Feb 25, 2024
प्रेम

पारिजात.. गंध प्रेमाचा..! भाग -33

Read Later
पारिजात.. गंध प्रेमाचा..! भाग -33


आपण वाचत आहात गंधाळलेल्या प्रेमाची सुगंधित कहाणी..


पारिजात.. गंध प्रेमाचा..!


( मागील भागात -


रावी डॉ साठे व सुमीला एकत्र आणावे या विचाराने सुमीला भेटायला येते, पण सुमी मात्र तिचा प्रस्ताव स्वीकारत नाही. सकाळी ती कॉलेजला गेल्यावर रावी परत त्या विचारात गुंतते आणि सरांचादेखील काही भूतकाळ असावा या निष्कर्षापर्यंत पोहचते.


आता पुढे.)


**************` मॉमसारखाच सरांचा पारिजात देखील त्यांच्या एखाद्या भूतकाळाशी जुळला असेल काय? ´


एक विचार उगाच तिच्या मनाला स्पर्शून गेला.

सरांचा विचार मनात आला तसा मग त्यांच्या मागोमाग विराज देखील आठवणीच्या कप्प्यातून दत्त म्हणून समोर उभा ठाकला.
त्याच्या आठवणीने तिच्या गालावरची खळी उमलली.


मोबाईल बाजूला होताच, तेव्हा त्याचा प्रोफाइल फोटो पाहण्याचा मोह तिला आवरला नाही.
हातातील कॉफीचा मग बाजूला ठेवत तिने व्हाट्सअँप सुरु केले. त्याच्या आवडत्या पांढऱ्या शर्टमधील असलेला त्याचा डीपी,  हाताची बोटे त्यावर ठेऊन तिने झूम करून पाहिला.


त्याचे ते काळेभोर डोळे, मनाचा ठाव घेणारी नजर आणि ओठांवरचं गोड हसू!

ती क्षणभर बघतच राहिली.

`श्रुती म्हणते तशी खरंच याची नजर किती कातिल आहे? आणि ही स्माईल? हाय! मै मर जावा ! श्रुती बोलली तशीच आहे.. एकदम किलर.
पण आजवर मला कधी अशी जाणवली नाही ती? ´
तिचं मन तिला बोललं.

` तसं जाणवायला आपली नजर सुद्धा तशी हवी, सौंदर्य उमगणारी! ´
दुसरे मन उत्तर द्यायला तयारच होते.

` आज अचानक काय होतेय मला? श्रुतीसारखा का विचार करायला लागले मी?´
तिचं मन.

`कारण श्रुतीला कळतं, खरं सौंदर्य काय असतं ते.´
दुसरं मन बोललं लगेच.

`छे! केवळ बाह्य अंगावरूनच एखाद्याचे सौंदर्य ठरवता येते का? विराज बघायला जेवढा सुंदर आहे,  त्यापेक्षा कैकपटीने तर मनाने चांगला आहे. ते मन कदाचित आधीच कळले मला. माझी नजर कदाचित श्रुतीसारखी नसेल,  पण मनाचे सौंदर्य कळते मला.´

तिच्या पहिल्या मनाने दुसऱ्या मनावर मात केली. तिलाही ते म्हणणे पटले. स्मित करून ती कॉफीचा आस्वाद घेऊ लागली.

`म्हणजे तो सुंदर, हँडसम आहे हे पटतंय तर?´
पुढच्या प्रश्नासह दुसरे मन लगेच सरसावले.

`हो आहेच की.´
पहिलं मन.

` म्हणजे आवडतो तुला तो?´
दुसरे मन.

`हो. आवडण्यासारखाच आहे तो.´
पहिल्या मनाने लगेच कबुली दिली.

रावीचा चेहऱ्यावर हास्य फुलले.

