पारिजात.. गंध प्रेमाचा..! भाग -34

रावीला कळलेय सत्य. डॉक्टर साठे म्हणजेच सुमीचा अनी.

आपण वाचत आहात, एका गंधाळलेल्या प्रेमाची सुगंधित कहाणी..
पारिजात.. गंध प्रेमाचा..!


( मागील भागात -
सुमीकडे आलेल्या रावीला ती विराजच्या प्रेमात पडल्याची जाणीव होते. दिवसभर त्याच्या आठवणीत गुंतल्यानंतर रात्री जेवताना ती सुमीला सांगते की जोपर्यंत सुमी लग्न करणार नाही तोवर तिसुद्धा लग्न करणार नाही. आणि आता काही झालं तरी सुमीच्या अनीला शोधायचंच असं ती ठरवते.
रावीने ठरवल्याप्रमाणे सुमीचा अनी खरंच सापडेल का तिला?
वाचा आजच्या भागात.)

*******


सकाळी लवकर निघायचे होते. त्यामुळे मग लगेच तिने निद्रादेवीच्या कुशीत स्वतःला स्वाधीन करून घेतले.


"आजची हिस्टरेक्टॉमी एकदम परफेक्ट झालीय डॉक्टर.

अँड टुडे लूकिंग फ्रेश हं! दोन दिवस घरी राहून आलीस, तर बघ, एकदम टवटवीट दिसते आहेस."

गर्भाशयाची शस्त्रक्रिया पार पाडून बाहेर आल्यावर डॉक्टर साठे रावीसोबत बोलत होते.

" सर, तुमच्यासारखे गुरु असले तर माझी प्रत्येक सर्जरी परफेक्टच होणार हो आणि फ्रेश म्हणत असाल, तर त्या बाबतीत अगदी खरं बोललात हं. आपले घर, तेथील माणसे ह्यांची भेट झाली की मन प्रफुल्लित होतं. शिवाय मायेने घास भरवणारी माझ्या मॉमसारखी आई घरात असेल तर मग बोलायलाच नको. दोन घास जास्तीचे जातात पोटात आणि मग मी भोपळ्यासारखी फुगत सुटते. "
रावी म्हणाली.


" काय? ह्या वयात तुझी मॉम तुला जेवण भरवते? लकी आहेस हं. तुझ्याएवढा असतांना जर मी माझ्या आईला जेवण भरव म्हटले असते तर चांगले फटके मिळाले असते मला."
ते आश्चर्याने हसत म्हणाले.


" मी तर लकी आहे सर, पण माझी मॉम जगावेगळी आहे. एकदम युनिक! ती तर अजूनही मला बच्चा म्हणते. मग अशी गोड मॉम असल्यावर मी तिचा लाडोबा असणारच ना? थोडा हट्ट केला की तिला नाही म्हणवत नाही. लगेच पुरवते. पण प्रत्येक हट्ट नाही हं. कधी कधी ती माझ्याहून जास्त हट्टी बनते, तेव्हा मात्र माझ्या नाकीनऊ येतात."
ती मॉमबद्दल भरभरून बोलत होती.


तिचे बोलणे ऐकून ते मनमुराद हसले. इतके की त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.


" बी फ्रँकली, एक सांगू? " डोळे पुसत ते म्हणाले. " जेव्हा तू बोलतेस ना, तेव्हा मला माझ्या मैत्रिणीची फार आठवण होते. तिदेखील तुझ्यासारखी अखंड बडबड करत असायची. "

बोलतांना ते भावुक झाले, पण तिला फारसं जाणवलं नाही.

" ओsह! डॉक्टर साठेंना एक मैत्रीण होती तर? कुठली, कॉलजेची का? "
त्यांच्याकडे डोळे रोखून बघत तिने विचारलं.

"कॉलेजची नव्हे गं, बालपणीची मैत्रीण होती ती."
हे बोलतांना त्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच तेज आले.

"स्पेशल होती का ती?"
त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज बघून तिची उत्सुकता वाढली.

"स्पेशल तर होती ती, शिवाय तू आत्ता बोललीस ना तशी युनिकसुद्धा होती."
ते हसून म्हणाले.

"तुम्हाला आवडायची ती?" तिने अधीरतेने विचारले.

त्यांनी मान डोलावली.ओठांवरचं हसू कायम होतं.

