Feb 27, 2024
प्रेम

पारिजात... गंध प्रेमाचा..! भाग - 18

Read Later
पारिजात... गंध प्रेमाचा..! भाग - 18


आपण वाचत आहात गंधाळलेल्या प्रेमाची एक सुगंधित कहाणी...
पारिजात… गंध प्रेमाचा..!


( मागील भागात आपण वाचलीत मालतीताईच्या लग्नाची गोष्ट..
आणि अनुभवली सुमी आणि अनीच्या विरहाची सुरुवात…

आता पुढे. )


                        *************
"... ते मला काही माहित नाही अनिकेत.

पण तू नको थांबू आता इथे..
एका पोरीचं लग्न लागतंय.. ते तरी सुखाने होऊ दे.. "


ते त्याच्या हातातून हात सोडवत स्टेजकडे वळले…

आणि..अनिकेत माघारी…


.
.
.
.

… तो मंडपातून बाहेर पडला.. कोणाच्या लक्षातही आलं नाही.

स्टेजवरून सुमीची नजर मात्र त्याला शोधत होती..

कितीतरी वेळ.अनिकेत घराजवळ पोहचला. अंगणातला पारिजात वाऱ्याने हलकेच डोलत होता.

तो तिथेच थबकला थोडासा…

हा तोच पारिजात…!

ज्याच्या फुलांमुळे त्याच्या प्रीतीची सुरुवात झाली होती.

हा तोच पारिजात..!

ज्याच्या फुलांची त्यानं तिच्यावर उधळण केली होती.

हा तोच पारिजात…!

त्यांच्या प्रेमाचा पहिलावहिला साक्षीदार.


त्याच्या काळ्याभोर डोळ्यात आभाळ दाटलं...

तो आत गेला..
नी इतकंवेळ डोळ्यात साचलेलं आभाळ त्यानं मोकळं होऊ दिलं .

त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच तो रडला असेल इतका ओक्साबोक्शी.

त्यानं आपल्या सामानाची आवराआवर केली. जायला निघणार तोच आतून खोकण्याचा आवाज आला.


" आजी.. काय गं पाणी हवंय का..? "

तो आत असलेल्या दिवेकर आजीकडे गेला.


" अनिकेत..! तू या वेळेला घरी?
लग्नाला नाही का गेलास..?"


आजीनं विचारलं.

" अगं हे काय आलोय आत्ताच.
उदया पेपर आहे एक, नी ते अगदी शेवटच्या क्षणाला आठवलं बघ.
म्हणून निघतोय तडकाफडकी. "


तो भराभर बोलत होता." अनिकेत..? काही बिनसलं का कोणाशी? रडलास का तू? चेहरा किती पडल्यासारखा दिसतोय. "

आजी त्याच्याकडे निरखून पाहत म्हणाली.


" किती गं प्रश्न आजी..? "


तो किंचित हसून म्हणाला.


निघताना वळून परत तिच्याजवळ आला.


" आजी एक काम करशील..?? "


तिनं त्याच्याकडे काय म्हणून पाहिले.


" ही चिट्ठी सुमीला देशील..?

तूला भेटायला येईल ना ती तेव्हा दे. आणि तूच दे…

तिला किंवा मालतीताईला.

निघतो मी आता..! "


तिच्या उत्तराची वाट नं पाहता तो निघाला.


" निघतो नाही रे.. येतो म्हणावं. "

आजीचे शब्द हवेतच विरले.

.
.
.

" अनी ss"

दिवेकर काकू आवाज देत आत आल्या.


" आई.. अहो अनी आला का घरी? लग्नमंडपातही दिसला नाही..! "


आत येत त्यांनी आजीला गाठलं.


" अगं हो. त्याचा पेपर होता म्हणे एक म्हणून निघून गेला तडकाफडकी. "


आजीनं सांगितलं." कमाल आहे!

असा अचानक न कळवता कसा निघून जातो हा मुलगा..?? "


त्या बडबडतच आपलं आवरायल्या गेल्या.

.
.
.
.

"... बाबा मला बोलायचंय तुमच्याशी.. "

सुमी आत येत म्हणाली.


" सुमा थकलोय मी आता..
आपण नंतर बोलूया का? "

-बाबा.


" बाबा.. माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे.. "

ती काकूळतीला येऊन म्हणाली.


" सुमा एवढी कशी गं स्वार्थी तू..??
मालती चं आज लग्न झालंय आणि तूला तुझंचं सुचतंय ?

तूझ्या आयुष्याचा विचार करायला मी समर्थ आहे अजून.

घरातील पाहुणे जावू दे..! मग बोलूया आपण.

उगाच लोकांसमोर तमाशा नकोय मला कसलाच. "

तो विषय तेव्हा तिथेच थांबला." मी स्वार्थी..??

