पारिजात... गंध प्रेमाचा..! भाग -17

Reason For Separation..!

आपण वाचत आहात.. कथामालिका..
पारिजात… गंध प्रेमाचा..!


एक गंधाळलेली प्रेमकथा.. पारिजातकाच्या सुगंधाप्रमाणे…!!


( मागील भागात आपण परत डोकावलोय सुमीच्या भूतकाळात…
अनी आणि सुमीच्या प्रेमाच्या शेवटाचं कारण आज तरी कळेल का..??
वाचा आजच्या भागात.)




आई.. बाबा.. ताई..! सर्वच भेटले तिला तिथे...


सगळ्यांचे हसरे चेहेरे…

आनंदाच्या क्षणांची उधळण…


आणि त्याबरोबरच

एका स्वप्नभंगाच्या दुःखाची लकेर…!


साऱ्यांचा साक्षीदार.. म्हणजे तो फोटो अल्बम..

मालतीताईच्या लग्नातला…!


.
.
.
.
.

लग्न अगदी आठ दिवसांवर येऊन ठेपलं.

लग्नघर म्हणजे नुसता उत्साह…!
सगळीकडे कामाची लगबग..!

निमंत्रणं झाली. खरेदीही आटोपली.

सुमी आंनदी होती. लग्न चार दिवसांवर आलेलं आणि आज तिचा अनीही येणार होता..!

लग्नापूर्वीची कामं जवळपास पूर्ण झाली होती. आता दोन दिवस मालतीच्या लाडकौतुकाचे आणि पुढले दोन दिवस लग्नाच्या धामधूमीचे असणार होते…


" सुमाच्या आई..! उद्यापासून घरी पाहुण्यांची रांग लागेल. तेव्हा आज रात्रीचं आमच्याकडे सर्वांनी जेवायला या हो. मालतीच्या केळवणाला..! "


दिवेकर काकूंनी प्रेमाचं आमंत्रण दिलं.


" मावशी.. रात्री मस्त गच्चीवर काहीतरी गेम खेळायचा..??
मालतीताईच्या लग्नापूर्वीची धमाल म्हणून..? "


अनिकेतने दिवेकर काकूंपुढे प्रस्ताव ठेवला.


" हो रे अनी. चार दिवसानंतर लग्न झालं की मालती सासुरवाशीन होईल. त्यापूर्वी खरंच आज मस्तपैकी धमाल मज्जा होऊन जावू दे..! "


काकूंनीही त्याला हिरवी झेंडी दाखवली.


रात्री जेवणानंतर मालती , सुमी आणि अनीचं त्रिकुट वरती सतरंज्या, उशा , तक्के घेऊन गेलं.
सतरंजी अंथरता अंथरता अनी हळूच सुमीच्या कानात म्हणाला..

" सुमी… तूला गाणं म्हणायचं आहे हं .. माझ्यासाठी.. लक्षात ठेव.!"


ती त्याच्याकडे पाहतच राहिली..


" काय मुलगा आहे..??

मला लाडू आवडत नाही.. याला आवडतात.

हा गाण्यांचा शौकीन.. मला त्यातलं ऐकण्याशिवाय काहीच येत नाही.

देवा..

अपोजिट अट्रॅक्ट म्हणतात तसंच आहे का रे आमचं..??

असं तर काहीच जुळत नाही… मनं कशी काय जुळलीत..?? "


ती मनात देवाला विचारत होती…


सगळी तयारी झाली. मोठी माणसं वरती गोळा झाली.

येताना बाबा एक टेपरेकॉर्डर घेऊन आले.

उशी पास करण्याचा खेळ सुरु झाला.. टेपरेकॉर्डर ची म्युजिक थांबली की ज्याच्याकडे उशी असेल तो काहीतरी करून दाखवायचा..

… आणि मग एकदा पाळी आली सुमीची..!


" सुमी आता तू गाणं म्हण एखादं.. "

अनिकेत म्हणाला.


तशी सर्व हसायला लागली.


