पारिजात.. गंध प्रेमाचा..! भाग - 31

रावी डॉ. साठे आणि सुमीला एकत्र आणेल??

   आपण वाचत आहात एका गंधाळलेल्या प्रेमाची सुगंधित कहाणी.. 


पारिजात.. गंध प्रेमाचा..!


  ( मागील भागात आपण वाचले की विराज अमेरिकेला जाणार आहे हे कळताच रावी त्याला भेटायला घरी येते. तो जाणार आहे हे बघून तिला खूप रडू कोसळते. संपूर्ण दिवस त्याच्यासोबत घालवल्यावर रात्रीला ती घरी पोहोचते. मोबाईलवर खूप सारे मिस्ड कॉल दिसल्यावर तिला जाणवते किती आज दिवसभर मॉमशी बोललेलीच नाहीये आता पुढे . )

**********


    " गॉड! मोबाईल सायलेंट होता अख्खा दिवस. "

आपला मोबाईल बाहेर काढत तिने बघितले.

   " मॉमचे इतके सारे मिस्ड कॉल? तिच्याशी आधी बोलायला हवं. "

तिने नंबर डायल करून मोबाईल कानाला लावला.

    " मॉम  ,  सॉरी  गं .  तुझ्याशी आज दिवसभर बोलणंच नाही झालं. "

रावीचा आवाज जरा पडला होता.

    " काय रे बच्चा? सगळं ठीक आहे ना? "

तिच्या आवाजातील दुःख जाणवलं सुमीला.

   " मॉम.. "

रडक्या चेहऱ्याने तिने सारं सांगितलं.

   " मॉम , आय डोन्ट नो व्हाय , पण खूप लो फील होत आहे गं. विराज जातोय तर मला का एवढं रडायला येतेय तेच कळेनासं झालंय. "

तिच्या मनाचा अंदाज सुमीला येत होता.

    " वेडू , विराजच्या प्रेमात वगैरे पडलीस की काय? "

तिच्या चेहऱ्याकडे टक लावून बघत सुमतीने विचारलं.

    " मॉम , प्रेम असं असतं का गं? ते का रडवतं आपल्याला? आणि मुळात मी प्रेमात आहे की नाही हेच मला कळत नाहीये अगं. "

    तिच्या चेहऱ्यावर एक मोठ्ठ प्रश्नचिन्ह होतं आणि त्यासोबतच होता डोक्यात जमा झालेला गोंधळ.

सुमीने हे बरोबर हेरलं.

     " बेटू , अगं नको जास्त विचार करुस. जे घडत आहे ते घडू दे ना. फक्त एक कर , जेव्हा तुला वाटेल ना की तू खरंच प्रेमात पडली आहेस तेव्हा मात्र मनाचे दार बंद करू नकोस. ते दार उघडे राहू दे. भावनांना व्यक्त होऊ दे. मग बघ तुझ्या डोक्यातला सगळा गोंधळ आपोआप कसा दूर होतो ते. "

सुमी सांगत होती.

     " मॉम , खरं तर ही फीलिंग माझ्या मनात आहे की नाही ते माझं मलाच कळलेलं नाहीय . डोक्यातला गुंताही तसाच आहे पण हां तुझ्याशी बोलून मात्र खूप बरं वाटतेय गं. ताण निवळल्यासारखा वाटतोय बघ. आता झोपते मी निवांत. "

 एक समाधानाचा श्वास सोडत रावी म्हणाली. थोड्यावेळाने कॉल बंद करून ती झोपी गेली.


    विराज डोळे मिटून पडला होता , पण बंद डोळ्यासमोरून रावी काही हटत नव्हती.


तिचं रडणं , तिने मारलेली मिठी , चेहऱ्यावरचे ती व्याकुळता..! नेहमीच्या रावीपेक्षा ती काहीशी निराळी भासत होती आज. त्यालाही ते निराळेपण जाणवत होते.


` मैत्रीच्या पलीकडची भावना तिच्या मनात निर्माण तर नाही ना झाली? ´

आपल्याच डोक्यात आलेल्या विचाराचं त्याला हसू आलं.

   `  मिस्टर विराज , जर तिला तुमच्याबद्दल काही वाटत असेल तर चांगलंच आहे ना?  ´
त्याचं मन म्हणत होतं.

