परीघापलिकडले नाते पर्व दुसरे - भाग 9 (मराठी कथा : marathi story)

Parigh, parighapalikadle, nate, marathi, katha, story, kautumbik, kutumba, family, love, relation, Arnav, Riya, Anay, Anshika, spardha


अंशिकाशी बोलणे झाल्यावर थोड्या वेळाने अनय रियाकडे आला आणि बेल वाजवली. बेल वाजताच एकमेकांच्या डोळ्यांत हरवलेले अर्णव आणि रिया भानावर आले . रियाने दार उघडले आणि अनय आत आला. अनयला बघून रियाला आश्चर्य वाटले.

"अंकल, तुम्ही? इथे? या. बसा ना ", सोफ्याकडे हात दाखवत रिया म्हणाली.

रियाचा रडून रडून सुकलेला चेहरा, गालावर सुकलेले अश्रू बघून अनय काय समजायचे ते समजला. त्याला वाईट वाटले. वातावरण थोडे हलके व्हावे म्हणून तो दोघांकडे बघत मिस्किलपणे म्हणाला, " मग , रुसवा गेला की नाही सूनबाईंचा? काय चिरंजीव ?"

अर्णव केसातून हात फिरवत खाली बघत किंचित लाजत हसला.

"म्हणजे अंकल तुम्हाला सगळं आधीच माहिती आहे? तुमची परवानगी आहे आम्हाला?", रियाने आश्चर्याने विचारले.

"हो बेटा, तसा आधी थोडा अंदाज होता. पण आज तर खात्रीच झाली. अन परवानगीचं म्हणशील तर , अर्णवसाठी रियाशिवाय सुयोग्य कोण असणार ? पण आमच्या चिरंजीवांनी काय गोंधळ घालून ठेवला आहे, तू कशी आहेस ते बघायला आलो होतो ". अनय म्हणाला.

"आणि हं , हे घे तुझे आवडते कुकीज. हे आमच्या घराजवळच्या बेकरीचे स्पेशल असतात ना, दुसरीकडे मिळत नाहीत. तुला आवडतात आणि तू आज येणार म्हणून मुद्दाम कालच आणून ठेवले होते. पण जाताना द्यायचे राहून गेले", अनय सॅक मधून कुकीज काढून रियाला देत म्हणाला.

"बाबा, तुमच्या जादूच्या पोतडीतून आणखी काय काय बाहेर निघणार आहे?", अर्णवने हसतच विचारले.

तेवढ्यात दारावरची बेल पुन्हा वाजली. राहुल रियाच्या काळजीने ऑफिस मधून लवकर आला होता.

अनयला बघताच राहुल आनंदाने व आश्चर्याने म्हणाला, "मिस्टर भावे, माझ्याकडे ... अलभ्य लाभ ... अलभ्य लाभ !".

"तुम्ही मला ओळखले?", अनय.

"अहो, तुम्हाला कोण ओळखणार नाही? इतक्या मोठया भावे इंडस्ट्रीज चे मालक आहात तुम्ही. कितीदा तरी फोटो येत असतो तुमचा साप्ताहिकात, मासिकात. आमची तुमच्याशी भेट म्हणजे दुर्लभच", राहुल.

"अहो हे मिस्टर भावे वगैरे नको हं , तुम्ही अनयच म्हणा मला. तसंही एक बाप या नात्यानेच भेटायला आलोय मी तुम्हाला . त्या दृष्टीने बघितलं तर आपण दोघेही सारखेच. नाही का?". अनय.

"हं", राहुल सोफ्यावर बसत म्हणाला.

"रिया बेटा काहीतरी खाण्याची व्यवस्था कर ना सर्वांसाठी", राहुल रियाला म्हणाला.

"काका , मी पार्सल घेऊन येतो ना सर्वांसाठीच. इथे मिळेल ना जवळपास?", अर्णव.

"हो, रियाला आज त्रास नको उगाच. अर्णव घेऊन येईल काहीतरी", अनय.

"ठीक आहे. उजवीकडे वळून थोडया अंतरावर गेल्यावर  एक चांगले हॉटेल आहे",  राहुल.

अर्णव पार्सल आणायला निघून गेला.

"मला खरं तर महत्त्वाचे बोलायचे आहे तुमच्याशी. तुम्हालाही कळले आहेच ना, की रिया आणि अर्णव दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम आहे?", अनय.

"काय, अर्णवलासुद्धा रिया आवडते हे माहीत नव्हतं मला , अर्णवचाही होकार आहे तर?", रियाकडे बघत राहुल थोडं मिस्किलपणे म्हणाला. रिया गालात हसत लाजली.

"दोघांचेही खूप प्रेम आहे एकमेकांवर. आताच अर्णव रियाशी बोलला", अनय. किंचित थांबून तो म्हणाला,
"तर राहुल , तुमचा याबाबतीत काय विचार आहे? मी रियाचा हात अर्णवसाठी मागायला आलो आहे" .

