पारिजात... गंध प्रेमाचा...! भाग - 10.

सुमी आणि अनीची भन्नाट लव्हस्टोरी...!

आपण वाचत आहात... 

एक भन्नाट प्रेमकथा... गंधाळलेल्या प्रेमाची...! पारिजातकाच्या सुगंधासारखी...!!

.

.

आज वाचा...

 नुकत्याच सुरु झालेल्या सुमी आणि अनीच्या प्रेमाचा पुढचा भाग....


             ***********************



... थोड्यावेळाने तिची त्यांच्याशी नजरानजर झाली तशी आपसूकच तिचे ओठ रुंदावले..


तिच्या गालावर पडलेली छोटीशी खळी  त्यांचं लक्ष वेधून घेत होती..


 "  एवढया वर्षांत कित्येक स्टुडंट्स घडवले... पण ही मुलगी काहीशी वेगळी भासते...

काहीशी आपली वाटतेय..!


का वाटतेय असं...?? "


ते मनात स्वतःशीच विचारत होते...
.
.
.
.
.


... रावीचा फोन डिस्कनेक्ट झाला.. नी सुमतीनं डोक्यावर हात मारला.


" काय येडं खूळ आहे माझी लेक..!  


काय तर म्हणे माझ्या लाडवाच्या गोडव्यात विरघळले तिचे सर...! "


तिला हसायला आलं.


पाणी पिता पिता तिचं लक्ष भिंतीवरच्या कॅलेंडर कडे गेलं...


आणि ओठाला लावलेला ग्लास तसाच ठेऊन डोळे फाडून बघत राहिली..


" ओ माय गॉड...!


आज तर अनीचा वाढदिवस...!!


कसं ध्यानात नाही आलं माझ्या..??


वेड्या..!  म्हणून कालपासून सारखा मनात डोकावतोस होय..??


हॅपी बर्थडे अनी..! हा तूझ्या आवडत्या लाडवाचा तुकडा मीच खाणार... दरवर्षिप्रमाणे...! "


तिनं तो तुकडा तोंडात टाकला.


" अनी... ही माझ्या हातची चव..  अजूनही आठवत असेल का रे तुला..?? "


तिनं मनातच त्याला प्रश्न केला.


" तुला नसेल कदाचित आठवत काही... पण माझ्या अजूनही लक्षात आहेत आपल्या सर्व आठवणी...!अगदी तुझं ते पहिलं पत्रसुद्धा...!! "


परत ती हरवली...

त्यानं लिहिलेल्या पहिल्या वहिल्या पत्राच्या दुनियेत...!


.
.
.
.
.
.


.... भर उन्हात गच्चीवर जाऊन तिनं ते पाकीट उघडलं होतं...! त्यानं ठेवलेल्या पारिजातकाचा सुगंध तिनं हुंगला...!!

आणि ती चिट्ठी उघडणार तोच कुणीतरी ती हिसकावून घेतली....

.

.



ती...

मालती ताई होती .... !


" ये तायडे s...! प्लिज दे ना गं माझी चिट्ठी.. "
ती रडकुंडीला आली.


" थांब जरा..! मला तर पहिले वाचू दे काय लिहिलंय..! "
मालती हात उंचावत म्हणाली..


" प्रिय सुमी...!


प्रिय लिहू की नको.. कळत नाहीये. तरी लिहिलंय. कारण... मला वाटतंय की.. तू मला आवडतेस..! म्हणून, प्रिय..!


तर प्रिय सुमी... "


मालती मोठ्यानं वाचत होती..


सुमीच्या मनात मात्र आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या...


" हां...??  आवडते मी याला..?? आणि कधी बोलला नाही ते..
पत्रात मात्र एकदम षटकार ठोकलाय..."


ती स्वतःलाच म्हणाली.


" ताई.. प्लीज दे ना...! "
ती काकूळतीला आली.


" नाही , नाही.  मला जरा इंटरेस्ट वाटू लागलाय वाचण्यात..! पुढे वाचू दे.. "


ताई म्हणाली.


"... तर  प्रिय सुमी..!
खरंच आवडतेस तू मला. जेव्हा फुलं घेऊन येतांना पहिल्यांदा धडकलीस तेव्हा राग आला होता तुझा..

