Feb 23, 2024
प्रेम

पारिजात.. गंध प्रेमाचा..! भाग -32

Read Later
पारिजात.. गंध प्रेमाचा..! भाग -32

आपण वाचत आहात एका गंधाळलेल्या प्रेमाची सुगंधित कहाणी..
पारिजात.. गंध प्रेमाचा..!


( कथेच्या मागच्या भागात..

विराज अमेरिकेला जातो. रावीच्या प्रेमात पडल्याची जाणीव त्याला होत असते. पण अजूनही रावीच्या मनाला हे कळत नाही. डॉक्टर साठे तिला सांगण्याचा प्रयत्न करतात की तिच्या हृदयात देखील विराज वसला आहे आणि त्याच्याविषयी विचार करण्याचा सल्ला देतात. इकडे रावीला असं वाटू लागते की साठे सर आणि मॉमचे जवळपास सगळे विचार जुळतात. त्यांच्या सवयी, आवडी सारख्याच आहेत. तेव्हा या दोघांना एकत्र आणावे असे ती ठरवते.
आता पुढे.)

***********


      ते खुश होते , त्यांच्या मनाच्या चित्रात रावी आणि वीर एकत्र होते.

    ती आंनदी होती.
तिच्या डोक्यात सुमी आणि डॉ. साठे होते.


    हॉस्पिटल सुटल्यावर ती फ्लॅटवर पोहचली . ड्युटीवर निघालेली श्रुती तिला दारातच भेटली. तिने धावत जाऊन तिला मिठी मारली.

    "अगं , अगं. काय चाललंय अचानक? "
-श्रुती.

    "श्रु ss , आय एम सो सो हॅपी! "
ती.

    "हो ते कळले मला. काय झालं ते तर सांगशील? आणि आधी माझ्यापासून दूर हो बघू. हॉस्पिटल मधून आल्या आल्या अशा पारोशा अंगाने मला मिठी नको मारत जाऊ."
श्रुती.

     "ये त्याचं काय गं? ऍप्रॉन तर काढला आहे ना मी?"

आपली मिठी अजून घट्ट करत रावी म्हणाली.

    "हो गं बाई! आता तरी सांगशील काय झालंय? तिळे वगैरे डिलिव्हर केलेस की काय आज ?"

ती.

     "छे गं."
बाजूला होत रावी.

    "हम्म !   नक्कीच विराजने तुला फोन करून प्रपोज केलंय."
श्रुतीच्या मनात विराजशिवाय दुसरं काही नसतंच.

    "गप गं "
तिला टपली मारत रावी.

     "थांब , मला गेस करू दे तुझा फुललेला चेहरा असं सांगतोय की तुला प्रेमात पडल्याची जाणीव झालीय."

आपलं डोकं खाजवत श्रुती म्हणाली.

     "माझे राणी, असं झालं ना तर सगळ्यात पहिले मी तुला सांगेन."

तिच्या गळ्यात हात गुंफत रावी म्हणाली.

      "अगं उद्या मी ऑफ घेऊन मॉमला भेटायला निघालेय. मग उद्या हॉस्पिटलमधून आल्यावर तुला मी भेटणार नाही ना म्हणून ही मिठी. "

ती हसली.

     "रावी तू ना इम्पॉसिबल आहेस. मला वाटलं की काहीतरी इंटरेस्टिंग ऐकायला मिळेल तर तू हे सांगत आहेस. निघते मी. मला उशीर होतोय, बाय."
हात हलवून श्रुती निघाली.


    ` श्रु ss हे इंटरेस्टिंगच आहे गं , पण तुला आत्ताच नाही सांगू शकणार. आधी सगळं फिक्स तर होऊ दे, मग बघ तुला कशी पार्टी देईन ते. ´

ती आत प्रवेशत स्वतःशीच म्हणाली.


     दुसऱ्या दिवशी सकाळच्या पहिल्या बसने रावी निघाली. घरी पोहोचली तेव्हा सुमी कॉलेजला गेली होती.
जेव्हा ती कॉलेजहून परतली तेव्हा समोर रावीच्या रूपात भलंमोठं सरप्राईज घरी हजर होतं.

    " सरप्राsईज! "

रावी मोठ्याने ओरडली.

    "बच्चा ? तू कधी आलीस अगं?"
सुमतीच्या चेहऱ्यावर आनंद, आश्चर्य, आणि मोठे प्रश्नचिन्ह होते.

     "अगं, येऊन एक झोप झाली माझी."

ती जांभई देत म्हणाली .

     "एवढ्या सकाळी कशी काय आलीस तू ?"

सुमतीच्या चेहऱ्यावरचे आश्चर्य तसेच होते.