" इट मीन्स तुम्ही प्रेमात पडला होतात तिच्या? "
तिची उत्सुकता शिगेला पोहचली.


" प्रेमात केवळ पडलो नव्हतो, तर आकंठ बुडालो होतो." ते.

" आणि तिचं काय? " विचारताना रावीचे डोळे चमकत होते.

" तिचेही सेम माझ्यासारखेच झाले होते. "
तिचे नाक खेचत डॉक्टर म्हणाले.

" आँs!" ती नाक चोळायला लागली.

"म्हणजे, दो दिल मिल रहे थे.. मगर चुपके चुपके! असं काहीसं होतं का सर? "

एखादी नवी केस स्टडी सुरु असल्याप्रमाणे कुतूहलाने ती सरांना एकेक प्रश्न विचारत होती.

"पुरे झाले आता, चला कामाला लागा."
हातातील कॉफीचा रिकामा मग टेबलवर ठेवत ते म्हणाले.

"सर, प्लीज! खूप इंटरेस्टिंग वाटत आहे हो,  मला हे सगळं. पुढे सांगा ना."

तिने गळ घातली.

"डॉक्टर रावी, ओपीडी बाकी राहिलीय आपली, आधी ते बघुयात का?"
ते उठत म्हणाले.

" डोन्ट वरी डॉक्टर साठे, बाजूच्या केबिनमध्ये असलेल्या डॉ. राधा पेशंट चेक करत आहेत. तेव्हा प्लीज, कंटिन्यू करा ना. "
ती आपली नजर बारीक करत म्हणाली.

" फार हट्टी आहेस गं तू. " ते.


" ते तर मला माहीतीय सर." ती मिश्किल हसली.

"जर तुमची स्टोरी मला सांगितलीत ना, तर बदल्यात तुम्हाला कॉफीचा दुसरा मग मिळेल बरं. " ती फ्लॅस्कमधून कॉफी मगमध्ये भरायला लागली. "शिवाय मी माझं एक सीक्रेट पण सांगेन तुम्हाला."

" कॉफीच्या रूपात मला लाच देतेस होय? " ते.

" नाही हो, मॉमच्या भाषेत याला मस्का लावणे  म्हणतात."
कॉफीचा मग त्यांच्या पुढ्यात धरत ती हसून म्हणाली.

" सर, मी असा मस्का लावला की माझी मॉम माझा हट्ट पुरवते. तुम्हीही पुरवा ना हा हट्ट, प्लीज! "
ती लाडीकपणे म्हणाली.


हट्ट..! एक छोटासा शब्द! पण त्यांच्या वाटेला हा प्रकार फारसा कधी आलाच नाही. हट्ट करण्याच्या वयात विराज दुरावला आणि मग ते एकदम पोक्त होऊन गेले. रावी त्यांच्यापुढे त्यांच्या प्रेमाबद्दल जाणून घ्यायला हट्ट करीत होती, तेही एवढं गोड बोलून की त्यांनाही नाही म्हणवलं नाही.तिच्या हातातील कॉफीचा मग पकडून ते परत खुर्चीवर बसले.


" बोल, काय ऐकायचं आहे तुला? तू विचारशील ते सर्व सांगेन. "
कॉफीचा घोट घेत ते म्हणाले.


" खरंच?"
तिला तर आनंदाने उड्या माराव्या वाटल्या.

" ती कोण? कुठे भेटली? काय करायची? पुढे काय झालं? आता कुठे आहे? सारं - सारं मला ऐकायचं आहे सर. प्लीsज लवकर सांगा ना. "
तिची उत्सुकता वाढतच होती.

" सांगतो, सांगतो. जरा ब्रेक लाव." ते हसून म्हणाले.

"माझ्या मावशीच्या गावी भेटली ती. खूप गोड, सुंदर अशी. गालावर पडणारी तिची खळी आणि हनुवटीवरचा तो काळा तीळ.. अजूनही नजरेसमोर स्पष्ट दिसतो. तुला हसायला येईल, पण खरे आहे हे, तिचे नाक ना थोडेफार तुझ्या नाकासारखेच होते, काहीसे अपरे. सारखी ती नाक मुरडायची तेव्हा खूप छान वाटायची मला. छोटी होती गं ती, दहावीची परीक्षा दिलेली. मीही नुकताच बारावीची परीक्षा देऊन मावशीकडे गेलो होतो. खूप भांडायचो आम्ही, मस्ती करायचो. प्रेम म्हणजे काय हे न कळणाऱ्या वयात प्रेमात पडलो."
ते भरभरून बोलत होते.
क्षणभर थांबून त्यांनी एक उसासा सोडला.

