अनय सकाळचा नाश्ता करत होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला.
"सकाळी सकाळी कुणाचा फोन आलाय ", म्हणून सोनेरी बारीक फ्रेमचा चष्मा नाकावर सरकवत अनयने फोन घेतला.
" हॅलो, अंकल, रिया बोलतेय. कसे आहात तुम्ही?" , रिया .
"मी तर छान आहे बेटा, बोल आज काही खास दिवस आहे का ? नाही , इतक्या दिवसांनी आमची आठवण आली आज तुला , म्हणून विचारतोय. बोल काय म्हणतेस? " हसतच अनय म्हणाला .
"असं काही नाही अंकल , ते... तुम्ही बिझी असता ना, आणि मी पण कामात होते इतक्यात , त्यामुळे बोलणं नाही झालं. ", रिया.
"हं, बरं , बोल ना", अनय.
"अंकल, मी ऐकलं की अर्णव जर्मनीला जाणार आहे एवढ्यात. उद्या अर्णवला ऑफिस ला सुटी आहे ना तर तो जाण्याआधी त्याला भेटायला येण्याचा विचार करत होते" , रिया.
"अरे, वा. मग असं कर ना, घरीच येतेस का ? तेवढीच माझीही भेट होईल तुझ्याशी. मलाही सुटीच आहे उद्या." अनय.
"हो चालेल ना. अंकल , फक्त एक कराल का? अर्णवला सांगू नका की मी येतेय उद्या, तो घरीच राहायला हवा. मी सकाळीच येईन हवं तर. त्याला जाणवू देऊ नका की माझ्या येण्याबद्दल तुम्हाला आधीच माहिती आहे" , रिया.
" हा , हा, हा, हा. सरप्राईज द्यायचंय वाटतं त्याला . Ok बेटा, done. As you say", अनय मोठयाने हसत म्हणाला .
"थँक्स अंकल, मग मी सकाळी साडेआठ पर्यंत आलं तर चालेल?" , रिया.
" हो , हो, ये तू सकाळी तुझ्या सोयीनुसार ", अनय.
"Ok bye अंकल, भेटूच उद्या ". रियाने असं म्हणून फोन ठेवला आणि ही स्टेप सुद्धा पार पडल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर विलसला.
मिष्टीच्या लग्नात भेटल्यानंतर गेल्या कितीतरी दिवसांमध्ये रिया आणि अर्णवची भेट झाली नव्हती. अर्णवला उद्या भेटता येणार या आनंदात रियाला ऑफिसमध्ये आज काही सुचतच नव्हते. कसेबसे काम आटपून ती घरी आली.
फ्रेश होऊन तिने कपाट उघडले. उद्या जाताना हा ड्रेस घालावा की तो , एक एक ड्रेस लावून ती आरशात बघू लागली . हा नको तो... असं करता करता कपाटातले सगळे ड्रेस बाहेर बेडवर पसरले.
राहुल ऑफिस मधून आला तर त्याला रिया बेडवर सगळा पसारा काढून एक एक ड्रेस स्वतः समोर धरून आरशात बघताना दिसली. तो येऊन दारामागे लपून तिची गंमत पहात होता. बराच वेळ झाला तरी तिचे ठरत नव्हते. शेवटी तो आत येऊन म्हणाला, " हं, special meeting ची तयारी चाललीय वाटतं ".
त्याला बघून रिया गडबडून, " बाबा, ते ... मी... उद्यासाठी ड्रेस बघत होते. उद्या अर्णवला भेटायला जाण्याचं ठरवते आहे. अंकल म्हणाले की घरीच ये, त्यामुळे त्यांच्या घरीच जातेय. तुम्ही केव्हा आलात? ".
"हेच पाऊण एक तास झाला असेल मला येऊन , जास्त नाही, तेव्हा तुम्ही आरशासमोर ड्रेस लावून बघत होतात", राहुल हसत हसत म्हणाला.
"ओह ! इतका वेळ झाला मी हेच ठरवत होते?" रिया लाजून हसली .
"हो, मग काय ! अग माझी परी, हे सगळेच ड्रेसेस खूप छान दिसतात तुला. पण हा घे हा जास्त छान दिसेल ", तिथला एक ड्रेस उचलत राहुल म्हणाला. रियाने हसून तो घेतला आणि बाकीचे ड्रेस कपाटात पुन्हा नीट ठेवले.