" गाणं आणि सुमा..?
अनिकेत तिचा छत्तीस चा आकडा आहे बरं का गाण्यासोबत…! "


बाबा हसून म्हणाले.


" हो का..?? पण ती तर मघाच मला म्हणाली की ताई साठी तिनं एक गाणं तयार केलंय असं..? "


तो बाबांकडे पाहून म्हणाला.


सुमीनं त्याच्याकडे बघून डोळे वटारले.


" माझ्यासाठी गाणार आहेस..?? मग तर सुमा म्हण गं.

मलाही ऐकू दे..! "



मालतीताई लाडीवाळपणे म्हणाली.
तिनं अनिकेत कडे पहिलं.. तो गालात हसत होता.


सुमीनं आपले डोळे गच्च मिटले.

" आता आली का पंचाईत..??

सगळ्यांसमोर हा अनी माझी वाट लावणार काय..??

पण त्याला देखील माहित नाही , ही सुमा किस खेत की मुली आहे ते..

आता नाकातून आवाज निघू दे नाहीतर गळ्यातून…
गाणं तर म्हणणारंच मी..!"


तिनं डोळे किलकीले करून पहिलं.. सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या..


पुन्हा लक्ष अनीकडे गेलं..
त्याच्या ओठांवरचं मिश्किल हसू तसंच होतं..


" अनी.. तुझ्यावर प्रेम करते ना म्हणून..!

नाहीतर गाणं आणि मी..??"


ती मनात चरफडत होती.

एक नजर मालतीताई कडे गेली..

तिनं हळूच अंगठा दाखवला..

आणि मग हिनेही हिम्मत केली… गाण्याची..!


"... नींद सी रेहती हैं
हलकासा नशा रेहता हैं
रात दिन आँखो में
इक चेहरा बसा रेहता हैं..

पर लगी आँखो को देखा हैं
कभी उडते हुए..

आज कल पाव जमीं पर
नहीं पडते मेरे
बोलो देखा हैं कभी
तुमने मुझे उडते हुए.. "


ती गायचं थांबली…
सगळे अगदी गप्प होते..

अनी तर डोळे फाडून बघत होता.


" काय झालं..?? अगदीच बेकार गायले का मी..?? "

बाबांकडे पाहत तिनं हळूच विचारलं.


" बेकार..?? अगं सुमा तू एवढं चांगलं गाऊ शकतेस हेच माहित नव्हतं आम्हाला..

काय सुरेख गायलीस तू..! "


त्यांनी टाळ्या वाजवल्या. त्याबरोबर सर्वांनीच टाळ्या वाजवल्या.

तिनं जिंकल्याच्या अविर्भावत अनीकडे एक भुवई उंचावून पाहिलं.

त्यानंही अंगठा आणि तर्जनीच्या साहाय्याने मस्त अशी खुण केली.


" ताईचं लग्न जुळलंय ना तेव्हापासून पाय जमिनीवर नाहीत तिचे..! म्हणून हे गाणं गायले. "


मालतीच्या गळ्यात पडत ती म्हणाली.


" हो..?? खरं काय ते सांगू सगळ्यांना..? "


तिचा कान खेचत मालतीताई हळूच कानात पुटपुटली.


तसं तिनं आपली मिठी अधिकच घट्ट केली..


" तायडे..! कित्ती गं गोड आहेस तू..??
खूप आठवण येईल तुझी मला..! "

ती भावनिक होतं म्हणाली.



" हो..?

मला नाही येणार बाई.

माझी सख्खी बहीण थोडीच आहेस तू.?? देवळाच्या पायरीवरून तर आणलंय तूला आईने उचलून..! "



मालती ताई आपले अश्रू लपवत म्हणाली.


" असेल..! पण आता तू नसशील तर मीच आईची लाडकी लेक होणार की नाही..?? "


सुमी आपल्या नाकाचा शेंडा उडवत म्हणाली.


दोघींना असं बघून आईचे डोळे मात्र पानावले.