"पण अंकल, मला एक सांगायचं आहे.... अर्णवने आज त्याचे प्रेम व्यक्त तर केले. पण त्याला अजूनही मनातून खूप भीती वाटते. आम्ही नाते नीट टिकवू शकू , एकमेकांना सांभाळू शकू असा आत्मविश्वासच नाहीये त्याला.  नाते बहरण्यासाठी एकमेकांवर आणि स्वतः वरसुद्धा विश्वास असायला हवा... की काहीही झाले तरी आम्ही सांभाळून घेऊ... एकमेकांसाठी उभे राहू. त्याला सतत अशी भीती वाटत राहिली, तर आम्ही आमच्या नात्यात मुक्तपणे कसे राहणार? अशा कच्च्या पायावर मी तरी नातं कसं पुढे नेऊ? आधी त्याच्या मनातली ही भीती निघून जाणे महत्त्वाचे आहे. त्याशिवाय नात्यात गुंतणे मला योग्य वाटत नाहीये", रिया.

"रिया, बेटा, तू म्हणतेस ते बरोबर आहे. खरं सांगायचं तर वरवर पाहता अर्णव ठीक असायचा, त्यामुळे मला कधी जाणवलाच नाही त्याच्या मनातला हा गोंधळ. मलाही आजच कळले की त्याचं भावविश्व इतकं उध्वस्त झालेलं आहे.

तू आतापर्यंत अर्णवला वेळोवेळी समजून घेतले आहेस. जेव्हा जेव्हा त्याच्या मनाची घालमेल सुरू होती तेव्हा तेव्हा तूच त्याला सावरले आहेस. तुमचे एकमेकांवर प्रेमही आहे आणि त्याच्या साठी त्याला समजून घेऊ शकेल अशी तू एकमेव आहेस. म्हणून तू त्याच्या आयुष्यात यावंस अशी माझीही मनापासून इच्छा आहे. तसेच अंशिकालाही तुमच्याबद्दल ऐकून आनंदच झालाय आणि तिचीही संमती आहे. राहुल , तुमचे मत काय आहे , तुम्हाला काय वाटतं?", अनय म्हणाला.

"अनय, मलाही वाटतं की रिया जे म्हणते आहे ते बरोबर आहे. नाते सुरू करताना त्याचा पाया भक्कम असावा. त्यात मोकळेपणा असावा, भीती, चिंता, काळजी अशा गोष्टींचा लवलेशही नसावा. पण मला एक कळले नाही , अर्णवला इतकी भीती का वाटते? असे काय झाले ज्यामुळे अर्णव इतका खचून गेला आहे? तुमची हरकत नसेल तर सांगा , म्हणजे त्यावर काही उपाय शोधता येईल तर बघू या आपण", राहुल.

"खरं म्हणजे अर्णव दोन तीन वर्षांचा होता तोपर्यंत आमचा परिवार सामान्य परिवारासारखाच होता. मी आणि अंशिका दोघेही त्याची काळजी घ्यायचो, त्याच्याशी खेळायचो, त्याला वेळ द्यायचो. पण नंतर हळूहळू आम्ही दोघेही आपापल्या व्यवसायात अधिकाधिक गुंतत गेलो. आमच्या जबाबदाऱ्यांविषयी किंवा कामाच्या वेळांविषयी आमची सतत भांडणे होऊ लागली होती. अर्णवला यापासून दूर ठेवावे , आणि त्याबरोबरच त्याचे शिक्षणही नीट होत राहावे म्हणून मी त्याला बोर्डिंग शाळेत ठेवले. अंशिकाची खूप स्वप्ने होती. माझेही तिच्यावर प्रेम असल्यामुळे तिला ती पूर्ण करू द्यावी म्हणून मीही कशालाच मोडता घातला नाही. नंतर मात्र काही दिवसांतच आम्हा दोघांच्याही व्यवसायाचा पसारा इतका वाढला की आम्ही एकमेकांना वेळही देऊ शकत नव्हतो . यदाकदाचित मिळालाच तर त्यातही आमची कधीकधी भांडणे होत. दोघांपैकी कोणीही आपल्या नात्यासाठी, अर्णवसाठी त्यावेळी माघार घेतली नाही. आणि इथेच आमचे चुकले. मध्यंतरी आम्ही वेगळे राहू लागलो. ती यशाची शिखरे पादाक्रांत करत गेली आणि मीही.