"माझ्या परीचे लहानपणीचे असे नखरे तर फारसे बघता नाही आले मला. पण आता मात्र मी तिला आनंदात ठेवेन. किती खुश दिसते आहे ती. देवा, ही खुशी अशीच राहू दे ", राहुलला क्षणभर वाटून गेले.
" चल रिया, जेवूया का आता? भूक लागलीय " , राहुलने पोटावर हात फिरवत विचारले.
आत्ता कुठे रियाच्या लक्षात आले, की जेवायला तर काही बनवलेच नाही अजून, तिने डोक्यावर हात मारून म्हटले
" मी बनवते लगेच , बस हम युं गये और युं आये. तब तक आप ये लड्डू खाईए" , डब्यातून लाडू काढून त्याला प्लेट मध्ये देत रिया म्हणाली.
जेवणे आटपून , आवरून रिया झोपायला बेडवर पडली . पण आज आनंदात अन उत्साहात असल्यावर झोप कशी लागणार? अखेर ती आपल्या मनातील भावना व्यक्त करणार होती . काय होईल उद्या? अर्णवला आनंद होईल का? काय रिऍकशन असेल त्याची? त्याचं माझ्यावर प्रेम असेल का? असेल तर तो व्यक्त करेल का? इत्यादी प्रश्न तिला झोपू देत नव्हते. बऱ्याच वेळाने तिचा डोळा लागला.
*****
दुसऱ्या दिवशी सकाळी अलार्म वाजण्याआधीच रिया उठली. भराभर सर्व आटपून ठरवल्याप्रमाणे तयार झाली. पायात चप्पल अडकवताना बाबांना सांगायला विसरली नाही.
"बाबा, मी नाश्ता तयार करून ठेवलाय, वेळ झाली की खाऊन घ्या. डबा सुद्धा भरून ठेवलाय तुमचा, आठवणीने न्या हं. आज मी सुट्टी घेतली आहे. मी जाऊन घरीच येते."
"Ok. शांततेने जा , घाई करू नकोस. आणि मी सांगितलेले लक्षात आहे ना? " राहुल.
"हो , बाबा. तुम्ही काळजी करू नका. मी सगळं नीट मॅनेज करेन. " , रिया म्हणाली अन गाडीची चावी बोटात फिरवत बाहेर पडली.
सकाळी लवकर निघाल्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक ठीकठाक होती. कुठेही फारसे थांबावे न लागता थोड्याच वेळात अर्णवच्या बंगल्यापुढे तिची गाडी पोचली. गाडी पार्क करून गाडीतल्याच आरशात एकदा स्वतः ला बघून ती आत गेली.
"गुड मॉर्निंग अंकल, पेपर वाचणं चाललंय का?", हॉल मध्ये सोफ्यावर बसलेल्या अनयला बघून रिया उत्साहाने त्याला म्हणाली.
"अरे, रिया बेटा, आलीस तू? ये. ये. आता माझ्यासारख्या म्हाताऱ्यांचं आणखी काय सुरू असणार ? कॉफी घेत घेत पेपर वाचतोय. बस ना", समोरच्या सोफ्याकडे निर्देश करत अनय हसत हसत म्हणाला.
"दामूकाका, रियासाठी एक कप कॉफी आणा प्लीज", अनयने दामूकाकांना आवाज देत सांगितले.
"हो , हो , आता आणतो", दामूकाका.
"काहीतरीच काय हो अंकल, अगदी यंग आणि चार्मिंग आहात तुम्ही, आता धावायला लागाल तर आम्हालाही मागे टाकाल", रिया.
"हो की नाही हो दामूकाका? आणि तुम्ही कसे आहात दामूकाका? सगळं नीट चाललंय ना? " दामूकाकांकडे बघत रिया त्यांना म्हणाली.
"हो ग पोरी, सगळं ठीक आहे. ही घे गरमागरम कॉफी." दामूकाका कॉफी देत म्हणाले.
