पारिजात.. गंध प्रेमाचा..! भाग -25

डॉक्टर साठे आणि विराज.. आज उलगडणार त्यांच्या नात्यातील कोडे.


आपण वाचत आहात एक सुगंधित कथामालिका..
पारिजात.. गंध प्रेमाचा..!

( मागील भागात आपण पाहिलं डॉक्टर साठे हॉस्पिटलला नसतांना स्वतःच्या रिस्कवर रावीने एक अवघड केस हातात घेवून एका नवजात बाळाचे त्याच्या आईसोबत प्राण वाचवले.
डॉ. साठेंना हे कळल्यावर त्यांनी तिचं खुप कौतुक केलं. नी त्याबरोबर सांगितला एक अनुभव त्यांच्या आयुष्यातला..
आता पुढे. )

***********


" तू आज जे अनुभवलंस ना. मीदेखील ते अनुभवलंय.
... रॅदर आजच्यापेक्षा जास्तच भयंकर आणि वाईट अनुभव…
बाविस वर्षांपूर्वी..!
फरक एवढाच आजची पेशंट अनोळखी होती तुझ्यासाठी. ती पेशंट ओळखीची होती माझ्या …
रक्ताच्या नात्यातील..!

माझी सख्खी बहीण होती ती.


लग्नाच्या पहिल्या वर्षापासून नवऱ्याचा अत्याचार सहन केला तिनं.. पण माहेरच्यांना कधी काही कळू दिलं नाही. पहिल्या बाळानंतर थोडा सुधारेल असं वाटलं होतं तिला.. राहिलाही काही दिवस तो नीट. नंतर परत त्याचं त्रास देणं सुरु झालं. लग्नाच्या चार वर्षानंतरअसह्य झाल्यावर तिने मला सांगितले हे. घरी घेवून आलो मी तिला. विभक्त होण्याचा सल्ला दिला. पण तिचं प्रेम होतं नवऱ्यावर. शिवाय पदरात तीन वर्षाचं लेकरू..!


किती वेळा तिला म्हंटलं मी की मी सांभाळेन तिला.. तिच्या मुलाला. तिला हे मान्य नव्हतं. काय ती घराची इज्जत वगैरे मातीत मिसळेल असं म्हणायची.
काही दिवसांनी पुन्हा प्रेग्नेंट राहिली ती. त्यातच नवऱ्याचा बाहेरख्यालीपणा आणखीन वाढलेला.
ती आतून पूर्णतः खचून गेली होती. पोटात बाळ.. पाठीशी चार वर्षाचा मुलगा."

बोलता बोलता डॉ. साठे शांत झाले.


रावी काही नं बोलता ऐकत होती .


कधी कधी बोलणाऱ्याला काहीच नको असते. हवा असतो एक मूक श्रोता.. जो केवळ ऐकणाऱ्याच्या भूमिकेत असेल .. कोण चूक कोण बरोबर याचा निवाडा न करता.


" मी तेव्हाही बोललो.. डिवोर्स घेवून टाकायचा म्हणून. ताई नको म्हणाली. एवढं बाळंतपण होवून जावू दे.. पुढंच पुढे बघूया असं म्हणणं होतं तिचं. "

ते पुढे बोलत होते.

" तिचा मोठा मुलगा.. माझा भाचा.. गोबऱ्या गालांचा..! वडिलांच्या आठवणीत झुरायचा तो. माझ्याशी मात्र चांगली गट्टी जमली होती त्याची.मी घरी असलो की सारखा मामा मामा म्हणून मागे असायचा माझ्या. "

त्याच्याबद्दल बोलतांना साठे सरांचा आवाज परत हळवा झाला.

" छोटं बाळ येणार म्हणून खुप खुश होता तो.
ते छोटं बाळ…! अजूनपर्यंत या जगात आगमनही झाले नव्हते त्याचे तरी सर्व त्याच्याकडे डोळे लावून बसले होते. ताईला आशा होती हे बाळ आलं की सगळं ठीक होईल.