     " तुझी आठवण मला येथवर खेचत घेऊन आली माते! "
ती लडिवाळपणे म्हणाली.

    " माझं पिल्लू गं ते."
सुमीने तिला कवेत घेतलं.

     "एवढी मोठी झालीस तरी अवखळपणा गेला नाही  अजून!"

तिचे गाल ओढत ती म्हणाली.

   "अंs ममुडी , तुझा बच्चा आहे ना मी?"

रावी जरा जास्तच लाडात येत होती.

   " हो रे माझ्या लाडोबा. मी आधी फ्रेश होऊन येते नंतर बोलूया."
ती आत गेली.


    जेवण आटोपल्यावर दोघीजणी मग निवांत बोलायला बसल्या.

     " हं बोला मॅडम कसं काय येणं केलंत?"
सुमी.

    "मॉम ऍक्च्युअली मला काही हवं होतं तुझ्याकडून."

रावी शब्दांची जुळवाजुळव करत म्हणाली.

     "काय?"
तिने आश्चर्याने विचारलं.

       "असं नाही. आधी मला प्रॉमिस कर, मी जे मागेन, तू मला देशील."

तिच्यापुढे हात करत रावी म्हणाली.

     " ये गधडे , हे प्रॉमिस वगैरे कुठून आलं आपल्यात ?"

तिचा हात खाली करत ती म्हणाली.

    "तू काही मागितलं आणि मी दिलं नाही असं आजवर कधी झालंय का?"
सुमती.

     " तसं नाही गं."
रावी

      " मग एवढा अविश्वास माझ्यावर?"
ती लटक्या रागाने म्हणाली.

     " सॉरी ना!"
पाठीमागून तिच्या गळ्यात रावीने हात गुंफले.

   " हम्म ! बोला लाडोबा आता. काय हवंय आपल्याला?"

तिच्या गालावर गाल घासत सुमती.

  " ममुडी मला ना.. "
बोलता बोलता परत रावी थांबली.

   " बच्चा, बोल तर खरं."

सुमी हसत म्हणाली.

   " मला ना एक वडील हवेत "


एका दमात रावीने सांगून टाकलं.   " हे काय नवीन ?"

तिच्याकडे वळून बघत सुमती.

    " नवीन नाही जुनेच आहे हे. मला खरंच एक डॅड हवेत आता."
रावी.

     " ये नमुने , कसलं खूळ भरलंय डोक्यात? "

      " म्हणून तुला मी प्रॉमिस कर म्हणाले होते. आणि खूळ भरायला मी काही कुक्कुलं बाळ नाहीये ना? आय एम इनफ ग्रोअन अप नाऊ! "

तिने आपले गाल फुगवले.

     " झालीस ना मोठी? मग जरा तशी वाग ना."

सुमीच्या नाकावर राग स्वार होऊ लागला होता.

     " मॉम, मी खरंच सिरीयसली बोलतेय. मला हवा गं एक डॅडू.
प्लीs ज. नाही नको म्हणू ना. "

ती आपले डोळे बारीक करत म्हणाली.

     " रावी s"

तिचा आवाज जरा चढला.

     " आणि तुला काहीच करायचं नाहीये अगं. तू फक्त हो म्हण. बाकी मुलगा वगैरे मी शोधलाय. "

रावी आपले म्हणणे पुढे धोपटत होती.

     " तुझं जरा अती होतेय असं नाही वाटत आहे का तुला? "
चढ्या आवाजात सुमी.

      " माझं माहीत नाही मॉम,  तुझं वय मात्र जास्त होतं आहे. आतातरी तू स्वतःसाठी काही निर्णय घ्यावा असं मला वाटतेय."

ती ठामपणे म्हणाली.

    " बेटू , तू नको ना एवढी काळजी करु."

सुमीचा स्वर आता मृदू होता.

     " मी नाही तर कोण करेल मॉम तुझी काळजी?
तुझ्या त्या अनीमुळे इतकी वर्ष एकटीने काढलीस, पण आता पुरे ना गं. प्लीज माझ्या बोलण्याचा विचार कर ना."


ती समजावणीच्या सुरात बोलत होती.

   " रावी, परत नको त्याच विषयावर बोलायला. पुरे आता."
सुमती.

     " मला बोलायचं आहे मॉम.
एवढी वर्ष तू वाट पाहिलीस त्याची, पण तो एकदा तरी भेटला तुला? तू किंवा तो कोणीतरी एकमेकांना शोधण्याचा प्रयत्न केला का कधी?
त्याच्यावर प्रेम करून काय मिळालं तुला? केवळ आयुष्यभराचं झुरणं तेवढं मागे लागलं. मला नाही सहन होतं आता हे. "

     रावी पोटतिडकीने बोलत होती.

