पारिजात.. गंध प्रेमाचा..! भाग -37

Ravi And Viraj ♥️

आपण वाचत आहात एका गंधाळलेल्या प्रेमाची सुगंधित कथामालिका..
पारिजात.. गंध प्रेमाचा..!


*********



विराजचे अमेरिकेतील प्रोजेक्ट जवळपास त्याच्या हातात आले होते, पण त्याला सध्या ब्रेक हवा होता. नजरेसमोरून रावीचा चेहरा जाता जात नव्हता. त्याने मनाशी पक्के केले, आता मिशन एकच..


`बॅक टू इंडिया!´


तशी त्याची हालचाल सुरु झाली होती.



"केव्हा निघणार आहेस? कन्फर्मेशन वगैरे झालंय ना सगळं?"
सकाळी हॉस्पिटलला निघण्यापूर्वी रावी विराजला कॉलवर विचारत होती.

"बघू गं. इतक्यात जमेल असं वाटत तर नाहीये."
त्याने लगेच कलटी मारली.

" काय बोलतोस तू? आणि आवाजाला काय झालंय? "
ती.

" जाम थकलोय यार, मी आज! डोळ्यांवर झोप आलीय."
आळसावलेल्या आवाजात तो म्हणाला.

" ते जाऊ दे, तू इथे आल्यावर श्रुतीला प्रपोज करणार होता ना त्याच काय? " ती.

" ये वेडाबाई, तुझ्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडचा मार नाही खायचाय मला, नी मुळात मी तसे म्हटलेच नव्हते. तुझ्या ओळखीतल्या डॉक्टर मुलीबद्दल मी बोललो होतो."   तो हसून म्हणाला.
" आता झोपू का मी?" त्याचा प्रश्न.

" नाही, अजिबात नाही.. "
जवळजवळ ती ओरडलीच.
" आपलं काय ठरलं होतं? मॉम आणि सरांना एकत्र आणायला प्लॅनिंग करणार होतो ना आपण? आता काय चाललंय तुझं? "
थोड्या रागाने ती.

"हो अगं, बोललो होतो खरा. पण इतक्यात यायला नाही जमतंय, त्याला मी तरी काय करू?"
तिचा तसा चिडका स्वर ऐकून त्याला जाम मजा येत होती.

 
"ठीक आहे,  नकोच येऊ तू.  माझे मी बघून घेईन. मी एकटीने करू शकते सगळं हॅन्डल आणि ऐक, यापुढे आपली पार्टनरशिप संपली आता."
तिने फणकाऱ्याने कॉल कट केला.

"अगं ऐक ना.."
तो काही बोलणार,  पण कॉल केव्हाच बंद झाला होता.


`सॉरी पार्टनर, तुला दुखवायचं नव्हतं मला, पण मग सरप्राईज द्यायचंय तर एवढं करावंच लागेल ना? ´
मोबाईलमध्ये तिचा फोटो बघून तो बोलत होता.

`लाडोबा, खरंच खूप गोड आहेस गं तू. तुझ्याशी हे खोटं बोलणं शेवटचं,  त्यानंतर मात्र असं कधीच वागणार नाही. मला समजून घेशील ना?´
तो तिच्याच तंद्रीत गुंग झाला होता.


हॉस्पिटलला पोहचल्याबरोबर तिने पहिले मोबाईल चेक केला. विराजचा सॉरीचा मेसेज असेल, अशी मनात वेडी आशा होती पण तसं काही नव्हतं उलट तो केव्हाचा ऑफलाईन दिसत होता. चिडून मग तिने मोबाईल बंद करून ठेऊन दिला. डोळे मिटले आणि एक लांब श्वास घेऊन स्वतःला तिने रिलॅक्स केले.त्यानंतर जणू काही घडलेच नाही अशा अविर्भावत ती आत गेली.



दिवसभरातील व्यस्त शेड्युल..  त्यामुळे बंद मोबाईलकडे बघायला तिला वेळच भेटला नाही. सायंकाळी घरी परतताना कॉर्नरवरच्या पारिजाताने तिचे लक्ष वेधले आणि मनात पुन्हा विराज डोकावला. घरी पोहचल्यावर फ्रेश झाल्या झाल्या लगेच त्याला कॉल करण्यासाठी तिने मोबाईल हातात घेतला खरा, पण सकाळचा राग अजून गेला नव्हता, मग कॉल न करता ती तशीच डोळे मिटून बसून राहिली.

`समजतो कोण हा स्वतःला? याला काय वाटलं, याच्याशिवाय मी काहीच करू शकत नाही का?´   मनात आलेल्या विचाराने तिला रागासोबत रडायला येऊ लागले. त्याचा विचार झटकून ती कानात हेडफोन टाकून मोबाईलमध्ये गाणे ऐकायला लागली.



