Mar 02, 2024
प्रेम

पारिजात.. गंध प्रेमाचा..! भाग =35

Read Later
पारिजात.. गंध प्रेमाचा..! भाग =35

आपण वाचत आहात एका गंधाळलेल्या प्रेमाची सुगंधित कहाणी..
पारिजात.. गंध प्रेमाचा..!


( मागील भागात -
बोलता बोलता डॉ साठे रावीला आपली प्रेमकथा सांगतात, तेव्हा डॉ. साठे म्हणजेच आपल्या मॉमचा अनी आहे, हे त्यांच्याशी बोलल्यावर रावीला जाणवते.
आता पुढे..)

************सुमीच्या अनीचा शोध तिला घ्यायचाच होता, पण असे अनपेक्षितपणे तो स्वतःच पुढ्यात येईल याची कधी कल्पना तिने केली नव्हती.

तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि मनात आनंद! एखादा खूप मोठा खजिना अचानक सापडावा, असे काहीसे तिचे झाले होते.`सरांच्या दारातला पारिजात आणि आपल्या घराच्या अंगणातला पारिजात, दोन्ही वेगळे नाहीतच. दोघांचे मूळ एकाच ठिकाणचे, जिथे अनी आणि सुमीच्या प्रेमाचा गंध दरवळला होता.´


रावी विचारात गढली होती. ते दोन्ही प्राजक्ताचे झाड तिच्यासमोर उभे होते.


आधी अगदीच काहीही न जुळणाऱ्या सुमी आणि अनीच्या सवयी आता बदलल्या होत्या. दोन जीव एकत्र आले की सहवासाने त्यांच्या सवयी एक व्हायला लागतात, असं म्हणतात. इथे मात्र कैक वर्षांच्या दुराव्याने त्यांचे विचार, सवयी सारख्या झाल्या होत्या. मग हा कसला दुरावा? दूर राहूनही त्यांची आंतरिक ओढ तर अजूनही तशीच होती, तीस वर्षांपूर्वीसारखीच!


`आणि माझं काय? मी कोण? त्या भीषण अपघातात सर्व दगावले, मॉम दोन दिवस बेशुद्ध होती. मी मात्र तिच्या ओंजळीत अगदी सेफ. साधं खरचटलं सुद्धा नव्हतं. कशासाठी? का वाचले मी? मॉमला तिच्या प्रेमापर्यंत पोहचवायला देवाने माझी निवड केली असेल का? हे विधिलिखित आधीच ठरलेलं असावं का? डॉक्टर व्हायची तळमळ आणि इथे आल्यावर सरांशी झालेली भेट, त्यानंतर इतक्या सगळ्या फॅकल्टीज असतांना डीजीओ व्हायची ओढ आणि त्यातही मेंटर म्हणून हवे असलेले साठे सर! कशासाठी हे सर्व? सुमीचे प्रेम अनीपर्यंत पोहचते करायला आणि अनीच्या भावना सुमीला कळवणे ह्या एका शुद्ध हेतूपोटी? त्यांच्यातील दुरावा दूर करण्यासाठी विधात्याने मला नेमले असावे का? ह्या `दुरावा´ मधील `रा´ म्हणजे मी. रा बाजूला काढला तर उरतो केवळ `दुवा´. दोघांना जोडणारा दुवा म्हणजे मी का? काही झाले तरी दोघांना एकत्र आणावेच लागेल. पण कसे, त्याची उकल होत नाहीये.´


ती डोळे मिटून प्रत्येक कडी जोडून बघण्याचा प्रयत्न करत होती. पुढे काय करायचं हा प्रश्न पाठ सोडत नव्हता.
" मॅम, ओपीडीचे पेशंट घ्यायचे का? "
सिस्टरने विचारलेल्या प्रश्नाने ती भानावर आली.


" हो, एकेक पेशंटला आत पाठवा." ती म्हणाली.