   रात्री उशिरा कधीतरी त्याचा डोळा लागला.


    ` दोघेही गुंतलेत एकमेकांत. बस्स! त्यांचं त्यांना लवकर कळू दे म्हणजे झालं. ´

विचार करतच साठेंनी डोळे मिटले.


    " मामा , अरे मी कही अगदीच लहान नाहीये. पूर्वी जसा मी होस्टेलला जाणार असलो की तू सकाळपासून घरात ठाण मांडून बसायचास तशी आता अजिबात गरज नाहीये. तू आरामात हॉस्पिटलला जा आणि मग तिथून परस्पर ये ना एअरपोर्टवर. "

घरी थांबायला निघालेल्या मामाला तो हॉस्पिटलला पिटाळत होता.

`  मुलगा मोठा झाला आता. ´

ते मनात म्हणाले.

    " ऐक ना , एक करता येईल. तू ना रावीच्या स्कुटीने जाशील का हॉस्पिटलला ? मी माझं आवरलं की कारने येतो तिकडे. मग आपण तिघे सोबत जाऊयात. "

तो.

    " तिघे ? "

न कळल्याचा आव आणत त्यांनी विचारलं.

    " हो रे . तू , मी आणि रावी. "
तो लगेच म्हणाला.

    " पण काय रे तुला काही प्रॉब्लेम तर ना? "

-तो.

    " नाही. रावी सोबत आली तर मला काय अडचण होणार? "

ते .

     " ती अडचण नाही म्हणतोय रे. स्कुटीने जाशील ना तू ? ते विचारतोय. "
-तो.

    " तुझ्यासाठी काय पण ! "

त्याच्या पाठीवर हलकी थाप देत ते म्हणाले.

.
.

     हॉस्पिटलमधून ते तिघे सोबत निघाले होते . रस्त्यात जास्त कोणी बोलत नव्हतेच. " काळजी घे. नीट रहा. " एवढंच काय ते बोलणं.

      इथून मुंबईला पोहचायला दीड तास आणि मग तेथून अमेरिकेसाठी चारचे विमान. निरोपाच्या वेळी रावीला सारखं भरून येत होतं , पण आज अजिबात रडायचं नाही असं हजारदा तरी तिने स्वतःलाच बजावलं होतं. तिघांची अवस्था थोडीफार सारखीच होती. काहीतरी हातातून निसटतेय असंच राहून राहून वाटत होतं.

त्यानं मिठी मारली , तसं डॉक्टरांचा उर भरून आला.

     " नीट रहा. आणि जमेल तसं दिवसातून एकदा तरी कॉल करत जा. "

भिजल्या स्वरात ते म्हणाले.

     " हो रे मामा. हृदयात वसलेल्या माझ्या माणसांना आता मला परत नाही रे गमवायचय. "

त्यांच्या ऊबदार मिठीतच तो बोलला.

    " आणि आता आपली माणसं ओळखायला शिकलोय मी. त्यांना हरवणं नाही झेपायचं मला. "

मिठीतून बाहेर येत त्यांच्या डोळ्यात पाहत तो परत म्हणाला.

    " ऑल द बेस्ट यंग मॅन. खूप मोठा हो. "

त्यांनी त्याला तोंडभरून आशीर्वाद दिला.

तो रावीसमोर आला तसं तिनं हस्तांदोलनासाठी हात पुढे केला.

    " ऑल द बेस्ट फॉर युअर ब्राईट फ्युचर. "

ती शक्य तेवढ्या हसऱ्या चेहऱ्याने म्हणाली.

  " थँक यू ! "

     तिचा हात हातात घेत तो म्हणाला आणि तिला घट्ट मिठी मारली. त्या मिठीत ती हरवली क्षणभर. मिठीत विसावल्याबरोबर इतका वेळ रोखून धरलेल्या आसवांचा बांध फुटला.

   `रावी कंट्रोल ! ´

ती स्वतःलाच बजावत होती , तरी एक थेंब त्याच्या पाठीवर ओघळलाच.