`विराज आवडतो मला तर. त्याच्या असण्या -नसण्याने फरक पडतो मला. कदाचित प्रेमात पडल्याचे लक्षण तर नाहीये हे?´
मनात आलेल्या विचाराने ती खुदकन हसली. तिला सकाळचा त्याचा कॉल आठवला.
`किती रुडली बोलले ना सकाळी त्याच्याशी? सॉरी म्हणू का?´
लगेच मेसेज टाईप करण्यासाठी मोबाईल हातात घेतला खरा, पण पुन्हा त्याच्या त्या हसऱ्या चेहऱ्यात ती अडकली.


"छोट्या मॅडम? काय एकट्या एकट्या हसून राहिल्या?"
काम करायला आलेली शांताकाकू आत येत म्हणाली.

" काही नाही गं काकू. सहजच. "
तिच्या ओठांवर पुन्हा गोड हसू आलं .

"काकू,  आज मला आवडणारी खीर करशील का गं?"
ती.


" होय हो मॅडम, तुमची खीर तर स्पेशल आहे. आत्ताच बनवायला घेते बघा."
स्वयंपाकघरात जाता जाता शांताकाकू म्हणाली.रोज होणारी दगदग, त्यात विराजबद्दल एवढा विचार करायला रावीला कधी वेळच मिळाला नव्हता. हॉस्पिटल आणि घर, पुन्हा घर ते हॉस्पिटल. त्यात हॉस्पिटलचे कामाचे वेगवेगळे तास, रोज कोणत्या ना कोणत्या नव्या केसेस, ह्यातच थकून जायची ती. नाही म्हणायला विराजच्या जाण्याने मनात निर्माण झालेली पोकळी तिलाही कधीकधी जाणवायची, पण म्हणजे ती प्रेमात वगैरे पडली असेल असं चुकूनही कधी तिच्या लक्षात आलं नाही.

आज बऱ्याच दिवसांनी ती अशी निवांत बसली होती. मॉम, डॉ. साठे यांचा विचार करता करता ती कधी विराजपाशी येऊन थांबली, तिला उमगलं नाही. पण हृदयात अंकुरलेल्या प्रेमाच्या भावनेनं मनोमन सुखावली ती.

`बहुधा मी विराजच्या प्रेमात पडलेय. आता मॉम आणि साठेसरांनी सांगितल्याप्रमाणे मनाचे बंद दार उघडून तर बघते.. विराज आत प्रवेशतो काय ते?´

ती स्वतःला सांगत होती. पुन्हा एकदा विराजच्या फोटोवर नजर टाकली आणि मनात आलेल्या नव्या भावनेनं तिला लाजल्यासारखं झालं.


कोवळे उन्ह थोडे प्रखर व्हायला लागले तशी ती आत आली. आरशात स्वतःला न्याहाळताना चेहऱ्यावरची लालिमा तिच्या नजरेतून सुटली नाही.


`गॉड! डॉ. रावी, तुम्हाला लाजताही येतं? नॉट बॅड. इट इज फर्स्ट इंडिकेटिंग साईन ऑफ लव्हेरिया. काँग्रॅच्युलेशन्स!´
स्वतःचं अभिनंदन करून ती मोकळी झाली.`प्यार तुने क्या किया
ये प्यार तुने क्या किया
एक ही पल मे अचानक
दी हैं नयी दुनिया
दी हैं नयी खुशियां..´

कधी नव्हे ते ती आज गुणगुणत होती.


" खूप खुश दिसताय हो मॅडम. असेच आनंदी रहा बरं. "
लादी पुसायला आलेली शांताकाकू हसत म्हणाली. त्यावर तीही हसली.

"रावी,   अगं कॉलेजच्या काळे मॅडमकडे सायंकाळी एक कार्यक्रम आहे, तर सोबत येशील काय?"

सुमी तिला जेवतांना विचारत होती.

" नको मॉम. मी नाही येत.तसेही त्या काळेकाकू मला फारशा काही आवडत नाही. "
रावीने नकार दिला.

" चल ना बच्चा. प्लीज. " 
सुमती.