"हवी होती गं ती मला, पण तसं नाही झाले."
बोलता बोलता त्यांना दाटून आले.

रावी ऐकत होती, अगदी तल्लीन होऊन.

" का? तुम्ही तिला प्रपोज नव्हतं का केलं? "   कुतूहलाने ती.

"केलं होतं ना. तेव्हा मी फायनलला होतो आणि ती सेकंड इयरला.पण तेव्हाच घोळ झाला. तिच्या आधी तिच्या वडिलांनी नकार दिला. आमचं प्रकरण तिथेच संपले."
खिन्नपणे हसत ते म्हणाले.

"तुम्ही पुढे कधी कुणाशी लग्न नाही केलं?" ती.

" प्रश्नच नव्हता. " नकारार्थी मान हलवत ते.
" ती माझ्या हृदयात होती, आताही आहे. प्रत्येक क्षणात, प्रत्येक श्वासात तिच आहे. तिच्या व्यतिरिक्त मी दुसऱ्या कोणाचा विचार करूच शकलो नाही. " ते.

" आणि ती? तिने केले लग्न?"
रावीचे प्रश्न संपत नव्हते.

" माहीत नाही, पण माझं मन म्हणतं की नसेल केलं.जेवढा तिला मी ओळखू शकलो त्यावरून सांगू शकतो,कदाचित ती आजही माझ्यात तेवढीच अडकून असेल. "
ते.
" एवढे प्रेम, एवढा विश्वास. तरीही हा दुरावा, हे आयुष्यभराचं झुरणं,  कशाला सर? "
ती.

"माय डिअर डॉक्टर, एकदा प्रेमात पडून तर बघ. मग तुला कळेल, प्रेम काय असते ते. "
तिच्याकडे बघत ते म्हणाले.

`सरांचे बोलणे सेम मॉमसारखे असते. ती मला हेच म्हणाली होती.´ तिला आठवलं.
` साठे सर म्हणजे मॉमचा अनी असावा का?´ तिच्या मनात आलं.

" सर तुमचं आणि तिचं सगळं जुळायचं का? "
तिने विचारलं.

"सगळं? अगं काहीच नाही जुळायचं. ती आणि मी पूर्णतः भिन्न होतो, पण हां, मनं मात्र जुळली. दोघांना जोडणारा एकमेव दुवा.. माहीतीये कोणता?"

तिने प्रश्नार्थक पाहीले.

" माझ्या अंगणातील पारिजात. " ते किंचित हसून म्हणाले.

"त्या पारिजातानेच पहिल्यांदा आमची भेट घडवली. त्याच्या सुगंधात आमची मने जुळली. मालतीताई, म्हणजे तिची बहीण गं, ती आणि हा पारिजात, हेच आमच्या प्रेमाचे पहिले साक्षीदार! खूप वर्षांपूर्वी ताईच्या लग्नाची पत्रिका घेऊन मावशीकडे गेलो होतो, तेव्हा तिथल्या अंगणात उभ्या असणाऱ्या प्राजक्ताची फांदी सोबत आणली आणि इथे माझ्या दारात रुजवली."

ते बोलत होते, इकडे रावीच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलत होते.

" ऋतू बदललेत, वर्ष बदलली. दिवसेगणिक अंगणातला पारिजात वाढतोय, बहरतोय. तिच्यावरचे माझे प्रेम अजून घट्ट करतोय."
ते.

त्यांचे बोलणे ऐकून तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले.



" सर, रूम नंबर पाच मधील पेशंटला ओटी मध्ये शिफ्ट केलंय. "
सीमा सिस्टर आत येत म्हणाली.

" परत एक गर्भाशयाची सर्जरी. तू ओपीडी बघ. मी डॉ. राधाला असिस्ट करायला लावतो. "
ते रावीला म्हणाले.

तिच्या डोळ्यातून वाहणारे पाणी त्यांच्या नजरेतून सुटले नाही.