तिच्या तिसऱ्या महिन्यात placenta previa (बाळाची वळ खाली असणे) डायग्नोस झाले होते. त्याचा धोका काय असू शकतो सर्व सांगितलं होतं मी तिला.
तिचं म्हणणं एकच… तू डॉक्टर आहेस आणि माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. तू म्हणशील ते पथ्यपाणी करेल. पण माझ्या बाळाला ह्या जगात येऊ दे.
… त्या बाळाशी मी देखील जुळलो होतो… कळत नकळतपणे."

डोळ्यातील ओल रुमालाने टिपत ते म्हणाले.

" होणारा मामा.. केवळ या नात्याने नव्हे… "
आपलं बोलणं कंटिन्यूव्ह करत ते म्हणाले.


" सोनोग्राफी करतांना ताईच्या उदरात मुलगी वाढतेय हे कळलं होतं मला. त्यामुळे जास्त आनंदी होतो मी. वाटलं होतं त्या चिमुकलीचा जन्म झाल्यावर तिला आपण वाढवायचं.. ताईला तिच्या पायावर उभं करायला मदत करायची..! पण नियतीला कदाचित मान्य नव्हतं हे. घराचे वासे फिरायला लागले की अख्खे घर उलटे फिरते म्हणतात.. तसंच झालं होतं आमच्या आयुष्याचं. इतके दिवस ताईला जपल्यानंतरसुद्धा आठव्या महिन्याच्या शेवटाला तिला अचानक ब्लीडींग झालं. शी वाज लाईंग इन द पूल ऑफ ब्लड… हास्पिटलला येईपर्यंत खुप ब्लड लॉस झालं होतं.त्यात तिचा रेअर ब्लडग्रुप. ब्लड अरेंज करण्यात बराच वेळ गेला.
ओटीत टेबलवर असलेल्या तिनं काही काळासाठी मृत्यूला थोपवून धरलं होतं..


जणू मला तिचे डोळे हेच सांगत होते.. माझं काही बरंवाईट झालं तरी चालेल पण बाळाला वाचव माझ्या. विश्वास होता तिचा माझ्यावर. कदाचित काकणभर जास्तच…
त्या विश्वासाला पात्र नाही ठरू शकलो मी. सिजेरियन करून बाळाला बाहेरच्या जगात तर आणलं पण हैपोक्सिया मुळे ती नाही वाचू शकली. आणि ताई…? पुढल्या अर्ध्या तासात तीही आम्हाला सोडून गेली. टेबलवर गतप्राण झालेली माझी ताई.. हातात निष्प्राण असलेली ती छोटी परी..! काय अवस्था झाली असेल त्या क्षणी माझी..?
कितीतरी अवघडलेल्या आयांना सोडवणारा हा डॉक्टर साठे हरला होता आपल्याच बहिणीपुढे…

पण माणूस म्हणून खरा हरलो ते माझ्या लहानग्या  भाच्याच्या डोळ्यात. त्या पाच वर्ष्याच्या कोवळ्या जिवाच्या डोक्यात मी कसा दोषी आहे. त्याच्या आईला आणि छोटया पिल्लूला कसं वाचवू शकलो नाही.. रादर माझ्यामुळेच त्या दोघीं त्याला सोडून गेल्याचं त्याच्या वडिलांनी ठासून भरवलं. बालमन ते. त्याला काय कळणार? पण हे मात्र नक्की मनाच्या खोल तळात पक्कं झालं होतं.. त्याचा गुन्हेगार मीच. आजही ती सल त्याच्या मनात आहे. गेली बाविस वर्षे अश्वथाम्याच्या मस्तकावरील भळभळणाऱ्या जखमेप्रमाणे मी ती मनाची जखम घेवून फिरतो आहे..! "
ते डोळे मिटून खुर्चीला टेकून बसले.
सरांचा बोललेला शब्द न शब्द तिच्या हृदयाला घरे पाडत होता. त्यांच्या बोलण्याचा तिचे मन काहीतरी अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होतं. कुठेतरी जुडतेय ही तार असं वाटत होतं पण मेळ काही बसेना.. आणि पुढल्याच क्षणात नजरेपुढे सर्व चित्र अगदी स्पष्ट झाल्यासारखे वाटले तिला.


"... विराज..?
सर.. तो विराज होता..?? "


ती चमकून म्हणाली.


हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असतांना आर्थ्रो डिपार्टमेंटला सरांच्या चकरा तिला आठवल्या..
विराज आणि ती होटल लोट्स मध्ये भेटलेले…
तेव्हाही सर होतेच तिथे.
विराज सोबत असतांना दरवेळी सरांच्या डोळ्यात जाणवणारा प्रेमाचा ओलावा...आणि त्याच वेळी विराजच्या नजरेतील रुक्षपणा..!


तिला जाणवलं होतं प्रत्येकवेळी… काहीतरी आहे यांच्यात… नक्कीच. पण ते काहीतरी म्हणजे काय याचा आज अर्थ लागत होता.
" तुमचा भाचा म्हणजे विराजच ना..? "
तिनं पुन्हा विचारलं.

" हम्म..! विराजच होता तो. माझा वीर. खुप दूर गेलाय गं माझ्यापासून तो.. एकाच घरात राहणारे दोन ध्रुवं झालो आहोत आम्ही. लहानपणी माझ्या मागे मागे असणारा वीर मला आता आरोपीच्या पिंजऱ्यात पाहतोय. आमच्यातलं नातं केव्हाचच संपलय. "

ते डोळे पुसत म्हणाले.

" तूला कसं कळलं तो वीर होता ते..? तो बोलला तूला काही ह्याबद्दल..?"

डॉ.साठे
.

" हो.. म्हणजे पंधरा दिवसांपूर्वी भेटलो होतो तेव्हा त्यानं सांगितलं मला.. पण ज्याचा तो एवढा रागराग करतो ती व्यक्ती तुम्ही आहात हे नव्हतं सांगितलेलं.
सर.. किती कॉम्प्लिकेटेड होवून बसलंय सगळं. त्याच्याशी बोलायला हवं आपल्याला. हे जे मिसअंडरस्टँडिंग झालेय ते सॉर्ट आऊट करायला हवे."

ती बोलत होती.


" मिसअंडरस्टँडिंग..? गैरसमज..!"

ते हसले खिन्न.

" बावीस वर्षांपासून त्याच्या मनात हा पक्का समज होऊन बसलाय.. आता नाही बदलायचा..
मनाची जखम ठणकेल आयुष्यभर तरी चालेल मला. पण तो सोबत हवाय माझ्या…
मनाने केव्हाच दूर गेलाय तो.. आता शरीरानेही जातोय. अमेरिकेत वसण्याचा विचार आहे त्याचा.
ही इज द ओन्ली रिजन.. फॉर हुम आय एम लिविंग..! तो नसेल इथे तर शून्य आहे मी. "

एक हुंदका बाहेर पडला त्यांच्या मुखातून.

काय करावं तिला सुचेना..

तरीही त्यांच्या खांद्यावर हात ठेवला तिने.


" सॉरी डॉक्टर..! परत हळवा झालो मी. "
डोळ्यातलं पाणी पुसत ते म्हणाले.

" पुरुष जातीने हळवे होवू नये, त्यांनी रडू नये… असा शिरस्ता नाहीये सर. आणि कधीतरी रडणे चांगले असते."

ती म्हणाली.


" हम्म खरं आहे तुझं. पुरुषांनी रडू नये असं नसलं तरी एक पुरुषी अहंकार आडवा येतो… प्रत्येकच पुरुषाला.
एक सांगू रावी.. इतक्या वर्षांत पहिल्यांदा हे शेअर करतोय मी कुणाजवळ तरी. तू आपली जवळची अशी वाटतेस मला. कधी वाटतं खुप ओळखीची आहेस माझ्या. फार पूर्वीच भेटलोय आपण. "

तिच्याकडे बघत ते म्हणाले.

तिनं आश्चर्याने पाहिलं..

" हे सगळं तर मला वाटते यांच्याशी बोलल्या , भेटल्यानंतर..! माझ्या मनातलंच बोलताहेत की काय हे..? "


" का असं वाटतं माहितीये तूला…?? "

त्यांनी विचारलं.

" का..? "

तिलाही जाणून घ्यायची इच्छा होतं होती आता.

"... कारण तुझं नाव!"

" नावामुळे ह्यांना मी आपलीशी वाटते? "
ती मनात.

