पारिजात... गंध प्रेमाचा...! भाग -11

सुरु झालीय सुमी आणि अनीची भन्नाट लव्ह स्टोरी...!!

आपण वाचत आहात सुमी आणि अनीच्या प्रेमाची  भन्नाट कथा..

पारिजात.. गंध प्रेमाचा...!

(  मागील भागात आपण वाचलं अनीनं सुमीला लिहिलेलं प्रेमपत्र..!

आणि अनुभवली अनीचा नापासाचा रिजल्ट ऐकून सुमीच्या मनाची झालेली तगमग..

आता पुढे.. )

          *************************




" वेडू...! पाण्यात पडलीचस तर पोहायला शिक जरा...! तरच तरून जाशील...!! "
तिच्या गळ्यात हात गुंफुन मालती म्हणाली...
" ताई..! तुला सांगू...
खरंच...
प्रत्येकाला
एक तरी बहीण असावी... तुझ्यासारखी...!!

.....रागावणारी...!
..... खोड्या काढणारी...!
... प्रसंगी ओरडणारी...!
... कधीतरी खेचणारी..!
पण..
... चुकलं तर सावरणारी...!
... प्रेमानं समजवणारी...!
... मायेनं जपणारी...!
खरंच ताई...
प्रत्येकाला एक बहीण असावी...
तुझ्याचसारखी...!!! "
तिला मिठी मारून सुमी म्हणाली...
.
.
.
.

दोन दिवसानंतर...


सायंकाळी आईनं सुमाला दळण आणायला पाठवलं.


" मी नाही गं आई...!
ताईला पाठव ना.. "

ती आळसावत म्हणाली.

" सुमा.. मोठी होताहेस आता.... कामं करायला शिक जरा. "

आई म्हणाली.

" अभ्यास करते ना..?? ब्यांशी टक्के मिळालेत मला..! तूझ्या लाडक्या लेकीला भेटलेत का कधी..?? "

- सुमी.

" हुशार गं माझी पोर..!
आता तिच हुशारी कामात पण दाखवा..!! "

- तिचे गाल ओढत आई.

" ठीक आहे...! "

काहीशी चिडत तिनं सायकल काढली..

अनीचा निकाल ऐकल्यापासून तिची चिडचिड जरा जास्तच वाढली होती.

" सुमा..! "

ताईनं आवाज दिला.

" अगं निघालीच आहेस तर मागच्या गल्लीतल्या रूपाची वही पण नेऊन दे ना.. "


तिच्याकडे वही आणून देत ताई म्हणाली.

सुमानं रागाने तिच्याकडे पाहिले.

" माझी गं लाडाची सुमीs..!
मला घरात सर्वात जास्त कोण आवडत असेल बरं....?? "

तिचं नाक ओढत मालती म्हणाली.

"... पुरे..! नको लावू लोणी..! नेऊन देते मी. "

एक खुन्नस कटाक्ष टाकून ती गेली.

.
.
.
.
.
.

...अर्ध्या एक तासाने ती परतली.. तर घरातून हसण्याचा आवाज बाहेरपर्यंत येत होता.

" मला कामाला पाठवतात नी ह्या घरात हसत राहतात..

खरंच मी ह्यांची मुलगी नाहीये..

ताई म्हणते ना की मला देवळाच्या पायरीवरून आणलंय... कदाचित खरंच आहे   ते..!! "


मनात चरफडत ती आत प्रवेशली ...

पोह्यांचा सुगंध तिच्या नाकापर्यंत पोहोचला..

".. पोहे...? ह्या वेळेला..??नक्कीच ताईची डिमांड असेल..

लाडाची लेक शेवटी...! "


काही बोलायला तोंड उघडणार...
तोच समोर तिला दिवेकर काकू बसलेल्या दिसल्या... आई आणि ताई सोबत...

आणि...

दिसला...

पाठमोरा बसलेला...


.... तिचा अनी ..!!
.
.
.


"... अनी..??  तू..??
तू केव्हा आलास...???
दिवेकर काकू... बोलल्या नाहीत तुम्ही मला..?? "

दळणाचा डब्बा तिथेच टेबलावर ठेवत तिचे नॉनस्टॉप प्रश्न सुरु झाले.

तिच्या चेहऱ्यावर एकाचवेळी आनंद.. आणि आश्चर्य होतं..!


"  अगं..  हा काय आत्ताच येतोय..! झाला असेल अर्धा तास ..

आणि मला तरी कुठे ठाऊक होतं तो येणारेय म्हणून..??

