पारिजात... गंध प्रेमाचा..! भाग -29

डॉक्टर साठे म्हणजेच आपल्या सुमीचे अनी..??


आपण वाचत आहात एका गंधाळलेल्या प्रेमाची सुगंधित कथामालिका..
पारिजात.. गंध प्रेमाचा..!


( मागील भागात आपण वाचले की विराज आणि डॉक्टर साठे यांच्यात पॅचअप झाल्याचं कळताच रावी त्यांना काहीतरी गिफ्ट द्यायचे ठरवते. मॉम तिला पारिजातकाची फुले दयायला सुचविते. योगायोगाने डॉक्टर साठेही तिला तेच देतात. तिच्या हातातील पारिजात पाहून साठेंना त्यांचा भूतकाळ आठवतो. कोण असेल त्यांच्या भूतकाळात? वाचा आजच्या भागात.)


*************

        ` रावी´ हे नावचं खूप स्पेशल होतं त्यांच्यासाठी.आपल्या ताईच्या मुलीचं नाव रावी ठेवणार होते ते.. पण त्याआधी ते नाव तर स्वतःच्याचं लेकीसाठी सुचलं होतं. मिटल्या डोळ्यातला ओलसरपणा जाणवायला लागला तसं ते पुसायला त्यांचे हात सरसावले.

"पुरुषांनी रडू नये असं कोण म्हणतं? आलं रडायला तर रडून मोकळं व्हायचं ना."

एकदा रावीनं म्हटलेलं त्यांना आठवलं. आणि त्यांचे हात आपोआप मागे सरले. मिटलेल्या डोळ्यातून बाहेर पडणारे थेंब घेऊन  गेले त्यांना त्यांच्या भूतकाळात.

      पंचवीस तीस वर्षांचा काळ लोटलेला, तरीही सर्व चित्र अगदी स्पष्ट दिसत होते. नुकतीच बारावीची परीक्षा आटोपलेली आणि सुटयांमध्ये मावशीकडे गेलेले डॉक्टर ए. वाय. साठे! डॉक्टर काय? डॉक्टर आत्ता. तेव्हातर केवळ एक नुकताच मिसरूड फुटलेला पोरसवदा तरुण , अनिकेत साठे. नव्हे तो तर दिवेकर मावशीचा लाडका अनी!


      दिवेकर मावशी आठवली आणि मग त्यांच्या डोळ्यांसमोर उभे राहिले त्यांचे घर. त्या घराच्या दरवाज्यात एका सकाळी सकाळी धडकणारी ती, आणि त्याबरोबर खाली पडून विखुरलेली तिच्या ओंजळीतील प्राजक्तफुले!
हो, ती तिच होती सुमती. सुमी! आणि हा आपलाच अनिकेत. अनी!


पहिल्याच भेटीत झालेलं त्यांचे ते गोड भांडण. आणि काही वेळातच आजीसमोर झालेली त्यांची मैत्री.


     ती सावळीशी , टपोऱ्या डोळ्यांची. गालावरची गोड खळी आणि हनुवटीवरचा नजरेत भरणारा तीळ. अपऱ्या नाकाची. तो तर तिला नकटू म्हणायचा, तेव्हा किती चिडायची ती.


   ` नकटू , ते तुझं लटकं चिडणंही फार आवडायचं गं मला.´
साठे उठून बसले. खिडकीची तावदाने बाजूला सारली. बाहेरच्या पारिजातकाचा गंध मनाला मोहवीत होता. एक दीर्घ श्वास घेऊन तो गंध त्यांनी सर्वांगात समावून घेतला.
\"पारिजात \"  ही एकमेव आवडीतील साम्यता.बाकी इतर कोणत्याच आवडीनिवडी जुळायच्या नाही कधी.


    ` तिला आवडणारा सूर्यास्त , माझी सूर्योदयाची ओढ. मी शुद्ध शाकाहारी, ती ओढ्याकाठी मासे पकडणारी. मला आवडणारे बेसनलाडू. तिचा ते बनवण्यासाठी चाललेला खटाटोप!
खरंच सुमी , किती निरागस अल्लड होतीस तू? आताही आहेस का तशीच?´
स्वतःलाच विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर नव्हते त्यांच्याकडे.


