीत म्हणाला.


खरं तर त्याच्या काळ्या डोळ्यात ती अडकली, पण त्याच्या बोलण्याने ती बाजूला झाली.

"अरे विराज आलास होय? ये आत ये ना."    तोवर सुमी हॉलमध्ये आली.

"हॅलो मॉम, कशा आहात?"    रावीला बाजूला सारत सुमीला मिठी मारून त्याने विचारले.

"मी एकदम मस्त, बाळा. तू सांग, तुझा प्रवास नीट झाला ना?" त्याला प्रेमाने कुरवाळत तिने प्रश्न केला.

रावी डोळ्यांची उघडझाप करून कधी विराजकडे तर कधी मॉमकडे बघत होती.

"एक मिनिट, तुम्हा दोघांचं काय चाललंय? हा तुला मॉम काय म्हणतोय आणि तू त्याला बाळा बाळा काय करतेस?"
तिने दोघांकडे बघून विचारलं.

"मॉम, बघितलं? जेलसी!"
तो म्हणाला, त्यावर दोघे हसायला लागली.

"हसू नका."  ती जवळजवळ ओरडलीच.

" आधी सांग, तू इथे कसा? आणि येणार नव्हतास ना तू?"
तिने आपला मोर्चा त्याच्याकडे वळवला.

"किती गं प्रश्न विचारशील? दम तरी घेऊ दे त्याला. जा, त्याला तुझ्या रूममध्ये घेऊन जा. फ्रेश होऊ दे, मग भांडायचं असेल तर खुशाल भांडा."
सुमी मिश्किल हसत म्हणाली.

" याला माझ्या रूममध्ये कशाला?"    ती.
"मग तो कुठे राहील? त्याचं सामान ठेवायला मदत कर आणि तू माझ्या रूममध्ये राहायला ये."    सुमी.

"पण मॉम,"

"रावी.."    सुमीने तिच्याकडे असं बघितलं की मग त्यावर काही न बोलता ती त्याची लगेज बॅग आपल्या खोलीच्या दिशेने ओढत घेऊन गेली. तिच्यापाठोपाठ तोसुद्धा गेला.
.

.

.

.

क्रमश :

*********


आला एकदाचा विराज. आता पुढे काय ते वाचा पुढच्या भागात. तोवर हा भाग कसा वाटला, नक्की सांगा.  आणि हे काय पारिजाताचा सुगंध कमी होतोय की काय? Fb पेजवर किती कमी लाईक? वाचत राहा, लाईक करत राहा. तेवढाच माझा उत्साह वाढतो.
साहित्यचोरी हा गुन्हा आहे. लेखकांच्या मर्जीशिवाय त्यांचे लेक इतरत्र शेअर करू नये. शेअर करायचे असल्यास fb पेजची लिंक शेअर करा. धन्यवाद!


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//