" खुप वर्षांपूर्वी मी ठरवलं होतं.. माझ्या मुलीचं नाव रावी ठेवायचे. ते नाही झाले शक्य.
नंतर जेव्हा ताईच्या गर्भातलं बाळ मुलगी आहे हे कळलं तेव्हाच ठरवलं.. आता हिच माझी रावी. हिला सांभाळायचं आपण.. डॉक्टर बनवायचे.
पण नव्हतं ते माझ्या नशिबामध्ये.
आणि त्यानंतर तब्ब्ल बावीस वर्षांनी तू आलीस माझ्या आयुष्यात..
डॉक्टर रावी! थोडीशी वेंधळी.. हुशार.. कॉन्फिडन्ट.
वाटलं माझी लेक असती तर कदाचित तुझ्यासारखीचं असती.."
ते बोलत होते.

ती सगळं ऐकत होती.. कानाची दारं उघडे ठेवून. त्यांचा शब्द न शब्द कानातून थेट हृदयात जावून सामावत होता.
तिच्या मनात त्यांच्याबद्दल एक fatherly figure निर्माण झाली होती आणि ते सुद्धा तिच्यात आपली मुलगी शोधत होते..
" दोन व्यक्तींच्या भावना एवढया सेम टू सेम कशा असू शकतात..? "

तिचा प्रश्न निरुत्तर होता.

" कुठे हरवलीस ? "

तिच्यापुढं त्यांनी चुटकी वाजवली.

" सर.. तुम्ही लग्न केलंच नाही का..?? "

तिनं अनपेक्षित प्रश्न विचारला.

त्या तिच्या प्रश्नानं चेहऱ्यावरचे भाव बदलले त्यांचे.


" नाही.
का नाही केलं ? हे प्लीज नको विचारू. त्याचं उत्तर या क्षणी नाही देवू शकणार मी."


ते उठून बाहेर गेले..

आत्तापर्यंत गोड गऱ्यांसारखे मधाळ असलेले सर एकदम काटेरी फणस कसे काय बनले..? तिला अंदाज येईना.
ती तिथेच बसली डोळे मिटून..
ड्युटीवर आल्यापासूनच्या सर्व घटना ती आठवू लागली… उलट्या क्रमाने.

आत्ता अचानक बाहेर गेलेले साठे सर , काही वेळापूर्वी त्यांना तिच्याबद्दल वाटणारी आपुलकी, तिच्यापुढे उलगडलेलं विराजचं सत्य... त्यांच्या हातातील ते निष्प्राण बाळ.. त्यांची बहीण..
आणि शेवटी आठवला आजचा तिचा ओटीतील प्रसंग..
त्या पेशन्टचा चेहरा डोळ्यासमोर आल्याबरोबर तिनं मिटलेले डोळे उघडले. मागच्या तीन तासांपासून तिचं आयुष्यात वेगळंच काही घडत होतं…
पेशंटला भेटायला म्हणून ती केबिनबाहेर पडली.
..रक्त चढवलं होतं तिला. आणि ती झोपली होती. अर्ध्या अर्ध्या तासाने नर्स सगळं मॉनिट करत होती.

" मॅडम.. तुमच्यामुळेच वाचली आमची लेक. तुमचे आभार कसं मानू?"
पेशन्टची आई डोळ्यात पाणी आणून बोलत होती.

हातात बाळ घेवून ती त्याला चमच्याने दुध पाजत होती.

" मॅडम.. या बाळाचं नाव तुम्हीच सुचवा.. तुमची आठवण आयुष्यभर राहील आमच्या सोबतीला."

बाळाला तिच्या समोर धरत ती म्हणाली.

रावीनं त्या बाळाला पाहिलं आणि पुन्हा मनात साठे सरांची चिमणी रावी तिला आठवली..

" विराज.. "
तिच्या मुखातून एकदमच बाहेर पडलं.

" छान नाव सुचवलं मॅडम तुम्ही.. हेच नाव ठेवणार आम्ही. "
बाळाची आजी म्हणाली.

" विराज.. तूला भेटायला हवं… एनी हाऊ ! "
रावीच्या मनात चालू होतं…


.

.

.

.

क्रमश :


       ************************

शेवटी उलगडा झालाय डॉ. साठे आणि विराजच्या नात्याचा.

कसा वाटला हा भाग कमेंट करून नक्की सांगा.

पुढील भाग लवकरच...

🎭 Series Post

View all