पारिजात... गंध प्रेमाचा..! भाग -19.

A Story Of Pure Love Between Ravee And Sumi.


आपण वाचत आहात… एक प्राजक्ताच्या सुगंधाप्रमाणे गंधाळलेली प्रेमकथा…

पारिजात… गंध प्रेमाचा…!



( मागील भागात आपण पाहिलंत.. बाबा जुने घर सोडून सुमी आणि आईला घेऊन नव्या गावाला निघाले…

आता पुढे…)

**************



...बाबांच्या नकळत तिनं त्या झाडावर आलेल्या बिया आपल्या बॅगेत टाकल्या आणि गाडीत जावून बसली…


तिचा प्रवास सुरु झाला होता…

एका नव्या दिशेने…
.
.
.
.


बाबांनी मालती ताईच्याच शहरात नवे घर घेतले.. सुमीची ऍडमिशन देखील तिथेच केली.

तिला कशाचंच सोयरंसुतक नव्हतं. घरात बोलायची तर नाहीच ती कुणाशी.


आपला अभ्यास आणि कॉलेज…
बस्स! एवढंच काय ते रोजचं रुटीन..



नाही म्हणायला एका कामात गुंतवलं होतं तिने स्वतःला..


… येतांना सोबत आणलेल्या पारिजाताच्या बियांना मातीत रुजवलं होतं..

… तिथेच बसून राहायची ती…
… कधीकधी तासंतास.. एकटीच…!



… एक दिवस आईनं आनंदाने बातमी दिली..

" सुमा.. ताई येतेय आपल्याकडे..

दिवस गेलेत तिला..! "


ऐकून तिच्या चेहऱ्यावरची माशीही हलली नाही. ती आपल्याच गोषात. जणू काही त्या घरची नव्हतीच ती.

मालती घरी आल्यावर तिच्याशीही नीट बोलायची नाही .


… आणि एकदिवस तिला दिसलं..


जमिनीच्या गर्भातून बाहेर आलेलं प्राजक्ताचं इवलंस रोपटं…
ते बघून पहिल्यांदा तिच्या ओठांवर स्मित फुललं..


कित्येक दिवसानंतर…!


… आता बोलायची ती एखाद शब्द… पण केवळ मालतीशीच. बाकी इतर वागणे अजूनही तसेच होते.




नवव्या महिन्यात पुन्हा ताई आली.. बाळंतपणाला..!


तिचं भलंमोठं पोट.. सुजलेले शरीर…

सुमाला बघवत नसे.


तिच्या आसपासही ती भटकत नव्हती आताशा.

अंगणातला पारिजात वाढिला लागला होता..
ती रममाण राहायची त्याच्यातच.


… काही दिवसांतच मालती बाळन्त झाली. एका छोट्याशा परीचं आगमन झालं घरी.

दिवसरात्र तिच्या रडण्याने घर गजबजून जायचं.


सुमाचा रागराग व्हायचा नुसता.
ताईचं बाळ का कोण जाणे पण तिला अजिबात आवडायचं नाही.

तिचा रडका सूर कानावर पडला तरी चिडचिड व्हायची.


… महिन्याची होत आली होती आता ती परी…



" सुमा.. नाव काय ठेवायचं गं हिचं..?"


बाळाला हातात घेतलेल्या ताईनं सहज विचारलं…


" रावी..! "


नकळत सुमाच्या मुखातून बाहेर पडलं.

मालतीने चमकून तिच्याकडे पाहिले.


बाळाच्या बाबतीत कधीच काही न बोलणारी.. तिचा रागराग करणारी सुमा चक्क तिचं नाव काय ठेवायचं ते सांगत होती.



" सुमा.. आवडलं गं मला नाव. आपण हेच ठेवूया. "


तिच्याकडे बघत मालती म्हणाली.


" अगं नको.. ते असंच बोलले मी. "


ती म्हणाली.


" तरीही हेच नाव ठेवूयात. हिलादेखील आवडलंय. बघ लबाड कशी हसतेय."


ताई म्हणाली.


सुमीनं पाहिलं.. त्या चिमणीचे ओठ खरेच रुंदावले होते…
तीही स्मित करत आत गेली.


तिच्यातील होणारा बदल मालती टिपत होती.

हळूहळू का होईना पण रावीकडे सुमी ओढल्या जात होती.


आणि ती पिटुकली..??

ती तरी किती लबाड..??


आताशा रडायला लागली की कुणाकडेच शांत व्हायची नाही..
पण सुमीच्या स्पर्शाने अगदी गप्प होऊन जायची.


त्या रडक्या आवाजाचा रागराग करणारी सुमी नकळत तिच्यात गुंतायला लागली.


रावी आणि सुमीचं जणू एक समीकरणचं होऊन बसलं.