तुमच्या भाषेतलं सरप्राईज का काय म्हणतात तेच दिलं ना अगदी मला...!! "

त्या म्हणाल्या.

सुमीच्या चेहऱ्यावर तो आल्याचा आनंद होता.., त्याबरोबरच त्याच्या नापास होण्याचं दुःखही..!

आता तिनं आपला मोर्चा त्याच्याकडे वळवला...

" अनी..??  कुणाला न कळवता कसा आलास रे..??
आणि मुळात नापास कसा होऊ शकतोस तू...?? "

तिनं त्याला विचारायला तोंड उघडलं....


तसं त्यानं आत्तापर्यंत झाकून ठेवलेला पेढ्यांचा बॉक्स उघडला नी एक पेढा तिच्या तोंडात कोंबला...


"... सुमी...


मेडिकल ला नंबर लागलाय माझा...!! "


तो हसत म्हणाला.

ती आ वासून बघत राहिली.. आणि तिच्यासोबत सगळेच..

तो काय बोलतोय... हेच त्यांना कळत नव्हतं..


" अगं.. डॉक्टर होणार आहे मी...! "

सुमीचं उघडं तोंड बंद करत तो म्हणाला...

तिने डोळ्यांची उघडझाप केली आणि पेढा गिळला..

खरं तर अजूनही ती शॉक मध्येच होती..

" अरे... पण तू तर बोलला होतास की एका विषयात नापास झाला ते...?? "

दिवेकर काकूंनी आश्चर्याने विचारलं..

" हो गं मावशी...! पण मेडिकलचा प्रवेश निश्चित झाल्यावर मला तुला सरप्राईज द्यायचे होते म्हणून तसं सांगितलं..

एक नजर सुमिकडे टाकून काकूच्या गळ्यात हात टाकत तो बोलला.

" तुझा भाचा नापास कसा होईल गं..?? चांगले पंच्याऐंशी टक्के मिळालेत मला.. "

शेवटचं वाक्य बोलतांना त्यानं  पुन्हा सुमिकडे पाहिलं..

कुणास ठाऊक का? पण
नकळत तिच्या डोळ्यात पाणी आलं..

कुणाला दिसू नये म्हणून दळणाचा डबा घेऊन ती आत गेली..

तिच्या पाठोपाठ मालतीही गेली..

दोन मिनिटांनी पाणी प्यायचं म्हणून तोही आत सटकला..

" सुमा .. तू रडते आहेस..?? "

डोळे पुसणाऱ्या तिला बघत मालती विचारत होती..

तेवढ्यात अनी आत पोहचला तशी ती पाण्याचे ग्लास घेऊन बाहेर आली.

" सुमी.. का रडताहेस तू..? "

तिच्या डोळ्यात बघत त्यानं विचारलं..


" माझ्यापेक्षा तुला तीन टक्के जास्त मिळाले ना..? "


नाक पुसत ती म्हणाली.


" सुमी.. म्हणून रडतेस तू..??

तिचा हात हातात घेत तो म्हणाला.


" अगं.. मी म्हंटलं होतं ना..

तुझी ओढ कायम राहील तर निकाल सांगायला स्वतः  येईल म्हणून..!!  आणि बघ आलो की नाही..?? "


-तिचे डोळे पुसत तो..

"... आणि मेडिकलचंही कन्फर्म व्हायचं होतं..


आणि नकटु..

तुझाही रिजल्ट बाकी होताच की..!
सारखा कसा येणार म्हणून ही शक्कल लढवली..!! "


तो सांगत होता.

"... म्हणजे अनी.. माझ्यावरचं तुझं प्रेम खरं आहे...?? "
अबोधपणे तिनं प्रश्न केला.

"शंभर टक्के..!
प्राणप्रिये ..!! "

तिच्या गळ्यात दोन्ही हात गुंफुन तो म्हणाला..

त्याच्या अशा स्पर्शानं शहारली ती..

लाजून नजर खाली गेली..
त्यानं तसाच तिचा चेहरा ओंजळीत पकडून वर केला..

आनंद.. हास्य.. लज्जा... सर्वांचे संमिश्र भाव चेहऱ्यावर होते तिच्या..!

" सुमी... खूप मिस केलं यार तुला..  प्रत्येक क्षणी..."

तिच्या डोळ्यात खोल पाहत तो म्हणाला...

" मी सुद्धा...!! "
ती हळुवार उदगारली...!