सुमी हसली. हलकेच!

       " बावळट!  तू एकदा प्रेमात पडून बघ मग तुला समजेल प्रेम म्हणजे काय ते? "
तिचे नाक ओढत ती म्हणाली.

     " तुला असं तीळतीळ तुटतांना बघितलं की प्रेमात पडायची हिम्मत होतं नाही मॉम मला. तुझा अनी मला एकदा भेटला ना तर त्याची कॉलर पकडून मी जाब विचारणार आहे, का नाही शोधलंस माझ्या मॉमला म्हणून. "
ती.

    " रावी इनफ नाऊ!"

सुमीच्या स्वरात एक जरब होती.

      " त्याला काही म्हंटल की लगेच टोचतं तुला. माझा कधी विचारच नको करू तू."
रावी मुसमुसत आपल्या खोलीत गेली.

सुमीचेही डोळे पाणावले.     " बेटू रागावलीस होय माझ्यावर?"
रात्री रावीच्या केसांना गोंजारत ती म्हणाली.

    " सॉरी मॉम. मी खूप काही बोलले ना तुला?"

तिच्या मांडीवर आपले डोके ठेवत रावी स्फुन्दत म्हणाली.

      " यापुढे कोण्या तिसऱ्या व्यक्तीमुळे आपल्यामध्ये भांडणे नकोत व्हायला."

तिच्या मोकळ्या केसात सुमीच्या हाताची बोटे फिरत होती.

   " हूं."
रावी.

    " पण एक सांगू मॉम? साठे सर खरंच खूप चांगले आहेत. म्हणजे कधीकधी ना मला विराजचा खूप हेवा वाटतो की, त्याला केवढा चांगला मामा मिळाला आणि कधीकधी खूप रागही येतो, की तो त्यांना लवकर समजू शकला नाही. "
रावी.

 " हो? आणि विराजला माझ्याविषयी काय वाटतं? "

तिच्या मनाचा अंदाज घेत सुमतीने विचारलं.

    " हेच की तू किती बेस्ट आहेस ते. "
रावी.

      " हो ना? म्हणजे काय, तर माणसाला नेहमी दुसऱ्याची वस्तू चांगली वाटते. "

सुमी.

     " पहिली गोष्ट मॉम की तू कुठली वस्तू नाहीयेस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे साठे सर खरंच खूप चांगले आहेत. जवळपास दीड वर्षांपासून ओळखते मी त्यांना.

     मॉम ,प्लीज! एकदा विचार कर ना. मला डॅडू म्हणून चालतील गं ते. "

आपला चेहरा तिच्याकडे वळवत ती म्हणाली.

      " परत तुझं तेच सुरु झालं ना बच्चा? दीड वर्षांत तू त्यांना ओळखतेस पण इतक्या वर्षांत मला नाही ओळखू शकलीस ना? "

नाराजीच्या स्वरात सुमी म्हणाली.

    " सॉरी !  राहिलं."

रावीने आपले कान पकडले.

   " मॉम.."
थोड्यावेळाने रावीने पुन्हा साद घातली.

    " हूं."

सुमी.

      " जर अनी कधी परत आला तर तू त्याच्याशी लग्न करशील? "

तिने आपले डोळे रोखून विचारले.
त्या प्रश्नाने गोंधळली ती.

  " सांग ना मॉम? "
रावी.

    " सध्यातरी ह्याचे उत्तर नाहीये माझ्याकडे. "

बोलतांना तिचा आवाज जड झाला.


   " मम्माs."
काही बोलायला म्हणून रावीने तोंड उघडले.

     " रावी, झोपूया आता? गुडनाईट!"

तिला पुढे बोलू ना देता सुमीने आपली कुस पलटली.

रावीचे बोलणे राहून गेले.


सकाळी मोबाईलच्या रिंगने तिची झोप चाळवली.

    " हॅलो "

तिने डोळे मिटूनच मोबाईल कानाला लावला.

    " हेय पार्टनर ,  गुडमॉर्निंग! अजूनही झोपेतच आहेस का?"
पलीकडे विराज होता.

      " गुडमॉर्निंग!  तू का उठलास एवढया पहाटे?"

तिचे डोळे अजूनही मिटले होते .

    " मॅडम , भारतामध्ये आता पहाट संपून सकाळ सुरु झालीय. आणि अमेरिकेत रात्र आहे."

तो हसून म्हणाला.

     " असेल. का फोन केला ते सांगशील का?"
ती चिडून म्हणाली .