पण तेव्हाही तुझा तो वेंधळेपणा आवडला मला.


तूझ्या गालावर पडणारी नाजूक खळी मला आवडते.


तूझ्या हनुवटीवरचा तीळ मला आवडतो. आणि जेव्हा नाकाचा शेंडा उडवतेस ना...
तेव्हा नकटु.. ते ही मला आवडतं..! "


ताईनं वाचता वाचता कागद बाजूला केला...


" ओय.. होय..!

ही गालावरची खळी..!  हा हनुवटीवरचा तीळ..!   हे नकटं नाक..!
कुणालातरी आवडतं वाटतं..?? "


तिचा नाक खेचत मालती म्हणाली.


"ताई ss ! "


उन्हानं ( की लाजेनं..? ) तिचा चेहरा लाल झाला होता.


" घे बाई..! असं कुणाचं प्रेमपत्र वाचू नये म्हणतात..! तूच वाच आता..! "


तिनं तो कागद सुमीच्या हातात ठेवला.

सुमी वाचू लागली...

"... तुझ्यासोबत केलेल्या मस्त्या..  तुझ्यासोबतची भांडणं... तुझ्यासोबत ओढ्याकाठी घालवलेली ती संध्याकाळ...  आणि...
तुझ्यासोबत कालचा अनुभवलेला सूर्योदय...
सुमी..

तूझ्या सहवासातला प्रत्येक क्षण मला आवडलाय.
सुमी..
असं वाटायला लागलंय की मी तूझ्या प्रेमात पडलोय.


तुलाही मी आवडतो ना गं..??

काल विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलेस तू..

पण तरीही मी जाणार म्हणून तूझ्या डोळ्यात आलेलं पाणी खूप काही सांगून गेलंय मला...


कदाचित सुमी हे आपल्याला वाटणारे केवळ आकर्षण असू शकते...!

कदाचित खरे प्रेमही...!!


मी  जातोय आज... ! विरहात प्रेम जास्तच वाढतं म्हणतात..

पुढल्या महिन्यात रिजल्ट आहे माझा..


जर ह्या एक महिन्यात आपल्यातील ओढ कायम राहिली किंवा वाढली तर माझा रिजल्ट सांगायला मी स्वतः येईल..


नकटु... तोपर्यंत वाट पहा माझी ...!!


तूझ्या आठवणीत ...
      - अनी.  "


किमान पाच सहा वेळा तिचं वाचून झालं असेल तोच ताईनं पुन्हा तो कागद हिसकावला..


" झालं असेल ना पाठ...??  दे ते आता इकडे..! "


" ताई ss.. "


- ती.


"... आणि काय गं कधीपासून सुरु आहे हे सगळं..?? "


काहीशा रागीट सुरात मालती म्हणाली.


" माहिती नाही...! पण ताई , अनी आवडतो मला...! "
खाली बघत ती म्हणाली.


" फक्त आवडतोच  की..??"


"... प्रेमात पडलोय  बहुधा आम्ही एकमेकांच्या...! "


- सुमी.


तशी मालती खळाळून  हसायला लागली.


ती बावरून तिच्याकडे बघायला लागली.


" सुमा...

अगं केवळ सोळा वर्षांची आहेस तू..!


प्रेम नाही आकर्षण म्हणतात याला..!! "

तिच्या केसांना विस्कटत ती म्हणाली.


" काही असू दे.. पण ते पत्र दे मला.. "
- सुमी.


" अहं..! इतक्यात कसं देऊ..?? "


पत्रावरून एक नजर फिरवत ती म्हणाली.


"... बाकी भारी लिहिलंय हां..


तुझ्याच आठवणीत - अनी.. "


ती हसत म्हणाली.


" ताई... "


काकूळतीला आलेली सुमी.

.

.


"... लिखे जो खत तुझे..
जो तेरी याद मे ... "

ती तिला चिडवत  गाणं म्हणायला लागली .

" ताई.. दे ना गं..?? "

  - सुमी.

" एवढया सहज कसं देऊ...  सुमी... ??

फुलं देखील आहेत वाटतं पाकिटात.. "

एक सुगंध घेऊन ती म्हणाली.