    " पार्टनर , माझ्या मामाला तुझ्यावर सोपवून जातोय मी. काळजी घे त्याची आणि मी इथे नसलो तरी तुझ्या सोबत नेहमीच आहे , सो डोन्ट क्राय. "

तिचे डोळे पुसत तो म्हणाला.

    " नाही रे , मी कुठे रडतेय?  ते डोळ्यात काहीतरी गेलं बहुतेक. "

ओठांवर खोटं हसू आणत ती म्हणाली.

नकळत त्याचेही ओठ रुंदावले. तिचा हात अजूनही त्याच्या हातात होता. त्यानं आपले ओठ हलकेच त्यावर टेकवले.

    " बाय. "
म्हणून तो निघाला.

     क्षणभर काय झाले तिला उमगलेच नाही. त्याच्या त्या स्पर्शाने संपूर्ण शरीरभर एक गोड शिरशिरी उमटली होती . तिला वाटलं धावत जाऊन त्याला अडवावे , जाण्यापासून परावृत्त करावे.
पण पुढे निघून गेलेल्या त्याला मात्र ती पाठमोरी बघतच राहिली.

      मुंबईला जाणारे त्याचे विमान आकाशात झेपावले होते.

त्यानं आपले डोळे मिटून घेतले.

     ` पार्टनर , यू आर द मोस्ट प्रेशिअस पर्सन ईन माय लाईफ. तुला सोडून जगणं अशक्य वाटू लागलंय गं. पण जावे तर लागणारच होते ना .
बट आय प्रॉमिस यू ,  ज्या क्षणी वाटेल ना की आता नाहीच जगू शकणार तुझ्याशिवाय , तेव्हा सगळं सोडून परतेन मी. ´

त्याच्या बंद डोळ्यासमोर रावीचे प्रतिबिंब दिसत होते. आणि त्याच्या डोळ्यातून नकळत एक अश्रूचा थेंब गालावर ओघळला.

    ` पार्टनर तुझ्यामुळे आता मी बिनधास्त रडायलाही शिकलो. थॅंक यू यार ! ´

रडायला येत असतानाही त्याच्या ओठावर हसू आले.


    चारच्या फ्लाईटने त्याने मुंबई सोडली आणि काही तासातच मायभूमीशी त्याचा संपर्क सुटला.


.
.
.


     अमेरिकेला जाऊन जवळपास तीन महिने होत आले होते. विराज बऱ्यापैकी तेथे रुळला. कामाच्या व्यापात फारसा वेळ तर नाही मिळायचा , पण रावीचे वेड अजून मात्र उतरले नव्हते.  उलटपक्षी तिची आठवण जास्तच येत होती.
जणूकाही ती त्याच्या आयुष्याचा एक भागच झाली होती.
दिवसाची सुरुवात अन रात्रीचा शेवट तिचा फोटो पाहिल्या शिवाय व्हायची नाही . पुष्कळदा फोनवरती गप्पा व्हायच्या पण वेळेचा घोळ होत होता.


    ` मिस्टर विराज , पुरे आता. तुमच्या मनातील भावना सांगून टाका की !  ´

त्याचं एक मन त्याला म्हणत होते.

   ` नाही , आता नको. आता सांगायचं तर प्रत्यक्षातच. ´

दुसऱ्या मनाने लगेच तंबी दिली.

     इकडे रावीची अवस्था देखील त्याच्यासारखीच झाली होती. पण आपण प्रेमात पडलोय हे मानायला काही तिचं मन तयार होईना.

त्याच्याशी बोलताना मनात एक हुरहूर लागून राहायची , पण मनातले भाव कधी ओठांवर येत नव्हते.
आपल्या कामात चोख तर पहिल्यापासूनच होती ती. मात्र आताशा काहीशी हरवल्यासारखी दिसू लागली होती. विराज शिवाय आयुष्याचं गणित चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं.


    "  डॉक्टर , पूर्वीची रावी हरवली तुझ्यातील. काय झालंय काही प्रॉब्लेम आहे का? "

कॉफी ब्रेकमध्ये डॉक्टर साठे तिला विचारत होते.

    " कुठे हो सर? आय ऍम ऍबस्युल्युटली फाईन.
मला कसली धाड भरतेय? "

पुसटशी हसत ती म्हणाली.
तेही हसले हलकेच आणि कॉफीचा मग तोंडाला लावला.