"थँक्स काका, आम्ही होस्टेलला असताना तुमची, आठवण काढल्याशिवाय अर्णवचा दिवस जात नसे. माझे दामूकाका पास्ता छान बनवतात, सँडविच छान बनवतात, काही न काही सांगत राहायचा तुमच्याबद्दल ", रिया घाईने कॉफी घेत घेत म्हणाली. तिला आता अर्णवला भेटण्याची घाई झाली होती. तिची ती घाई अनयच्या नजरेतून सुटली नाही.
"अंकल, ते... अर्णव कुठे दिसत नाही?" रिया अडखळत हळूच म्हणाली.
"हो, हो, मला माहिती आहे , तुला त्याला भेटायची घाई आहे. वरती टेरेस गार्डन मध्ये आहे तो. जा तू तिथेच. मी काहीही सांगितले नाहीये त्याला तू येते आहेस ते", अनय हसत म्हणाला.
"Ok आलेच मी भेटून", म्हणत रिया लगेच जिन्याने टेरेस गार्डनकडे गेली सुद्धा.
टेरेस गार्डन मधले दृश्य बघून तर ती हरखूनच गेली. टेरेसच्या एका बाजूला निळा आयताकृती स्विमिंग पूल होता. तिथपासून ते टेरेसच्या दुसऱ्या बाजूपर्यंत रांगेने एकसारख्या मोठया कुंड्यांमध्ये रंगीबेरंगी फुलांनी बहरलेली फुलझाडे ठेवलेली होती. त्या कुंड्यांच्या रांगेसमोर हिरवळीचा गालिचा होता . त्यावर पांढऱ्या रंगाचे एक छोटे टेबल आणि चार खुर्च्या ठेवल्या होत्या. दुसऱ्या बाजूला व्यायाम करण्यासाठी ट्रेडमिल, सायकल, डंबेल्स इत्यादी काही जिम मधली उपकरणे ठेवली होती.
तिथे बऱ्याच वेळपासून व्यायाम करत असलेला अर्णव तिला दिसला. फिक्या निळ्या रंगाचे स्लीव्हलेस स्पोर्ट टी शर्ट आणि डार्क निळ्या रंगाचे ट्रॅक पॅन्ट घातलेला अर्णव योगा मॅट पसरून त्यावर शीर्षासन करत होता. त्याचे डोके खाली नि पाय वर होते . त्याला तसे बघून रियाला खुदकन हसू आले. ती हळूच काही न बोलता त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली.
फिक्या गुलाबी रंगाचा शुभ्र एम्ब्रॉयडरी असलेला कुर्ता , पांढऱ्या शुभ्र रंगाचे लेगिंग... गळ्याभोवती पांढरी शिफॉन ची ओढणी stylish पद्धतीने घेऊन तिची एका बाजू पुढे तर एक मागे सोडलेली... गळ्यात नाजूकशी चेन आणि खड्यांचे पेंडंट... कानात तसेच मॅचिंग नाजूक स्टडस् , मोकळे असलेले पण नीट पिन केलेले खांद्यापर्यंत असलेले केस ... हलकासा मेक अप...साधीच, पण खूप सुंदर दिसत होती रिया.
"आता दिवसा सुद्धा रिया दिसायला लागलीय का मला? स्वप्नात दिसत होती इथपर्यंत ठीक होतं... पण ... पण ही मला अशी उलटी उभी असलेली का दिसते आहे ?", अनय किंचित हसत पुटपुटला. सकाळी सकाळी हिरवळीवर उमललेल्या सुंदर गुलाबी फुलासारखीच भासली त्याला रिया.
"कारण तुम्ही उलटे उभे आहात मिस्टर अर्णव" , रिया खळखळून हसत म्हणाली. त्या हास्यातून मोती विखुरल्याचा अर्णवला भास झाला...
तिचे बोलणे आणि खळखळून हसणे ऐकून अर्णव गडबडला आणि धपकन खाली पडला.
"तू? तू खरच आहेस इथे? इथे काय करते आहेस तू? " अर्णवला तर काही सुचनासेच झाले अन पटकन उठून बसत त्याने विचारले.
"तू इथे होतास म्हणून अंकलनी मला इथे पाठवले. पण तू तर ... , काय कसे वाटले सरप्राईज? " , रिया पुन्हा खळखळून हसत म्हणाली.