     " अगं मामाकडून कळलं की तू तुझ्या घरी गेलीस ते. म्हणून म्हंटल जरा आंटीशी बोलावं. बऱ्या आहेत ना त्या?"

तो.

      " तिलाच विचार ना मग.आणि व्हिडीओ ऑन कर म्हणजे बघून पण घेता येईल."
ती.

     " हो. गुड आयडिया. दे त्यांच्याकडे फोन."
व्हिडिओ ऑन करत तो म्हणाला.

तोवर तिने सुमतीला मोबाईल दिला.

     " बोल बाळा , कसा आहेस? "

त्याच्याकडे बघत ती म्हणाली.

     " मी मजेत. तुम्ही सांगा. "
तो.
त्या दोघांचं बोलणं सुरु होतं.  इकडे रावीची झोप पळाली.

      " बाळा? " ती वेडावत म्हणाली.

    " यालाच म्हणतात दुसऱ्याचा तो बाब्या नी आपलं ते कार्ट."

सुमीला आवाज जाईल अशा आवाजात ती मुद्दाम मोठ्याने म्हणाली.      " काय सुरु आहे रावी तुझं? "
तिला मोबाईल परत करत सुमीने विचारलं.

      " तो बाळ? आणि मी तुझी कार्टी आहे ना ? म्हणून त्याच्याशी इतकी गोड गोड बोलत होतीस."

ती थोड्या रागात म्हणाली.

      " अगं वेडे, माझा बाब्या तर फक्त तू आहेस."
सुमीला हसू आलं.

   " हसू नकोस. आणि त्याच्याशी एवढं लाडे लाडे बोलायचं असेल ना, तर आपल्या मोबाईल वरून बोलत जा."
रावी.

     " हो गं. आम्ही केलेत आपले नंबर एक्सचेंज. आता तो डायरेक्ट मलाच कॉल करत जाईल."

ती आपलं हसू दाबत म्हणाली.

रावीने नाक मुरडले.

    " फिलिंग जेलस हं. "

तिच्याजवळ येत सुमी म्हणाली.

      " हो. तू फक्त माझ्याशी गोड गोड बोलू शकतेस. दुसऱ्या कुणाशीच नाही."

तिच्या गळ्यात हात गुंफत ती म्हणाली.

    " ई ss! पहिले ब्रश कर. नंतर मिठी मार मला."

सुमी दूर होत म्हणाली.

    " हो, हो. करते बरं."
म्हणत ती न्हाणीघरात पळाली.      बाथटब मध्ये मनसोक्त न्हाऊन झाल्यावर ती बाहेर आली. सुमती कॉलेजला गेली होती. शांताकाकूला यायला उशीर होता. तिने स्वयंपाकघरात जाऊन स्वतःसाठी मस्तपैकी कॉफी बनवली. बाजूलाच नाष्ट्यासाठी मॉमने खास तिला आवडणारे थालीपीठ बनवले होते ते परत गरम करून घेतले आणि कॉफीसोबत थालीपीठ घेऊन ती गॅलरीत आली.

      ` सकाळच्या उन्हात असं गॅलरीत निवांत बसून खाण्याची मजाच काही और असते. ´

तिच्या मनात आलं.

         गॅलरीच्या कोपऱ्यात अंगणातल्या पारिजाताची एक फांदी कलली होती.सूर्याच्या कोवळ्या उन्हाच्या किरणांनी त्या फांदीवर एक वेगळीच प्रभा तिला जाणवली. ते बघून तिच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेची छटा उमटली. आपल्या घरचा प्राजक्त बघून आपोआपच सरांच्या घरचा पारिजात तिच्या मनात डोकावला. तो तिथला तटस्थ पारिजात, सरांच्या घराचे नावही पारिजात.

      ` मॉमसारखाच सरांचा पारिजात देखील त्यांच्या एखाद्या भूतकाळाशी जुळला असेल काय? ´

एक विचार उगाच तिच्या मनाला स्पर्शून गेला.


.

.

.

क्रमश :


*****************

सुमी आणि अनी केव्हा भेटतील??

सगळ्यांना पडलेला हा प्रश्न. म्हणून आता सुरुवात करतेय त्यांना भेटीच्या प्रयत्नांची.

पहिला प्रयत्न रावीकडून सुरु झालाय. बघूया तिला यश येईल की नाही ते.

तोवर हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. कमेंट करा आणि आवडला भाग तर एक लाईक नक्की करा. त्यामुळे पुढे लिहायला नवा उत्साह येतो.

पुढील भाग लवकरच !


(साहित्यचोरी हा गुन्हा आहे. कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे आहेत.)
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//