पारिजात... गंध प्रेमाचा...! भाग - 8

Love story Of Sumi And Ani...

आपण वाचत आहात... 

एक भन्नाट प्रेमकथा... गंधाळलेल्या प्रेमाची.. पारिजातकाच्या सुगंधासारखी...!!


               ********************






"... जब भी थामा हैं तेरा
हाथ तो देखा हैं
लोग कहते हैं के
बस हाथ की रेखा हैं
हमने देखा हैं दो तकदीरो को जुडते हुए...
आज कल पॉवं जमीं पर नहीं पडते मेरे
बोलो देखा हैं कभी
तुमने मुझे उडते हुए..
आज कल पॉवं जमीं पर
नहीं पडते मेरे..."
.
.
.
.
.
.
... टिंग टॉंग...
टिंग टॉंग... टिंग टॉंग...
" मॅडम ss...
अहो सुमती मॅडम ss.. "

डोअर बेलचा आवाज आणि शांताकाकूंनी घातलेली साद... दोघांची सांगड एकत्रच घातली होती.


पाच सहा वेळा दिलेला आवाज ऐकून तिचे स्वप्नाळलेले डोळे अलगद उघडले..

उठायची ईच्छा नव्हतीच पण नाईलाजाने तिने दरवाजा उघडला.
"... शांता...??
एवढया लवकर आलीस तू..?? "
तिनं आश्चर्याने विचारलं.


"... अहो मॅडम.. नऊ वाजलेत सकाळचे!
आणि तुम्हाला बरं नाहीये का ??
रावी मॅडम केव्हाच्या फोन करून राहिल्या.
त्यांच्याशी बोला पहिले.."


कामाला लागत शांताकाकु म्हणाली.


" रावी तुला का कॉल करतेय...?? "


ती शांताकाकूला विचारतच होती की तिचा मोबाईल वाजायला लागला..


रावीचा विडियो कॉल होता.


" हॅलो ss बच्चा.. "
" मॉम ss... आर यू ओके...??

काय झालंय तुला??

डोळे किती सुजलेत तुझे..??

कितीदा कॉल करतेय तुला.. का उचलत नाहीयेस तू..???
शेवटी शांताकाकूला कॉल करून घरी पाठवलेय मी..

ठीक आहेस ना तू..?? "


एक  नाही - दोन नाही.. तिने तर प्रश्नांची सरबत्तीच सुरु केली होती.


काळजीने तिचा स्वर भिजला होता.


" wait.. Wait.. रावी..!
I\"m absolutely fine bachha...
तू का एवढी घाबरलीयेस..?? "


सोफ्यावर बसत तिनं विचारलं..


" एक मिनिटं मम्मा.. तू लेट नाईट कॉफी प्यायलीस ना..?? "


रावीनं जरा रागातच विचारलं.


"... हो.. अगं ते झोप येत नव्हती ना म्हणून..
पण तुला कसं कळलं..?? "


ती आश्चर्याने म्हणाली.


" मम्मा.. सोफ्याच्या बाजूला टेबलवर तुझा आवडता कॉफी मग दिसतोय मला..
अशी उशिरा कॉफी पितेस नी मग रात्रभर जागी असतेस..
तुला माहितीय माझा जीव इकडे काळजीने टांगणीला लागला होता.. "


रागाने तिच्या नाकाचा शेंडा लाल झाला होता.


" ये ss य... रावी ss !
सॉरी ना यार...! "


ती एका हाताने आपला कान पकडत म्हणाली.


" राहू दे मॉम.. आता ना मला बोलायचंच नाहीये. तसंही नऊ वाजलेत. निघते मी हॉस्पिटलला. उगाच उशीर झाला तर मग आहेतच डॉक्टर साठे माझी फिरकी घ्यायला...! "


रावी आपला ऍप्रॉन घेत म्हणाली.


" येय बच्चा.. सॉरी म्हटले ना मी..
लव्ह यू ना डिअर..! "


ती छोटुसा चेहरा करत म्हणाली.


" humm..!

मस्का मारणं आपल्या लेकीकडून बरं शिकलीस गं..??

पण माझा राग काही कमी नाही झालाय.

आता लेट होतेय म्हणून...  सायंकाळी बघतेच तुला..!"