     झोप तर केव्हाचीच उडून गेली होती. किचनमध्ये जावून त्यांनी फ्लॅस्कभरुन कॉफी आणली. हातात कॉफीचा मग, कानात इअरफोन. ते डोळे मिटून आरामखुर्चीवर बसले. मोबाईलमध्ये गाणं वाजत होतं,


             आजकल पॉव जमीं पर
               नही पडते मेरे…!

लतादीदींचा आर्त स्वर हृदयात घर करत होताच , त्याबरोबर सुमीच्या आठवणीने त्यांचे काळीज पिळवटून निघत होते.

        त्याला आवडतात म्हणून ती लाडू वळायला शिकली. त्याला आवडतात म्हणून ती गाणं गायला शिकली. त्याला आवडतो म्हणून उगवतीचा सूर्य पाहायला लागली. सगळंच त्याला आवडतं म्हणून!
      ` मीदेखील बदललोय सुमी, तुझ्यासाठी. ही कॉफीचं बघ ना , नाही आवडायची पूर्वी. पण आता प्यायला लागलो की कळतंही नाही किती पितोय.तुझं ते भांडण, नाकावरचा राग, गालावरची खळी, तुझा अल्लडपणा तुझी निरागसता.  सारं काही आजही मनाच्या कोपऱ्यात तसेच साठवून ठेवले आहे. एवढी वर्ष वाट पाहिली तुझी. एक पाऊल पुढं टाकून येशील ही आस होती मनाला. आजही ह्या वेड्या आशेत जगतोय मी. सुमी सांग ना कुठे आहेस गं तू?´

         त्यांची भांडण, हुंदडणं , त्याची प्रेमाची कबुली, तिचा लग्नाचा होकार, आणि मग तिच्या वडिलांनी घेतलेलं वचन.
भूतकाळातील सगळी पानं जशीच्या तशी नजरेसमोरून पलटत होती.
      ` सुमी , होईल का गं आपली भेट? एकदातरी? ´
खूप दाटून आलं त्यांना. डोळ्यातून केव्हाही आभाळ कोसळू लागणार होते.

         " मामा? अजूनही जागाच आहेस तू? "
विराजच्या आवाजाने त्यांनी डोळे उघडले. दाटलेले आभाळ आपसूकच बाजूला झाले.

        " हो रे , झोप येत नव्हती, मग गाणी ऐकत बसलो होतो. "
कानातील हेडफोन काढत ते म्हणाले.
         " तू का जागा आहेस? "
त्यांनी विचारलं.
       " पाणी प्यायला आलो किचनमध्ये तर तुझ्या खोलीचा दरवाजा ओपन दिसला डोकावून  बघितलं तर तू दिसला मला बसलेला."
बेडवर बसत तो म्हणाला.
       " ठीक आहे ना सगळं? म्हणजे माझ्यामुळे टेंशनमध्ये तर नाहीस ना पुन्हा? "
-विराज.
       " नाही रे राजा. तुझ्यामुळे कसलं टेंशन? "
काहीसं हसून ते म्हणाले.
      " खूप त्रास दिला नं मी तुला? नेहमी माझा विचार करत आलास तू. स्वतःसाठी कधी जगलाच नाहीस. "
विराज त्यांचा हात हातात घेत म्हणाला.
      " आज अचानक असं का बोलतो आहेस?"
-डॉक्टर.
       " काही नाही रे. इतके दिवस कधी तुझा विचारच केला नव्हता मी. पण आज कळतंय तुझं अख्खे आयुष्य माझ्यासाठीच खर्च झाले. प्रत्यक्ष दाखवत नव्हतास पण नेहमी माझ्याच काळजीत असायचास.साधं लग्नदेखील केलं नाहीस तू. पण मला कधी समजून घेताच आलं नाही तुला. "
तो बोलतांना थोडा हळवा झाला.