संध्याकाळची कातर वेळ,  कितीही नको म्हणताना त्याच्या आठवणीत गुंतलेली ती आणि कानात गुंजणारा लतादीदींच्या आर्त स्वरातील गाणी ..!
ते ऐकताना तिच्या डोळ्यात हेलकावणारे पाणी गालावर आलेच.




"ओये, लेडी देवदास, अशी अंधारात का बसली आहेस?"

बाहेरून आलेल्या श्रुतीने घरातील दिवे लावत विचारलं.

ती आपल्याच विचारात बघून श्रुतीने तिच्या कानातले हेडफोन ओढले.

" येs, काय करतेस?"    डोळे उघडत रावी ओरडली.

"सगळा मूड घालवला ना."
श्रुतीकडे बघत ती.


"कसला? गाणे ऐकण्याचा की रडण्याचा?" श्रुतीचा प्रश्न.

रावीने नजर खाली केली.

" काय झालं? विराजची आठवण येतेय का? "
तिच्याजवळ बसत तिने शांतपणे विचारलं.

" त्याचा काय संबंध असतो गं प्रत्येक वेळी? "
ती चिडून बोलली खरी पण अश्रुंचे बरसणे चालूच होते.

"ओके, राहिलं. नसेल सांगायचं तर नको सांगू. पण विसरू नकोस, मी आहे बरं का इथेच, तुझ्यासोबत. तुझ्या मनातलं थोडंफार मलाही कळायला लागलंय आताशा."

ती हे बोलली आणि रावी तिला मिठी मारून रडायला लागली.

"श्रु, मला विचारू नकोस, की मी का रडतेय, पण खरंच असं गळ्यात पडून रडायचं आहे यार. प्लीज, रडू दे मला."

रावीच्या बोलण्याने श्रुतीला हसू आले. तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत ती काही न बोलता तिला फक्त कुरवाळत राहिली.


सकाळी रावी हॉस्पिटलला गेल्यानंतर तिला विराजचा कॉल आला होता…
" हे, हाय श्रुती,  इट्स विराज."
तो.

"यू मिन्स मिस्टर विराज कुलकर्णी?" श्रुतीने अविश्वासाने विचारलं.

" होय, तोच मी . " तो हसून म्हणाला.

" ओ माय गॉड!  हँडसम तू माझ्याशी बोलतो आहेस? इट्स जस्ट आऊट ऑफ माय इमॅजीनेशन!  बोल, रावीला सोडून मला कसा काय कॉल केला? नी मुख्य म्हणजे माझा नंबर तुझ्याकडे कसा?"
तिचे प्रश्नावर प्रश्न सुरु झाले.

"बाई गं किती प्रश्न? तुझा नंबर मी रावीच्या मॉम कडून घेतलाय गं. ऐक ना,  आज रावीचा मूड जरा डाउन आहे. एक करशील? जर ती तुला रडताना दिसली ना तर डोकं टेकवायला तुझा खांदा तेवढा देशील? ती का रडतेय ते मात्र विचारू नकोस. नंतर ती तुला सांगेलच सगळं."
तो म्हणाला.

" तुझ्यामुळे रडतेय का माझी मैत्रीण ? "   तिने विचारले.

"थोडंफार तसंच. पण सिरीयस असं काही नाहीये."    तो.

" ओके, मग नो प्रॉब्लेम.मी सांभाळेन तिला. "
श्रुतीने त्याला विश्वास दिला तेव्हा कुठे तो निवांत झोपू शकला.


रडणाऱ्या रावीला थोपटत असतांना श्रुतीला सकाळचे विराजशी झालेले बोलणे आठवले.दिवसभरात कित्येकवेळा तिने रावीला कॉल केला होता पण मोबाईल बंद असल्यामुळे दोघींचे बोलणे झाले नव्हते आणि आता घरी परतल्यावर तिला ती अंधारात बसून दिसली तर ती रडतेय हे तिने लगेच ओळखले.



काही वेळाने रावी शांत झाली. मन हलके झाले तसे तिला बरे वाटू लागले.

"आता ओके आहेस ना तू? चल जेवण करूया, मग मला हॉस्पिटलला निघायचं आहे."
रावीकडे बघत तिने विचारले.

"थॅंक्स श्रु. तूच माझी खरी मैत्रीण आहेस."
आपले नाक पुसत ती म्हणाली.