"... आणि मी सुद्धा...! "

आत येत मालती म्हणाली." मी सुद्धा तुम्हा दोघांना खूप मिस करतेय... आटोपलं असेल तर चला बाहेर.. "

दोघांचे कान ओढत ती.

" मालती ताई..? "
जरासा भांबावला तो.

" ताईला ठाऊक आहे सगळं..!
तू लिहिलेलं पत्र वाचलंय तिने.. "
ती म्हणाली.

" काय...??
अशी कशी गं सुमी तू....?? आपलं सीक्रेट होतं ना ते..?? "

डोक्याला हात मारत तो म्हणाला.

" ओय रोमियो... माझ्यासमोर काही सिक्रेट बिक्रेट नसतं बरं का..


आणि तसं असेल तर आत्ताच बाहेर सगळ्यांना सांगते...!
सांगू..??  "


तिनी गोड धमकी दिली.


" ताई..ss !  नको...!! "

दोघांनीही तिचे हात पकडले.

तशी तिनं दोघांनाही मिठीत घेतलं..

" असेच रहा आनंदी सदैव...!! "

ती म्हणाली..

तिघे बाहेर आले..

.

.


त्यानं तिच्यासाठी पुस्तकांची थप्पी आणली होती.

" सुमी...
दहावीनंतर सायन्स घे.. मी तूझ्यासाठी  माझे नोट्स आणले आहेत.. "

तो तिला सांगत होता...


तिनं मान डोलावली.


" झाली का तुझी ऍडमिशन..?? "

मालतीने विचारलं.

" नाही गं ताई..! उदया निघेल इथून.नी मग परवा ऍडमिशन..! "

तो म्हणाला.


तो निघाला तर सुमीही मागोमाग दारात आली..


" सुमी.. उदया वाढदिवस आहे माझा..! काय गिफ्ट देशील..?? "

त्यानं हळूच विचारलं...

त्याचा वाढदिवस...! ती आनंदून गेली..!!


" तू म्हणशील ते...!! "


फुलल्या चेहऱ्याने ती..


"बघ हां...? "

- तो.

" अरे.. तुझ्यासाठी तर हा जीवही दयायला तयार आहे... "
तिनं डायलॉग मारला.

" जीव वगैरे नको गं ...??  मला लाडू खूप आवडतात..

माझ्यासाठी करशील बेसनाचे लाडू...??? "

- तो.

" काय ss "
ती ओरडता ओरडता थांबली...

परत दबक्या आवाजात म्हणाली...

" काय...?? "

" आत्ताच तर जीव दयायला निघाली होतीस ना...??  घाबरलीस इतक्यात..?? "

तो हसत म्हणाला.

"... घाबरले कुठे रे...?? मला म्हणायचं होतं की.. काय फक्त लाडूच का?? की पुन्हा काही हवं..? "
उसने हसत ती म्हणाली.

" नकटु...! मला बेसनाचे लाडूच आवडतात. तेच हवेत. "

तिचं नाक हलकेच ओढून तो निघाला..

"... सगळे माझं नाकचं का खेचतात..?? "
मनात प्रश्न आला..

मग ती आपल्या नाकाचा शेंडा उडवून आत गेली...
.
.
.
... स्वयंपाकघर..!

म्हणजे तिची सगळ्यांत न आवडणारी जागा..! असं काही कुणासाठी करून खाऊ बिऊ घालणे.. गावीही नव्हतं तिच्या.. आणि आता अनीने केलेली डिमांड...?

ती त्याला नाहिदेखील म्हणू शकत नव्हती.


रात्री सगळ्यांचे जेवणआटोपल्यावर ती आत गेली. बेसनाचा डबा शोधू लागली.

".. सुमा..
कसली लुडबुड सुरु आहे?"

आई आत येत म्हणाली.

" आई.. अगं बरेच दिवस झालेत... आपण काही गोडाचं केलं नाही.. "

बोलता बोलता तिनं एक पॉज घेतला नी मग म्हणाली,

"... आई, बेसनाचे लाडू करूयात आपण..?? "

एका दमात ती बोलून गेली.

"आत्ता...??
सुमा बरी आहेस ना तू..??"

तिच्या कपाळावर हात ठेवत आई म्हणाली.

"... आणि हे लाडू वगैरे कधीपासून तुला आवडायला लागले..? "

आईचा प्रश्न.

दोघींची कुजबुज ऐकून मालती किचन मध्ये आली.

दरवाज्याला रेलून ती एकेक घुट पाणी पीत दोघींचे संभाषण ऐकत होती.

सुमीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून तिला हसू येत होतं..

हे वेडं प्रेम काय काय करायला शिकवतं..??


काही दिवसांपूर्वी भाजीत तीन तीन चमचे मीठ टाकणारी सुमा आज लाडू वळणार होती..


" आई तूच म्हणतेस ना मी आता मोठी झालीय.. काम शिकली पाहिजेत...
आणि आता करायला घेतेय तर आढेवेढे घेत आहेस..

अगं ताईचं लग्न झाल्यावर मलाच तुझी मदत करावी लागणार आहे.. म्हणून प्रॅक्टिस.."

काय बोलावं न सुचून ओठात जे येईल ते ती बोलत होती..

मालतीला मात्र पाणी पीता पीता ठसका लागला..

" आई.. शिकव गं बाई हिला.. नाहीतर उद्याच माझी सासरी पाठवणी करेल.. "

- मालती.

" कोणाचं काय तर कोणाचं काय..

दे गं तो डबा इकडे..
साधा बेसनाचा डबा कोणता ते माहित नाही नी निघाली लाडू करायला... "

आई एकटीच बडबडत होती.
".. ते पातेलं घे..
ते तुपाचं भांडं ..
परतायला चमचा..? "

एकेक सामग्री आईनं सुमाकडून जमा करून घेतली..

" आई.. आता तू हो बाजूला.. नी फक्त मला सांग..
मी करते... "

पातेलं शेगडीवर ठेवत सुमा म्हणाली.

" अगं.. बेसन करपेल..! "
- आईचा जीव बेसनात अडकला.

" आई.. ती एवढं म्हणतेय तर करू दे ना.. "

डोळ्यांनी तिला आश्वस्त करत मालती म्हणाली.

मग आईच्या तालमीत तिनं साजूक तुपात बेसन भाजायला सुरुवात केली...
.
.
.
शेवटचा लाडू वळून त्यावर तिने काजूचे काप लावले..

" हुशss ! झाले एकदाचे.. "


डब्यात लाडू भरत ती म्हणाली.


" अगं अगं.. आम्हाला थोडी चव तर बघू दे.. "

एक लाडू उचलत मालती म्हणाली.

" ताई.. रात्रीचं गोड खाऊ नये..! बाधतं ते.. "

तिच्या हातातला लाडू डब्यात टाकत सुमा.

" सुमाचं वागणं बघून डोक्याला झिणझिण्या येतात माझ्या..
बाकी लाडू सुरेख वळलेत हो..
चला आता झोपायला..! "

आई झोपायला गेली...
.
.
.
. सकाळी बाबांनी अनिकेत ला नाश्त्याला बोलावलं..


" काय मग अनिकेत.. डॉक्टर होणारेस असं ऐकलं.. "


बाबा त्याला विचारत होते.


" होय काका.. तुमचा आशीर्वाद असू द्या.. "


त्यानं त्यांच्या पायाला स्पर्श केला.


" अरे आशीर्वाद तर आहेतच.. पण तूझ्या मेहनतीचे फळ मिळाले तुला..


अगं सुमा..
अनिकेतला लाडू वाढ ना..!! "


बाबा म्हणाले.

समोर बेसनलाडू बघून मनोमन सुखावला तो..

सुमीने बनवले याची खात्री होती त्याला.

त्यानं एक तुकडा तोंडात टाकला..

आणि त्याची रसना तृप्त झाली.

... आजवर इतका चविष्ट लाडू त्यानं कधी खाल्लाच नव्हता..

" काकूss.. काय मस्त लाडू बनलेत हो..! अप्रतिम चव आहे तुमच्या हाताला..! "


- तो.


" अरे मी नाही सुमीनं केलेत लाडू.. "

- आई.

" जमलेत.. पण  ज sरा जास्तच गोड झालेत रे अनिकेत.. सुमीच्या प्रेमाचा गोडवा उतरलाय त्यात..!! "

त्याला ऐकू येईल अशा हळू आवाजात मालती म्हणाली.

त्यानं सुमिकडं बघितलं..

एक मिश्किल हसू होतं तिच्या ओठांवर...

.

.

.

.

.

क्रमश :


       *****************************


शेवटी आला अनिकेत...

नी जीव भांड्यात पडला. सुमीचा.. माझा... आणि तुमचाही...!


कसा वाटला आजचा पार्ट...??

सांगा तुम्हीच... कमेंट करून..!!

🎭 Series Post

View all