"डॉक्टर, डोन्ट मिक्स युअर पर्सनल लाईफ अँड प्रोफेशनल लाईफ टुगेदर." एकदा सरांनी सांगितलेलं तिला आठवलं.
डोक्यातील विचार बाजूला ठेऊन ती पेशंट चेक करण्यात गुंतली.ओपीडी आटोपल्यावर ती निघाली. तिच्या फ्लॅटजवळच्या चौकातील बंगल्यासमोरच्या पारिजाताने तिचे लक्ष वेधले आणि पुन्हा तेच विचार मनात फेर धरू लागले."ये, हाय! बरं झालं आलीस तू. मी आता तुला कॉल करणारच होते."
दारात तिला श्रुतीने गाठलं.

रावीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं.

" अगं, उदय आलाय तेव्हा त्याला भेटायला निघाले. रात्री त्याच्यासोबत डिनर करून मग परस्पर हॉस्पिटलला जाईन. "
श्रुती.

तिने स्मित करून मान डोलावली.

" काय झालं? जास्त वर्कलोड होते का? थकल्यासारखी दिसते आहेस. "
तिच्या चेहऱ्याकडे पाहत श्रुतीने प्रश्न केला.


" हूं. ओपीडी हेवी होती आज, म्हणून थकलेय. जरा वेळ झोप काढली की बरं वाटेल. जा, तू. माझी काळजी करू नकोस. एन्जॉय युअर डे !"
ती म्हणाली तसं तिला बाय करून श्रुती निघून गेली.थोडावेळ झोपल्यानंतर बरं वाटेल म्हणून रावीने अंग टाकले. पण मनातल्या कोलाहलाने झोप डोळ्यावर येईना, तरीही काही वेळ ती तशीच पडून राहिली. पोटात कावळे ओरडायला लागले तेव्हा नाईलाजाने उठून ती स्वयंपाकघरात गेली. दोन मिनिटांत बनणारी मॅगी आणि कॉफी घेऊन ती बाहेर आली.
डोक्यात एकच विचार, मॉम आणि सरांना कसं भेटवायचं. आणि मग अचानक तिला विराजची आठवण झाली.


`त्याला सांगावं का?´ मनात आलेल्या प्रश्नावर लगेच होकाराचा कौल मिळाला. तिने मोबाईल हातात घेतला. सात वाजत आले होते, म्हणजे तिकडे तो ऑफिसच्या तयारीत गुंतला असेल. `आता कॉल करणे बरं नव्हे´ असा विचार करून तिने मोबाईल परत बाजूला ठेवला.

घड्याळातील काटे आज खूप हळू फिरत आहेत असं तिला वाटू लागलं. स्वयंपाक करणाऱ्या काकू येऊन गेल्या होत्या, तिने कसेबसे चार घास पोटात ढकलले आणि हातात मोबाईल घेऊन पुन्हा ती भिंतीवरच्या घड्याळाकडे बघत बसली.
दोन दिवसांपूर्वीचे विराजचे प्रेजेंटेशन खूप भारी झाले होते. प्रोजेक्ट त्याच्या हाती आला होता, खूप खुश होता तो. आज रावीला आपल्या मनातलं सांगायचं ह्या विचारात असतांना डोक्यात एक युक्ती आली. लंच ब्रेकमध्ये लंच सोडून तो एका ज्वेलरीशॉप मध्ये होता.

`आणखी एक महिना पार्टनर, मग मी तुझ्या पुढ्यात असेल.´
तिला कॉल करण्यासाठी काढलेल्या मोबाईलमधील तिचा फोटो बघून तो मनात म्हणाला.

`झोपली असेल का ही? ह्या वेळेस फोन करू की नको?´ या दुविधेत असतांना त्याने कॉलची बटण दाबली.


इकडे रावीसुद्धा त्यालाच फोन करत होती, त्यामुळे दोघांनाही नेटवर्क बिझी येत होते.
शेवटी पाच - दहा मिनिटे हा खेळ चालल्यानंतर रावीने मोबाईल बाजूला ठेऊन दिला. पुढच्या मिनिटाला शेवटचा प्रयत्न म्हणून विराजने नंबर डायल केला आणि रावीच्या मोबाईलची रिंग वाजली.


"विराज, केव्हाची कॉल करतेय तुला? कुठे होतास?"
ती घाईत बोलली.