"खूपच सरप्राईजिंग होते ....
तू थांब, मी लगेच आलो फ्रेश होऊन, तोपर्यंत बस ना तिथे ", टॉवेल ने चेहरा पुसत, केसांतून हात फिरवत, हसतच अर्णव म्हणाला. हाताने तिला हिरवळीवरच्या टेबल खुर्चीवर बसण्यास दर्शविले.
अर्णव धावतच खोलीत गेला. रिया खरच त्याच्या डोळ्यासमोर होती यावर अजूनही त्याचा विश्वासच बसत नव्हता. तिला बघून त्याची तर विकेटच उडाली होती. दीर्घ श्वास घेत तो मिनिटभर तसाच उभा राहिला. नंतर फ्रेश होऊन, कपडे बदलून तो टेरेस गार्डन मध्ये येत होता.
फिका लेमन यलो रंगाचा लिनन चा फुल स्लीव्ह शर्ट, डार्क निळ्या रंगाची जीन्स, क्लीन शेव्हड हातात घड्याळ आणि चेहऱ्यावर आनंदाने आपसूकच आलेली स्माईल... आधीच सेट केलेल्या ओल्या केसांवर पुन्हा हात फिरवत येत असलेल्या अर्णवकडे बघताना रियाच्या डोळ्यांची पापणीसुद्धा लवत नव्हती.
हिरवळीवर ठेवलेल्या पांढऱ्या टेबल जवळ रिया बसलेली होती त्यासमोरची खुर्ची ओढून बसला.
"बोला रिया मॅडम, आज तर अगदी जबरदस्त सरप्राईज दिलेस तू !", अर्णव गालात हसत म्हणाला.
"हो ना. तू जर्मनीला जातोय असं ऐकलं म्हणून जाण्याआधी एकदा भेटावसं वाटलं म्हणून आले. एकदा गेलास आणि तिकडचाच झालास तर, कोणी सांगावं ना? मग काय आमची आठवण पण येणार नाही तुला", रिया खट्याळपणे म्हणाली.
"काहीही म्हणतेस का ग? एक वर्षाचा प्रॉडक्ट डिझाइनचा कोर्स आहे माझा, तो झाला की येईन परत. तू आलीस हे छान केलंस हं. वेळ मिळेल तसा जाण्याआधी सर्वांना भेटण्याचा विचार होताच माझा", अर्णव.
"अर्णव, खरं सांगायचं तर थोडं बोलायचं होतं तुझ्याशी", रिया थोडं गंभीर होत म्हणाली.
अर्णवचे हृदय आता जोरात धडधडायला लागले होते. त्याचा चेहरा एकदम गंभीर झाला. "काय बोलायचंय रियाला माझ्याशी ? मला जे वाटतय तसं तर नसेल ना? रिया, नको ना ग बोलूस . राहू दे तुझ्या मनातच. मी नाही सांभाळू शकणार ग स्वतःला", अर्णव मनातच विचार करत होता. नकळत त्याचा हात त्याच्या हृदयाशी गेला.
"रि... रिया, क ...क्काय बोलायचंय तुला माझ्याशी?" , अर्णव अडखळत म्हणाला. तो अजूनही आपल्या विचारातच होता.
"अर्णव, मला तुला काही सांगायचंय..." , रिया खाली बघत दोन्ही हातांनी ओढणीच्या टोकाशी खेळत, लाजत एक एक शब्द उच्चारत होती.
इकडे अर्णवची नजर तिच्याकडे आणि कान तिच्या बोलण्याकडे एकवटले होते . तिच्या एक एक शब्दाची त्याचे हृदय जणू वाटही पाहत होते आणि तिने बोलू नये असेही वाटत होते. " बोलू नकोस ना, मला माहिती आहे ते आधीच. फार पूर्वीच कळलंय मला तुझ्या डोळ्यांतून... तुझ्या माझी काळजी घेण्याच्या प्रयत्नातून...
म्हणूनच दूर राहिलो ग मी स्वतः हून...
अजूनही नाही जमत ग मला ते स्वीकारणे...
न मला ते स्वीकारणे जमते...आणि न त्यापासून दूर पळणे मला जमते ...