" नको ना मॉम, प्लीज. आज घरीच थांबू दे. उद्यापासून मग रोजचे रुटीन आहेच. "
आपल्या आवडत्या खिरीचा आस्वाद घेत ती म्हणाली.
दुपारची मस्त झोप काढून ती चार वाजता उठली. तोवर सुमीने बनवलेली गरमागरम कॉफी तयार होती. दोघींनी एकत्र कॉफीचा आस्वाद लुटला.काही वेळाने सुमी कार्यक्रमाला जायचं म्हणून तयार व्हायला गेली.
बाहेर मंद वारा सुटलेला. कानात हेडफोन घालून रावी झोपाळ्यावर झोके घेत गाणे ऐकत होती.
संध्याकाळची वेळ.. कातरवेळ!
गाणे ऐकता ऐकता मन परत विराजच्या आठवणीपाशी पिंगा घालू लागलं.

`त्याला फोन करून बघावं का? ´ मनात आलेल्या विचारासरशी तिने मोबाईल हातात घेतला. सात वाजायला आले होते. म्हणजे स्वारी तयार होत असेल. `व्हिडीओ कॉल करू का?´
स्वतःशी बोलता बोलता तिने कॉलचं बटण दाबलं.आज विराजची महत्त्वाची मिटींग होती. सकाळचे आन्हिक उरकून तो तयारीला लागला. कपाटातून कपडे घेतांना रावीच्या लिपस्टिकचे निशाण असलेला त्याचा आवडता शर्ट हाताशी आला.


`पार्टनर,  आजच्या प्रेजेंटेशन मध्ये आपलेच नाव झाले पाहिजे यार, बस तुझी सोबत हवी त्यासाठी.´ त्या लिपस्टिकच्या निशाणावरून नजर फिरवत तो म्हणाला.
नऊ वाजत आले होते. नाश्ता आटोपून त्याने अंगावर कपडे चढवले. तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. स्क्रीनवर रावीचे नाव झळाळत होते.

ह्या वेळी रावीचा व्हिडीओ कॉल बघून विराजचे ओठ रुंदावले.

`व्हॉट ए परफेक्ट टाईमिंग! म्हणून तर तुझ्या आणखीन प्रेमात पडायला होतं मला.´ मनात म्हणत त्यानं कॉल उचलला.

" हाय! पार्टनर. अशा अवेळी कशी काय या पामराची आठवण झाली? "

मोबाईल स्पीकर वर ठेऊन आपली नेकटाय व्यवस्थित करत तो बोलला. चेहऱ्यावर मिश्किल हसू होतं.

` तुझी आठवण व्हायला स्पेसिफिक वेळेची गरज नसते मला. आय मिस यू एव्हरीटाइम!´
बोलायला सुचलेले शब्द बाहेर येता येता ओठांच्या आतच अडकले. तयार होणाऱ्या त्याला ती न्याहाळत होती.

` खरंच किती हँडसम आहे हा? तो इथे असतांना माझी ही नजर कुठे हरवली होती, कुणास ठाऊक? ´

तिच्या डोक्यात विचारांची गर्दी होऊ लागली.

" ओये! कुठे हरवलीस? "
त्याच्या प्रश्नानं ती भानावर आली.

" गुडमॉर्निंग! ऑफिसची तयारी का? "
तिने स्वतःला सावरत विचारलं.

" हो अगं. इथल्या मेन ब्रँचला एक प्रेजेंटेशन आहे. त्यासाठी तयार होतोय. "

तिच्याशी बोलता बोलता तो आपली कामं करत होता.

"ऑल द बेस्ट."
ती त्याला अंगठा दाखवत म्हणाली.

" थॅंक्स!" म्हणत त्यानं तिच्याकडे पाहिलं.

डोक्यावर बांधलेले केस. गालावर रेंगाळणाऱ्या एक - दोन अवखळ बटा.
`अशा साध्या रूपातसुद्धा काय कमाल दिसते यार ही?´ त्याला वाटलं. क्षणभर त्याची नजर तिच्यावर खिळून राहिली.नंतर लक्षात आल्यावर लवकर निघायचे म्हणून स्वतःवर आवर घालत त्याने तिचा निरोप घेतला.