स्कुटीची चावी घेत रावी म्हणाली.


"... आणि हं.. कॉलेजला जाऊ नकोस धडपडत...
आराम कर आज.
बाय...! "


तिनं कॉल कट केला.


"... श्रुती चल यार. आजतरी उशीर नको व्हायला.."
श्रुतिवर जरा ओरडतच ती म्हणाली.


" yes बॉस.. आलेच मी. "
आपला ऍप्रॉन घेत श्रुती बाहेर आली.


रावीनं गाडीला किक मारली आणि दोघी निघाल्या.....
.
.
.
.
.
" गोडुली गं माझी...!

कधी कधी असं वाटतं की मी हीची आई आहे की ही माझी..??
काय भारी रागावते..!! "


हलकेच मनात हसत सुमतीनं मोबाईल ठेवला.


तेव्हा तिला दिसलं..
" बापरे...!
बारा - बारा मिस्ड कॉल रावीचे..
रोज सकाळी उठल्या उठल्या गुड मॉर्निंग चा मेसेज टाकते मी.
आज तेही नाही, म्हणून एवढी चिडलीये ही..
सायंकाळी काही खरं नाही माझं...! "


ती स्वतःशी बोलली आणि फ्रेश व्हायला निघून गेली....
.
.
.
.
.
... रावी सरांच्या केबिनपाशी येऊन धडकली.


" रिलॅक्स रावी...!
एक डीप ब्रिद कर आणि नंतर हसऱ्या चेहऱ्याने आत जा..
ऑल इज वेल...


ऑल इज वेल...! "


ती स्वतःशीच बोलत आत प्रवेशली.


  आत साठे सरांच्या पुढे पुष्पगुच्छांचा ढेर पडला होता.


".. आज काय स्पेशल..?? "


तिनं बाजूलाच उभ्या असलेल्या सिस्टरला विचारलं.


" मॅम.. आज सरांचा बर्थडे आहे.. "


सिस्टर कुजबुजली.


त्याच वेळी नकळत सरांशी तिची नजरानजर झाली..


" गूड मॉर्निंग सर..! "
तिनं ग्रीट केलं.


" गुड मॉर्निंग डॉक्टर रावी.. "
आज त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न हसू होतं.

" हॅपी बर्थडे सर.. "


अचानक आपल्या बॅगमधून छोटा डबा त्यांच्यासमोर धरत ती म्हणाली..


" ऍक्च्युअली सर.. तुमचा वाढदिवस आहे हे ठाऊक नव्हतं मला..!

So मी काहीच घेऊन आले नाही.


बट सर.. हे लाडू घ्या ना प्लीज..! "


डबा तसाच उघडा ठेऊन ती म्हणाली.


एकवार तिच्याकडे बघून त्यांनी लाडू हातात घेतला.


" डोन्ट वरी सर..

लाडू होम मेड आहेत.. माझ्या मॉमनी बनवलेत..!"
ती पटकन बोलली.


तिच्याकडे बघतच त्यांनी लाडूचा तुकडा तोंडात टाकला...


आणि क्षणात त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले....


" काय झालं सर?? नाही आवडलं का? "


त्यांचे एक्स्प्रेशन बघून ती म्हणाली.


" नाही  नाही. मस्त आहेत.  लेट्स गो टू वर्क... "
ते उठत म्हणाले.


डोक्यात मात्र एकच विचार सुरु होता...


...अगदी तीच चव... !  इतक्या वर्षानंतर...!!
कसं शक्य आहे...???
.
.
.
.
.


...  कॉलेजला जाऊ नकोस म्हणून रावीनं तिला बजावलं होतं. मग तीही निवांतपणे आपलं आवरत बसली.


डायनिंग वर जेवायला बसली अन शेजारचा डबा उघडला..
गोड आवडायचं नाही फारसं पण रावीला द्यायला म्हणून बेसनलाडू केले होते..

लाडवाचा एक तुकडा टाकला तोंडात आणि अचानक तिला आठवलं...

अनी ला किती आवडायचे तिच्या हातचे लाडू..??
खरं तर खास त्याच्यासाठीच तर शिकली होती ती लाडू बनवायला...