लहानपणा पासून नेहमी तूच सोडवायचीस ना माझे प्रॉब्लेम्स ... पण हा प्रॉब्लेम तर सांगूही शकत नाही मी तुला ..." त्याचे मन आक्रोश करत होते ....
जब जब तेरे पास मैं आया
इक सुकून मिला
जिसे मैं था भूलता आया वो वजूद मिला
जब आए मौसम ग़म के तुझे याद किया
हो जब सहमे तन्हांपन से तुझे याद किया
हम्म दिल संभल जा ज़रा
फिर मोहब्बत करने चला है तू
दिल यहीं रुक जा ज़रा
फिर मोहब्बत करने चला है तू
ऐसा क्यूँ हुआ
जानू ना मैं जानू ना
हो दिल संभल जा ज़रा
फिर मोहब्बत करने चला है तू
दिल यहीं रुक जा ज़रा
फिर मोहब्बत करने चला है तू
अर्णवच्या चेहऱ्यावर भावना दाटून येत होत्या....
" खूप दिवसांपासून सांगावेसे वाटत होते, पण हिंमतच होत नव्हती . अर्णव, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.... कसे ... केव्हापासून ... काही कळलेच नाही . पण माझ्या मनावर तुझेच अधिराज्य आहे.... तुला समजून घेता घेता माझे मन कधी तुझे झाले कळलेच नाही.... तूच माझ्या स्वप्नातील राजकुमार आहेस.... माझी आयुष्यभरासाठी साथ देशील का? ....माझा होशील का ? .....माझ्याशी लग्न करशील का अर्णव?..... तुला मी आवडते का? " रियाने बोलून झाल्यावर नजर वर करून अर्णवकडे बघितले.
अर्णवचे डोळे आता अश्रूंनी भरून आले होते. एकीकडे त्याला आनंदही होत होता आणि दुसरीकडे वाईटही वाटत होते. शेवटी ज्याची भीती वाटत होती तेच झाले. काय करावे , काय बोलावे त्याला काही सुचेना . काहीही न बोलता तो खुर्चीतून उठून मागे वळून दोन चार पावले पुढे गेला आणि पाठमोरा उभा राहिला.
"नाही रिया , मी नाही करू शकत हे", अर्णव कापऱ्या आवाजात म्हणाला.
"अर्णव , माझ्याकडे बघ ना. खरंच तुझं माझ्यावर प्रेम नाही का?" रियाचा स्वर आता जडावला होता.
अर्णव अजूनही पाठमोराच उभा होता. नाही म्हणताना त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू ओघळत होते आणि ते त्याला रियाला दिसू द्यायचे नव्हते. तो न वळता, तसाच काही न बोलता उभा राहिला.
थोडा वेळ शांततेत गेल्यावर...
" पण मग गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक वेळी जेव्हा केव्हा आपण सगळे भेटलो , तेव्हा तेव्हा मला तुझ्या नजरेत ते वेगळेपण का जाणवले जे इतर कुणाच्याही नजरेत कधी जाणवले नाही? तुझ्या चेहऱ्यावरची आतुरता कधीच का लपली नाही माझ्यापासून? का नेहमी असं वाटायचं की तू माझी वाट बघत असतोस? का माझ्या मदतीसाठी नेहमी धावून येतोस? मला कुणी वाईटसाईट बोललेले तुला का सहन होत नाही?" , रिया न राहवून म्हणाली.
"कॉलेजमध्ये असताना जेव्हा 'तू ही रे ...तेरे बिना मै कैसे जियुं...' हे गाणं गायला होतास तेव्हा इतका दर्द कसा आला तुझ्या गाण्यामध्ये? त्या क्षणाला असं का वाटलं मला , की तू मलाच साद घालतो आहेस... का थांबला होतास मी प्रेक्षकांमध्ये येऊन बसेपर्यंत?", रिया चा स्वर जडावलेला होता.
अर्णव काहीही न बोलता फक्त ऐकत होता.
"इट्स ओके अर्णव. ...