प्रेम केलं म्हणून माणूस स्वार्थी होतो का..?? "

ती एकटीच बिछान्यावर पडल्या पडल्या विचार करीत होती."... तायडे.. हवी होतीस यार तू आत्ता.
खरंच तू म्हणायचीस तसं नाकातोंडांत पाणी गेलंय गं माझ्या..
आणि बाहेरही पडता येत नाहीये आता. "


ताईच्या आठवणींनी डोळ्यातलं पाणी गालापर्यंत आले…
तिही त्यांना थोपवू शकली नाही.
मांडव परतवणीला मालतीताई माहेरी आली. झालेल्या प्रकाराची तिला काहीच माहिती नव्हती.


आजीला भेटायचं म्हणून ती दिवेकर काकूंकडे गेली.


" मालती.. तेज आलंय हं लग्नाचं चेहऱ्यावर!

अशीच आनंदी रहा नेहमी.. "

मालतीच्या चेहऱ्यावरून हात फिरवून आजी म्हणाली.

आशीर्वाद म्हणून तिच्या हातात शंभर ची नोट ठेवली.


" आजी..! इतके? "

-मालती." असू दे गं. नातीसारखी आहेस माझ्या. "

आजी म्हणाली.


ती जायला वळली.. तसं आजीनं आवाज दिला..

" मालती… "

सुमा बरी आहे ना गं..?

तूझ्या लग्नापासून इकडे आली नाही एकदाही. "
" अगं घरी पाहुणे होते ना म्हणून नसेल आली. "

ती उत्तरली." मालती.. अनिकेतने जाताना ही चिट्ठी दिलीय सुमासाठी .
तिच्यापर्यंत पोहचवशील? "

-आजी.


तिनं आश्चर्याने आजीकडे पाहिलं आणि मग ती चिट्ठी घेऊन निघून गेली.


.
.
." प्रिय सुमी…

मी जातोय तूझ्या आयुष्यातून कायमचा…

पण तू माझ्या हृदयात असशील नेहमीच.

तुझे बाबा चुकीचे आहेत असं नाही म्हणणार मी.


कदाचित ती वेळ चुकीची असेल..
जेव्हा मी तूला लग्नाबद्दल विचारलं.

पुढे कधीही तूला.. तूझ्या घरच्यांना वाटेल मी योग्य आहे तुझ्यासाठी..

.. तेव्हा येशील तू माझ्याकडे..??

मी वाट पाहील तुझी.. आजन्म.

अगदी शेवटच्या श्वासापर्यंत..! "

          केवळ तुझाच.
             अनी.… मालती ती चिट्ठी वाचत होती.

आई, बाबा, दिवेकर काकू..
आणि कोपऱ्यात सुमी बसली होती.

रडून रडून तिचे डोळे सुजले होते..


" बघितलंत वहिनी तुमच्या अनिकेतचे प्रताप..?? "


रागाने ती चिट्ठी बाबांनी फाडून टाकली.


" बाबाs "

सुमी ढसाढसा रडायला लागली.
आपलं हृदय छिन्नविच्छिन्न झाल्यासारखं वाटलं तिला.


दिवेकर काकू अपराध्यासारखी मान खाली घालून होत्या.
आणि आई..? काय चालतंय तेच तिला कळत नव्हतं." बाबा.. माझं प्रेम आहे अनीवर. मी नाही राहू शकणार त्याच्याशिवाय. "


ती हुमसून हुमसून रडत होती.


" आपलंच नाणं खोटं असल्यावर दुसऱ्याला तरी काय म्हणणार..? "


बाबा आईकडे बघत म्हणाले.


" बाबा.. अनिकेत चांगला मुलगा आहे हो. आपल्या सुमाला सांभाळेल नीट तो. "

मोठया हिमतीने मालती म्हणाली." म्हणजे मालू तूला ठाऊक होतं हे सगळं..?
तिला समजवायचं सोडून तूच तिला खतपाणी घालत होतीस..? "

बाबांनी आपला मोर्चा मालतीकडे वळवला.


" बाबा.. सुमा म्हणजे मी नव्हे.
मला सुधीर आवडायचा. तुम्ही नकार दिलात नी अनंतरावांशी लग्न लावून दिलंत.
मी गप्प बसले. पण सुमाशी नका हो असं वागू..
तिला तरी जगू द्या तिच्या मनानं. "


डोळे पुसत मालती म्हणाली." लग्नाला दोन दिवस होत नाहीत तोच खूप मोठी झाल्यासारखी बोलायला लागलीस गं.

लग्न म्हणजे पोरखेळ नव्हे मालती.
एक संस्कार आहे तो.

दोन कुटुंब जोडली जातात ह्या संस्काराने .

लग्न हे आपल्या जातीकुळातच व्हायला पाहिजे. आपल्या समाजाच्या चालीरिती आपणच पाळल्या पाहिजेत..

कळलं ? "

ते मालतीला ठणकावत म्हणाले." आणि सुमा.. ध्यानात घे. अनिकेत चा विषय नको मला पुन्हा या घरात."" पण बाबा मला हवाय अनी.. "

तिही हट्टाला पेटली.