श्रुती गेल्यानंतर बिछान्यावर पडल्यापडल्या ती पुन्हा सरांचा विचार करू लागली.तिला हॉस्पिटलचा पहिला दिवस आठवला. सर आणि विराज, दोघेही तिच्या आयुष्यात एकाचवेळी आले होते, हे आठवून नकळत तिच्या ओठांवर हसू उमटले. डीजीओची दोन वर्ष कशी भराभर संपत आली, तिलाच उमगेना. ह्या दोन वर्षांत काय काय घडलं होतं. सरांचा खाल्लेला ओरडा, विराजशी झालेले भांडण, नंतर त्यांच्यातील मैत्री. तिची ती सीझरची पहिली, त्यात तेवढीच कॉम्प्लिकेटेड केस, आणि त्यामुळे सर आणि विराजचे उलगडलेले नाते. सगळंच कसं अकलनीय!

सर आठवले नी मग सोबत त्यांच्या दारातला पारिजात आठवला.   `कसलं भारी नातं आहे ना त्यांचं पारिजाताशी? विराज आणि त्यांच्यातील नातं परत जुळलं तेव्हा मॉम ने मला तीच इवली फुलं त्यांना द्यायला लावली आणि त्यांनीही रिटर्न गिफ्ट म्हणून मला तोच केशरी पारिजात द्यावा? एकमेकांशी किती जुळली आहेत यांची मने, आता ती लवकरच एक व्हायला हवीत.´ ती मनात विचार करत होती.


या सगळ्या आठवणीत तिला तो लाडवाचा प्रसंग आठवला. सरांच्या वाढदिवसाला तिने डब्यातला लाडू दिलेला, तेव्हा पहिला घास घेताक्षणी त्यांचे भाव बदलले होते.


`इतक्या वर्षानंतर सुद्धा तिच्या हातची चव त्यांच्या जिभेवर अजूनही रेंगाळत असेल का?´


`नक्कीच! त्यांचे प्रेम एवढे खोल आहे की दोघेही काहीही विसरू शकले नाहीत. ना तो पारिजात, ना ते बेसनाचे लाडू आणि ना त्या लाडवांची चव!´
तिच्या प्रश्नाचे उत्तर तीच देत होती.


बेसनाच्या लाडवांसोबत सरांचा वाढदिवस पुन्हा नजरेसमोर आला आणि तिचे डोळे अचानक आनंदाने चमकू लागले. हातातल्या मोबाईलमध्ये ती कॅलेंडर बघायला लागली... त्यांचा वाढदिवस अगदी चार दिवसांवर येऊन ठेपला होता.


`ओ माय गॉड! सरांचा बर्थडे येतोय.
वॉव! त्याच दिवशी ह्या दोघांना भेटवलं तर?´
स्वतःला सुचलेल्या कल्पनेने तिला खूप आनंद झाला.


`डॉक्टर रावी, यू आर रिअली ग्रेट!´
आपल्या हाताने स्वतःचीच पाठ थोपटायला जाणार,   तोच तिच्या हातातला मोबाईल खणखणला.


"हॅलो, बच्चाs!"
पलीकडे रडवेल्या आवाजातील सुमी होती.

"मॉम? काय झालेय? तुझा आवाज असा का येतोय?"
रावीच्या चेहऱ्यावर काळजीचे भाव आले.

" बच्चा,मला तुझी खूप आठवण येतेय. प्लीज तू येशील का उद्या?"
सुमीचा स्वर तसाच होता.

"मॉम तू रडू नकोस ना, आणि काय झाले ते नीट सांग बघू."
ती.

"मला असं नाही सांगता येत आहे गं, प्लीज तू ये ना बेटू."
सुमी.

"अगं पण.." रावी.

"आता मी ठेवते फोन, तू सुद्धा झोप आणि उद्या नक्की ये.. मी वाट बघत आहे. गुडनाईट!"
लगेच तिने कॉल बंद देखील केला.

`काय झालं असेल मॉमला? ती पूर्वी कधी असं वागली नाही आणि आज अचानक? परत हार्मोनल इंबॅलन्सचा खेळ सुरु झालाय का हिचा? ´

तिचा विचार करत ती डोक्याला हात लावून बसली

.

.

.

क्रमश :


**********


काय झाले असेल सुमीला? का तिने एवढया तातडीने रावीला बोलावले? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या भागात..

तोवर हा भाग कसा वाटला, कमेंट करून नक्की कळवा. तुमचे like सुद्धा मला पुढे लिहायला प्रोत्साहन देत असते.त्यामुळे fb पेजवर like  करायला विसरू नका.



साहित्यचोरी गुन्हा आहे. तेव्हा लेखकांच्या परवानगीशिवाय त्यांचे लेख शेअर करू नयेत.


🎭 Series Post

View all