पण इकडे अर्णव दिवसेंदिवस एकटा पडत गेला. दहावीत असताना तर तो खूप डिस्टर्ब झाला होता. तेव्हा प्रिन्सिपॉल सर आणि रिया, आर्यनच्या मदतीनेच तो पुन्हा सावरला होता. पण त्यानंतर त्याच्या मनात इतके वादळ आहे हे मला आजच कळले. त्याचेही एका अर्थी बरोबरच आहे. त्याने कधी आम्हाला नाते नीट सांभाळताना, एकमेकांचे होऊन एकमेकांसाठी जगताना बघितलेच नाहीये. परिवाराचे सुख नीट अनुभवलेच नाही आहे. आमचे नाते तुटताना त्याने खूप जवळून बघितले आहे . दोघांनाही होणाऱ्या वेदनासुद्धा खूप जवळून बघितल्या आहेत त्यामुळे जोडलेले नाते तुटण्याची त्याला भीती वाटतेय ...आमच्या बिघडलेल्या नात्याचा इतका दूरगामी परिणाम होईल याचा कधी मी विचारच केला नव्हता",  अनयने भावुक होऊन  राहुलकडे आपले मन मोकळे केले.

"हं, खरं आहे", राहुल.

"मला आजच हे कळले की अर्णवच्या मनात इतकी भीती आहे की त्यामुळे कितीतरी वर्षांपासून स्वतःचे प्रेम असून सुद्धा त्याने ते व्यक्तही केले नाही, त्यापासून दूर पळत राहिला. आज त्यामुळेच त्याने रियाला नकार दिला होता. इकडे रिया रडत रडत घरी आली आणि तिकडे तो हमसून हमसून रडत होता. इतका की पहावलेही नाही मला. आणि तडक या दोघांनाही समजवावे म्हणून त्याला घेऊन तुमच्याकडे आलो ", अनय.

"हं..... अनय, तसा विचार करता, मला यावर एक उपाय दिसतोय, तो म्हणजे तुम्ही दोघांनी एकत्र येणे", राहुल.

" गैरसमज , हेवेदावे जरी झाले तरी एकमेकांचा दृष्टिकोन समजून घेत ते लवकरात लवकर मिटवून घ्यावे.... आयुष्य खूप अनमोल आहे....  व्यक्ती हयात असताना हे केले नाही तर पुढे पश्चात्तापाची वेळ येऊ शकते. खरंच आयुष्यात जोडीदाराची,  प्रेमाच्या व्यक्तीची सोबत असणं, सहवास असणं यासारखं दुसरं भाग्य नाही .... जे या गोष्टींना पारखे झालेले असतात ना , तेच या या सुखाच्या क्षणांचे मोल सांगू शकतात", बोलता बोलता राहुलचा गळा दाटून आला होता.

"स्वतःच्याच अनुभवावरून सांगतो... आयुष्यात काही फार मोठया गोष्टींची अपेक्षा केली नव्हती मी. साधेसे छोटेसे एक स्वप्न होते माझे.... एक छोटासा सुखी परिवार, बायको मुलांचे प्रेम, आई वडिलांचा आशीर्वाद .... बस एवढेच. पण तेवढेही असण्यासाठी नशीब लागतं.... रियाची आई रसिकाचा सहवास फारच थोडा नशिबी आला माझ्या.  रिया चार वर्षांची असतानाच ती अचानक गेली, मला आयुष्यभरासाठी एकटे सोडून .... आता कितीही आठवणीने व्याकुळ झालो तरीही परत आणू शकत नाही मी तिला.... रियाच्या रूपाने माझ्या ओंजळीत तिने सुख टाकले आहे .... बस तिच्याचकडे पाहून जगतोय आता...", राहुल . अनयने राहुलच्या खांद्यावर थोपटले.

"बाबा s", असे म्हणत रिया त्याला बिलगली. दोघांच्याही डोळ्यातून अश्रू ओघळत होते. काही वेळाने दोघांनीही एकमेकांचे अश्रू पुसले . राहुलच्या डोळ्यात आलेले अश्रू अनयला खूप काही सांगून गेले होते.

स्वतः ला किंचित सावरत राहुल अनयला म्हणाला, "तसेही तुमचे एकमेकांवर प्रेमही आहे आणि आता तर तेव्हा घडून गेलेल्या चुकांची जाणीवही झालेली आहे. मग आताही परिस्थिती सावरायला काय हरकत आहे? म्हणजे मला तरी असं वाटतं की त्यामुळे अर्णवच्या मनात विश्वास निर्माण होईल आणि त्याला सतत भीती किंवा काळजी राहणार नाही . मग त्यानंतर अर्णव आणि रियाला निर्धास्तपणे एकत्र येता येईल", राहुल.

"हं, अंशिकाशीही एकदा बोलावे लागेल. तिलाही तसे वाटत असेल तरच हे जमू शकेल ", अनय.


क्रमशः

*****

© स्वाती अमोल मुधोळकर

हा पार्ट कसा वाटला ते नक्की कळवा.

🎭 Series Post

View all