दोघींचं एकमेकींशिवाय पानही हलेना. केवळ दूध पिण्यापूरती आणि झोपताना रावी मालतीकडे असायची..

पण इतर वेळी तिला सुमीचं लागायची.


"सावत्र लेक आहे ही माझी.."


कधीकधी मुद्दाम ताई म्हणायची.



अशीच एकदा तीन महिन्यांच्या रावीला ती रात्रीची अंगणात फिरवत होती..


अनं....

एक अनपेक्षित  सुगंध तिच्या नाकात भिनला…


तोच ओळखीचा गंध…

परत एकदा…

कित्येक दिवसांनीं..!


… होय. अंगणातला पारिजात फुलत होता…!!

.
.
.
.

पारिजात फुलायला लागला नी सुमीदेखील खुलायला लागली. एखादंदुसरं कामही करायला लागली होती ती आता.
.
.
.
बघता बघता रावी वर्षभराची होत आली होती.  ताई भेटायला म्हणून माहेरी आली.

.
.


त्या दिवशी सुमीनं किचन मध्ये पाय टाकला आणि गोडाचं बनवायला घेतलं..


तिच्या रावीसाठी…


परत तिच्या हातून वळले तेच बेसनाचे लाडू…!

अनीसाठी केलेले…!!


लाडू बघून मालतीच्या डोळ्यात पाणी आलं.. तरी लपवत  ती म्हणाली..


" वॉव सुमा.. किती सुरेख वळलेत गं.. टेस्ट तर करू दे."



तिच्या हातावर चापटी देत सुमी म्हणाली ,


" नाही गं तायडे… पहिला मान माझ्या रावीचा..!"



सुमी तर सहज बोलली.. पण मालतीच्या डोळयांपुढे तोच प्रसंग उभा राहिला ..

अनिकेत साठी वळलेल्या लाडवांचा..!

तेव्हाही कुठे तिनं मालतीला पहिला लाडू खाऊ दिला होता..?


.
.
.
.

" आमच्या रावीची मी कोण गं ..?? "

दोन वर्षांच्या रावीला सुमी विचारत होती..

" माजी माऊ… "


गोबऱ्या गालाची रावी सुमीची पापी घेत म्हणाली...


" आमच्या रावीला कोण आवडतं सर्वात जास्त..?? "


सुमीचा प्रश्न.



" माजी माऊ… "


रावीनं दुसऱ्या गालाची पापी घेतली.



" रावीची मॉम कोण आहे..?"

सुमीनं पुन्हा प्रश्न केला..



" माऊ.. माम म्हंजे.?? "


बोबड्या रावीनं तिच्या गळ्यात हात गुंफत विचारलं.



" मॉम म्हणजे… मावशी मम्मा..!"


तिचं नाकाला नाक घासत सुमी म्हणाली.



" लावीची माछी ममा..


माजी माऊ…! "


रावी उड्या मारत म्हणाली.



"माछी ममा" हा कन्सेप्ट तिला आजच कळला होता.




"आणि रावी फक्त फक्त फक्त माछी ममाची… "


तिला गोल फिरवत सुमी म्हणाली...




आठवड्याचे दोन तीन दिवस तरी रावी इकडेच असायची.

आणि ती नाही आली तर सुमी त्यांच्याकडे चक्कर मारायचीच.

दोघींचे हे अनोखे नाते दिवासेंदिवस बहरत होत होते…!

.

.

.

.



" सुमा आता हळूहळू नीट राहतेय … चार चौघींसारखी वागायला लागलीय.
माझ्या डोक्यात तिच्या लग्नाचा विचार येतोय.. "


सुमीचे बाबा आईशी बोलत होते.


" मी काय म्हणते… तिच्या कलानं घ्या जरा. पुन्हा काही घोळ नको व्हायला.. "


आई समजावणीच्या सुरात म्हणाली.



" हो गं पण बिनलग्नाची पोर किती दिवस घरात ठेवणार..? "


बाबा म्हणाले.



" कोणाचं लग्न..?? "



कॉलेज मधून सुमा परस्पर रावीला घ्यायला गेली होती. आणि आल्याआल्या तिच्या कानावर लग्नाचं पडलं.


" कोणाच्या काय..? तुझ्याच लग्नाबद्दल बोलतोय सुमा. "


बाबा म्हणाले.


" बाबा.. मी आधीही सांगितलेलं नी आताही तेच सांगते..
माझ्या लग्नाचा विषय परत काढायचा नाही आता..!"


ती निग्रहाने म्हणाली.


" माऊचं लग्न.. माऊचं लग्न.. "

लहानगी रावी नाचायला लागली.



" बघितलं..? किती आनंदी झाली ती?
तिलादेखील कळतं लग्न महत्वाचं असतं ते. "


बाबा म्हणाले.