" अनी... प्रत्येकच गोष्ट तुझ्याच आठवणीशी कशी निगडित असते रे..??
अगदी एवढया वर्षानंतरही...! "


पुन्हा तिचा अनी तिच्या मनात डोकावू लागला...
.
.
.
.
.

.

.


.... रोजच्याप्रमाणे आजही ती पारिजाताची फुलं गोळा करत होती.. आणि तिच्या अंगावर फुलांचा वर्षाव झाला..

तिनं नजर वर करून पाहीली...


".. अनी ss??
तू एवढया पहाटे - पहाटे काय करतोयस इथे..?? "


त्याच्याकडे बघत तिनं विचारलं.


तो झाडाची फांदी हलवत तिच्यावर फुलं पाडत होता.


" नकटु.. पहाटे - पहाटे मी देखील उठतो बरं का.. "
मिश्किल हसत तो म्हणाला.


" काय रे अनी.. पुन्हा नकटु..?? "
लटक्या रागानं ती म्हणाली.


" सॉरी.. "

कान पकडत तो.


".. मग आज काय प्लॅन..?? "
तिनं हसत विचारलं.


".. हम्म..! तू एकदा मला मावळतीचा सूर्य दाखवला होता ना..
चल तुला आज मी उगवतीचा सूर्य दाखवतो.. "


तिच्या अंगावर पुन्हा फुलांचा वर्षाव करत तो म्हणाला.


" कुठे..?? "
- ती.


" तूझ्या त्या ओढ्याकडे.. "
- तो.


" आत्ता..?? "


" हो.. चल ना सुमी..

सूर्योदयाला अजून अर्धा तास अवकाश आहे.. "
तिच्या डोळ्यात बघत तो म्हणाला.


" चल.. "
त्या काळ्याभोर डोळ्यांना नाही म्हणायला नाही जमले तिला...


तेच ठिकाण..
तोच ओढा..
वरचे आकाशही तेच..
पण तेव्हा सायंकाळ होती आणि आता सूर्य हलकेच वर येणार होता..
मंद वारा वाहत होता... पक्षीही घरट्यातून बाहेर पडत होते.. त्यांचा किलबिलाट मंत्रमुग्ध करत होता..


".. सांग.. कसं वाटत आहे आता तुला..?? "
पाण्यात दगड मारत तो म्हणाला.


"... खूsप मस्त..! अगदी प्रसन्न..!! "


ती आनंदाने गिरकी घेत म्हनाली.
सूर्याचा लाल गोळा वर यायला लागला होता..


" निघायचं...? "
त्यानं तिला हात देत विचारलं.


" हो..! "
ती उठली.


"... सुमी ss
एक विचारू..?? "


" विचार ना..! "
तिचा हात अजूनही त्याच्या हातात होता.


"... तुला आवडतो ना मी? "


त्यानं अनपेक्षित प्रश्न केला.


"हां..?? "


तिनं दचकून त्याच्याकडे पाहिलं.


" आवडतो ना मी तुला...?? "
शब्द फिरवून परत त्यानं तेच विचारलं.


" हम्म.. म्हणजे...
मला दिवेकर काकू आवडतात. आजीही फार आवडते.
तसा तुदेखील आवडतोस..! "


शब्दांच्या जाळ्यात तिनेही त्याला गुंडाळलं..


" बस्स..!
मावशी आणि आजी एवढाच फक्त आवडतो मी तुला..??
मला वाटलं की... "


" काय वाटलं तुला..?? "


तिनं मुद्दाम डिवचून त्याला विचारलं.


" मला वाटलं की मी तुला जरा जास्तच आवडतो..! "


तिच्या डोळ्यात आरपार बघत तो म्हणाला.


" अनी...
असा डायरेक्ट माझ्या डोळ्यात बघू नकोस... "


" का गं..?? "

" तूझ्या ह्या काळ्याभोर डोळ्यात हरवायला होतं मला...! "

ती खाली बघत म्हणाली..

" म्हणजे...?? "

"... म्हणजे  मला माहित नाही .
पण तुझे हे डोळे खूप आवडतात मला..! "
ती अगदी सहजतेने बोलली.

" आणि मी..?? "


त्याच्या प्रश्नानं चेहरा लाल झाला तिचा... लाजेनं...!


त्यानं हलकेच तिचा हात सोडला.