      " नाही रे वेड्या, सोड ते आता. तुझं सांग. कुठपर्यंत आलं तुझं अमेरिकेचं? "
त्यांनी विचारलं.
      " झाल्यात सर्व फॉर्मॅलिटिज. पॅकिंग देखील झालीये जवळपास. उद्याचा दिवस इथे. मग परवाच्या फ्लाईटने अमेरिका. "
तो सांगत होता पण चेहऱ्यावर उत्साह नव्हता त्याच्या.
     "रावीला सांगितलंस हे?"
-ते.
      " मागे एकदा बोललो होतो. पण आता परवा निघतोय हे नाही माहिती तिला. "
-तो.
     " मग सांगायला हवंस. ती तुझ्या माणसांच्या परिघात समाविष्ट आहे असं मला वाटतं. "
त्यांच्या बोलण्यावर त्याने केवळ हूं म्हणून मान डोलावली.

      "एक सांगू वीर. काही माणसं आपल्या आजूबाजूला असतात तेव्हा बरं वाटतं आपल्याला. पण ते नसले तरी तेवढा फरकही पडत नाही . पण काही माणसं आपल्या हृदयात समावली असतात. ते जर नसतील ना सोबत तर मात्र आयुष्याचं गणित चुकल्यासारखं होतं. अशी माणसं ओळखायला शिक बाळा."
त्याच्या डोळ्यात बघत ते म्हणाले.
     " कुणाबद्दल बोलतोहेस तू?"
विराजने उलट विचारलं .
    " स्पेसिफिक असं कुणाबद्दल नाही रे.पण आपल्या हृदयात वसलेली माणसं एकदा निसटली की परत त्यांना शोधणं खूप कठीण होऊन जातं म्हणून बोललो. "
त्यांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला.
तो काहीच बोलला नाही.

     " वीर, अमेरिकेला निघालाहेस तू. खुश तर आहेस ना? "
त्यांनी त्याच्या काळजात हात घातला.
त्याच्या डोळ्यातून एक मोती घरंगळत गालावर आला.
   ` हा प्रश्न जर मला आठ दिवसांपूर्वी विचारला असता ना तर माझं उत्तर हो असंच असतं. मला इथून केव्हा बाहेर पडेन असं झाले होतं. पण आता बदललंय सगळं. आता तुला सोडून जायला मन धजत नाहीये रे माझं.´
त्याचं मन म्हणत होतं.पण ओठांवर नाही आलं ते.

     " या! आय एम व्हेरी हॅपी!!"
त्यांना हग करून तो आपल्या खोलीत निघून गेला.

" वीर! अडकत चाललाहेस तू इथे."
जाणाऱ्या विराजकडे बघत ते स्वतःशी म्हणाले.
रात्र सरत आली होती. आता झोपेच्या स्वाधीन होणं आवश्यक होते . ते बेडवर आडवे झाले.पडल्या पडल्या पुन्हा हाताच्या बोटांनी मोबाईलकडे धाव घेतली. व्हाट्सअप उघडून रावीचा फोटो बघायचा मोह त्यांना आवरला नाही.
    `ह्या मुलीत मला सारखं सुमीचं प्रतिबिंब का दिसतं? केवळ तिच्या नावामुळे का??´
तोच प्रश्न पुन्हा डोक्यावर स्वार झाला.


" आपल्या हृदयात वसलेली माणसं एकदा निसटली की परत त्यांना शोधणं खूप कठीण होऊन जातं. "

झोपायला गेलेल्या विराजच्या कानात साठेंचे शब्द अजूनही फिरत होते.
  ` हृदयात वसलेली माणसं म्हणजे कोण? मामाला रावी इंडिकेट करायचं होतं का? पार्टनर. खरंच का इतकी स्पेशल आहेस तू माझ्यासाठी?´

तो रावीची वॉट्सअप डीपी बघत बोलत होता. ती केव्हाची ऑफलाईन होती.त्याची दोन मिनिटं डीपी बघण्यात गेली.मेसेज करण्यापेक्षा उदया डिरेक्टली कॉल करायचा म्हणून मग त्यानं मोबाईल ठेऊन दिला.झोपेला आलेल्या डोळ्यांवर मात्र रावीचेच स्वप्न स्वार होत होते.


स्वप्नातून जागे होऊन जेव्हा तो उठला तेव्हा सकाळचे दहा वाजले होते. हातात मोबाईल तसाच होता. डोळे उघडल्याबरोबर त्याला डीपीतल्या रावीचे दर्शन झाले. नी आपोआप त्याचे ओठ रुंदावले. तिला कॉल करण्याचा विचार पुन्हा मनात डोकावला. पण ह्यावेळी हॉस्पिटलला असेल म्हणून त्याने संयम बाळगला.साठे सर केव्हाच हॉस्पिटलला निघून गेले होते.रेखाताई येऊन आपल्या कामाला लागली होती. त्यानंही आवरायला सुरुवात केली.
.
.


      " रावी घरी कोणकोण असतं तुझ्या? "
टी ब्रेक मध्ये डॉक्टर साठे तिला विचारत होते.

    " सर्वच!"
ती हसून म्हणाली. त्यावर त्यांनी केवळ स्मित केलं.

    ` सुमीची मुलगी नाहीये ही. सुमी लग्न करणेच शक्य नाही. ´
त्यांचं मन त्यांना म्हणत होतं.

       " आज असं अचानक का विचारलंत? "
कॉफी पीत ती म्हणाली.

        " सहज गं. "
तिच्या टपोऱ्या डोळ्यात बघत ते म्हणाले.

         " डॉक्टर साठे कोणतीच गोष्ट सहज करत नाहीत. तुम्हाला माझ्या घरच्यांशी भेटायचंय का सर? "
तिनं त्यांना कात्रीत पकडलं.
      ` सुमीचाच अवखळपणा, तीच निरागसता, तशीच मनात घर करण्याची वृत्ती! नाही नाही. सुमीचीच लेक ही.´
त्यांच्या दुसऱ्या मनाने कौल दिला.
स्वतःच्या मनाच्याच द्वंद्वात ते अडकत होते.

     " तसं नव्हे गं. बरं मला सांग विराजचा कॉल वगैरे आला का तुला? "
त्यांनी विषय बदलला.

    " नाही ना. का? "
तिचा प्रश्न.
     " उद्या निघतोय तो अमेरिकेला. "
ते म्हणाले.

    " काय? "
तिच्या चेहऱ्यावरचे भाव लगेच बदलले.
     ` असा कसा हा मला काही बोलला नाही?´
तिचं मनात चाललं होतं. मनातली अस्वस्थता चेहऱ्यावर उमटत होती.


    " हवं तर तू तीन वाजता निघू शकतेस त्याला भेटायला. "
तिच्या मनाचा वेध घेत ते म्हणाले.


     " नाही नको. "
जराशा रागातच ती म्हणाली.

परत ओपीडी सुरु झाली तशी तिची होणारी चलबिचल ते टिपत होते. तिचं असं वागणं बघून त्यांच्या ओठांवर एक मिश्किल हसू उमटले. घड्याळात तीनचा टोला पडला तशी ती पटकन उठून उभी राहिली.

    " सर, निघू मी? प्लीज नाही म्हणू नका नं? "

       त्यांनी हसून मान डोलावली. तसं आनंदाने आपली बॅग घेऊन ती निघाली. दोन पावलं चालल्यावर परत थबकली ती.

      " काय झाले? "
त्यांनी नजरेनेच विचारले.

      " सर , ऍक्च्युअली आय डोन्ट नो युअर ऍड्रेस. "
बोलतांना तिचा चेहरा पिटुकला झाला होता.

       त्यांनी तिला पत्ता दिला.

        "थँक यू सर! "
घाईतच म्हणाली ती.आणि मग निघाली भरधाव. त्याच्या ओढीने.

.

.

.


क्रमश :


        ****************


कसा वाटला हा भाग. बघा आले की नाही लवकर घेऊन. तुम्हीही असंच लवकर लवकर लाईक करा कमेंट करा. आणि आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.


🎭 Series Post

View all