" अगं मी तुलाच ट्राय करत होतो, पण नेटवर्क बिझी येत होते. "
तो.

"हम्म! विराज मी खूप खुश आहे आज." तिचा चेहरा खुलला होता.

" मी सुद्धा!" तो.

"काही सांगायचंय तुला." ती.

"मलादेखील." तो.

"खूप एक्सायटिंग न्युज आहे." ती.

"माझ्याकडे पण." तो.

" काय चाललंय तुझं विराज? मी जे बोलतेय तेच का बोलत आहेस तू? " ती थोडी चिडून म्हणाली.

" सॉरी अगं. चिडू नकोस ना, पण खरंच मलासुद्धा तुला एक महत्त्वाची,एक्सायटिंग गोष्ट सांगायचीय." तिचा चिडका स्वर त्याने ओळखला.

" मग बोल ना." ती.

" असं नाही, व्हिडीओ कॉल करू?" तो.

तिने मान डोलावली.

" हं, सांगा आता. " तिने व्हिडीओ कॉल उचलल्यावर तो म्हणाला.

" आधी तू. " ती.

" नाही, तू. तुला मघापासून सांगायचं होतं ना?" तो.

" हो, पण तुझा फोन आधी लागला ना, तर तू आधी सांग. मग मी सांगते." ती.

"पार्टनर, आय एम ईन लव्ह! प्रेमात पडलोय यार मी."
तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला.

ती त्याच्याकडे पाहत होती, त्याचा चेहरा आनंदाने फुलला होता.


" वॉव! अभिनंदन. तिथल्याच गोऱ्या मॅडमला पटवलं का? "
तिने त्याची खेचत विचारलं.


"नाही गं बावळट, तुझ्या ओळखीतील आहे ती." तिच्याकडे बघून मिश्किल हसत तो म्हणाला.


"तिला सांगितलं?" ती.


"नाही अजून. पण भारतात परतलो की डायरेक्ट प्रपोज करणार आहे, म्हणून रिंग घ्यायला आलोय इथे. तुझी थोडी मदत हवीय मला."
तो.

" ओ हो, डिरेक्ट प्रपोज हं? तुझ्यासारख्या नमुन्याला कोण हो म्हणेल रे?"
त्याला वेडावत तिने विचारलं." कोणाचे माहीत नाही, पण मला खात्री आहे, ती नक्कीच हो म्हणेल. तू तिला ओळखतेस, अगदी जवळची आहे ती तुझ्या." तो.


" अशी कोण आहे? " तिला खरंच प्रश्न पडला.

" एक क्लू देतो, ती सुद्धा डॉक्टर आहे. " तो हसून म्हणाला.

"माझ्या ओळखीतील, अगदी जवळची, त्यात डॉक्टर..! श्रुतीबद्दल बोलतो आहेस का तू?" ती डोकं खाजवत म्हणाली.

"ये वेड्या, ती ऑलरेडी एंगेज आहे हं. उगाच तिच्या बॉयफ्रेंडचा मार खाशील." ती.

"वेडी तर तू आहेस गं. बरं ते जाऊ दे, तू सांग, तू काय सांगणार होतीस?"
त्याने विचारले.

" हो रे, विराज. मला तर खूप मोठी न्यूज सांगायची होती तुला. खूप महत्त्वाची अशी." ती पुन्हा आतुरतेने म्हणाली.

" सांग ना. "
तिचा आनंद बघून त्यालाही आनंद झाला.

" मी मागे मॉमबद्दल बोलले होते ना तुझ्याशी? मॉमच्या बालपणीच्या प्रेमाचा शोध लागलाय. " हर्षाने ती.

" काय सांगतेस? वॉव! रिअली खूप एक्सायटिंग न्यूज आहे ही. आय एम सोs हॅपी! सांग ना, कोण आहे तो? कुठे असतो?"
विराजचे कान पुढे ऐकायला आतूर झाले होते.


" ओळखतोस तू त्यांना, तुझ्या अगदी जवळची व्यक्ती आहे ती. त्यातून डॉक्टर. "
ती हसून म्हणाली.