    " पण तुमचं काय चाललय सर? किती ही कॉफी ? "

त्यांच्या हातातील कॉफीचा मग खाली ठेवत ती काहीशा रागात म्हणाली.

    " विराजची आठवण येतेय का? "
त्यांच्या डोळ्यात बघत तिने विचारलं.

    " तुला येते ? "
त्यांनी प्रतिप्रश्न केला.

     " हो , म्हणजे काय? माझ्यावर सोपवून गेला आहे ना तो तुम्हाला. तुम्ही असे वागलात तर तो परतल्यावर त्याला मी काय सांगू ?  "
ती.

     " येणार आहे का तो परत? "
तिच्याकडे पाहत त्यांनी विचारलं.

     " आय डोन्ट नो. "
ती खाली बघत म्हणाली.

    " पण मला खात्री आहे , तो नक्कीच येईल. अमेरिकेत असला तरी त्याचं मन मात्र इथेच अडकलय आपल्याच माणसांत. "
ते.

    ती खिन्नशी हसली.

    " होप सो! "

डोळ्यात पाणी जमा झाले होते तिच्या.

      " तुला एक सांगू ? बघ हं रागावू नकोस. "

तिच्याकडे टक लावून बघत ते म्हणाले.

    " बोला ना सर. "
ती.

      " डॉक्टर रावी , यू आर इन लव. प्रेमात पडलीहेस तू विराजच्या. "

तिने चमकून त्यांच्याकडे पाहिलं. त्यांची नजर अजूनही तिच्यावरच स्थिरावली होती.

    " मग मला का कळत नाहीये? "
तिचा प्रश्न.

     " कळतेय गं , पण तुला वळत नाहीये ! "
ते.

     " म्हणजे? "
ती.

     " म्हणजे..? " ते हसले.

      " म्हणजे तुझ्या अंतरीच्या तारांना एकदा छेडून तर बघ , कदाचित त्यातून उमटलेले सुर हे विराजसाठीच असतील. तुझ्या हृदयाची बंद  कवाडं उघड .   आत तुला केवळ विराज दिसेल.
तुझे डोळे , तुझा चेहरा हेच सांगतो की विराज तुला आवडतो . आता एकदा मनालाही हे सांगू दे की! "

      त्यांचे बोलणे ती ऐकत होती. मनात मात्र मॉमच बोलतेय असं वाटत होते . विराज जाण्यापूर्वी तिने देखील हेच तर सांगितले होते ,

     " ..जेव्हा तुला वाटेल ना की तू खरंच प्रेमात पडली आहेस तेव्हा मात्र मनाचे दार बंद करू नकोस. ते दार उघडे राहू दे.. "
मॉमचे ते बोलणे तिला आठवत होते.

    ` सर आणि मॉमचे विचार किती जुळतात ना? त्यांचे बोलणे , त्यांच्या सवयी , त्यांच्या आवडी , आणि पारिजात..? तो सुद्धा! सर आणि मॉम दोघांना एकत्र आणलं तर? ´
तिच्या डोक्यात विचार आला.

    " रावी , मी जे बोललोय त्यावर विचार कर एकदा. "

तिच्या डोक्यावर हात ठेवत ते उठले.

     " येस! नक्कीच. "

ती स्वतःच्याच विचारात प्रसन्न हसत म्हणाली.

     ते खुश होते , त्यांच्या मनाच्या चित्रात रावी आणि वीर एकत्र होते.

ती आंनदी होती.
तिच्या डोक्यात सुमी आणि डॉ. साठे होते.

.

.

.

क्रमश :



**************

तुम्हाला हा पारिजात सुखावतोय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद..!

असेच लाईक करत रहा. कमेंट करत रहा. तुमचे एक लाईक सुद्धा मला पुढे लिहायला प्रोत्साहन देतो  आणि ते प्रोत्साहन आवश्यक असतेच ना?

हा भाग देखील तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करते. तुम्हाला किती आवडला तो तुमच्या लाईक आणि कमेंट वरून मला कळेलच.

सो... वाचत रहा तुमचा आवडता पारिजात.

पुढचा पार्ट लवकरच.

🎭 Series Post

View all