" देवा..! दोघींतलं प्रेम असेच राहू दे.
दोन्ही पोरीच माझ्या..! त्यांना एकमेकींची साथ कायम असू दे..!! "


आईनं मनोमन देवाला हात जोडले…

.
.
.
.
.
.


अल्बमच्या दुसऱ्याच पानावर ताईचा एकटीचा फोटो होता..
पिवळ्या साडीतला..

हसऱ्या चेहऱ्यावर हळदीचं तेज…

खूप गोड दिसत होती ती..!

तो फोटो म्हणजे मालतीताईच्या कुमारिका ते सवाष्ण होण्याच्या प्रवासाला जोडणारा दुवा होता…!


दोन पान पलटवल्यावर तिला एक फोटो दिसला…

तिचा आणि अनीचा…


अनीनं हलकेच तिच्या गालाला हळद लावली आणि तोच क्षण फोटोग्राफरनं आपल्या कॅमेऱ्यात अलगद टिपला..


…. तो एकमेव फोटो… तिच्या आयुष्यातला…

अनीसोबतचा…!


त्यानंतर दुसरा फोटो घेण्याचा चान्सच नाही मिळाला…


पुढले काही पान चाळल्यावर ताईचा नववधूच्या पेहरावातील फोटो होता..


किती सुंदर दिसत होती ना ताई..!

कोणाची नजर लागू नये म्हणून आईनं मोठं काजळाचं तीट कानामागे लावलं होतं..!


.. मग पुढल्या एका फोटोत ती दिसली..
साडी नेसलेली…

पोरसवदा…! नाजूकशी…!!


मोठया आवडीने ताईच्या लग्नात घालायची म्हणून चार दुकानं फिरून ती साडी घेतली होती.. अबोली रंगाची..


साडी नेसून जेव्हा ती लग्नमंडपात प्रवेशली… तेव्हा अनीच्या हृदयाची कंपनं आपोआपच थांबली काही क्षणासाठी..!


साडीमध्ये पहिल्यांदाच पाहत होता तिला तो..

नेहमी त्यांच्यासोबत असणारी त्याची अल्लड सुमी आज अचानक मोठी झाल्यासारखी वाटली…


तिला अशी बघून विकेट गेली त्याची…
परत एकदा…!


" अनी कशी दिसतेय मी..??"

तिनं त्याच्याजवळ येऊन प्रश्न केला.

" खूप सुंदर..! "

तो म्हणाला.


" बस! एवढंच..??

पुन्हा तूला कौतुक नाही का रे करता येत..? "


ती तोंड फुगवून जायला वळली.


पाठमोऱ्या झालेल्या तिचा हात त्यानं पकडला..


" खरं सांगू..?? असं वाटतंय की याच मांडवात याच क्षणी आपलंही लग्न व्हावं..!

एवढी सुंदर दिसते आहेस ना सुमी की आता तुझ्यापासून दूर नाही राहवतंय मला..! "


तिचा हात हातात घेऊन तिच्याजवळ जात तो बोलला.


त्याच्या त्या स्पर्शानेच शहारली होती ती..!

त्यातच त्याचं ते मधाळ बोलणं…

लाजेनं चूर झाली ती.


जवळ येत त्यानं हलकेच तिच्या हनुवटीला उचलून तिचा चेहरा ओंजळीत पकडून वर केला..


" सुमी…!
लग्न करशील माझ्याशी..??"


तिच्या डोळ्यात डोळे घालून त्यानं विचारलं.


त्या काळ्या डोळ्याच्या डोहात ती हरवली पुन्हा स्वतःला विसरून…


" अनिकेत..? "

कोणीतरी पटकन त्याला हाताने मागे खेचलं.


ते सुमतीचे बाबा होते.


" बाबा..? "

सुमी त्यांच्या मागोमाग गेली.


" काय चाललंय तुझं अनिकेत..?? काय बोललास तू माझ्या पोरीला..?? "

त्यांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवून विचारलं.


" बाबा.. त्यानं काहीच केलेलं नाहीये. मी सांगते ना.. "


" तू गप गं. मी त्याला विचारतोय.. त्यालाच बोलू दे."

तिचं बोलणं मध्येच तोडत शक्य तेवढ्या हळू आवाजात ते म्हणाले.


" काका.. आमचं प्रेम आहे एकमेकांवर.
लग्न करायचं आहे मला सुमीशी.
मी तुम्हाला हे सांगणारच होतो… "

अनिकेत संयमाने बोलत होता.


" अनिकेत पुरे..!
हे प्रेम.. लग्न कशाशी खातात हे तरी कळतं का रे तूला..?

मघाचं बोलणं कुणी ऐकले असते तर चार लोकात काय नाव राहिलं असतं माझं..??"


त्यांना आता चीड येऊ लागली होती.


" असं काय चुकीचं केलं काका मी..?? सुमीला लग्नाबद्दलचं तर विचारत होतो..
आणि सुमीचंही प्रेम आहेच की माझ्यावर. "

तो म्हणाला.


" हो बाबा.. मला आवडतो अनी.. "

-ती.


" सुमा.. मला आता तुझ्याशी या विषयावर बोलायचं नाही आहे.
ताई तिकडे स्टेजवर एकटी उभी आहे.. तिच्याजवळ जा.. "


त्यांच्या आवाजात एक जरब होती.


ती गुमान मान खाली घालून स्टेजवर मालतीताईच्या बाजूला उभी राहिली.

मालतीने नजरेनंच काय झालं म्हणून विचारलं.

तिनं ओठावर हसू आणून काही नाही अशी नकारार्थी मान हलवली.

.
.


" काका.. विषय निघालाच आहे तर मला आत्ताच बोलायचंय तुमच्याशी.

का नकार देताय तुम्ही मला..?
अहो डॉक्टर होतोय मी..! सुमीला दुःखाची झळदेखील पोहचू देणार नाही एवढा विश्वास आहे स्वतःवर ..

तुम्हीच सांगा.. काय कमी आहे माझ्यात..? "

त्याच्या बोलण्यात एक स्पष्टता होती... आणि डोळ्यात पारदर्शकता..!


" अनिकेत.. तू हुशार आहेस.
कर्तबगार आहेस..

कदाचित नसेलही तुझ्यात काही कमी.
पण ह्या समाजाचं काय करू..??

आपली जात वेगवेगळी आहे..

नाकासमोर चालणारी मध्यमवर्गीय लोकं रे आम्ही..!
घरात खायला नसेल काही तरी चालेल एक वेळ.. पण समाजात झालेली नाचक्की नाही सहन होणार मला.. "


ते त्याच्या डोळ्यात बघत म्हणाले.


" काका.. समाजाचं काय घेऊन बसता..? सुमीच्या सुखाचा विचार करा ना.
चार वर्षांपासून प्रेमात आहोत आम्ही..! पण कधीही चुकीचं नाही वागलो..

नका तोडू आम्हाला असं..
तिला नाही सहन होणार हे.. ती कोमेजून जाईल हो. "


त्याचा आवाज रडवेला झाला होता.


" बाप आहे मी तिचा..!
तिचं बरंवाईट कळतं मला.
तू फक्त एक कर… तिच्या आयुष्यातून निघून जा.. कायमचा. "

त्यांनी त्याच्यासमोर हात जोडले.


" काका.. अहो काय करताय तुम्ही..?

सुमीच्या आयुष्यातून जरी गेलो ना तरी तिच्या हृदयात मात्र मीच असेन.. कायम. "


त्यांचे हात पकडत तो म्हणाला.


" ते मला काही माहित नाही अनिकेत. पण तू नको थांबू आता इथे..
एका पोरीचं लग्न लागतंय.. ते तरी सुखाने होऊ दे.. "


ते त्याच्या हातातून हात सोडवत स्टेजकडे वळले…

आणि..

अनिकेत माघारी....


.

.

.

.


क्रमश :


             ************************


... पुढे काय..??

कळण्यासाठी वाचत राहा..

पारिजात... गंध प्रेमाचा..!


आणि आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा..

🎭 Series Post

View all