" माझ्या ओळखीतील, जवळची व्यक्ती, ते सुद्धा डॉक्टर..? व्हॉट? तू अनिकेत मामाबद्दल बोलत आहेस? "
त्याने आश्चर्याने विचारले.

" हो विराज, अरे तुझा अनिकेत मामा म्हणजेच माझ्या मॉमचा अनी आहे."
ती आनंदून म्हणाली.

" माय गॉड! मामाचा असा काही पास्ट असेल, मला माहीत सुद्धा नव्हतं गं. पार्टनर, मी खूप खूप खुश आहे आज. किती आनंदाची गोष्ट सांगितलीस तू. "
त्याच्या डोळ्यात पाणी तरळले.

" हो ना. विराज, तू हवा होतास यार इथे. इतक्या वर्षांपासून हवी असणारी ही आनंदाची बातमी मी मॉमलादेखील नाही सांगितली. मला कळलेच नाही मी काय करू. तुझ्याशी बोलायला म्हणून मी कितीवेळची वाट बघत होते. "
ती बोलता बोलता रडायला लागली.

" हेय, रावी तू रडू नको ना. " तिला तसं रडताना बघून त्याला गलबलून आले.

"विराज, आय मिस यू टुडे टू, टू, टू मच! तू हवा होतास ना इथे. का सोडून गेलास तू मला? मी मॉमला नाही सांगू शकले काही, कारण जेव्हा ती तिच्या अनीला प्रत्यक्ष भेटेल तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा आहे मला. रॅदर, त्या दोघांचा आनंद बघायचा आहे. त्यांना कसे भेटवू? मला कळत नाहीये. मी एकटी नाही करू शकत यार, हे सगळं. विराज तुझी गरज आहे मला. प्लीज, कम बॅक सुन! ये ना रे, लवकर परत."

ती रडत रडतच बोलत होती.


" तू रडू नको ना गं. तुला असं रडताना नाही बघू शकत मी. तुला हवाय ना मी तिथे, इथले सगळे आटोपून शक्य तेवढ्या लवकर येतो मी तिकडे. जमल्यास महिन्याभरातच. तू म्हणशील तसेच होईल. आपण दोघे मिळून त्यांच्यासाठी सरप्राईज मिटिंग अरेंज करू. पण तू रडणं थांबव आधी."

तिला सांगता सांगता तोही रडायला लागला.

" विराज, आय मिस यू!"
ती डोळे पुसत म्हणाली.

" आय मिस यू, टू पार्टनर!" तो तिला म्हणाला.

" थँक्स! विराज. " ती मुसमूसत म्हणाली.

" अरे, मग माझ्यावर तुझे इतके थँक्स बाकी आहेत की ते म्हणायला मला लवकरच तिकडे परतावे लागेल. "
तो हसून म्हणाला. त्यावर तीही हसली.

"बरी आहेस ना आता? बघ, हसतांना तुझ्या गालावरची खळी किती गोड दिसते."
तिने परत हसून मान डोलावली.

"गुड! कसला विचार न करता निवांत झोप आता. मी ऑफिसला निघतो." तो.

" विराज, तुला रिंग घ्यायची होती ना? "
तिने आठवण करून दिली.

" हम्म! आता असू दे, प्लॅन जरा चेंज झालाय. नंतर बघू. निघू मी? "
तो.

त्याला बाय करून तिने फोन ठेवला.

.

.

.

क्रमश :


*************


मागचा भाग स्पेशल होता. तुम्हाला तो आवडला, तशा भरभरून कमेंट्स सुद्धा आल्यात. सर्वांचे खूप खूप आभार. सुमी आणि अनीला एकत्र आणायला रावी आणि विराज काय करतील हे कळायला वाचा पुढील भाग. तोवर हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. सोबत फेसबुक पेजवर लाईक, कॉमेंट करत रहा.साहित्यचोरी हा गुन्हा आहे. तेव्हा लेखकांच्या मर्जीशिवाय त्यांचे लेख, त्यातील मजकूर कुठे शेअर करू नये. धन्यवाद!

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//