मंद वारा वाहत होता..!
ओढ्याला खळखळ नव्हतीच फार..
तिचे केस भुरूभुरू उडत होते.. गालावर सूर्याची लालिमा अवतरली होती..


त्याच्या काळ्या डोळ्यांचा तो खोल डोह... नजरेसमोरून हटत नव्हता.


ती आपली सायकल घेऊन निघाली... तिच्या हृदयाची वाढलेली स्पंदनं तिलाच ऐकू यायला लागली होती...


"अनी मला आवडतो.. पण हे त्याला कसं कळलं..??
आणि वरून तोच मला विचारतो की मी आवडतो ना म्हणून..!
एवढया लवकर माझी चोरी कशी पकडली त्याने..??

खरंच हुशार आहे हा..!


पण आता मी याला कसं सांगु की तूझ्या  काळ्या डोळ्यांच्या डोहात हरवायला आवडतं मला.


तुझ्याशी बोलायला आवडतं मला..


तुझं सोबत असणं आवडतं मला..


अनी... खरंच आवडतोस तू मला...!!! "


ती मनात एकटीच बोलत निघाली.


सायकल चालवणं अशक्य होतं ह्या अवस्थेत.
ती पायीच निघाली.


" सुमी s..
सुमी ss... "
तो मागून तिला आवाज देत आला.
पण ती त्याच्याशी काही बोलेल तर शप्पथ..!!


" ये ss...
तू बोलणारच नाहीयेस का माझ्याशी..?? "
तिच्या सायकलच्या हॅन्डलवर हात ठेवत तो म्हणाला.


तिनं त्याचा हात बाजूला केला.
"... बावळट मुला...
कसं सांगू काय होतंय मला..! "


तीचं आपलं मनातच चालू होतं.


" सुमी s..
सायंकाळी गच्चीवर भेटशील...??
काही सांगायचंय तुला. "
तो म्हणाला.


तिनं फक्त त्याच्याकडे पाहिलं. आणि काही बोलता निघाली.मग तोही गप्प झाला.


आज पहिल्यांदाच असे दोघे शांत घरी परतत होते....

.

.
.


" ... सुमे ss..
कुठे गेली होतीस सकाळी सकाळी हुंदडायला...??
ट्युशन आहे माझी, आणि सायकल नाहीये घरात..
कशी जाणार मी.."
मालती ( तिची ताई ) जाम चिडली होती.


" ये माझ्यावर कशाला ओरडतेस गं..?
तुझी सायकल अनी ने घेतली,  त्याला म्हण."


सुमी आत जात म्हणाली.


" उशीर होतोय मला.. आल्यावर बघतेच थांब..

ये, दे रे माझी सायकल..! "

त्याच्याकडुन सायकल घेत मालती ट्युशनला पळाली.

.

.
सुमी आईला  स्वयंपाकाला मदत करत होती.


".. अगं ये बाई..! केवढं मीठ टाकणारेस भाजीत..??
दोन चमचे टाकलेस आधीच.
नुसता धसमुसळेपणा..!

जा आवर तुझंच.. नको मेली तुझी मदत मला..! "


आई तिच्यावर ओरडली तशी तिनं पाहिलं..


" बापरे !  एवढं मीठ..?? आता येथून गेलेलंच बरं.. "


तिनं किचन मधून काढता पाय घेतला.


" काय होतंय आज...??
अनीच्या एका प्रश्नामुळे माझं चित्तचं थाऱ्यावर राहत नाहीये...! "
कॉटवर पडल्या पडल्या ती सकाळचा घटनाक्रम आठवत होती..


तो पारिजातकाचा वर्षाव...
ते सूर्याचं लाल रुपडं...
तो मंद वाहणारा वारा...
तो हलकेच खळाळणारा ओढा...
तो त्याच्या हातातील तिचा हात..
आणि...
तो तिच्या डोळ्यात बघत त्यानं विचारलेला प्रश्न...!!

लाजेनं शहारली ती...!


आता सायंकाळची वाट बघू लागली...

.

.

.

.

क्रमश : ...



         *******************************

काय मग.. कसा वाटला आजचा भाग...??

कमेंट करून नक्की सांगा.

काही सुचवायचं असेल तर तेही सांगा...

तुमच्या सूचना स्वागतार्ह आहेत...

🎭 Series Post

View all