`मी त्याला न्याहाळत होते हे विराजला जाणवले असेल का?´
बोलणे झाल्यावर उगाच तिला वाटून गेलं. त्याच्या विचारात ती पुन्हा गढून गेली.
" बच्चा, तू जेवली नाहीस अजून? "

टेबलावरचे जेवण तसेच ठेऊन होते हे बघून सुमतीने विचारलं.

" नाही ना मॉम. एकटीला कंटाळा आला गं. आज तू भरवतेस मला? "
तिच्याकडे बघत निरागस चेहऱ्याने ती म्हणाली.

" काल तर मोठी झाले म्हणून डंका पिटत होतीस ना? आणि आज स्वतःच्या हाताने जेवता येत नाही होय? "
लटक्या रागाने सुमती म्हणाली.

" ममुडी, कितीही मोठी झाले तरी शेवटी तुझा बच्चा आहे ना गं मी? प्लीज भरव ना."
तिच्या डोळ्यात डोळे घालून तिने आपला चेहरा छोटुसा केला.

" हूं. मस्का बरा लावता येतो गं तुला? ये भरवते."
ताटामध्ये जेवण घेत सुमी म्हणाली.


" आत्ता ठीक आहे,  सासरी गेल्यावर काय करशील? तिथे मी असणार आहे का? "
भरवता भरवता तिचे सुरु झाले.

" ईssय! अगदी टिपिकल आईसारखी काय बोलतेस गं?"
रावी.

"अरे टिपिकल काय? एक दिवस सासरी जाशीलच ना तू?"
सुमी.

" अभी दिल्ली बहुत दूर हैं माय डिअर! आणि तसेही मी ठरवलंय, आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं!"
ती.

" म्हणजे गं? "
सुमी.

" म्हणजे सुमीला हळद लागल्याशिवाय रावी लगीन नाय करायची ."
ती आता फुल्ल मूडमध्ये होती.

" परत तेच? "

" नाही. आता दुसरं आहे. साठेसर नाहीत, तर नो प्रॉब्लेम. पण तुझ्या अनीला शोधल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. "
ती.

" रावी तू ना.. "

" अगं पुढे तर ऐक. एक बार मैने जो कह दिया सो कह दिया. मेरा वचन ही हैं मेरा शासन!"
मॉमचे बोलणे मध्ये तोडत उभी होऊन ती आवेशाने म्हणाली.

"ओ माहिष्मतीच्या सम्राज्ञी, आधी जेवून घ्या. मग बोला."
तिला खाली बसवत सुमी म्हणाली.
"आज जरा जास्तच नौटंकी चाललीय तुझी."
तिचे नाक खेचत सुमी.

" मॉम, सिरीयसली बोलत आहे मी. हलक्यात घेऊ नको हं मला. "
ती.

" पुरे आता. गुमान जेव नाहीतर जेवणाऐवजी फटके बसणार. "
सुमीने तिला दम भरला.

" राहीलं. भलाई का तो जमाना ही नही रहा. "
ती पुटपुटली. सुमीने डोळे मोठे केले तशी मग गपगुमान जेवायला लागली.


सकाळी लवकर निघायचे होते. त्यामुळे मग लगेच तिने निद्रादेवीच्या कुशीत स्वतःला स्वाधीन करून घेतले..

.

.

क्रमश :


**********

मला माहितीय तुमचा जीव सुमी आणि अनीमध्ये अडकलाय. पण सुमीइतकीच रावीसुद्धा कथेची नायिका आहेच की. म्हणून आजचा भाग तिचा.

पुढील भाग लवकरच. तोवर हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा. तुमच्या कमेंटसोबत मिळणारे एक लाईकसुद्धा मला लिहायला नवा उत्साह देतो.


साहित्यचोरी हा गुन्हा आहे. आणि हा गुन्हा शिक्षेस पात्र आहे. तेव्हा लेखकांच्या मर्जीशिवाय कुणीही त्यांचे लेख इतरत्र शेअर करू नये.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//