" बच्चा... तूला आवडेल तूझ्या माऊचं लग्न..?? "


तिच्यासमोर गुडघ्यावर बसत सुमीनं विचारलं.


" हो ss "
रावी आनंदाने म्हणाली.


" का गं..??"

सुमीचा प्रश्न.


" मला ना माऊ लग्नातला दान्स आवलतो…"


बोबडी रावी.



" पण माऊचं लग्न झालं ना तर तूला माऊ पुन्हा कधी भेटणारच नाही…!


आता आबाला सांग की तूला माऊचं लग्न हवंय का माऊ..? "



रावीच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिनं अचूक निशाणा साधला…



" नाई..!
आबा.. माऊचं लग्न नाही कलायचं…
मला फक्त माऊ पाईजे..!"


ती भोकाड पसरणार तसं सुमीनं तिला कडेवर घेतलं.


" बघितलंत बाबा..?? हिलादेखील कळतं.. प्रेमाची माणसं किती महत्वाची असतात ते..!


अनीला आयुष्यातून काढलं बाबा तुम्ही…


पण माझ्या हृदयातून कधीच जाणार नाही तो… "


ती डोळे पुसत आत जायला निघाली.


" सुमा… एकटं आयुष्य काढणं सोप्प नसतं गं .. "


मागून आईचा आवाज आला.


"... आई माझी काळजी नको.
हवं तर मी रावीला दत्तक घेईन.दोन वर्षांत डॉक्टरेट मिळाली की पर्मनंट जॉब पण मिळेल मला.. म्हणजे कोणाला जडही होणार नाही.."


बाबाला ऐकू जाईल अशा मोठ्याच आवाजात बोलली ती..



" तुम्ही हट्टी… आणि ती तुमची लेक लाख हट्टी..!

कसं होईल सुमाचं… नुसता घोर जीवाला. "


डोळ्याला पदर लावत
आई म्हणाली.


" मी वैरी नाही गं सुमाचा…!
पण समाजात राहायचं तर चालीरिती पाळायलाच पाहिजेत ना..? "



बाबा हळवे झाले.

.
.
.


"बच्चा...! डोळे मीट... "

तिला सुमी झोपवत होती.

" मितले माऊ..! "

" लांब श्वास घे आता.. "

" हम्म्म्म.. "

रावी श्वास आत ओढत म्हणाली.

" कसं वाटतंय..?? "

"मश्त मश्त छुगंद येतोय..!"


रावी डोळे मिटून म्हणाली.


"छे…! गंद नाही गं गंध असतं ते..! "


" गनssद.. "


आपल्या जिभेवर भार देत तिने प्रयत्न केला.. नाहीच जमलं.


" असू दे रे बच्चा..!
पण खर्र सांग… कसा वाटतो हा गंध..?? "


" खुssप छान..! माज्या माऊ सालखा..!!"


डोळे उघडून तिला मिठी मारत ती म्हणाली.

किती ते निरागस प्रेम…
शुद्ध , निर्व्याज्य प्रेम…
कसलीच अपेक्षा नसणारं…!


जगातील सर्वात छान… सुंदर… म्हणजे फक्त आपली माऊ एवढंचं तिला ठाऊक होतं.

सुमीच्या कडा पाणावल्या. आपले ओठ तिनं हलकेच रावीच्या मस्तकावर टेकवले….


" देवा..! माझ्या रावीला नेहमी आनंदी राहू दे… दुसरं काहीच नको मला. "
तिला थोपटत मनात ती देवाला म्हणाली.
.
.
.
.


"... दिवेकर काकू.??"


कॉलेजमधून लेक्चर घेऊन येतांना त्या दिसल्या तिला.


" अगंबाई सुमा..?? "

आश्चर्याने त्या म्हणाल्या.


" इकडे कशा तुम्ही? "

तिनं विचारलं.


" अगं.. लग्नाला आले होते एका.
काय करतेस तू..?? "


दिवेकर काकू.


" कॉलेजला जातेय शिकवायला.

काकू… अनी आला होता कधी..?? "

तिनं मनातला प्रश्न केला .


" हो. तीन वर्षांपूर्वी एकदा आला होता.. लग्नाची पत्रिका घेऊन.. "

त्या बोलल्या.


पुढचं ऐकायला सुमी थांबलीच नाही तिथे. लग्नाची पत्रिका जिव्हारी लागली होती तिच्या…


भरल्या डोळ्यांनी ती तिथून निघून गेली…..

.

.

.

.

क्रमश :


              ************************


आवडली का ही छोटी गोड रावी..??


आणि अनीच्या लग्नाचं काय...??

पुढल्या भागात काही प्रश्नांची उकल होईलच. तोवर हा भाग आवडला की नाही कळवत रहा.

🎭 Series Post

View all