तू तुझा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेस. माझी काही जबरदस्ती नाही. मला वाटले होते कदाचित तुझे सुद्धा माझ्यावर तितकेच प्रेम आहे जितके माझे तुझ्यावर. पण तुझ्या थोडयाफार shy स्वभावामुळे कदाचित तू बोलू शकला नसशील. बाबांनी कित्येकदा मला लग्नासाठी मुलगा बघण्यासाठी विचारले. पण त्यांना सध्या नको , आता नको म्हणत मी नकार देत राहिले. तुझी, तू बोलण्याची , मन मोकळं करण्याची वाट बघत राहिले. कदाचित माझीच चूक झाली असेल तुला समजण्यात... खरंच मी ओळखू शकले नाही का तुला?...." , रिया .
अर्णव गप्पच होता.
ठीक आहे अर्णव, आपण आयुष्यात एकत्र येऊ शकत नसू, तरी तू तुझ्या आयुष्यात आनंदी राहावंस एवढीच माझी इच्छा आहे..... मी माझे प्रेम फक्त मनाच्या कुपीत जपून ठेवेन.... माझा तुला काहीही त्रास होणार नाही याकडे मी लक्ष ठेवेन .....आणि तू म्हणशील तर तुला दिसणारही नाही.... यापुढे तुझ्या आयुष्यात मी अजिबात ढवळाढवळ करणार नाही.....
Always stay happy in your life, my sweetheart.
थँक्स. येते मी. गुडबाय ", रियाच्या अश्रूंनी कधीच डोळ्यांची साथ सोडून गालावर धावायला सुरवात केलेली होती.
रडत, डोळे पुसत रिया तिथून खाली येऊन कोणाशीही न बोलता पटकन बाहेर पडली आणि गाडीत बसून परत निघाली.
बंगल्याबाहेरच्या हिरवळीवर सकाळच्या उन्हात फिरणाऱ्या अनयला रिया रडत, डोळे पुसत जाताना दिसली. काय झाले असावे अशी काळजी वाटून तो तडक अर्णवला बघायला टेरेसवर गेला. अर्णव तिथे नव्हता. अनय टेरेसला लागूनच असलेल्या अर्णवच्या खोलीत गेला. बघतो तर काय? अर्णव उशीमध्ये डोके खुपसून हमसून हमसून रडत होता.
"तुला जे वाटलं ते सगळं खरच आहे ग रिया. अगदी बरोबर ओळखतेस तू मला. खूप आतुरतेने वाट बघायचो मी तुझी. तू येईपर्यंत , दिसेपर्यंत जीवाला चैन पडायची नाही माझ्या. अजिबात सहन होत नाही मला तुला कोणी काही बोललेले. नेहमीच हरवतो मी तुझ्या दिलखुलासपणे हसण्यामध्ये. असं वाटतं, हा क्षण इथेच थांबावा आणि तुझं हसणं असंच माझ्या मनात उतरत राहावं. पण तुझं माझ्यावरचं प्रेम लक्षात यायला लागलं तसं मी घाबरलो आणि दूर राहायला लागलो. कसे सांगू तुला , सांग ना. नाही सांगू शकत ग मी.... नाही स्वीकारू शकत तुझे प्रेम... मी नाही सांभाळू शकलो तर? तुला त्याच्या वेदना नाही देऊ शकत मी.... खूप खूप प्रेम आहे ग माझे तुझ्यावर ...", मोबाइल मधल्या रियाच्या फोटोकडे बघत पाठमोरा असलेला अर्णव रडत रडत म्हणत होता.
अनयने अर्णवच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत विचारले, "अर्णव, बाळा , काय झालं? इथे तू रडतो आहेस तिकडे रियासुध्दा रडत गेलेली बघितलं मी. आली तेव्हा कशी हसतखेळत होती. काय बोलणं झालं तुमच्यामध्ये असं?
"बाबा, रियाने आज ... ", अर्णव.
"रियाने आज तिचे तुझ्यावर चे प्रेम कबूल केले , हेच ना?" , अनयने विचारले.
"हो", अर्णव.
"पण मग ती अशी रडत का गेली? माझ्याशी न बोलता जात नाही ती अशी कधी", अनय.
"कारण ती डिस्टर्ब होती. मी तिचे प्रेम स्वीकारायला नकार दिला" . अर्णव पुन्हा स्फुंदत म्हणाला.