"... फुल तुम्हे भेजा हैं खत में..
फुल नहीं मेरा दिल हैं..! "

दुसरं गाणं..

तिचं आपलं सुरूच होतं.

" ताई... काय करू म्हणजे मला परत देशील..?? "

सुमीनं तिच्याकडे रोखून बघत विचारलं.


" हं.. आता कशी लाईनवर आलीस..??


चल खाली...! तूझ्यामुळे माझा प्रोजेक्ट रेंगाळलाय...  तो पूर्ण करायला मदत कर..! "

तिच्या पाठीवर थाप देत ताई म्हणाली.


... दोघी निघाल्या...


पायऱ्या उतरता उतरता मालती थांबली.., तिच्या हातात ते पत्र ठेवत म्हणाली...


" सुमी...
अनी तसा चांगला मुलगा आहे..
आवडली हां मला तुझी चॉईस...! "


तिला डोळा मारत ती म्हणाली.


" पुरे हं ताई आता..! उगाच मस्का मारायची गरज नाहीये..! करणार आहे तुला मदत..!! "


लटक्या रागाने ती म्हणाली.


मालतीचं चिडवणं मनात कुठेतरी तिलाही आवडत होतं..


"  येवढया उन्हाचं काय सुरु आहे गं तुमचं वरती..?? "


आई ओरडली... तशा दोघी चपापल्या...


" अगं... जरा फेरफटका मारायला गेलो होतो... "


परिस्थिती सावरत मालती म्हणाली.


" इतक्या उन्हात...?? "


आईनं डोळे वटारून विचारलं..


" हो अगं..  व्हिटॅमिन डी शोधायला आलो  होतो..!"


- इति मालती.


आई त्यांच्याकडे  अजूनही डोळे मोठे करूनच बघत होती..


" अगं... प्रोजेक्टचा पार्ट आहे माझ्या... तुला नाही कळायचं...!"


आईचा गालगुच्चा घेत ती परत म्हणाली.


" मालू... उगाच गुंडाळू नकोस हं मला..! बाबांना सांगेन नाहीतर...! "
- आई.


" हो गं आई.. प्रोजेक्टचाच भाग आहे... तेच पूर्ण करायला आलो आम्ही..!  हा बघ हिचा पसारा...! "


पसारा बघून आईला पटलं थोडंसं... ती आपल्या कामाला लागली.


" सुमा... तू कधीपासून असं  गंडवायला शिकलीस..?? "
काहीशा अविश्वासानं मालतीनं विचारलं.


" देवळाच्या पायरीवरून तुमच्या घरी आल्यापासून...! "
तीही हसत उत्तरली.


दोघी एकमेकांना टाळी देऊन हसायला लागल्या....
.
.
.
.
.


"... सुमा...
खरंच अनिकेतवर प्रेम आहे तुझं...?? "

रात्री  कॉटवर पडल्या पडल्या मालती विचारत होती..


" हम्मं...! "


तिनं मान हलवली..


" सुमा... बाबांना कळलं तर त्यांना नाही आवडणार हे...! "
- मालती.


" ताई.. असं नको म्हणूस ना गं..
तूझ्या वर्गातला सुधीर... तुला पण आवडायचा ना तो..! "


- सुमी.


" हो..!

म्हणूनच तर अनुभवाचे बोल सांगतेय..  बाबांनी एकदा चांगलाच दम भरला मला. तेव्हापासून सुधीरशी तर मी बोलतदेखील नाही..! "


खिन्नशी हसत मालती उत्तरली.


" ताई.. घाबरवतेस तू मला..?? "
- सुमी.


" नाही गं सुमा, सावध करतेय..!


... पाण्यात पडलीच आहेस आता तर हातपाय मारायला शिक.. नाकातोंडांत पाणी जाऊ देऊ नकोस...! "


एक उसासा टाकत मालती म्हणाली.


" बाबा काही नाही बोलणार..! अनी आवडेल त्यांनाही... बघच तू..! "


ती विश्वासाने म्हणाली.


" अती विश्वास नडतो सुमा..! अनिकेत आवडेलही बाबांना.. पण त्याच्यावर असलेलं तुझं प्रेम नाही आवडणार...!

आपण मिडल क्लास लोकं...

हे प्रेम बीम नाही त्यांच्या पचनी पडायचं... "


तिच्या डोक्यावर हात फिरवत ती म्हणाली.


काही क्षण दोघीही शांत होत्या...


" ताई.. "


"हूं.. "


" एक विचारू...??


प्रेमालाही क्लास असतो का गं...?? "
.
.
मालती निरुत्तर झाली...


" सोड ना सुमा...

खरं तर प्रेम ही खूप सुंदर भावना असते... मनाला स्पर्शून गेलीच आहे तूझ्या ती... तर तुही अनुभवून  बघ...!! "


तिला थोपाटत ती मनात म्हणाली..


डोळ्याची कड उगीचच पाणावली तिच्या...!!
.
.
.
.
... म्हणता म्हणता महिन्याभराचा काळ लोटला...

ह्या काळात...

  अनी... मनात होताच तिच्या... सदैव..! अंगणातल्या पारिजातसारखा...!!


... आणि मग एके दिवशी बारावीचा निकाल लागला...


" दिवेकर काकूss...! "


आत येत सुमी म्हणाली.


" आज बारावीचा निकाल  ना..?? तुमच्या अनिकेतचा काही फोन वगैरे आला की नाही..?? "


ती अंदाज घेत म्हणाली.


" नाही गं..! अजून तरी नाही आलाय. मी करतेय त्यांच्या शेजारी.. पण कुणी उचलतच नाहीये..! "


काकू म्हणाल्या.


तिचा चेहरा पडला.


" का गं तुला काय झालंय...? "


त्यांनी विचारलं.


काही नाही म्हणत ती आजीशी गप्पा मारायला निघून गेली...
.
.
.
त्याचा निकाल लागून काही दिवस असेच गेले...


मध्ये तिचाही दहावीचा निकाल आला. चांगले ब्यांशी टक्के मिळाले तिला...

घरात आनंदीआनंद होता..! बाबा तर जाम खुश होते...!!


... नी मग एक दिवस तिला  दिवेकर काकूंकडून कळलं....
अनी एका विषयात नापास झाला होता...


"... नापास झाला..?? तो तर खूप हुशार होता ना ..?? "


- ती.


" हो गं..! निकालात काहीतरी घोळ झाला बहुतेक...!
- दिवेकर काकू.
.
.


तिच्या  आनंदावर  जणू विरजनच पडलं ...

" असा कसा हा फेल झाला...?? मारे तर माझ्यासमोर फुशारक्या मारत होता...?? "


तिला आश्चर्याचा झटकाच लागला...


" अशा नापास मुलावर मी प्रेम करते हे बाबांना कळलं तर...?? "
ती मनातून तुटली होती..


"  बावळट...!

तो नापास झाला.. म्हणून तुझं प्रेम तर कमी होत नाही नं..?? "


तिच्या डोक्यावर टपली मारत मालती म्हणाली.


" नाही गं ताई...!


पण बाबा...?? ते करतील मान्य..?? "


तिच्या डोळ्यात पाणी होतं...


" वेडू...! पाण्यात पडलीचस तर पोहायला शिक जरा...! तरच तरून जाशील...!! "


तिच्या गळ्यात हात गुंफुन मालती म्हणाली...


" ताई..
खरंच... किती छान समजावतेस...!!

तुला सांगू..??

असं वाटतं की...


प्रत्येकाला
एक तरी बहीण असावी... तुझ्यासारखी...!!


.....रागावणारी...!
..... खोड्या काढणारी...!
... प्रसंगी ओरडणारी...!
... कधीतरी खेचणारी..!


पण..


... चुकलं तर सावरणारी...!
... प्रेमानं समजवणारी...!
... मायेनं जपणारी...!


खरंच ताई...


प्रत्येकाला एक बहीण असावी...


 अगदी तुझ्याचसारखी...!!! "


तिला मिठी मारून सुमी म्हणाली...

.

.

.

.

. क्रमश :



      ********************************

काय मग आवडला का आजचा भाग...??

आणि सुमती - मालती चं नातं कसं वाटलं नक्की सांगा..

तुम्हालाही वाटते का..

प्रत्येकाला एक तरी बहीण असावी...??

आवडला आजचा पार्ट तर लाईक कमेंट आणि share जरूर करा...

🎭 Series Post

View all