" तू वचन दे मला. ह्यापुढे अनिकेतला भेटणार नाहीस तू. माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत… "

त्यांनी हात पुढे केला.

ती गोंधळली.


" दे वचन! "

ते पुन्हा म्हणाले.


" दिलं वचन..

नाही भेटणार यापुढे अनीला मी.


पण तुम्हीही लक्षात घ्या बाबा..


अनी नाही तर कुणीच नाही.

ह्या घरात माझ्या लग्नाचा विषयही चालणार नाही मला."

तिही त्यांना ठणकावत आत निघून गेली." बाबा अहो असं काय करताय..? लहान आहे ती. "


मालती म्हणाली." लहान आहे म्हणूनच ती तुझी जबाबदारी होती मालू. पण तूच तिला पाठीशी घातलंस.
आता इथेच संपला हा विषय."


त्यांनी आपली पाठ फिरवली." सुमाच्या आई.. क्षमा करा मला. आमच्या अनीमुळे घडतंय हे सारं..! "

दिवेकर काकू हात जोडून उभ्या होत्या." अहो वाहिनी तुम्ही का हात जोडताय..?
अनिकेत चुकला असेल तर सुमाही चुकलीच की.
आपल्या लेकरांच्या चुका आपणच पदरात घेणार ना?"


त्यांचे हात हातात घेत आई म्हणाली.

काही न बोलता दिवेकर काकू घरी निघून गेल्या.

.
.
.
.


… त्या दिवसापासून सुमी गप्प झाली.. एकटी एकटी राहू लागली.

मालती घरी होती तेव्हा दोघींच्या चिवचीवाटाने घर गजबजून जायचं. तिही आता सोबतीला नव्हती.

सुमीच्या गप्प गप्प राहण्याने घर भकास दिसू लागलं.

बाबा तर दिवसभर बाहेर असायचे.. आई मात्र बिचारी टीपं गाळत बसायची.

आपला अभ्यास आणि कॉलेज याव्यतिरिक्त सुमा काहीच करत नसे.

तिचा तो आवडणारा पारिजात…

त्याच्याकडे बघणही ती हल्ली टाळू लागली.

हळूहळू नैराश्याच्या गर्तेत सुमाचं पदार्पण होत होतं..

.
.

एक दिवस बाबांनी निर्णय घेतला.. ते घर सोडण्याचा.
तिचा त्रास त्यांनाही बघवत नव्हता.

वाटलं.. जागा बदलेल तर त्या आठवणीही कमी होतील हळूहळू..

तिच्या नकाराचा प्रश्नच नव्हता. एखाद्या कठपुतळीप्रमाणे तिही जायला तयार झाली..

जाताना मात्र पाय थबकले तिचे..


ती दिवेकर काकूंच्या घरी गेली…
.. ताईच्या लग्नानंतर..पहिल्यांदा.दिवेकर काकूंच्या दारात पाय ठेवला.. आणि तिला तिथेच पहिल्यांदा धडकणारा अनी आठवला.


मनाला आवर घालत तिने काकूंचा आशीर्वाद घेतला.


आत जावून आजीला मिठी मारली तिने. ह्यावेळी मात्र स्वतःला सांभाळू नाही शकली ती.


ही तिच जागा होती.. जिथे दोघांनी एकमेकांच्या हातात हात घेतला होता.. मैत्रीचा." आजी निघते मी.. "

ती म्हणाली.
" निघते नाही गं सुमा.. येते म्हणावं. "

कापऱ्या आवाजात आजी म्हणाली."आजी.. आता नाही गं परत येणार मी."

जाता जाता ती बोलली.
...अंगणात सामानांनी भरलेला टेम्पो उभा होता.

आणि बाबांनी त्यांच्यासाठी गाडी बोलावली होती.

आई बाबा आत बसले… तिही बसायला निघाली..

अनं काय झालं कुणास ठाऊक..?

अंगणातल्या प्राजक्तापाशी थांबली ती..


एका सकाळी सकाळी अनीनं केलेला त्या प्राजक्तफुलांचा वर्षाव तिला आठवला..


ती गहिवरली.


त्या उभ्या पारिजाताकडं मनं भरून पाहिलं तिने.


जणू काही तो ही तिच्याकडे असंच बघतोय असं वाटलं तिला..

बाबांच्या नकळत तिनं त्या झाडावर आलेल्या बिया आपल्या बॅगेत टाकल्या आणि गाडीत जावून बसली…


तिचा प्रवास सुरु झाला होता…

एका नव्या दिशेने...
.

.

.

.

क्रमश :        ***************************


कुठे घेऊन जाईल हा  प्रवास तिला..??

पूर्वीची अल्लड सुमी पुन्हा परतेल का..??


कळण्यासाठी वाचत रहा..

पारिजात... गंध प्रेमाचा..!आणि तोवर हा भाग कसा वाटला...  नक्की कळवा.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//