"पण तुझे तर तिच्यावर खूप प्रेम आहे ना? मग नकार का दिलास?", अनय.
"तुम्हाला कसे कळले बाबा?", अर्णव आश्चर्याने म्हणाला.
"बेटा, मी बाप आहे तुझा. हे केस उगाचच पांढरे नाही झालेत. खूप आधीच कळले होते मला की तुम्हा दोघांचेही एकमेकांवर प्रेम आहे. अन आता तर तुझ्या अश्रूंनी त्याची ग्वाही दिलेलीच आहे. ", अनय.
"हो, खूप प्रेम करतो मी तिच्यावर . गेल्या कित्येक वर्षांपासून.... आणि तिचेही माझ्यावर प्रेम आहे हेसुद्धा कळले होते मला.... पण ही वेळ येऊ नये म्हणून जाणूनबुजून तिच्यापासून दूर राहत होतो.... तिला जास्त भेटत नव्हतो ... तिच्यासोबतच्या मैत्रीच्या क्षणांच्या आठवणीत खुश राहण्याचा प्रयत्न करत होतो .... पण आजपर्यंत निदान कधीतरी तिला दुरून बघू तरी शकत होतो.... बोलू शकत होतो....पण आज ती निघून गेली बाबा.... पुन्हा दिसणारही नाही म्हणाली ....", अर्णव रडत म्हणाला.
"तुझे प्रेम असूनही तू का नकार दिलास अर्णव? असं कोणतं कारण आहे ज्यामुळे तू तिचे प्रेम स्वीकारले नाहीस?" अनयने काळजीने विचारले.
"मला खूप भीती वाटते बाबा.... मला नात्यांमध्ये, परिवारामध्ये राहण्याची सवय नाही.... एकमेकांना कसे समजून घ्यायचे , सांभाळून घ्यायचे हे सुद्धा मी कधीच शिकलो नाही .... खूप भीती वाटते मला जोडलेले नाते तुटण्याची.... नाते तुटताना खूप जवळून बघितले आहे मी.... त्याचा, दुराव्याचा, दोघांनाही होणारा त्रास , वेदनासुद्धा खूप जवळून बघितल्या आहेत.... मी हे नातं, हे प्रेम सांभाळू नाही शकलो तर? ....
आयुष्यभर तिला साथ नाही देऊ शकलो तर?... आम्ही एकत्र नाही राहू शकलो तर ? .... तिच्या वेदनांचे मला कारण बनायचे नाही.... मी तिला दुःखात नाही बघू शकत. जवळ येऊन दुरावणे हे जास्त कष्टदायक असते ना?
मला हिंमतच झाली नाही बाबा तिचे प्रेम स्वीकारण्याची.... पण .... पण .... मला तिला गमवायचेही नाही बाबा.... सांगा ना, मी काय करू? तिने आपले प्रेम व्यक्त करण्याची मी एकीकडे वाटही बघत होतो, आणि दुसरीकडे त्या क्षणापासून दूरही पळत होतो... आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो तिचेही आपल्यावर प्रेम असणे ही किती दुर्मिळ आणि भाग्याची गोष्ट आहे ना...
ती माझी वाट पाहत राहिली... मी स्वतः हून व्यक्त करण्याची ... मी व्यक्त तर करू शकलो नाहीच ... पण तिने व्यक्त करूनही स्वीकारू सुद्धा नाही शकलो मी....
खूप मनापासून प्रेम करतो मी तिच्यावर.... तिच्याशिवाय राहूही नाही शकणार मी....ती मला सोडून गेली तर, हीच भीती वाटते मला ....ती मला सोडून गेली तर.... तर मी नाही जगू शकणार तिच्याशिवाय....मी हरलो बाबा... मी हरलो.... सगळ्या गोष्टींत अव्वल असणारा तुमचा अर्णव .... प्रेमात, आयुष्याच्या लढाईत मात्र हरलाय बाबा! .... ", अर्णवचे अश्रू क्षणाचीही उसंत घेत नव्हते.
क्रमशः
© स्वाती अमोल मुधोळकर
*****
कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव.
कथेचा हा पार्ट कसा वाटला ते नक्की कळवा. वाचकांचे अभिप्राय हीच लेखकाची प्रेरणा .
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा