Feb 23, 2024
प्रेम

पारिजात... गंध प्रेमाचा..! भाग -20

Read Later
पारिजात... गंध प्रेमाचा..! भाग -20

 


आपण वाचत आहात..  प्राजक्ताच्या हिंदोळ्यावर झुलणारी एक नाजूक प्रेमकथा…


पारिजात… गंध प्रेमाचा..!
( मागील भागात आपण वाचलीत रावीच्या जन्माची कहाणी…
आणि अनुभवली रावी सुमीच्या प्रेमळ नात्याची सुंदर वीण…
अचानक सुमीची झालेली दिवेकर काकूंशी भेट..

आता पुढे…)


************" काकू…
अनी आला होता कधी..??"


तिनं मनातला प्रश्न केला ." हो. तीन वर्षांपूर्वी एकदा आला होता.. लग्नाची पत्रिका घेऊन.. "

त्या बोलल्या.पुढचं ऐकायला सुमी थांबलीच नाही तिथे.

लग्नाची ती पत्रिका जिव्हारी लागली होती तिच्या…


भरल्या डोळ्यांनी ती तिथून निघून गेली….
" सुमा s..

सुमा ss.. "

दिवेकर काकूंचा आवाज तिच्यापर्यंत पोहचलाच नाही…!

.
.


आपली गाडी आडोशाला लावून ती आत गेली.

आत ताई आणि आई बोलत बसल्या होत्या आणि बाजूलाच चार वर्षांची रावी निजली होती.
कुणाकडेही न बघता ती तिच्या रूममध्ये गेली. स्वतःला बेडवर झोकून दिलं. तिच्या भावनांची वाट मोकळी होत होती…" सुमा…! "


पाचेक मिनिटांपासून बेडजवळ उभ्या असलेल्या मालतीनं डोक्यावर हात ठेवत हाक दिली.

तिनं वर पाहिलं..

ताईची नजर तिच्यावरच होती.


" काय झालं सुमा..? का रडतेस..?? "


ताई विचारत होती." काही नाही गं ताई..! "


ती डोळे पुसत उठून बसली." सुमा.. माझ्याशी गं कधीपासून खोटं बोलायला लागलीस..??
माझं लग्न झालं नी मी दुरावले ना गं तूला..? "


मालतीच्याही डोळ्यात पाणी आले." नाही गं तायडे.. तसं नव्हे..! "

आपली नजर खाली करत ती म्हणाली." मग कसं सुमा..? आधी किती छान होतं ना सगळं.

उंदरा मांजरासारखं भांडत राहायचो नेहमी. पण तरीही एकमेकांना आपणच लागायचो.
कधी कसली लपवाछपवी नव्हती. कसलं सीक्रेट नव्हतं..

आणि ह्या चार पाच वर्षांत साधं नीट बोलतही नाहीस गं माझ्याशी.

नेहमी म्हणायचीस ना मला तू की ताई तुझ्यासारखी बहीण सगळ्यांना असावी…!

आता गं का नकोशी झालेय..?

ती माझी सुमा कुठे गं हरवली..?? "तिच्या जवळ बसत ताई म्हणाली." ताई ss "


सुमीनं तिचा हात पकडला..

"...अनीचं लग्न झालंय गं. "" काही काय बोलतेस सुमा..? तो लग्न करणं शक्य नाही गं. "


-मालती." दिवेकर काकू भेटल्या होत्या मला आज..
त्याच बोलल्या.. "


ती स्फून्दत म्हणाली.काय बोलावं मालतीलाही काही सुचेना…


पण तिचं मन म्हणत होतं.. अनी असं वागणं शक्य नाही.

"... सुमा…

तूला काय हवंय आता..??

अनीशी लग्न करन्याला तर बाबांचा विरोध होता ना..??"

तिला कुरवाळत मालतीताई म्हणाली." मला काहीच कळेनासे झालेय गं..

तो तर म्हणाला होता ना आयुष्यभर वाट बघेल माझी…
मग त्याचं लग्न..?? "


हुंदका आवरत ती म्हणाली.


" मी त्याला नाही विसरू शकले गं ताई…

पण त्याच्या आठवणीत तुम्हा सगळ्यांशी देखील नातं बिघडलं गं माझं..

बाबा म्हणतात तसं खरंच स्वार्थी आहे का गं ताई मी..??

तो नाहीये तर तुम्ही सगळे आहात ना…
का मी स्वतःला अलिप्त करत आले तूमच्यापासून…?? "डोळ्यातून पाणी वाहतच होते.." पुरे ना सुमा आता…
किती रडशील..?

बाबा चुकीचे आहेत असं नव्हे गं. त्यांच्या ठिकाणी राहून विचार केला तर वाटतं त्यांचही असेल बरोबर.

ते ज्या परिस्थितीतुन आलेत ना तिथे त्यांनी हेच पाहिलं असेल.
त्यांच्या पिढीला त्यांची सामाजिक मूल्ये जास्ती महत्वाची वाटतात… तिथे भावना तेवढी मोलाची नसते गं..

माझंच बघ ना .. सुधीरवरचं माझं प्रेम खोटं नव्हतं...
पण ह्यांच्याशी लग्न करून सुखी आहेच की मी. "


ताई तिला समजावत होती.
"... तू आनंदी आहेस ताई ?"


-सुमी." सुख आलं दारात तर आनंदी राहायला शिकतो गं माणूस… "

ती खाली बघत म्हणाली.


" माऊ ss
तू केव्हा आली..?? "

झोपेतून उठलेली रावी सरळ तिच्या खोलीत धावत येत म्हणाली.

" अरे..! उठली का माझी गोडुली..??

मी तर मघाच आले. चला चला फ्रेश होऊया.. नी खायला काहीतरी करूया.."

सुमी तिला किचन मध्ये घेऊन जात म्हणाली…" रावी भेटली की सगळं विसरते ही मुलगी.. "


मालती मनात म्हणाली.


.
.
.
.


" बाबा.. आपल्या कुलदेवीला जावून यावं असं मनात होतं यांच्या .. "


मालती बाबांशी बोलत होती..


" अगं चांगलंय ना मग. या जावून. "

-बाबा." तसं नव्हे..
आपण सर्व मिळून जावूया असं म्हणताहेत ते.. "

-ती." अरे वा. चांगली कल्पना आहे.
आई आणि मी तर येऊच. सुमाचं तू बघून घे."

-बाबा.


" तुम्हीच बोला ना तिच्याशी."

मालती." मी लाख बोलेन गं..
पण तीही बोलायला हवी ना? "

ते म्हणाले." मी यायला तयार आहे बाबा.."सगळ्यांसाठी चहा घेऊन येत सुमी म्हणाली.ती स्वतःहून आज बाबांशी बोलली होती." आई बाबा.. मी खुप त्रास दिला ना तुम्हा सर्वांना.

प्लीज माफ करा मला. "

चहा देतांना बाबांकडे बघितलं तिनं.


"... म्हणजे लग्नाला तयार आहेस तू सुमा..??


-आई.तिनं ताईकडे पाहिलं.. नन्तर आई नी मग बाबा.


" बाबा.. मला लग्न नकोय हो आता.

आपण छान तिघे एकत्र राहुयात नं आणि रावीलाही घेऊ आपल्यात.

आपल्यातील वाद.. रागराग पुरे झालं आता..!

आता मला सगळ्यांशी मिळून राहायचं आहे… "


ती शांतपणे बोलत होती..बाबांना भरून आलं
त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला.


त्यांना वाटलं सांगावं की तूझ्या आयुष्याचा व्हिलन नाहीय मी..
आणि अशी लग्न नं करण्याची शिक्षा नको देऊ स्वतःला..


पण देवदर्शनाहुन परतल्यावर बोलूया म्हणून ते गप्प बसले…


" आत्ता पुन्हा ती चिडली तर..? "


त्यांच्या डोक्यात आलं.
इतक्या वर्षानंतर लेक बापाशी स्वतःहून बोलतेय हे बघून आई डोळे पुसत उठली…

तिनं देवाजवळ दिवा लावला…
.
.
.
.
.
.


" माते… माझ्या लोकांना असंच एकत्र बांधून ठेव..
पुन्हा दुसरं काही नको मला… "


आई मनात देवीला साकडं घालत होती.


… आज सकाळीच देवीला सर्व पोहचले होते…
तिथेच आई मंदिरातल्या देवीपाशी हात जोडून होती…


देवदर्शन झालं…

जेवणं आटोपली…

मग सगळी पर्यटनाला निघाली…
" काय गं नाटकू काय मागितलंस देवीला..?? "

मालती रावीची पापी घेत म्हणाली.." मी तर देवीला माऊ मागितली.. "

रावी म्हणाली." मी तर तुझीच आहे बच्चा..! "

हसून सुमी." हो.. तरीही तूच पाहिजे मला नेहमी..! "

तिच्याकडे धावत जात ती म्हणाली.तिला उचलून घेत सुमीनी तिची गोड पापी घेतली." ताई.. आता तूला लवकरच दुसऱ्या बाळाची तयारी करावी लागणार असं दिसतंय…
रावी तर फक्त माझीच आहे आता.."


सुमी हसून म्हणाली.नवऱ्याकडे बघून मालती लाजली.

.
." काय मागितलंत हो देवीला..
खुप प्रसन्न दिसत आहात..!"


आई बाबांना विचारत होती." खरं सांगू तूला..?? सुमी बोलायला लागली ना माझ्याशी तेव्हापासून खुप बरं वाटतंय गं.
आता ठरवलं मी.. परत गेल्यावर ना दिवेकर वहिनींना भेटायचं. आणि त्या अनिकेतनी लग्न नसेल केलं तर सुमासाठी त्याला मागणी घालायची... "


बाबा आईला सांगत होते." तुम्ही बोलताय हे..? "


आई आनंदून म्हणाली." हो गं..!
तू विचारलंस ना देवीला काय मागितलं म्हणून..??

हेच मागितलं मी. माझ्या सुमाचं सुख तिच्या ओंजळीत टाकीन म्हणून..

आणि खरं सांगू हे मागणं मागितलं नी अपराधीपणाचं शल्य कमी झालं गं मनातलं माझ्या..

हं.. पण तू मात्र सुमाला आत्ताच नको सांगू हे.."


ते म्हणाले." नाही हो.. तुमच्या विरोधात कधी गेलेय का मी.. "


आई डोळे पुसत म्हणाली.

आज तिच्या डोळयात आनंदाश्रू होते….


.
.
.
.
.
.

…. परतीचा प्रवास सुरु झाला होता…

आज सगळेच आनंदी होते.

मनासारखं झालेलं देवीचं दर्शन..
मनसोक्त फिरणं..

आणि मुख्य म्हणजे.. इतक्या दिवसांनी दुरावलेली मने पुन्हा एकदा जुळल्याचा आनंद…!

आज फक्त आनंदी आनंदच होता..…. तेवढ्यात सगळं होत्याच नव्हतं झालं…

ड्राइव्हरचं सुटलेलं नियंत्रण..

एका मोठया झाडाला झालेली गाडीची टक्कर…

आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेले ते सर्व…!
.
.
.… जाग आली तेव्हा रावी तिच्या कुशीत बसली होती हे तिला आठवलं.. नी आठवला तो भीषण अपघात…" रावीss.."
ती मोठ्याने किंचाळली.
" मॅडम… हळू..!
डोक्याला जखम आहे तुमच्या. "


तिच्या आवाजाने धावत आत येत नर्स म्हणाली." माझा बच्चा.. माझी रावी कुठे आहे सिस्टर?
आणि माझ्या घरचे सगळे..
ते कुठे आहेत..?? "


ती रडत विचारत होती." तुमची मुलगी अगदी सुरक्षित आहे. येईलच तुम्हाला भेटायला ती. "


-नर्स.


" माऊ ss "

तेवढ्यात ती आलीच.
" माऊ.. तूला किती मोठा बाऊ झालाय डोक्याला. कित्ती वेल झोपलीस तू? "तिच्या डोक्याला हात लावत रावी म्हणाली." तू ठिक आहेस ना बच्चा..?? "


तिला कवटाळत तिनं विचारलं.

" माऊ मला काई नाई झालं.
पण मम्मी , पप्पा, आजी आणि आबा कुते आहेत? "


ती चिमणी निरागसपणे विचारत होती.


आणि तिनं नर्सकडे पाहिलं.

जणू काही ती नर्सला तेच विचारत होती… कुठे आहेत सगळे?" त्यांच्यावर पण उपचार सुरु आहेत. बाकीचं डॉक्टर सांगतीलच तुम्हाला.. "


तिला सलाईन लावत नर्स उत्तरली.

.
.… दोन दिवसांनी तिच्यात बरीच सुधारणा झाली.

ती डॉक्टरांच्या केबिन मध्ये बसली होती." सॉरी बेटा.. पण जेव्हा सगळ्यांना इथे आणलं ना त्यापूर्वीच सगळ्यांची प्राणज्योत मालवली होती…"


एक मध्यमवयीन डॉक्टर तिला सांगत होते..


तिच्या कानावर तर विश्वासच बसेना.


"मला.. आम्हांला हॉस्पिटलमध्ये कोणी आणलं..? "

कसंबसं तिनं विचारलं.

" आमचाच स्टाफ एका मेडिकल कॅम्पवरून परतत असतांना हा ऍक्सीडेन्ट दिसला आम्हाला. तसंच ऍम्ब्युलन्स बोलावून तातडीने इथे घेऊन आलो. तुझ्या चिमुरडीला तर साधं खरचटलंही नव्हतं. तूझ्या कुशीत सेफ होती ती. आणि तू बेशुद्ध.

इतरांनी तर जागेवरच प्राण सोडलेले. केवळ तुझीच आस होती आम्हाला.

तब्बल अट्ठेचाळीस तासांनी तू शुद्धीवर आलीस नी आम्ही देवाला हात जोडले.

आमच्या एका नर्सने तुमच्या मुलीची जबाबदारी घेतली होती हे दिवस. "


ते सांगत होते." मी बघू शकते सर्वांना..? "
तिनं विचारलं.
.
.

डॉक्टर आणि नर्सच्या साहाय्याने ती आत गेली.


शवाघरात ठेवलेले मालतीच्या सासरच्यांचे नी तिच्या कुटुंबियांचे मृतदेह…

तिने पाहिलं एकवार सगळ्यांना नी मोठयाने हंबरडा फोडला...

.

.

.

.

क्रमश :                *****************************


पुढील भाग लवकरच...


तोवर हा भाग कसा वाटला नक्की कळवा.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//