" अरे, इतकी इमोशनल नको होऊस अगं. मी बघ, मनावर दगड ठेऊन जगतोय अजूनही." ते उठत म्हणाले.

" आणि तुझे सीक्रेट कळले बरं का मला. प्रेमात पडल्याची जाणीव झाली ना तुला? तुझ्या डोळ्यात दिसतेय ते. सुमीच्या डोळयांत बघूनच मला कळलं होतं, मी तिला आवडतो ते. तू बरेचदा तिच्यासारखीच वाटतेस मला, अगदी सेम. "

तिच्या गालावर हलकी थाप देत ते म्हणाले.


" सर, काय म्हणालात आत्ता?"  ती झटकन उभी होत म्हणाली.


" प्रेमात पडल्याचे जाणवायला लागले ना तुला? हेच बोललो मी. " तिच्याकडे बघत परत ते म्हणाले.

" त्यानंतर? त्यानंतर कुणाचं नाव घेतलं तुम्ही?"
ती.


" ते होय. सुमी म्हणालो मी.आत्तापर्यंत जिच्याबद्दल ऐकत होतीस, तिच ती सुमी. सुमती नाव तिचं, पण मी सुमी म्हणायचो आणि ती मला अनिकेतऐवजी अनी म्हणायची."
ते जायला वळले.


" सर, तुम्ही तिला आजवर भेटण्याचा किंवा शोधण्याचा कधी प्रयत्न का नाही केला? "
पाठमोऱ्या त्यांना तिने कातर स्वरात विचारले.

" कारण तिच्या बाबांना दिलेल्या वचनात बांधला गेलो होतो मी. "
ते थबकून म्हणाले.


" पुरे झाला हा विषय आता, बोलत बसलो तर संपणार नाही. मी निघतोय सर्जरीसाठी. तू उर्वरित ओपीडी बघून घे, त्यानंतर घरी गेलीस तरी चालेल. "
ते केबिनबाहेर निघून गेले.


ते गेले आणि तिने स्वतःचे अंग खुर्चीत झोकून दिले.


`मॉमचा अनी म्हणजेच साठे सर! मला हे कधीच कसं ध्यानात आलं नाही? सारखं वाटायचं की ह्या दोघांचं खूप काही जुळतेय, पण त्यांची मनं खूप पूर्वीपासून जुळलीत हे का नाही कळलं मला?´
ती आपले डोके हातात घेऊन बसली.


तिला आठवलं, जेव्हा कॉलेजला गेस्ट लेक्चरर म्हणून पहिल्यांदा डॉ.साठे आले होते, तेव्हा त्यांना पाहताक्षणीच एका अनामिक ओढीने ती त्यांच्याकडे ओढली गेली होती. पुढे जाऊन त्यांच्याच हाताखाली डीजीओ करायचं हे तेव्हाच मनाने पक्के केले होते. डॉ. साठे म्हणजे तिचे आयडॉल, तिचे गुरु होते. या दीड पावणेदोन वर्षाच्या काळात गुरुशिष्याबरोबर त्यांच्यात मैत्रीचे, बापलेकीचे नाते वृद्धिंगत होत गेले आणि तरीही डॉ. ए. वाय. साठे मधील ए हा अनिकेतचा आहे हे तिला माहीत नव्हते. ते जाणून घ्यायची गरज वाटलीच नाही कधी.

सुमीच्या अनीचा शोध तिला घ्यायचाच होता, पण असे अनपेक्षितपणे तो स्वतःच पुढ्यात येईल याची कधी कल्पना तिने केली नव्हती.

तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि मनात आनंद! एखादा खूप मोठा खजिना अचानक सापडावा, असे काहीसे तिचे झाले होते.

.

.

.


क्रमश :


************

आवडला ना आजचा पार्ट? नक्की कळवा. आणि लाईक, कमेंट नक्की करा. आणि फेसबुकवर किती कमी लाईक? तिथेही लाईक करा की राव.तुमचा प्रत्येक लाईक, प्रत्येक कमेंट लिहायला नवी प्रेरणा देतो. तेव्हा ते करायला विसरू नका. माझे इतर लेख वाचायला फॉलो करा.


साहित्यचोरी हा गुन्हा आहे, तेव्हा लेखकांच्या मर्जीशिवाय त्यांचे लेख शेअर करू नयेत.


🎭 Series Post

View all